काही स्वप्नवत(?) आठवणी -2

काही स्वप्नवत(?) आठवणी-2
~~~~~~~~~~~~~~~
        जूलै 1966 मधील घटना आहे. मी माझ्या गावच्याच जि.प. शाळेत सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होतो. अचानक एके दिवशी गुरूजींनी सांगितले की दिवाळीच्या सुट्टीनंतर आपल्या शाळेतील वर्ग 5 व 6 बंद होत असून सर्वांनी आपापली सोय पहावयाची आहे. माझे वडील काॅन्ग्रेसचे एक वरीष्ठ कार्यकर्ते(?) असल्याने त्यांची पंचायत समितीच्या सभापतीशी आणि जि.प. च्या अध्यक्षाशी चांगली ओळख व मैत्री सुद्धा होती. त्यांनी हा निर्णय बदलविण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. पण सर्व व्यर्थ. आमच्या गावाजवळील 3 किमी अंतरावरील जि.प. शाळा अंजोरा येथे आमची रवानगी झाली, काही विद्यार्थी 6 किमी वरील आमगांव या तत्कालीन ब्लाॅकस्तरीय मोठ्या गावातील शाळेत गेले. म्हणजे तत्कालीन तुकडी, वर्ग एक ते वर्ग साडेपाच पर्यंतचे माझे शिक्षण माझ्या गावातील जि.प.च्या शाळेतच झाले. इंग्रजी भाषेची व विषयाची पहिली ओळख पाचव्या वर्गात माझ्या गावातच झाली.
                 मी गावापासून 3 किमी रोज पायी ये-जा करीत असे. तसा मी तथाकथित मोठ्या(?) शेतक-याचा लाडावलेला मुलगा असलो तरी गावात अजून चप्पल-जोड्याची फॅशन(?) पोचली नसल्याने 'नंगेपाव आवजाव' हा आमचा दिनक्रम. वर्ग साडेपाच(?) ते वर्ग आठ असे माझे शिक्षण अंजोरा या छोट्याशा गावातील जि.प. शाळेतच झाले. दरम्यान आठव्या वर्गात असताना मी सायकल शिकल्याने वडीलांनी सायकल घेऊन दिली होती. अजूनही चप्पल-जोड्याची फॅशन पोचली नसल्याने 'नंगेपाव सायकल चलाव' असाच दिनक्रम होता.
     आठवी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी आदर्श विद्यालय आमगांव या पितृतुल्य मा.लक्ष्मणराव मानकर गुरूजींनी सुमारे 1951 साली स्थापन केलेल्या शाळेत नवव्या वर्गात प्रवेश घेतला. आमगांव म्हणजे आमच्यासाठी शहरच. पहिल्या दिवशी शाळेत गेलो ढिलाढाला पायजमा व तसाच ढिलाढाला शर्ट घालून. आमच्या वडीलांचा वाढत्या(?) अंगाचे कपडे घालण्याचा दंडकच होता. चांगलीच रॅगींग झाली. गावंढळ म्हणून छिलाई(?) सुद्धा झाली. लवकरच युनिफाॅर्म शिवला व हळूहळू शाळेत रूळू लागलो. 
     नवव्या वर्गापासूनच स्ट्रीम वेगवेगळी व्हायची तेव्हा. मी गणिताची स्ट्रीम निवडली होती. आम्हाला येरणे सर आणि चौथकंठीवार सर (मुख्याध्यापक) हे गणित शिकवायचे. एका महिन्यातच गणिताचा जुना अभ्यासक्रम बदलून New maths in English medium (अरे बापरे) चा अभ्यासक्रम सुरू झाला. आता फक्त येरणे सरच गणित शिकवू लागले. अभ्यासक्रम नवीन असल्याने पुस्तकेच उपलब्ध नव्हती. येरणे सरांजवळच्या एकमात्र सायक्लोस्टाईल प्रतीवरून येरणे सर शिकवीत व आम्ही ते आमच्या वहीत उतरून घेत असू. तेव्हा तिमाही, सहामाही अशा midterm परीक्षाही व्हायच्या. तिमाही परिक्षेत माझा "पहिला नंबर" आला आणि रॅगींग व टर उडवण्याचे प्रकार थांबून मी वर्गहिरोंच्या पंक्तित सामील केला(?) गेलो. अजूनही नंगेपाव सायकल चलाव हे बदललं नव्हतं. तरी ते दिवस खूप खूप खूपच मस्त होते.
       दहाव्या वर्गात गेलो तेव्हा आमचे गणित शिक्षक येरणे सर B.Ed.साठी वर्षभर रजेवर गेल्याने त्यांचे जागी श्री.कस्तुरे सर हे नुकतेच B.Sc. झालेले, अगदी तरुण-जवळपास आमच्याच वयाचे, बदली शिक्षक आम्हाला गणित (New Maths) शिकवायला आले. आणि मला पुन्हा समजले, पटले की पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात सोपा विषय म्हणजे "गणित" हा विषय होय. त्यासाठी मी कस्तुरे सरांचा आजन्म ऋणीच राहीन. कस्तुरे सर त्या शाळेत फक्त एकच वर्ष होते, त्यानंतर ते Ordnance Factory, Jawaharnagar (BHANDARA) येथे नोकरीला गेल्याचे कळले. पण अजूनही पुन्हा त्यांची भेट होऊ शकलेली नाही, त्यांची कोणतीही खबरबात मला मिळू शकलेली नाही. जय हो, कस्तुरे सर!
......(अपूर्ण)
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार, जि.गोंदिया.
~~~~~~~(29.04.2019)~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन