21व्या शतकातील ग्रंथव्यवहार कसा आहे आणि कसा असावा?
*अखिल भारतीय साहित्य परिषद, विदर्भ प्रांत, नागपूर*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
२३ एप्रिल हा दिवस *जागतिक ग्रंथ दिवस* म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने येत्या २३ एप्रिल 2022 रोजी अखिल भारतीय साहित्य परिषद, विदर्भ प्रांताच्या वतीने जागतिक ग्रंथ दिनानिमित्त सायंकाळी ६ वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील सेवासदन शिक्षण संस्थेच्या माई मोतलग सभागृहात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
*२१व्या शतकातील ग्रंथ व्यवहार कसा आहे..? कसा असावा..?* या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक आणि अ.भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष *ॲड.लखनसिंह कटरे* हे होते. याप्रसंगि साहित्यिक व समिक्षक *रश्मी पदवाड मदनकर*, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रकाशक *विनोद लोकरे,* साहित्यिक चळवळीतील कार्यकर्ते *प्रकाश एदलाबादकर* आणि व्यासंगी वाचक *तुषार जोशी* ह्या मान्यवरांनी सुद्धा आपले विचार मांडले....
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.लखनसिंह कटरे यांचे भाषण खालीलप्रमाणे..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
२३ एप्रिल हा दिवस *जागतिक ग्रंथ दिवस* म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने येत्या २३ एप्रिल 2022 रोजी अखिल भारतीय साहित्य परिषद, विदर्भ प्रांताच्या वतीने जागतिक ग्रंथ दिनानिमित्त सायंकाळी ६ वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील सेवासदन शिक्षण संस्थेच्या माई मोतलग सभागृहात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
*२१व्या शतकातील ग्रंथ व्यवहार कसा आहे..? कसा असावा..?* या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक आणि अ.भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष *ॲड.लखनसिंह कटरे* हे होते. याप्रसंगि साहित्यिक व समिक्षक *रश्मी पदवाड मदनकर*, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि प्रकाशक *विनोद लोकरे,* साहित्यिक चळवळीतील कार्यकर्ते *प्रकाश एदलाबादकर* आणि व्यासंगी वाचक *तुषार जोशी* ह्या मान्यवरांनी सुद्धा आपले विचार मांडले....
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.लखनसिंह कटरे यांचे भाषण खालीलप्रमाणे..
👇👇
*"२१व्या शतकातील ग्रंथव्यवहार कसा आहे आणि कसा असावा?*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> सर्वप्रथम आपण 'ग्रंथव्यवहार' या संज्ञेचा मला अभिप्रेत असलेला अर्थ समजावून घेणे आवश्यक राहील. माझ्या अल्पबुद्धि-आकलनानुसार 'ग्रंथव्यवहार' या संज्ञेत लेखक, कवी, नाटककार आदि सर्व साहित्यिकांपासून ते प्रकाशक, वितरक ते वाचकांपर्यंत सर्व घटक अध्याहृत असलेल्या एका अनवरत सर्जनशील प्रक्रियेचा समावेश होतो/व्हावा. त्यामुळे 'ग्रंथव्यवहारा'चा विचार करताना आपल्याला या सर्व घटकांचा सुद्धा विचार करावा लागेल. अशा या ग्रंथव्यवहार ह्या बहुआयामी संज्ञेत अध्याहृत असलेल्या सध्याचा/21व्या शतकातील लेखनव्यवहार* या घटकापुरताच मर्यादित राहून मी या विषयावर खालीलप्रमाणे व्यक्त होऊ इच्छितो.
>> यादृष्टीने विचार करता बहुआयामी असलेल्या ग्रंथव्यवहार ह्या संज्ञेवर मुख्यतः चार विचारप्रणाली कळत-नकळत आपापला वर्चस्व गाजवताना आढळून येतात, असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे. त्या विचारप्रणाली म्हणजे भारतीय संश्लेषणात्मक विचारधारा, भारतीय नास्तिक विचारधारा, युरोपियन/पाश्चिमात्य प्रबोधनात्मक विचारप्रणाली आणि मार्क्सवादी विचारवाद. यातील प्रारंभी नमूद दोन्ही विचारप्रणाली या विचारधारा या संकल्पनेला पूरक आहेत, तर उर्वरित दोन पैकी तिसरी विचारप्रणाली ही विचारसरणी या संकल्पनेला तर चौथी विचारप्रणाली ही विचारवाद (ism) या संकल्पनेला पूरक आहे, असे माझे नम्र आकलन आहे.
>> माझ्या अल्पाभ्यासाच्या आधारे मी नम्रतापूर्वक नमूद करू इच्छितो की, विचारधारा म्हणजे अशी विचारप्रणाली, जी नदीच्या वाहत्या प्रवाहासारखी सदैव नित्यनूतन राहण्यासाठी कालसुसंगत अशा ''शाश्वत/कायम बदलाच्या नैसर्गिक प्रक्रिये''चा अवलंब करते. आणि विचारसरणी म्हणजे अशी विचारप्रणाली, जी कालांतराने कालबाधित होऊन कालबाह्य ठरू लागते. तर विचारवाद म्हणजे अशी विचारप्रणाली, जी डबक्यासारखी साचून दुर्गंधीयुक्त होऊनही प्रचलित होण्या/राहण्यासाठी सतत धडपडत असते. विचारवाद ही विचारप्रणाली हिमनगपृष्ठवादासारखी सुद्धा असू शकते, पण ह्या वस्तुस्थितीला कुतर्क/वितर्काच्या आधारे सतत नाकारत असते.
>> माझ्या ह्या अल्पबुद्धि-आकलन-प्रमेयाच्या समर्थनार्थ मी नम्रतापूर्वक काही बाबी उदाहरणार्थ सांगू इच्छितो. त्यापैकी पहिले म्हणजे रामदास स्वामी यांनी त्यांच्या व्यावहारिक ज्ञानरंजनाद्वारे (दासबोध, मनाचे श्लोक) सांगितलेले 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' हे वचन मी उद्घृत करेन. याचा अर्थ 'मी मुजोरी करेन' असा नसून 'एखाद्या विषयावर व्यक्त होताना मी त्यावरील अन्य मान्यवरांच्या विचारांचाही परामर्श घेऊन त्यातून नवनीत काढून मी स्वतःच्या बुद्धी व विवेकाच्या वापराने त्यावर आपले विचार व्यक्त करीन', असा तो अर्थ आहे/असावा, असे मला वाटते. तसेच पौराणिक साहित्य असलेल्या महाभारत या ग्रंथातील अजरामर कृती भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्ण यांचे तद्विषयक विचार जाणून घेण्यासाठी मी गीतेच्या अठराव्या अध्यायातील 63व्या श्लोकाचा उत्तरार्ध वाचकां/श्रोत्यांसमोर ठेवू इच्छितो. त्यात श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून म्हणतात, "...यथेच्छसि तथा कुरु". म्हणजे अर्जुनाच्या साऱ्या शंका, कुशंका प्रश्नादिंवर श्रीकृष्णाने अठरा अध्यायात समर्पक विश्लेषण/समाधान केले आहेच, आता अर्जुनाने त्यावर आपल्या बुद्धीचा लेप चढवून यथायोग्य निर्णय घ्यावा, यथेच्छसि तथा कुरु. अशाचप्रकारे एक वचन (श्लोकाचा उत्तरार्ध) विदेह राजा जनक व ऋषी अष्टावक्र यांच्यातील 'संवाद' असलेल्या अष्टावक्र गीतेच्या 15.02 या श्लोकातही 'यथेच्छसि तथा कुरु' या वचन/कथनाचा उल्लेख असून याचाही भावार्थ व मथितार्थ भगवद्गीतेतील तद्विषयक वचन/कथनासारखाच आहे. त्याप्रमाणे भगवान बुद्धाचे एक वचन/कथन सुद्धा याचप्रकारचे आहे. ते वचन/कथन म्हणजे 'अत्त दीप भव'. या वचन/कथनाचा भावार्थ व मथितार्थ सुद्धा असाच आहे की, स्वतःचा मोक्षकारक/उद्धारक स्वतःच हो. अशाप्रकारे आपण पाहतो की, शाश्वत/कायम बदलाच्या नैसर्गिक सिद्धांताला पूरक ठरण्यासाठी आपले विचार हे आपलेच विचार असले पाहिजेत आणि प्रत्येक व्यक्ती ही कायम बदलणारी नैसर्गिक वस्तुस्थिती असल्याने त्याचे विचारही सतत प्रवाही असणे म्हणजे विचारधारेला पूरक असणे अनिवार्यपणे क्रमप्राप्त ठरते, असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे.
>> वरीलप्रमाणे संक्षिप्त विश्लेषणाचे अनुषंगाने जो जो ग्रंथव्यवहार* हा वर नमूद केल्याप्रमाणे विचारधाराप्रणित किंवा विचारधारेला संपूरक असेल तो तो ग्रंथव्यवहार* शाश्वत/टिकाऊ राहील आणि तसा नसलेला ग्रंथव्यवहार* हा काही काळ गाजला/गाजवला गेला तरी *सवंग स्वादतृप्री करणारा पण कलात्मक भूक भागवण्यात असमर्थ* ठरत असल्याने तथा त्याचे सदैव कालसुसंगत न राहण्यामुळे तो शाश्वत/टिकाऊ राहू/होऊ शकणार नाही, हे स्पष्ट आहे. शिवाय असा ग्रंथव्यवहार* हा *अतिरेकी श्रिन्कफ्लेशन वा अतिरेकी पाल्हाळीकरणाने संपृक्त* राहत असल्याने तसेच *आविर्भावी, आक्रस्ताळी, आक्रमक पद्धतीने शब्दाळलेला* राहत असल्यानेही, ते शाश्वत/टिकाऊ ग्रंथव्यवहार*च्या संज्ञेला पात्र ठरू शकत नाही. अर्थातच असा थिल्लर(?) स्वरूपाचा ग्रंथव्यवहार* व्यामिश्रतम मानवी जीवनाला सुसंगत व सकारात्मक दिशादर्शनासाठी सक्षम नसतो, उलट दिशाभूल करणाराच ठरण्याची शक्यता असते. याउलट शाश्वत/टिकाऊ ग्रंथव्यवहार*च व्यामिश्रतम मानवी जीवनाच्या सुसंगत व सकारात्मक उन्नतीसाठी/दिशादर्शनासाठी अनिवार्य अशी "गरज" ठरतो, हे स्पष्ट व्हावे. एकंदरीत कोणत्याही व केव्हाच्याही ग्रंथव्यवहारा*त फक्त प्रवाही शब्दबळ आणि अलंकृत अर्थबोध यांचेच महत्त्व नसून त्यात सांस्कृतिक बळ ह्या सार्वकालिक मूल्याचे मूल्यभानही असणे अनिवार्यतः आवश्यक आहे, हे सुद्धा स्पष्ट व्हावे.
>> परंतु सध्याच्या म्हणजे 21व्या शतकातील ग्रंथव्यवहारा*कडे साकल्याने/बारकाईने बघितले असता सध्यातरी कामचलाऊ, तकलादू तथा हिमनगपृष्ठवादी विचारवादाच्या वितंडवादाने ग्रसित, अज्ञान किंवा अल्प/अर्धवट माहितीवर आधारित, स्वाभिमान-शून्य, नकारात्मक विचारांनी प्रेरित व पोषित, स्वयंघोषित तत्त्वज्ञाचा आव आणणारा, जीवनातील ऋणात्मक बाबींचे उदात्तीकरण करणारा असाच ग्रंथव्यवहार* मोठ्या प्रमाणात/बहुतांश लिहिला/रचला जात असून तो नावाजला सुद्धा जात असल्याचे व सोशल मिडीया तथा सत्योत्तर कथनाद्वारे तशा ग्रंथव्यवहारा*चा उदोउदो होत असल्याचेही दिसून येत आहे. म्हणूनच अशा ह्या क्षणभंगुर व आत्मविसंगत ठरणाऱ्या तथा दिशाभ्रम करू पाहणाऱ्या तथाकथित पाॅप्युलिस्ट(?) ग्रंथव्यवहारा*ला टाळून, त्याला दुर्लक्षित करून त्याऐवजी सध्याचा ग्रंथव्यवहार* पुनश्च जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक विचारधाराप्रणित व विचारधारेच्या विश्लेषणात्मक स्वभावाचा होईल, सांस्कृतिक बळाला समृद्ध करणारा होईल यासाठी ग्रंथव्यवहारा*शी संबंधित सर्व घटकांनी सतत जागरूक राहून त्यासाठी प्रयत्नशील रहावे लागेल असे मला वाटते.
>> असे माझे हे "21व्या शतकातील ग्रंथव्यवहार* कसा आहे आणि कसा असावा" या विषयावरील संक्षिप्त आकलन आहे. आणि "DISSENT : THE VOICE OF PROGRESS" या संविधानसंमत प्रक्रियेनुसार/नियमानुसार, माझ्या या अल्पबुद्धि-आकलनावर सामोपचाराने साधक-बाधक अशी निर्विष चर्चा घडून यावी अशी माझी ग्रंथव्यवहारा*तील सर्व घटकांना, आजच्या या जागतिक ग्रंथ दिनानिमित्ताने, विनंती आहे. (#680)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(विदर्भ प्रांत अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य परिषद)
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment