उजाखानंतरचे सत्योत्तर युग व मानसिकता

*उजाखानंतरचे सत्योत्तर युग व मानसिकता*
-------------------------------------------------------
>> उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण) काळातील बुद्धिमत्ता, परीक्षा, स्पर्धा, स्वकेंद्रित प्रगती, तुच्छतावाद, विवेकशून्यता सारख्या बाबींचे असंवेदनशील असे उदात्तीकरण यांचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत. अशा या विवेकवादाला थारा न देणाऱ्या कटूतम वस्तुस्थितीचे उगमस्थान दुर्दैवाने आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीत असू शकते. सध्याच्या आपल्या शिक्षण पद्धतीचा भर प्रामुख्याने नोकरी मिळविण्यासाठी लागणारी कौशल्ये शिकण्या/शिकवण्याकडे असतो. वस्तूतः शिक्षणाचा उद्देश व उपयोग अर्थार्जनासाठी व्हायला हवा हे वाईट नाही किंवा ते वैगुण्याचेही म्हणता यावयाचे नाही, पण तो तेवढ्यापुरताच मर्यादित रहायला नको. शिक्षणाचा प्रमुख हेतु हा विचारी, विवेकी, सहिष्णू, संवेदनशील, माणुसकीचा धर्म पाळणारे सुजाण नागरिक घडवणे हा असायला हवा. विद्यार्थांना कोणत्याही साचेबंद शिक्षणाच्या मर्यादेत न राहता त्या पलीकडे जाऊन मूलभूत विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारे शिक्षण मिळण्याची परमावश्यक गरज आहे. व्यावसायिक जगात सर्वच काही पैशांच्या मूल्यात मोजण्याच्या सद्यकालीन व्यवस्थेमुळे जे पैशात मोजले जात नाही त्याला महत्वाचे मानायची गरज नाही असा समज रूढ होत आहे. पर्यायाने स्वतःमध्ये मग्न राहणारा असा वर्ग/समाज तयार होतोय. अशा वर्ग/समाजाला स्वतःच्या 'विश्वा'बाहेरील समाजाचे/वर्गाचे खरे स्वरूप समजून घ्यायला फुरसत नाही आणि त्यांना तशी आवश्यकताही वाटत नाही.

>> वर नमूद केल्याप्रमाणे सामान्य नागरिकांच्या अशा या मनोवृत्तीमुळे आणि डिजिटल समाज माध्यमांच्या सहज सर्वांपर्यंत वेगाने पोहोचण्याच्या क्षमतेमुळे या सहजोपलब्ध माध्यमांचा समर्थपणे दुरुपयोग करून अनेक खोट्या, भ्रामक, एकांगी, छद्मी, इतिहासदुष्ट गोष्टी, गैरसमजुती, तिरस्कार आदि असहिष्णू बाबी मुद्दामहून पसरवणे शक्य होते. त्यामुळे एकसंघ/एकसंध असलेला समाज 'आपण' आणि 'दुसरे' अशी दुहीची भावना प्रबळ होण्याच्या प्रक्रियेच्या चक्रव्यूहात फसू/सापडू लागतो. पर्यायस्वरूप सार्वजनिक अवकाशात असहिष्णुता, वैरभाव सारख्या विभाजनवादी, विनाशकारी विचारांचा प्रभाव वाढत जातो. 

>> अशा या उजाखानंतरच्या सत्योत्तर युगातील मानसिकता बाधित होऊन बहुविधता, सर्वसमावेशकता, सर्वधर्मसमभाव, मतनिरपेक्षता सारख्या मानवतावादी विचारांना समाजाच्या अवकाशात स्थानच उरत नाही.उलट त्या मूल्यांकडे तुच्छतेने पाहिले जाते, त्यांची चेष्टाच केली जाते. विवेकवादाला थारा न देता लोकांनी एककल्ली विचारांच्या कोशात/बंदिवासातच राहावे, अशी कु-शिकवण पद्धतशीरपणे दिली जाते. आणि अशा कु-शिकवणीच्या विचारसरणीला पुष्टी मिळेल अशा स्वरूपाच्या खऱ्या खोट्या कथा, इतिहासातील घटनांची संदर्भ सोडून व मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने केलेली उजळणी, अस्तित्वातच नसलेल्या काल्पनिक समस्येची भिती, यांचा दैनंदिन भडिमार समाज माध्यमाचा दुरुपयोग करून लोकांवर केला जातो. 

>> जाहीर व्याख्यानांमध्ये, समाज माध्यमातून, टेलिव्हिजन वर तथा इतरत्रही असे दिसून येते की, लोकशाही पद्धतीने वैचारिक चर्चा, वादविवाद, संवाद, संश्लेषण बाजूला सारून कर्णकर्कश आवाजात, द्वेषपूर्ण आवेशात आपले फसवे, असंबद्ध व असंदर्भ असे सत्योत्तर कथन व विचार रेटण्याचे प्रमाण वाढत असून अशा कार्यक्रमांची लोकप्रियता(?)ही वाढत असल्याचे वर्तमानातील कटू वास्तव दिसून येत आहे.

>> आजचा बहुतांश समाज इंटरनेटच्या मायाजालात गुरफटून गेला असल्याने बाहेरच्या जगात जाऊन प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधणे कमी कमी होऊ लागले आहे. अशावेळी इंटरनेटवर, डिजिटल समाज माध्यमातून जे दिसते, ऐकू येते, वाचले जाते तेच खरे मानण्याची उजाखानंतरच्या या सत्योत्तर युगातील लोकांची मानसिकता होऊ लागली आहे. ही परिस्थिती मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्ट्या आव्हानात्मक अशी परिस्थिती आहे. कोणत्याही समाजाच्या पुढच्या पिढीसाठी ही अवस्था चिंताजनक असून समाजकारणी, साहित्यिक, कलावंत, व्यावसायिक, उद्योगपती, राजकारणी अशा समाजातील सर्व घटकांनी यावर गंभीरपणे सुविचार करण्याची अनिवार्य वेळ येऊन ठेपली आहे आणि एकूणच समाजाची नैतिक अधोगती रोखण्यासाठी या सर्व घटकांनी अविलंब पुढे सरसावणे ही काळाची गरज आहे, अन्यथा येणारा काळ त्यांना/आम्हाला/सर्वांना दोषी ठरवून तशी ऐतिहासिक नोंद घेईल. (525) //(आधारित)//
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(27/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन