जंगलगाथा : कवितासंग्रह : रमेश सावंत // हृदयाचे डोळे उघडून...

□"जंगलगाथा : कवितासंग्रह : रमेश सावंत□
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
◇"हृदयाचे डोळे उघडून....."◇
---------------------------------------
      माझा एक अष्टपैलू साहित्यिक मित्र मुंबईत राहतो. मूळचा गाववासी असून अजूनही तो "गावाच्या भूमीचा वास" संपूर्ण व्यक्तिमत्वात भरून शहरवासी झालेला हा मित्र म्हणजे खरा NRV.(Non-Resident Villager). ह्या अष्टपैलू साहित्यिक मित्राचे नाव रमेश सावंत. याचा "जंगलगाथा" हा कवितासंग्रह मला जून-2018 मध्येच मिळाला. मिळताच तो मी चाळला आणि थक्क झालो. फूरसतीमध्ये वाचण्या/अनुभवण्यासाठी वाचन-प्रतीक्षा यादीत राखून ठेवला. आज पहाटेपासून मी हा कवितासंग्रह वाचतो आहे. हृदयाचे डोळे उघडून वाचतो आहे. किंवा असे म्हणता येईल की, हा संग्रह वाचण्या/अनुभवण्यासाठी हृदयाचे डोळे उघडावेच लागतात.
      "वाचायला हवं जंगल" या पहिल्याच कवितेत कवी म्हणतो...
"म्हणूनच हृदयाचे डोळे उघडून
बघायला हवी निरखून
सृष्टीच्या कुंचल्यातून घडलेली
निःशब्द, पण हृदयंगम कविता..."
    माझ्यासारख्या महाराष्ट्रातील मोठमोठी शहरे अनुभवून शेवटी झाडीपट्टीतील छोट्याशा गावात स्थायी झालेल्याला ह्या ओळी एका अनामिक आनंदात बुडवून काढतात. माझ्या बालपणीच्या, पोहणे शिकण्यासाठी नदीच्या डोहात बुडता-बुडता वाचल्याच्या, आठवणी डोळ्यासमोर साकार होतात. आणि... 
"काल-परवापर्यंत
वाहत होती नदी गावातून
आपले खळाळते पाणी घेऊन"
या ओळी मला मानवाच्या निसर्गावर विजय मिळविण्याच्या हव्यासाची किंमत किती भयंकर आहे, हे सांगून जातात.
"माणसांनीच असे डोंगर पोखरून
भलत्याच विकासाचे सुतोवाच केल्यावर,
हिरवाई डोंगरांना सोडून जाईलच ना!"
या ओळी मला माझ्या बालपणीचे "घनदाट-डोंगर" आज बोडखे झाल्याचे पहावे लागण्याच्या माझ्या दुःखाला आणखी खोल करतात. हे एकट्याचे, माझेच दुःख नव्हे, तर 2018 हे वर्ष आजवरचे सर्वात उष्ण वर्ष असल्याच्या वस्तुस्थितीचे चटके सोसलेल्या माझ्यासारख्या सर्वांचेच हे दुःख आहे, ही जीवघेणी(!) जाणीव पसरत असल्याचे दुःख आहे.
     बहुधा गाववासी व्यक्ती शहरवासी झाल्यावर त्यांना सिमेंट-लोखंडाचेच जंगल आपले वाटू लागते, आवडू लागते. आणि "गाववासीयांनी जंगलाचे, पर्यावरणाचे भयंकर नुकसान केले आहे" अशी "उलटा चोर, कोतवाल को डांटे" सारखी ओरड करायला व अशा "ओरडी"त सामील होण्यालाच "ते" प्राधान्य देत असतात. चिरस्थायी ग्राम-सभ्यता, ग्राम-संस्कृती ला नाके मुरडून, मागास(!) ठरवून क्षणभंगुर व विनाशकारी शहरी-सभ्यता/संस्कृती ला "ते" विनाशर्त शरण जातात. निसर्गाला शरण जाण्याची ग्राम-सभ्यता/संस्कृती त्याज्य ठरवून निसर्गावर विजय मिळवू इच्छिणारी स्व-विनाशी सभ्यता/संस्कृती चे गोडवे गाऊ लागतात.असे कितीतरी "साहित्यिक" मराठी साहित्य क्षेत्रात शहरो-शहरी आढळून येतात. ही कटू वस्तुस्थिती आहे. पण आमचा/माझा हा साहित्यिक मित्र मात्र या वृत्तीला अपवाद आहे. आणि कदाचित म्हणूनच अजूनही "दर्लक्षित"च आहे.
     आणि म्हणूनच माझा हा कवी-मित्र त्याच्या "फौज गिधाडांची" या परखड कवितेत म्हणतो...
"मरण स्वस्त झालं
तेव्हापासून दिसू लागलीय
मस्तवाल गिधाडांची फौज
जिवंत माणसांच्या रूपात
अधाशीपणे वर्दळताना..."
या ओळींतील "अधाशीपणे वर्दळताना" हे दोन शब्द वारंवार अनुभवावेत(?) असे मला वाटते. नेहमीच्या साध्या-सुध्या शब्दातही किती "भव्य अर्थ" भरता येतो, याचे जणू हे जिवंत प्रात्यक्षिकच! जय हो, मित्रा!
"फिरून यावं म्हटलं 
मनात ठाण मांडून बसलेल्या
आडवळणाच्या जंगलवाटांनी,
ज्या मोहवून टाकत होत्या
गर्द हिरव्या रानात
पाखरांच्या मागे धावताना
वेड्या झालेल्या मनाला..."
"जंगलवाटा" या कवितेतील कवीची ही खंत ख-या गाववासीयांनाच कळू शकेल कदाचित! "भस्मासुरां"ना मात्र हे दुःख, ही खंत कळणे जरा दुरापास्तच आहे. 
       जीवन म्हणजे सुख जवापडे, दुःख पहाडाएवढे असेच असते. या दुःखाच्या पहाडाला सहज पार करण्याची शक्ती हे जंगलच गाववासीयांना प्रदान करीत असते. म्हणूनच गाववासींना "मानसोपचार तज्ज्ञां"कडे शहरवासीयांसारखी रांग लावावी लागत नाही. या दुःखाच्या पहाडांना पार करण्यासाठी जंगल कसे साह्यभूत ठरते, यासंबंधीच्या कवीच्या ओळी पहा...
"जितक्या वाटा धुंडाळत
रानात चालत जावं
तितकी नजरेस पडतात 
रानफुलांनी डवरलेली झाडं

अक्रीत ह्याच गोष्टीचं वाटतं 
की या निर्जन जंगलात
दूरवरून दरवळत येणारं वारंही
कसं बोलू लागतं 
वाटेत डोलणा-या या रानफुलांशी? 

आपण मात्र बेमुर्वतपणे
तुडवत जातो ही रानफुले
आपल्या बेरड पावलांखाली 
तेव्हा ती गुमान चिरडून घेत
तशीच पडून राहतात 
रानवाटेवरच्या धुळीत 
आपला सुगंध उधळीत.
     अशी ही "जंगलगाथा" उत्तरोत्तर फुलत, उमलत जाते. जंगल ह्या आदिम संकल्पनेचे विविध पदर उलगडत जाते. जंगल हे ग्राम-सभ्यता/संस्कृती शी कसे एकजीव असते/झालेले आहे, याचे हा कवितासंग्रह म्हणजे जणू जिवंत प्रात्यक्षिकच! 
      कोणत्याही व्यक्तीचे वा त्याच्या कलाकृतीचे "आकलन" होण्यासाठी त्या व्यक्तीतील वा त्याच्या कलाकृतीतील छोटे-छोटे दोष(!) दुर्लक्षून "त्या"तील गुणच पहावे/अभ्यासावे, आणि कोणत्याही संघटना वा संस्थेच्या "आकलना"साठी मात्र "तिच्या"तील श्रेष्ठ गुणांपेक्षा क्षुल्लक-क्षुल्लक दोष/अवगुणच पहावे/अभ्यासावे, या संघटन-शास्त्रातील एका (जुन्या) सिद्धांताला मी मानत असल्याने मला "जंगलगाथा" या कवितासंग्रहातील "गुण"च पहावेसे/अभ्यासावेसे वाटले व त्याप्रमाणे अर्ध्याच संग्रहाचे "अवलोकन" मी केलेय. जेणेकरून वाचकांना उर्वरित भाग वाचण्याची/अभ्यासण्याची इच्छा व्हावी.
     विशेषतः NRV बंधूंना माझी आग्रहाची विनंती आहे की, त्यांनी हा संग्रह अवश्य वाचावा/अभ्यासावा.
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
    (जि.गोंदिया/विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~~~~~~(08.02.2019)~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन