योगी अरविंद आणि त्यांची कविता : एक स्मरण-यात्रा

*योगी अरविंद आणि त्यांची कविता : एक स्मरण-यात्रा*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
@ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार. 
-----------------------------------------------
>> 1964-65 या शैक्षणिक वर्षात मी चौथ्या वर्गात होतो. आमचे वर्गशिक्षक श्री.सोना बुगाजी बहेकार हे होते. हे त्यावेळेस मुख्याध्यापक सुद्धा होते व त्यांना सतत बीडी ओढण्याची सवय होती. त्यामुळे त्यांचे शिकवण्याकडे दुर्लक्ष होत असे. अशा वेळेस आमचे वर्ग 1 ते 3 चे शिक्षक राहिलेले श्री.सीताराम भुराजी चुटे हे मध्ये मध्ये आमच्या चौथीचा शिक्षण-भार उचलत असत. चुटे गुरुजी हे एका डोळ्याने पूर्णतः दिव्यांग असले तरी शिकवण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हता. माझे हस्ताक्षर, माझे गणित आणि मराठी हे विषय सुंदर व मजबूत होण्यामागे माझ्या आईइतकेच या चुटे गुरुजींचेही श्रम(!) व उपकार आहेत. 

>> चौथीच्या आमच्या वर्गशिक्षकाचे शिकवण्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे आम्ही जरा ढेपाळलेच होतो. माझ्या आईच्या आणि मधून मधून चुटे गुरुजींच्या कृपेने मी अभ्यासात जरा ठीकठाक होतो. त्यावेळेस चौथीची बोर्डाची परीक्षा असायची. आमची परीक्षा आमच्या गावी न होता तीन किमीवरील अंजोरा येथील शाळेत असल्याने मी अंजोरा येथील माझ्या गावबहिणीच्या सवतीकडे राहायला होतो. (माझी गावबहीण अकाली वारल्यामुळे तिच्या पतीने, श्री.श्रावण चांगोजी ब्राह्मणकर या गुरुजींनी, दुसरे लग्न केले असले तरी त्या सवतीने गावबहिणीचे नाते टिकवून ठेवले होते. श्री.ब्राह्मणकर गुरुजींचे माझ्यावरील माझ्या सातवीच्या परीक्षेतील गणिताविषयीचे नाविन्यपूर्ण उपकार सुद्धा मी विसरू शकत नाही. ती एक वेगळीच कथा आहे.) 

>> चौथीच्या या परीक्षेत मी त्यावेळेस पंचायत समितीतून दुसरा की तिसरा (निश्चित आठवत नाही, क्षमस्व.) येऊन उत्तीर्ण झालो होतो. 1965-66 या शैक्षणिक वर्षात मी पाचवीचा विद्यार्थी होतो. आमच्या घराजवळीलच श्री.हरिभाऊ सोनाजी भांडारकर हे आमच्या गावातील ग्रामपंचायत चे सरपंच व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्षही होते. त्यांच्याकडे ग्रामपंचायतचे 'तरुण भारत' हे वृत्तपत्र यायचे. त्यांनी मला ते वृत्तपत्र वाचायला प्रवृत्त केले व मी न चुकता दुसर्‍या दिवशी सकाळीच कालचा 'तरुण भारत' वाचत असे. अशाप्रकारे मला 'तरुण भारत' वाचण्याची सवयच जडली. तेव्हापासून सुमारे 1990 पर्यंत मी 'तरुण भारत'चा नियमित-सलग वाचक होतो. 'त.भा.' ची तत्कालीन रविवारची पुरवणी 'विविध विषय विभाग' म्हणजे माझी मेजवानीच असायची. श्री.ग.त्र्यं.माडखोलकर, श्री.मा.गो.वैद्य यांच्या शेकडो अग्रलेखांची व इतर काही (अन्य) लेखांची कात्रणे मी निवृत्त होईपर्यंत जपून ठेवली होती. ती निवृत्तीनंतरच्या एका कौटुंबिक स्वरूपाच्या द्विधा मनस्थितीच्या एका चक्रव्यूहात फसून मी रद्दीत देऊन टाकली. तरी त्यापैकी काही अवशेष इकडेतिकडे लपूनछपून राहिलेतच. परवाच्या माझ्या उत्खननात(?) त्यातील काही कात्रणे गवसलीत. 

>> त्यातीलच एका कात्रणात योगी अरविंद यांच्या 'Who' या कवितेचा अमरावती येथील जुन्या पिढीतील एक कवि श्री.र.द. उर्फ राजाभाऊ देशपांडे यांनी केलेला मराठी अनुवाद सापडला/गवसला. (या कात्रणाची तारीख दिसत नसली तरी हे कात्रण 1971-72 मधील असावे असा माझा कयास आहे. कारण दुसर्‍या एका उपलब्ध होऊ शकलेल्या कात्रणावरील तारीख 26-03-1972 अशी असून हे कात्रण म्हणजे योगी अरविंद यांच्या 'सावित्री' या महाकाव्याचे अनिकेतस् या टोपण नावाच्या एका कवीने केलेला मराठी अनुवाद आहे. 'अश्वपतीची विश्वयात्रा' या शीर्षकाने हा अनुवाद लेखमालेसारखा दर पाक्षिकाला त.भा.च्या रविवारच्या 'वि.वि.वि.' तून प्रकाशित होत असावा असे दिसून येते. असो.) 

>> तर योगी अरविंद यांच्या 'Who' या कवितेचा अनुवाद असा -------- 
👇
आकाशाच्या निळ्या वनाच्या हिरव्या अंगाला 
चैतन्याचा पहा झळाळा कोणा हस्ते दिला 
अवकाशाच्या कुशीत वारा शांत झोप घेतो 
कोण तयाला जागे करुनी वहना आज्ञापितो 

तोच जाहला विलय अंतरी सृष्टीच्या कुहरी 
विचार निर्मिती करीत गवसे बुद्धीच्या अंतरी 
फुलाफुलांच्या आकृतिमाजी गुंफुनि या राही 
तारांच्या या प्रकाशजाळीं बद्ध पहा होई 

नर-सामर्थ्यीं, स्त्री-सौंदर्यीं बालक हास्यांत 
दिव्य तेज ते-दिव्य सदाही-गौरी लास्यांत 
देई गति जो गुरुग्रहाला गगनी फिरण्याला 
तोच कुशलता खर्ची घाली बंदा निर्मितीला 

त्याची लीला, त्याची माया त्याचीच ही छाया 
कुठे परी तो? कोण्या नामे प्रसिध्द जगती या? 
ब्रह्मा किंवा विष्णु म्हणावे नारी किंवा नर?
एकच की तो अनेक न कळे मूर्त निराकार?

चित्ती प्रेम असे मुलावर सदा काळा तसा देखणा 
स्त्री ही वस्त्रविहीन भ्यासुर जरी ती स्वामिनी जीवना 
बर्फाच्छादित पर्वतावर तया ध्यानस्थ म्यां पाहिला 
विश्वान्तर्गत कार्यमग्न विभुला विश्वांत म्यां देखिला 

नाही ज्यास जरा, नसे मरणही, तो सूर्यही तोच तो 
छाया जी निशिथी दिसे पसरली त्याचीच तीही असे 
घेरा घालीतसे तयास तमही-अंधार हो आंधळे 
ऐशाही समयी तयान्तरी वसे-चैतन्य हे एकले 

स्वामी जो मनुजां असे प्रिय नरां अत्यंत जो या जगीं 
अन्तर्यामि वळून दृष्टि बघतां आहे हृदी सांनिधी 
आसन्नी विषयी सदा न विसरूं आम्ही कदा मीपणा 
अन्तर्यामीं असोनियाहि न दिसे आम्हास तर्काधिना  
¤
>> योगी अरविंद यांच्या कविता, सावित्री व इतर साहित्याचा सुद्धा माझ्यावर एक अनाकलनीय असा प्रभाव(?) पडला असावा असे मला वाटते. सुमारे 1975 ते 1984 पर्यंत मी तत्कालीन पांडेचेरी येथील अरविंद आश्रम द्वारे प्रकाशित, 'पुरोधा' या हिंदी मासिक पत्रिकेचा सक्रिय वर्गणीदार-वाचकही होतो. अजूनही मी ते सर्व अंक बाईंडिंग करून जपून ठेवले आहेत. असो.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(16/02/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)