अरण्याचे नंगधडंग होणे (एक कविता, एक लघुकथा)

*अरण्याचे नंगधडंग होणे*
~~~~~~~~~~~~~~~~~
दोष जरासाही नव्हता पानगळीचा 
पानेच पिवळसर होऊन 
म्हातारपणाकडे झुकू लागली होती 
निसर्गाने प्रचलित नियम अनुसरत 
वाऱ्याला मोकळीक दिली होती
वाऱ्याची भूमिका सुद्धा सहायकच होती 
आणि हळूहळू सारे अरण्य 
नंगधडंग होऊन बसले. 

तेव्हा नीमवृक्षाने परिस्थिती हातात घेतली,
नीमवृक्ष या वैराणातही बहरू लागला 
पलाश लालभडक होऊन पेटू लागला 
अमलतास आपली सोनेरी पुष्पे फडकावू लागला 
अस्वलांनी मोहफुले खाऊन मस्ती केली 

मग नंगधडंग अरण्याचे नागवेपण 
उफाळून वर येऊ लागले 
हळूहळू त्याचाही हिरवटपणा उगवू लागला
अरण्याचे नंगधडंगपण 
सृजनाला अनुकूल होऊ लागले.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(11/02/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 
*अरण्याचे नंगधडंग होणे*  (एक लघुकथा)
----------------------------------------------------
>> पानगळीचा जरासाही दोष नव्हता. अरण्यातील वृक्षावरील सारी पाने म्हातारपणाकडे झुकून पिवळसर होऊ लागली होती. निसर्गाने आपला प्रचलित नियम अनुसरत वाऱ्याला मोकळे रान करून दिले होते. 
>> हळूहळू अरण्यातील साऱ्या वृक्षांनी आपापली पिवळसर म्हातारी पाने त्यागायला सुरुवात केली. वाऱ्यानेही आपली भूमिका चोख बजावली.
>> अखेर सारे अरण्य नंगधडंग झाले. 
>> तेव्हा नीमवृक्ष मात्र बहरू लागला होता. पलाश लालभडक होऊन पेटू लागला होता. अमलतास आपले सोनेरी पुष्प फडकावत होता. मोहफुले खाऊन अस्वलांना दारू चढू लागली होती. 
>> अरण्याचे नंगधडंगपण अधिकाधिक नागवे होऊन त्याचा हिरवटपणा उगवू लागला होता. अरण्य सृजनाला अनुकूल होऊ लागले होते.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(11/02/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन