ग्रंथ माझ्या आयुष्यात...
*ग्रंथ माझ्या आयुष्यात...*
~~~~~~~~~~~~~~
>> माझ्या वडिलांना वाचनाची बिलकुल आवड नसली तरी माझ्या आईला मात्र वाचनाची भयंकर आवड होती. हिंदीतील व मराठीतील धार्मिक ग्रंथ ती नियमित वाचत असे आणि त्यातील कथानके मला माझ्या बालपणी सांगत असे. त्यामुळे मला स्वतः वाचून कथानके समजून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली.
>> माझ्या चौथीच्या वर्गापर्यंत माझे रामविजय कथासार, पांडवप्रताप कथासार, महाभारत, स्त्री-सुबोधिनी, प्रेमसागर, इत्यादी सारखे मराठी/हिंदी ग्रंथ वाचून झाले होते. आणि माझी वाचनभूक वाढू लागली होती. 1965 मध्ये मी पाचवीत गेलो आणि नागपूर तरुण भारत चा नियमित वाचक झालो. त्यावेळी ग.त्र्यं.माडखोलकर हे संपादक होते. त्यांचे संपादकीय व रविवारच्या विविध विषय विभाग या पुरवणीतून मी माझी वाचनभूक भागवत असे. तरुण भारत मधूनच मला महाराष्ट्र टाईम्स ची ओळख झाली. पण आमच्या आमगांव, गोंदिया येथे मटा येत नसल्याने मी नागपूर येथील बर्डीवरील हनुमान गल्लीत स्थित एका न्यूजपेपर एजन्सीला पत्र लिहून रविवारचा मटा मला पोस्टाने मिळू शकेल काय, म्हणून विचारणा केली. आणि आश्चर्य म्हणजे त्या न्यूजपेपर एजन्सीच्या मालकाने मला दोनेक वर्षे रविवारचा मटा न चुकता निशुल्क पाठवला. मटातील व तभातील जाहिराती पाहून मी 1968 च्या दरम्यान ललित मासिकाचा वर्गणीदार-वाचक झालो, तो आजतागायत. ललित मधील जाहिराती वाचून मला आवडणारी काही पुस्तके पोस्टाने मागवू लागलो, कारण आमच्या आमगांव, गोंदिया येथे ती पुस्तके मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यापैकी काही पुस्तके अशी : इंद्रायणी काठी, सागरा प्राण तळमळला, रामनगरी, माणूस मोठा जिद्दीचा, स्मृतीचित्रे, गीतरामायण, कमला(गद्यानुवाद), वगैरे.
शिवाय प्रकाशित मन या दयानंद वर्मा संपादित व दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या हिंदी मासिकातील जाहिरात बघून डाॅ.राधाकृष्णन यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकांच्या हिंदी अनुवादाची पाच पुस्तके, .... इत्यादि वाचनाचा मी जणू सपाटाच लावला होता.
>> याच दरम्यान मी पुणे येथील गीता धर्म मंडळाचे गीतादर्शन, मुंबई येथील अवधूत शास्त्री यांचे धर्मभास्कर, बडोदा येथील पुरुषार्थ, नागपूरच्या ब.स.येरकुंटवार यांचे प्रज्ञालोक, पुणे येथील मसाप चे मसापत्रिका, मुंबई येथील मराठी संशोधन पत्रिका, नागपूर येथील वा.वि.मिराशी प्रणित विदर्भ संशोधन मंडळाचे वार्षिक, हैदराबाद येथील पंचधारा, अशा विविध नियतकालिकांचा वर्गणीदार-वाचक झालो. मला जणू वाचनाचा भस्म्यारोगच झाला असे म्हणावे लागेल व तो रोग अजूनही लाईलाजच आहे. आज माझ्याकडे मराठी, हिंदी व इंग्रजी मिळून एकूण 56 नियतकालिके नियमित येत असून मी या नियतकालिकांचा वैयक्तिक वर्गणीदार-वाचक आहे. माझ्या वैयक्तिक ग्रंथ संग्रहात मराठी, हिंदी व इंग्रजी मिळून सुमारे दहा हजार पुस्तके/ग्रंथ आहेत.
>> अशाप्रकारे नियतकालिके व ग्रंथ/पुस्तके यांचे माझ्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या ग्रंथांनीच मला घडवले आहे, माझ्या बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक क्षेत्रा(?)तीलही ग्रंथांचे स्थान म्हणजे माझे जणू जीवनोद्देशच झाले आहे. सप्टेंबर 2008 ते फेब्रुवारी 2012 या माझ्या जीवनातील, अपघात श्रृंखला, कँसर, शस्त्रक्रियेची नऊ "पारायणे" घडलेल्या अतिशय संकटमय काळात मला माझ्या पत्नीसोबतच माझ्या या ग्रंथवाचनाने/ग्रंथवेडा(!)ने व माझ्या कवितेनेच मला पूर्णतः सकारात्मक साथ दिली आहे व देत आहे.
>> सारांशाने सांगावयाचे तर ग्रंथ आणि कविता माझ्या आयुष्यात आले नसते तर मी केव्हाचाच मोडून पडलो असतो. आज तीन मोठे जीवघेणे अपघात, या अपघातात डावा पाय अंशतः व डावाच हात पूर्णतः विकलांग होणे, किडनी कॅन्सरने माझी उजवी किडनी मागून घेऊन जाणे, या सर्वांपायी नऊ शस्त्रक्रियांचा अनुभव घेणे या बाबी(?) झेलूनही आज वयाच्या 68व्या वर्षीही मी ताठ उभा(!) आहे, याचे मोठ्ठे श्रेय माझ्या पत्नीसोबतच माझ्या जीवनातील ग्रंथांना सुद्धा आहे. अशी ही माझी ग्रंथजीवी जीवनगाथा. (#425)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(22.04.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment