कोरोना-पश्चातची "चला निसर्गाकडे"ची अपरिहार्य हाक आणि मी...

*कोरोना-पश्चात ची "चला निसर्गाकडे" ची अपरिहार्य हाक आणि मी....*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> मी अविभाजित भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगांव या तत्कालीन अंदमान-निकोबार सदृश्य (आवागमनाच्या दृष्टीने) एका आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित तालुक्यात तालुका सहकार निबंधक असताना 1997 मध्ये भंडारा अर्बन सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन गोंदिया या शहरात (शरद पवार गोंदिया ला मिनी-मुंबई म्हणतात) एक 30×60 फूट क्षेत्रफळाचा प्लाॅट/भूखंड खरेदी केला होता. निवृत्तीनंतर गोंदिया या शहरात स्थायिक होण्याच्या इराद्याने मी तो भूखंड खरेदी केला होता.

>> मी 1995 पासून अर्जुनी/मोरगांव या आवागमनाच्या दृष्टीने अतिशय दुर्गम स्थानी असलेल्या गावात (तालुका स्थळी) कार्यरत होतो. माझा तीन वर्षांचा विहित कालावधी केव्हाच लोटला तरी तेथून अन्यत्र माझे स्थानांतर होण्याची काही चिन्हे दिसेनात. अखेर जुन-1999 मध्ये मी अपत्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी लाखनी (जि.भंडारा) येथे माझे जुने मित्र भैय्याजी बावनकुळे यांच्याकडे भाड्याने घर घेऊन लाखनीच्या समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात मुलीला अकरावीत व मुलाला नववीत प्रवेश देऊन दिला. आणि मी कधी जाऊन-येऊन तर कधी अर्जुनी/मोरगांव येथेच थांबून आपल्या कार्यालयीन कामात नेहमीप्रमाणे कार्यरत होतो

>> याच दरम्यान सप्टेंबर-ऑक्टोबर 1999 दरम्यान माझे घरमालक भैय्याजी बावनकुळे यांच्या नागपूर येथील एका मित्राने नागपूरच्या नंदनवन भागातील एक फ्लॅट विकायला काढला. भैय्याजींनी मला हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी गळच घातली. आम्ही पती-पत्नी दोघांनी विचार केला असता आमचेही त्याबाबत एकमत झाले. त्यावेळी फ्लॅटची किंमत रु.दोन लक्ष होती. त्यासाठी मी जीपीएफ-लोन व भंडारा अर्बन सहकारी बँकेकडून गृहकर्जसाठी अशाप्रकारे दोन कर्जप्रकरणांची प्रक्रिया सुरू केली. या सर्व सव्यापसव्यासाठी अखेर डिसेंबर-1999 उजाडलाच. परंतु... 

>> नोव्हेंबर-डिसेंबर-1999 दरम्यान मला अविभाजित भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकल प्रशासक व त्याच वेळस डीडीआर भंडारा चा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला. अशावेळी आमचे घरमालक व मित्र भैय्याजी बावनकुळे यांनी एक अतिशय मोलाचा सल्ला दिला की, आता मी नागपूर ला फ्लॅट घेण्याच्या भानगडीत पडू नये. कारण मी जर नागपूरला फ्लॅट खरेदी केला तर बँकेच्या प्रशासक पदाची व डीडीआर च्या अतिरिक्त प्रभाराची ही "अनधिकृत देण" समजली जावुन माझी अकारणच बदनामी होण्याची पूर्ण शक्यता राहील. अर्थात मला हा सल्ला पटला. कारण 1997 दरम्यान मी अशाच एका अकारण, तद्दन खोट्या अशा बदनामीकारक, भयंकर संकटातून तावून सुलाखून निघालो होतो. मा.राष्ट्रपती यांच्या कार्यालयाकडून सुद्धा (होय, मा.राष्ट्रपती कार्यालयाकडून!) माझी चौकशी होऊन मी अखेर महत्प्रयासाने पूर्णतः निर्दोष सिद्ध झालो असलो तरी खूप पोळला गेलो होतो. अखेर मी माझी दोन्ही कर्जप्रकरणे परत घेतली व नागपूर येथे फ्लॅट घेण्याचे अखेर राहूनच गेले. अर्थात ही इष्टापत्तीच असल्याचे नंतर सिद्ध सुद्धा झाले. 

>> याच कालावधीत कदाचित 2001 च्या सुमारास माझे ज्येष्ठ मित्रवर्य, 'अंतर्नाद' मासिकाचे संपादक श्री.भानू काळे (पुणे) यांच्या मार्फतीने दिलीप कुलकर्णी व पौर्णिमा कुलकर्णी या दांपत्याची पत्रओळख होऊ शकली. दिलीप कुलकर्णी संपादित करीत असलेल्या छोट्याशा मासिकाचा, 'गतिमान संतुलन' चा मी वर्गणीदार-वाचक झालो. हळूहळू त्यांची इतर पुस्तके सुद्धा वाचू लागलो. आणि आम्ही मानव-प्राणी, निसर्गावर मात करण्याच्या ईर्ष्येने किती निसर्ग-नाश करतो, निसर्गद्वेष्टी कृत्ये करतो,  हे कळू लागले. शहरीकरणाचे भयानक व भयंकर असे गंभीरतम दुष्परिणाम समजू लागले. आम्ही निसर्गावर करीत असलेल्या अत्याचार व बलात्कार यांची जाणीव होऊ लागली. आमची विकासाची व्याख्या म्हणजे निसर्गाला अमर्याद/बेसुमार लुटणे/लुबाडणे अशी भयंकर निसर्ग-विरोधी विनाशकारी होऊ लागली होती/आहे, हे मला कळायला व पटायला लागले. व मी हळूहळू माझ्या, निवृत्तीनंतर शहरात स्थायिक होण्याच्या, विचारावर पुनर्विचार करू लागलो. आम्ही चौघांनी (पती, पत्नी, कन्या व पुत्र) यावर चर्चा सुद्धा केली. अखेर मी/आम्ही निवृत्तीनंतर माझ्या जन्मगावी एका छोट्याशा खेडेगावात स्थायिक होण्याच्या विचाराप्रत पोचलो.

>> जानेवारी-2003 च्या 31 तारखेला कार्यमुक्त होऊन मी 01 फेब्रुवारी 2003 ते 31जानेवारी 2004 या एक वर्षाच्या तत्कालीन शासनमान्य बिनपगारी असाधारण रजेवर गेलो. (त्यावेळी महाराष्ट्र शासनाची अशी एक योजना होती, हे काहींना आठवत असेल.) एकतर एमपीएससी मार्फत डायरेक्ट वर्ग-2 पदावर नियुक्ती होऊनही व 9-10 आऊटस्टँडिंग सी.आर. असूनही 19 वर्षात, विविध न्यायालयीन/प्रशासनिक अडचणींमुळे,  एकही पदोन्नती होऊ शकली नव्हती व गावात नव्याने घर बांधायची इच्छा सुद्धा होती. म्हणून मी वरीलप्रमाणे एक वर्षाच्या बिनपगारी असाधारण रजेवर जाऊन फेब्रुवारी-2003 मध्येच माझ्या जन्मगावी, आमच्या वडोलोपार्जित वाड्याला लागूनच असलेल्या खाली जागेवर एक घर बांधायच्या कामाला सुरुवात केली. परंतु...

>> 01 मार्च 2003 ला गोंदिया चे तत्कालीन डीडीआर मिलिंद आकरे साहेबांनी निरोप दिला की, पदोन्नतीचे आदेश निघत असून मी रजेवरून परत यायला तयार असेन तर मला सद्धा पदोन्नतीची पोस्टींग मिळेल, म्हणून मी ताबडतोब माझी संमती फॅक्स ने शासनाला कळवावी. अर्थात मी संमती कळविली. आणि तात्काळ पदोन्नतीचे आदेशही निर्गमित झाले. मला दि.08 मार्च 2003 ला आदेशाची फॅक्स प्रत मिळाली व मी ताबडतोब डीडीआर चंद्रपूर म्हणून रूजू व्हावे असा वेगळा आदेशही प्राप्त झाला. अर्थातच मी दि.10 मार्च 2003 ला डीडीआर चंद्रपूर म्हणून रूजू झालो. इकडे गावी घराचे बांधकाम सुरूच होते. माझ्या वडीलांची देखरेख होती. अखेर चार वर्षानंतर रखडत-रखडत, हळूहळू ऑक्टोबर-2007 मध्ये माझे गावातील घराचे बांधकाम पूर्ण झाले. जानेवारी-2008 मध्ये माझ्या मुलीचे लग्न झाले. मुलगी सासरी गेली, मुलगा शिकायला नागपूरला गेला आणि इकडे आमची/दोघांची गावी जाण्याची वारंवारिता वाढली. 

>> अखेर चंद्रपूर--> यवतमाळ--> गडचिरोली--> यवतमाळ असा डीडीआर पदाचा प्रवास करीत मी दि.28 फेब्रुवारी 2013 ला यवतमाळ च्या डीडीआर पदावरून निवृत्त झालो. व दि.07 मार्च 2013 ला सामानासह माझ्या जन्मगावी परतलो.

>> एका मिनी ट्रकवरच माझा थोडासा असलेला सारा सामान गावी आणला असता सामान उतरवण्यासाठी गावातीलच तीन-चार मजूर माझ्या वडिलांनी बोलावून ठेवले होते. त्यांना हमालीची सवय नसल्याने त्यांनी हळूहळू सामान उतरवून घरात ठेवला. या सामानात माझ्या पुस्तकांनी भरलेल्या चार मोठ्या ट्रंका आणि पुस्तके-फाईल्स-मॅगेझिन्स आदिंचे आठ-नऊ पोते होते. इतर सटरफटर सामानासोबतच ह्या ट्रंका आणि पोते सुद्धा त्या मजूरांनीच उतरविले.

>> दुस-याच दिवशी आमच्या गावातून जाणा-या तत्कालीन राज्यमार्गावरील पानठेल्यांवर त्या मजूरांद्वारे बातमी पेरली गेली की, "लखनसिंह कटरे ने रिटायरमेंट नंतर ट्रंका आणि पोते भरभरून रुपये/पैसे आणले, आम्ही स्वतः उतरवले ते!" मजूरांनी पेरलेली ही फेक न्यूज लवकरच गावभर पसरली.

>> आता याला नऊ वर्षे होत आहेत. मी माझ्या या छोट्याशा खेडेगावात सुखी-समाधानी आहे. माझा उच्चशिक्षित (B.Com., LL.B., M.B.A.(Fin & HR)., S.A.P.) पुत्र सुद्धा आपला सुव्यवस्थित जाॅब सोडून माझ्या सोबत गावातच राहून आधुनिक पद्धतीने शेती करतोय.

>> त्यावेळी मला गावात राहण्यासाठी नावे ठेवणारी सारी मंडळी आताच्या या *कोरोना*मुळे मात्र माझ्या निर्णयाची प्रशंसाच नव्हे अनुकरण करण्याचेही बोलत आहेत. मला त्याबाबत विचारणा करीत आहेत. 
जय जय कोरोना!!! जय हो!!!
😀😀😀
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(03.05.2020/2021/11.02.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन