प्राक्कथा : एक संक्षिप्त आकलन (प्रकाशित, तत्रैव)
*प्राक्कथा : एक संक्षिप्त आकलन* (प्रकाशित, तत्रैव)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
@ॲड.लखनसिंह कटरे
----------------------------------------------------------
(1) प्राक्कथा : सामाजिक आणि सांस्कृतिक भूतकाळाच्या विश्लेषणाच्या संदर्भात ऐतिहासिक वाटणारी पण वाङ्मयाच्या कालातीत मूल्याच्या पुरस्काराच्या संदर्भात इतिहासनिष्ठ नसलेली कथा, अशी प्राक्कथेची एक सुटसुटीत संकल्पना व्यक्त केली जाते. (वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना कोश : प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके व इतर)
(2)प्राक्कथा आणि लोकसाहित्य : प्राक्कथा ही स्वयंभू नसते, तर मानवी मनाच्या गूढ गुहेत दडून बसलेल्या आदिम इच्छा-आकांक्षांचे ते धार्मिक कथा-कहाण्यांतील पात्रांवरील/घटनांवरील प्रतीकात्मक प्रत्यारोपण असते. हे प्रत्यारोपण सर्वप्रथम लोककथेतून अवतरते व अशाप्रकारे लोकसाहित्य या आदिम साहित्यप्रकाराची रचना-निर्मिती होत असते. अर्थात प्राक्कथेचे बीज सर्वप्रथम लोकसाहित्यातूनच उद्भवते असे आढळून येते. लोकसाहित्यात केवळ प्राक्कथेची बीजे आहेत असे नसून त्यात शक्यताच शक्यता बीजरूपाने अस्तित्वात आहेत. फरक इतकाच की लोकसाहित्य सहज आहे तर प्राक्कथेला आदिबंधात्मक असा बौद्धिक व मानसिक आधार आहे/असतो.
(3) कार्ल गुस्ताव युंग (1875-1961) यांच्या मते दिव्यकथा (प्राक्कथा, मिथक) हे मूलतः मानसिक घटित असते. त्यातून, पूर्वी कधीही न पाहिलेले आणि पाहण्याची इच्छा नसलेले, आत्म्याचे स्वरूप व्यक्त होते. आदिमानवाला जे प्रत्यक्षात दिसते त्याचे वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण नको होते, तर त्याला बाह्य ऐंद्रिय अनुभव आणि आतील मानसिक घटिते यांच्यातील सूत्र शोधायचे होते. ... दिव्यकथात्म निसर्ग-प्रक्रिया या केवळ वस्तुनिष्ठ घटितांची रूपकात्मक अभिव्यक्ती नव्हेत. सायकीमध्ये घडणाऱ्या अबोध नाट्याची ती प्रतीकात्मक अभिव्यक्ती असते. युंग यांनी आदिबंध हे द्विध्रुवात्मक असतात असे दाखविले आहे. त्याला एक काळी बाजू असते, तशीच दुसरी उजळ बाजू असते. हे आदिबंध प्राक्कथांमध्ये, परीकथांमध्ये, धार्मिक परंपरांमध्ये आणि विश्वरहस्यांमध्ये पुनःपुन्हा आलेले असतात. (तत्रैव)
(4) प्राक्कथा आणि रामायण : रामायणचा मूळ लेखक/रचयिता वाल्मिकी असला तरी संपूर्ण जगात रामायणचे सुमारे 300+ भिन्नभिन्न(?) कथांतर (प्राक्कथा) असलेले रामायण सापडत असल्याचे तद्विषयक संशोधकांचे म्हणणे आहे. संघदास यांचे जैनग्रंथ 'वसुदेव हिन्दी' मध्ये सीतेच्या जन्माची एक वेगळीच कथा/प्राक्कथा सांगितली आहे. त्यानुसार विद्याधर माया जेव्हा आपली कन्या मन्दोदरी हिला विवाहात रावणाला देण्यासाठी तयारी दर्शवतो तेव्हा ज्योतिषी भविष्यवाणी करतात की, या विवाहातून जन्माला येणारे पहिले अपत्य हे रावणाच्या वंशाचा विनाश करेल. तरीदेखील मन्दोदरीवर मोहित असलेला रावण एका अटीवर हे लग्न करतो की, तो आपल्या पहिल्या अपत्याचा त्याग करेल. तेव्हा पहिले अपत्य म्हणून एका कन्येचा जन्म झाला असता, रावण त्या कन्येला एका 'पात्रा'त बंद करून ते पात्र सुदूर प्रदेशात नेऊन गाडून येतो. परंतु संयोग असा की, तो सुदूर प्रदेश म्हणजे राजा जनकाचा राज्यप्रदेश असतो. नंतर ती कन्या (सीता) राजा जनक यांना मिळते व तिला ते आपली कन्या मानून तिचे पालनपोषण करतात.
तसेच गुणभद्र यांच्या 'उत्तरपुराण' मधील कथे/प्राक्कथेनुसार रावण हा अलकापुरी चे राजा अमिताभवेग याची कन्या मणिवती, हिच्या तपात विघ्न उत्पन्न करतो. त्यामुळे ती कन्या क्रोधित होऊन प्रतिज्ञा करते की, ती रावणाच्या कन्येच्या रूपात जन्म घेऊन बदला घेईल. तदनंतर ती मन्दोदरीच्या उदरी जन्म घेते. परंतु ज्योतिषी तिला रावणासाठी अशुभ असल्याचे सांगतात. अखेर मारीच त्या कन्येला एका 'पात्रा'त बंद करून मिथिला प्रदेशात नेऊन तिथे गाडून टाकतो. तिथे ती तेथील शेतकऱ्यांना मिळते व ते शेतकरी त्या कन्येला राजा जनकाकडे नेऊन देतात. हीच ती सीता.
सीतेच्या जन्माच्या जवळपास अशाच कथा (प्राक्कथा) तिब्बती रामायण, चीनी तुर्किस्तान ची खोटानी रामायण तथा संस्कृतातील 'दशावतार चरित' मध्ये सापडतात. (तीन सौ रामायण -- एन.के.रामानुजन)
(5) डाॅ.म.सु.पाटील हे 'आदिबंध' ही प्राक्कथांच्या आविष्करण/निर्मितीसंदर्भातील संकल्पना स्पष्ट करताना म्हणतात की, 'हे आदिबंध आशयदृष्ट्या पूर्वनियत नसतात. त्यांचे रचनात्मक अंग मात्र बरेचसे पूर्वनियत असते. ती एक आविष्काररूपाची शक्यता असते. आविष्कार आनुवंशिक नसतो. त्याचे रचनात्मक अंग मात्र आनुवंशिक असते. हे आकृतिबंध म्हणजे व्यक्तीला नव्हे तर त्याच्या पूर्वजांना आलेल्या एकाच प्रकारच्या अगणित अनुभवांच्या रेखा होत. त्यांना रंगरूप प्राप्त होते ते वैयक्तिक जीवन जगताना. असे जगतानाच आदिबंध हे आशयपूर्ण होतात. हा आशय व्यक्तिपरत्वे वेगळा असतो. या आदिबंधाची जाणीव आपणास मनात किंवा कलासृष्टीत आवृत्त होणाऱ्या विशिष्ट प्रतिमांवरून होते. या प्रतिमांना युंगने आदिम प्रतिमा असे म्हटले आहे. त्यांचे स्वरूप बरेचसे प्राक्कथात्मक असते. त्या आदिबंधाच्या आविष्कारक असतात. आदिबंध हे मूर्त नसले तरी त्यांच्या आविष्कारक प्रतिमा वा कल्पना या मूर्त असतात. ह्या प्रतिमा म्हणजे मानवाने आपल्या अस्तित्वकलहात आणि या जगाशी जुळते घेण्याच्या धडपडीत जे हजारो वर्षे अनुभव घेतले त्यांचे निक्षेप होत.' (तत्रैव - वाङ्मयीन संज्ञा....)
(6) प्राक्कथा आणि घोडा : हिन्द-यूरोपियनांच्या प्राचीनतम प्रारंभिक जीवनात घोड्याचे सर्वाधिक महत्त्व राहिले आहे. घोडा या शब्दाचा पर्यायवाची शब्द अश्व असून या शब्दाशी मिळतेजुळते शब्द ईरानी, लॅटिन, यूनानी आदि हिन्द-यूरोपियन भाषांमध्ये आढळून येतात. घोडा/अश्व या अर्थाच्या विभिन्न रूपांतील शब्दांचा आढळ ऋग्वेदात सुमारे 250 वेळा/स्थानी असल्याचे संशोधक सांगतात. ऋग्वेदातील दोन पूर्ण ऋचांमध्ये (1.162-63) अश्वाची स्तुती केलेली आहे. अश्विन् हा देव दोन घोड्यांचा स्वार (दोन-अश्वरोही) असून त्याला वैदिक देवमालेत उच्च स्थान प्राप्त आहे. जवळपास सर्वच वैदिक देवतांचा, विशेषतः इंद्र आणि त्याचा लढवय्या सहचर मरुत् यांचा घोड्यांशी संबंध असल्याचे ऋग्वेदातील ऋचांवरून दिसून येत असल्याचेही तद्विषयक संशोधकांचे संशोधन आहे.
फक्त घोडाच नव्हे तर रथाशी सुद्धा हिन्द-यूरोपियनांची प्राचीनतम/पुरातन ओळख असल्याचे दिसून येते. आणि हीच कथा पुढे प्राक्कथात्मक रूप घेऊन सूर्याच्या रथाची व त्या रथाला जुंपलेल्या सात अश्वांची कथा होऊन अवतरते. अशी ही प्राक्कथांची जन्मकुंडली अतिशय गहन-गूढ असल्याचे अध्ययनांती निदर्शनास येते. (आर्य एवं हडप्पा संस्कृतियों की भिन्नता - रामशरण शर्मा)
(7) स्काॅटिश मानवशास्त्रज्ञ सर जेम्स फ्रेझर यांचा 'द गोल्डन बाऊ' हा ग्रंथ 1890 ते 1915 या काळात बारा खंडांत प्रसिद्ध झाला. या ग्रंथात यातुविद्या आणि धर्म यांचा अभ्यास असून प्रागैतिहासिक काळापासूनच्या दिव्यकथा (प्राक्कथा, मिथक) एकत्र केल्या आहेत. (तत्रैव - वाङ्मयीन संज्ञा...)
(8) लोकसाहित्यातील प्राक्कथा : वेद, उपनिषदांत अंशरूपाने आलेल्या काही कथा पुराणांत सुद्धा संवर्धित व संश्लेषित होऊन पुनर्निर्देशित/पुनर्कथित/पुनर्रचित झाल्याचे आढळून येते. तसेच पुराणांतील या कथा मग लोकसाहित्याच्या आदिम प्रभावाने प्रभावित होऊन प्राक्कथांच्या रूपात लोकजीवनातही आपले अस्तित्व जाणवत राहतात. अशीच एक प्राक्कथा आमच्या झाडीपट्टीत प्रचलित असून तिच्यानुसार राम हा अवतारी पुरुष व राजा असला तरी तो बैलजोडी व नांगर घेऊन शेतात जमीन नांगरायला जातो. दुपारी जेवणाचे वेळी मग सीता आंबील, भात, वरण व स्याक घेऊन शेतात रामासाठी शिदोरी घेऊन जाते. शेतातील आंब्याच्या झाडाच्या सावलीत राम व सीता शिदोरी खातात. जेवणानंतर रामाला डुलकी लागते. मग सीता बैलांना चारापाणी करून स्वतःच शेत नांगरू लागते. रामाला जाग येतो. सीतेला शेत नांगरताना पाहून राम आश्चर्यचकित होतो, त्याला सीतेच्या जन्माची कथा आठवते. तसेच झाडीपट्टीतील दंढारीतील किसन, पेंद्या व गवळणी हा प्रकार सुद्धा दुसऱ्या एका लोक-कलाप्रकाराची नकल(?) असला तरी त्यातील काही अस्सल झाडीबोलीतील संवाद एक वेगळीच श्रीकृष्ण-प्राक्कथा सांगून जातात.
यासोबतच भर्तृहरि, गोपीचंद राजा यांच्या प्राक्कथा सुद्धा झाडीपट्टीच्या दंढारीतच नव्हे तर लोकजीवनातही प्रचलित आहेत. आता गावागावातून प्राक्कथांना जिवंत ठेवणारी आजी ही "संस्था" जरी काही प्रमाणात कायम असली तरी शहरीकरणाच्या, स्थलांतरित होण्याच्या परिणामाने "नातू" ही "संस्था" गावागावातून रोड पावत असल्याने या प्राक्कथांना सतत प्रवाहित ठेवणारी लोकसरिताच नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळेच या अशा विखुरलेल्या प्राक्प्राक्कथांचे संकलन, प्रकाशन, जतन होण्याची अनिवार्य गरज अधोरेखित होते.
(9) प्राक्कथांमध्ये हा आदिबंध वेगवेगळ्या रूपांमध्ये आविष्कृत होतो. छाया, अनिमा-अनिमस, वृद्ध आप्त, माता, ... अशा विविध रूपांमध्ये हा आदिबंध प्राक्कथांतून आविष्कृत होत असतो/होतो. (तत्रैव - वाङ्मयीन संज्ञा...)
(10) प्राक्कथा आणि माणूस : पाश्चात्य दार्शनिक/तत्त्वज्ञ ॲरिस्टाॅटलच्या मते ज्ञानप्राप्ती व ज्ञानवृद्धीसाठी विज्ञानाचे महत्त्व अबाधित असले तरी विज्ञानाला भौतिक/चेतन जगताशी फारकत घेऊन 'जगणे/वाढणे' अशक्य असते. अशा परिस्थितीत मनुष्य, निसर्ग व या दोहोंची परस्परावलंबी संरचना यांत ज्ञात व अज्ञात अशा साऱ्या घटकांना सामावून घेऊ शकेल अशी ज्ञानपद्धतीच खऱ्या ज्ञानप्राप्ती व ज्ञानवृद्धीसाठी अनिवार्य ठरते हे सत्य नाकारता येत नाही. प्रयोगवादी दार्शनिक हाब्स म्हणतो की, विचार हे मस्तिष्क आणि हृदयाच्या विभिन्न गती मात्र असतात. (विचार मस्तिष्क और हृदय की गतियाँ हैं।) भौतिक तत्त्व आणि गती हे मूलतत्त्व असून याच गोष्टी प्रत्येक वस्तूची (चीज़ की) व्याख्या करायला समर्थ आहेत; मग त्या गोष्टी जड असोत वा चेतन! तो असेही म्हणतो की, 'अच्छाई, बुराई, पाप, पुण्य सब सापेक्ष चीज़े हैं, यानी वे भौतिक परिस्थितियों के अनुसार निर्धारित होती हैं...।' तो आणखी असेही म्हणतो की, 'मनुष्य एक मानव भेड़िया है, उसकी मूल वृत्ति धन, लोभ-लालच की ओर प्रवृत्त होने की है...।' (मार्क्सवाद के मूलभूत सिद्धांत : अशोक कुमार पाण्डेय) या सर्व बाबींच्या प्रकाशात आपण प्राक्कथांकडे पाहतो तेव्हा असे लक्षात येते की, मनुष्यातील 'मानव-भेड़िया'चा प्रभाव न्यून करण्यासाठी सुद्धा या प्राक्कथांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे/राहत आहे. आणि कदाचित म्हणूनच आजच्या या आधुनिकोत्तर, सत्योत्तर व उजाखोत्तर युगातही प्राक्कथांची "निर्मिती" थांबली नसून उलट मोठ्या प्रमाणात वाढली/वाढत आहे. असा हा प्राक्कथा आणि माणूस यांच्यातील नाभीनाळबद्ध संबंध असून त्याद्वारे आजही प्रक्कथा कशा आवश्यक ठरतात हे स्पष्ट व्हावे.
(11) समारोप : अगदी अनादि काळापासून सुरू असलेली प्राक्कथांची अशी ही समृद्ध परंपरा(!) अनंत काळापर्यंत अशीच प्रवाहित राहून मनुष्यातील 'मानव-भेड़िया'ला हाकलत राहण्याचे सत्कृत्य(!) करीत राहील/करीत राहो हीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो. (शब्दसंख्या : सुमारे 1100)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(चलभाष : 7066968350)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment