आणखी एक अनुत्तरीत पत्रव्यवहार.....

बोरकन्हार-441902, जि.गोंदिया,  दि.12.10.2019
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रति,
मा.श्री.सुहास कुलकर्णी,
संपादक, महाराष्ट्र दर्शन. 
समकालीन प्रकाशन, पुणे-30

सप्रेम सादर नमस्कार. 

>> मी, लखनसिंह कटरे, (निवृत्त जिल्हा सहकार निबंधक)!
मी मे-1984 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन कृषी व सहकार (विद्यमान सहकार, पणन व वस्त्रोद्योग) विभागात, MPSC द्वारे निवड होऊन, राजपत्रित अधिकारी म्हणून रूजू होऊन फेब्रुवारी-2013 मध्ये निवृत्त झालो. या दरम्यान मी पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे सह), मराठवाडा (औरंगाबाद, बीड सह), विदर्भ (गडचिरोली ते यवतमाळ सह) या भागात नोकरीनिमित्त सपरिवार सह-निवास केला आहे. कोंकण व खान्देश भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी मी सपरिवार सह-निवास केला असल्याने व सहकार, पणन हा विभाग मुख्यतः ग्रामीण महाराष्ट्राशी सर्वाधिक संबंधित असल्याने मला या भागातील संस्कृती, इतिहास, समाजजीवन/ग्रामजीवन, लोकसाहित्य, पर्यावरण, शेती, इ. संदर्भात जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली आहे/होती. 

>> निवृत्तीनंतर मी कोणत्याही शहरी/नागरी भागात निवास न करता माझ्या जन्मगावी/छोट्याशा खेडेगावी निवास करून सपरिवार राहत आहे. मला वाचनाचा जणू "भस्म्यारोग" झाल्याप्रमाणे पूर्णवेळ वाचक म्हणून सध्या जीवन जगतो आहे. त्यासाठी 60 (मराठी/हिंदी/इंग्रजी) नियत/अनियतकालिकांचा वैयक्तिक वर्गणीदार वाचक झालो आहे. शिवाय झाडीबोली, पोवारी बोली या दोन ऐतिहासिक अशा प्राचीनतम बोलींच्या चळवळीत व अभ्यासात सक्रीय सहभाग नोंदवत आहे. तसेच महाराष्ट्रातील अन्य बोलींच्या संदर्भातील बोली साहित्य चळवळ या नागपूर स्थित संघटनेत सुद्धा सक्रीय भाग घेत आहे.

>> आजवर माझी बारा पुस्तके (पाच कविता संग्रह, एक अभंग संग्रह, एक कथासंग्रह, एक संकीर्ण व एक दीर्घ कविता पुस्तक, एक हिंदी कविता संग्रह, एक पोवारी बोली तील पुस्तक व एक हिंदी अनुवाद) प्रकाशित झाली आहेत. 

>> कदाचित यामुळेच, मी कोणताही अर्ज/आवेदन न करता, महाराष्ट्र शासनाने डिसेंबर-2018 मध्ये माझी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर तीन वर्षाकरिता सदस्य म्हणून नियुक्ती केली होती व मी तेथे आपल्या अल्पस्वल्प मगदुराप्रमाणे सदस्य म्हणून कार्यरत राहू शकलो.

>> रामदास स्वामी यांच्या "दासबोध" मध्ये नमूद मूर्खांच्या लक्षणांपैकी एक लक्षण वरीलप्रमाणे पूर्ण करून "मी एक मुर्ख" असल्याचे मी याद्वारे सिद्ध केल्यावरच समोरचे लिखाण करीत आहे. कृपया माझा हा "मूर्खपणा" सुद्धा ध्यानात घ्यावा ही सविनय विनंती आहे.

>> दि.22.09.2019 ला छत्तीसगढ़ येथील छत्तीसगढ़ मराठी साहित्य परिषद, बिलासपूर द्वारे आयोजित "भाषा व्यवहार : मराठीचे अनुबंध" या एक दिवसीय चर्चासत्राला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली होती. (चर्चासत्राचे आयोजक श्री.कपूर वासनिक हे माझे महाविद्यालयीन जीवनातील वर्गमित्र असल्याने.) त्या चर्चासत्रात बोलताना मुंबईचे श्री.गिरीश पतकी आणि पुण्याचे डाॅ.दामोदर खडसे यांनी त्यांच्या विद्वत्तापूर्ण व्याख्यानात आपल्या द्वारे संपादित व प्रकाशित "महाराष्ट्र दर्शन" या ग्रंथाचा आदरपूर्वक उल्लेख केला होता. मला या ग्रंथाबद्दल थोडीफार पूर्वकल्पना असली तरी त्याच्या एकंदर स्वरूपाबद्दल मी अनभिज्ञच होतो. परंतु वरील दोन्ही मान्यवरांचा अभिप्राय ऐकून मी हा ग्रंथ विकत घेऊन वाचण्या/अभ्यासण्याचे ठरविले. त्यानुसार मी हा ग्रंथ आपल्याकडून मागवला. दि.10.10.2019 ला हा ग्रंथ मला मिळाला. काल 11.10.2019 ला त्यातील आपले "नमन" तथा अंतरंगातील नागपूर जिल्हा आणि संयुक्त चंद्रपूर-गडचिरोली-भंडारा-गोंदिया जिल्हे यासंबंधीचे दोन्ही लेख वाचले. नागपूर जिल्ह्याचा लेख अप्रतिम झाला आहे, यात वादच नाही. मनोज भाऊ जोशी यांना सलाम!

>> परंतु चंद्रपूर-गडचिरोली-भंडारा-गोंदिया जिल्ह्यांवरील लेखाने माझे मित्र श्री.देवेंद्र गावंडे आणि हे चारही जिल्हे या पाचही-वर "भयंकर" अन्याय व अत्याचार केला आहे, हे सुद्धा मला सांगितले पाहिजे. वस्तूतः देवेंद्र गावंडे हे आजतरी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यावर लिहिण्यासाठी एकमेव सक्षम पत्रकार व अधिकारी व्यक्ती आहेत. पण आपण त्यांच्यावर अतिरिक्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यांचा सुद्धा भार टाकल्याने देवेंद्र गावंडे आणि ते चार जिल्हे अशा पाचही जणां(?)वर आपण अन्यायच केला आहे. आपण आपल्या "नमन" मध्ये नमूद केलेले पहिलेच वाक्य त्यामुळे बिघडले असून ते वाक्य---"महाराष्ट्र दर्शन' हा एक भ्रामक/फार्स स्वरूपाचा पुस्तकप्रकल्प असून, तो एक फसलेला पुस्तक-प्रयत्नही आहे, असे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्राचं बहुरंगी दर्शन "'बि'घडविण्याचा प्रयत्न" अशा भलत्याच स्वरूपाचे विदारक चित्र तयार होऊन माझ्यासारख्या गोंदिया-भंडारा जिल्हा-निवासींकरिता हे अतिशय दुखदायी ठरत/ठरले आहे. 

>> देवेंद्र गावंडे सारख्या, माझे मित्र असलेल्या, एका सक्षम व त्याविषयाचा अधिकारी असलेल्या व्यक्तीवर सुद्धा हे अन्याय करणारे आहे. 

>> वस्तूतः भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा संदर्भ देण्या/लिहिण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे लिखाण आवश्यक ठरले असते, इतके या दोन्ही जिल्ह्यात वैविध्य आहे. म्हणजे या जिल्ह्यांतील कचारगड गुहा/गुफा (आशिया खंडातील सर्वात मोठी निसर्गनिर्मित गुफा), मांडोबाई-सूर्यादेव देवस्थान, ससेकरण देवस्थान व या त्रयींतील ऐतिहासिक/मिथकीय संदर्भ, चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले डाकराम/सुकळी, चांदपूर, गायमुख, हाझरा फाॅल, पोंगेझरा, गढमाता(सालेकसा), हलबीटोला(सालेकसा)-सारखी सुप्रसिद्ध देव/निसर्गस्थाने, पुजारीटोला, कालीसराड, सिरपूर, गोठणगाव, बोदलकसा, कटंगी, आदिसारखी महत्वाची धरणे, बोंडगांव/देवी, सानगडी, आमगांव, कामठा वगैरे कित्येक ऐतिहासिक स्थळे, यांच्या संक्षिप्त टिपणाने सुद्धा या जिल्ह्यांची खरीखुरी ओळख पटविणे शक्य झाले असते.

>> शिवाय चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही इतिहास प्रसिद्ध व इतिहास समृद्ध जिल्ह्यांना स्वतंत्र प्रकरणे दिली असती तर देवेंद्र गावंडे हे त्यावर आणखी संदर्भासहीत लिहायला पूर्ण सक्षम व अधिकारी व्यक्ती आहेत. तसे न केल्याने त्यांना या दोन्ही जिल्ह्यांना योग्य न्याय देता आलेला नसल्याने एकप्रकारे गावंडेजींच्या प्रतिभेचाच उपमर्द करण्यात आलेला आहे, असे ध्वनित होते.

>> महोदय, 
ही टीका किंवा नाराजी नव्हे! याकडे तशा दृष्टीने पाहू नये अशी सविनय प्रार्थना आहे. 
तथापि आपणास तसे वाटल्यास माझ्या या अव्यापारेषु व्यापार ठरणा-या किंवा लहान तोंडी मोठा घास घेणा-या लिखाणाच्या धृष्टतेबद्दल मला क्षमा करावी ही विनंती. 

>> "महाराष्ट्र दर्शन" सारख्या संदर्भ-सदृश्य ग्रंथात "अशा" त्रुटी असू नयेत या शुद्ध हेतूने हे कळवीत आहे. तरीसुद्धा आपल्याच भाषेत सांगायचे झाल्यास, ---"...स्वतःला सर्वज्ञ समजणारे पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील लोक महाराष्ट्राबद्दल विशेष अज्ञानी आहेत, असं लक्षात येतं. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक सत्तेची सूत्रं हळूहळू पुण्या-मुंबईपासून दूर सरकू लागलेली असली, तरी 'आपल्याला सर्व काही माहित आहे' असा गंड इथल्या धुरीणांमध्ये अजूनही कायम आहे. ही परिस्थिती फारशी चांगली नव्हे, कारण अपुरी माहिती असण्यापेक्षा जेवढी माहिती आहे ती संपूर्ण आहे असं मानणं घातक!" --- 
असे/एवढे उद्घृत करून थांबतो. 

>> तसदीबद्दल क्षमस्व.
¤
□आपला एक (ग्राहक)/वाचक, 
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया (अतिपूर्वेकडील विदर्भ)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ता.क.
मागे दि.21.03.2019 ला एका ईमेल द्वारे श्री.हेरंब कुलकर्णी यांच्या "दारिद्र्याची शोधयात्रा" या आपणच प्रकाशित केलेल्या भ्रामक, डाटा-विश्लेषणाचा उलटा/विपरित पिरॅमिड वापरून लिहिलेल्या ग्रंथाबद्दल माझे अल्पबुद्धीचे आकलन कळविले होते. पण अजूनही त्यावर आपणाकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे माझ्या सदरील आकलनावर सुद्धा आपण काहीच प्रतिसाद देणार नाही, याची खात्री असली तरी न राहवल्याने थोडासा बेशरम होऊन लिहून बसलो. कृपया क्षमा असावी. 
@लखनसिंह कटरे. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


 

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन