कविता : 2022 (01 ते 21)

कविता : 2022 (01 ते 21)
~~~~~~~~~~~~~~~~~
(1)
*घानमाकड*
~~~~~~~~
रस्त्याची रुंदी मोजता मोजता
संपले सारे जीवन तरी,
जाणिली ना कला भेदण्याची
घोंघावत राहिले ते अधांतरी. 

'श्रावण मासी हर्ष मानसी' 
ठरली कधीची हद्द नवलाईची 
थकली, रुसली कल्पनाशक्ती
ओलांडून हद्द पुढे जाण्याची. 

बंदिस्त लेखणी परीघात आणि 
स्वयंघोषित गतानुगामी सरणी 
नावीन्याचे वावडे जयांना तेच 
रुजलेल्या त्या वाटेवरचे सेनानी. 

चक्रव्यूह तो जुनाच रेंगाळलेला 
भेदून जाण्याची मरगळ पृच्छा 
जंगलेली तलवार घेऊन हाती 
बाळगती अजागळ भ्रमित इच्छा. 

लोलक फिरवून गोलगोल सदा 
वर्तुळातील क्लृप्त्या न्याहाळती 
वास्तव सारे अस्ताव्यस्त पडलेले 
देखूनही डोळे मिचकावून जाती.

सीमेपारचे क्षितिज ते अनाघ्रात 
जाणिले ना जाणवले कधी 
दुरूनच डोंगर साजरे करण्यात 
निसटून जाते पायाखालील संधी.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(11.01.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(2)
*लांडगा आला रे आला...!*
---------------------------------------
तालीमही नाटकाची आता फसू लागली आहे 
नटाच्या अश्रूंची धार आता सुकू लागली आहे. 

प्रेक्षकांसमोर नाटककारच नट बनून येतो 
नटण्याची हौस नटाची उतू लागली आहे. 

संवाद-समन्वय आता निसटून जात असता 
थिल्लर क्लृप्त्यांना जाग येऊ लागली आहे. 

कुंपणावरील सरडाही लाजून चूरचूर व्हावा 
रंगांतराची अशी किमया दिसू लागली आहे. 

लांडगा आलारे आला, धावा, वाचवा आता 
फसवी/भ्रामक आरोळी अशी फुटू लागली आहे.

नेपथ्य सारेच ते अस्ताव्यस्त इतिहास-दुष्ट 
भविष्याच्या स्वप्नांची झोप उडू लागली आहे. 
¤
@खगेन्द्र मोहन ऊकाराव,
(07/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(3)
*कावळ्यांना वाटते, आता तेच बगळे*
-----------------------------------------------
पांढरे सारे होता काळे 
कावळ्यांनी पळवले बगळे 
रातोरात बांधून इमले 
मिस्त्री सारे झाले नामानिराळे. -1-

करामतीचे मार्ग वेगवेगळे 
झालेत अकस्मात काळे-निळे 
चौकाचौकात उभे पहारेकरी  
घेऊन सोबतीला सापळे. -2-

दाखल झाले खारीज सगळे 
झाडावर लटकवलेले झोपाळे 
झुलतांना शिष्य वरचढ होता 
गुरुजींनाच झोंबले भूत काळे. -3-

पसरले बाराही महिने पावसाळे
उन्हाळ्यात उगवले हिवाळे 
गुरजींच्या स्वयंघोषित थोरवीला 
पेलवेनात मग सायास डोहाळे. -4-

उलटे पाय भुताचे पिवळे 
गावोगावी साकारती सोहळे 
आभाराचा आभास भ्रामक 
आणि फाजील फसवे उमाळे. -5-

लपवून वाचाळतेचे दिवाळे
करती फसव्या उपाधिंचे चाळे 
वासरात होता लंगडा बैल शहाणा 
कावळ्यांना वाटते, आता तेच बगळे. -6-
¤
@खगेन्द्र मोहन ऊकाराव 
(08/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(4)
 *काही अनभिज्ञ असेही...!*
-----------------------------------------
विसरतो सूर्य आजकाल 
आपली दिशा उगवतीची 
आणि 
उगवू लागतो सकाळी सकाळी 
कोणत्याही/भलत्याच दिशेला.

तारांबळ उडते मग 
सर्व प्राणिमात्रांची 
आणि 
पुसट होत जातो दिशा-भान 
सर्वांचा अकारण अकस्मात. 

दिशाही होत जातात मग 
दिशाहीन अशा वातावरणात 
आणि 
उगवतात जिकडेतिकडे 
दिशा-ज्ञानाचे कोचिंग क्लासेस. 

होतो दाखल सूर्यही मग
अशाच एका कोचिंग क्लासात 
आणि 
शिकवणीच्या या भाराने 
सूर्य काळवंडू लागतो हळूहळू.

चंद्र, काजवे, पणत्या, वगैरे
बळकावतात प्रकाश-किल्ला 
आणि 
होऊ लागते तिथे नव-रचना 
दिशा-शून्य सत्योत्तर 'विश्वा'ची. 

कोण अडवतो वाट कोणाची 
कोण भेदतो सुरक्षाकवच 
आणि 
कोण साधतो दिशा-संवाद 
चौकालाही ते असते अनभिज्ञ. 
¤  (अपूर्ण...) ¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(08/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(5)
*नव-संहिता*
---------------------
झोपलेल्यांना करून जागे 
झोपले मग सारे जागलेले 
ऊर्मज्ञानी आरूढले गादीवर 
भक्तिपंथाला मग उतू आले. 

अविचाराची देखून चलती 
विचारवंत सारे मग दुबकले 
दडून आड मोहक शब्दांच्या 
सारथ्यांनी रथमार्ग विस्तारले. 

उधार आणलेली ताकद सारी 
सिंहारूढ होता कायम झाली 
ताकदवान ते मूळचे डावलून 
मेंढ्यांची फौज उभारून झाली. 

फसले सारे शिवारही बिचारे 
शब्दार्थांना ओढून झोपी गेले 
शब्दकोशातून पसार झाले शब्द 
ठरवले गेले मग त्यांना जुमले. 

असत्यात भेसळून थोडे सत्य 
आसमंत मस्त रंगवण्यात आले 
नैतिकेची देऊन सारी दुहाई 
आपले तेच खरे रेटण्यात आले.

सूर्य उगवू लागला पश्चिमेकडून 
पूर्वेला मग तो मावळू लागला 
दिशाभ्रमाची दीक्षा दिली आणि 
शिष्यांनी पसरविले नव-संहितेला. 
¤
@खगेन्द्र मोहन ऊकाराव 
(08/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(6)
*दग्ध होई रान...!*
------------------
उमलता आस
सर्वांगी थर्थर
अतृप्त अधर 
अनोळखी.

वांझ सारी सभा 
प्रमेय असाध्य 
अबाध्य ते बाध्य 
अंतर्मुख. 

दखल क्षणैक 
लवचिक भेट 
जीवनाची थेट 
तजवीज. 

कोमेजता पाने 
खोड तडफडे 
नावड आवडे 
सायंकाळी. 

मौन ती कहानी 
शब्दांना भोवली 
अभागी सावली 
अंधाराची. 

साचलेले सारे 
विखुरता मौन 
दग्ध होई रान 
विझताना.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(05/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(7)
*दशांगुळे उरलेली व्यथा-कथा*
------------------------------
दस्तावेज सारे 
झाले अस्ताव्यस्त 
इतिहास सुस्त 
विसावले.

लक्ष्य वितळता 
पहाटली उषा 
निराश निराशा 
सुप्तावली.

जीव मुठीतला 
आक्रसला जरा 
दुभंगली धरा 
अजाणता. 

तप्त ते दिवस 
विस्तारित झाले 
नाही थंडावले 
अजूनही. 

आज कदाचित 
उघडले डोळे 
दिवस आंधळे 
परी आता. 

तात्पर्य भ्रामक 
भविष्य विस्तृत 
अचाट अमृत 
क्षणोक्षणी.

तर-तम सारे 
दाखले विगत 
अतृप्त मनात  
अनाठायी.

रीत पहाटावी 
विस्तारावी वाट 
डोंगर सपाट 
व्हावे आता. 

युग्म सांधताना 
सावडावी ऊर्जा 
बदलावा दर्जा 
क्षणभर. 

प्रतिक्षारत मी 
तुही प्रतिक्षारत 
अजोड विरक्त 
जन्मोजन्मी. 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(05/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(8)
*जाणारा काळ येताना...*
-------------------------
(31 डिसेंबर)
~~~~~~~~~~~~~~~~~
दिवसामागून निघून जातात दिवस 
आणि
रात्री साऱ्या येतात उचंबळून, 
अचानक एके दिवशी 
रात्रच गहाळ होते 
तेव्हा म्हणे काळ नव्याने सुरू होतो.

पावलावर न ठेवता पाऊल 
रस्ते बदलणारे इतिहासमग्न दिवस 
अचानक गायब होतात 
आणि 
रात्री भुंकणारे सारे कुत्रे 
कृतज्ञ रात्रींनाच शाप देऊ लागतात. 

अगाध बडबडणारे सारे दिवस 
मुके होऊन गाढ झोपी जातात, 
आणि 
काजव्यांनी सजवलेल्या रात्री 
अचानक चंद्राला भोवळ येते 
तेव्हा म्हणे काळ स्तब्ध झालेला असतो. 

काळाच्या पडद्याआड लपलेले दिवस 
नेपथ्य सारे अस्ताव्यस्त पखरून 
रात्रीच्या कवेत विसावतात 
आणि 
नट-नटी सारे नाटकातील 
काळाला शरण जातात.  

काळ उगवतो, काळ मावळतो 
भविष्यलोभी सारे थकलेले दिवस 
भूतकाळातील रात्रींना वगळू पाहतात 
आणि 
दग्ध झालेल्या नाराज रात्री मग 
काळाला गिळून ढेकर देतात.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(31.12.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

9)
*उजाडता उजाडता...*
~~~~~~~~~~~~~~~~~~
उजाडता उजाडता झाली सायंकाळ,  
आधारस्तंभ कोसळले  
आणि 
विखुरला काळ.  
¤
पोकळीत साऱ्या सामावली ही धरणी,   
चवताळले अंतरिक्ष   
आणि  
संभ्रमित पाणी.   
¤
विसरले गरूडही उडण्याची कला,   
कूपमंडूक जन सारे  
आणि  
पुढ्यात श्रृंखला. 
¤
सर्वतोपरी आत्ममग्न ते जयगान, 
शीतल सारे परदुःख  
आणि  
नाट्य विवेचन. 
¤
समर्थन विस्मृतीचे झाले दणकट,
झाले पूर्वज अस्ताव्यस्त 
आणि 
वंशज तर्कट. 
¤
@खगेन्द्र मोहन ऊकाराव 
(12.01.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

10)
*काटा रुतल्यावर...!*
------------------
काल-परवा केव्हातरी,
निश्चित दिवस व वेळ आठवत नाही, 
माझ्या पायात काटा रुतला, 
मी कळवळून जागीच बसलो 
काटा काढण्याची खटपट करू लागलो.

इतक्यातच धावून आले 
दोन-चार राजकीय नेते,
त्यांनी मला धीर दिला, 
शासकीय मदत मिळवून देण्याचे बोलून गेले,
मी काटा काढण्यातच मग्न होतो.

इतक्यातच पुन्हा दोन-चार राजकीय कार्यकर्ते 
प्रकटले तिथे,
त्यांनी माझे कोरडे सांत्वन केले, 
नेत्यापर्यंत बातमी पोचवण्याची हमी दिली 
आणि हळहळत निघून गेले,
मी काटा काढण्यातच मग्न होतो.

इतक्यातच पुन्हा दोन-चार मतदार धावून आले,
त्यांनी मला ठासून आश्वासन दिले की,
मी त्यांच्या दारू-पाण्याची 
व काही बक्षिसीची व्यवस्था केल्यास 
ते मला काटा काढण्यास हमखास मदत करतील, 
माझा कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने  
ते तेथून हळूच पसार झाले,
मी काटा काढण्यातच मग्न होतो.

माझ्या पायात रुतलेला काटा 
अखेरपर्यंत मला काढताच आला नाही. 
¤
(रामानुज प्रभातरुद्र)
(मूळ हिंदीतून मराठी अनुवाद : लखनसिंह कटरे)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

(11)
◇मी आवर्तात फसलो...◇
~~~~~~~~~~~~~~~~
मी आवर्तात फसलो
पांढ-या शुभ्र वा-याच्या,
पायाखाली माझ्या
ठेवलेत मी चुकलेले रस्ते,
कबूलीजबाब अनाथ झाल्याने
मी अज्ञातवासाला पात्र ठरलो.

मूकभाषा माझी
अडकली कानात त्यांच्या
आणि एक क्षणभंगूर जीवन,
मी हतवीर्य होऊन
उभ्याउभ्या 'सरकवत' राहिलो,
वळणच मग रस्ते झाले,
आणि
चौकाचौकातील फसवे देखावे
माझ्या डोक्यात मग
मावेनासे झाले.

मी सुकलेल्या डारांच्या* मांडवाखाली
घुंघरू पायाला बांधून
डेरी*ला पालवी फुटेल,
या 'फसव्या' आशेने
वाटेची वाट देखत
थांबण्याचे नाटक खेळलो.

सत्कार खूप झाले माझे,
'मीच ते घडवून आणले;'
या आरोपाचा मी धनी झालो,
आणि
त्यांचे आकाश
चांदण्यांनी सजले तेव्हा
मी मात्र अंधाराशी लढत राहिलो.

माझ्या भविष्याच्या वर्तमानाला
मी कवेत घेतले
आणि
उलटे मंत्रजाप करीत
मी यज्ञसमीधा झालो,
तेव्हा माझ्या हातातील कबूतर
उडाले की मी उडवले;
या तर्कदुष्ट चकव्याला
पळवाट दाखविण्याच्या नादात
मीच माझा 'आरसा' झालो.
मी पांढ-या शुभ्र वा-याच्या
आवर्तात फसलो...!
(*झाडीबोलीतील शब्द)
○○○
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार-441902
~~~~~~(25.01.2018)~~~~~~~~~~~~

(12)
*छद्माची आरती*
--------------------------
पोसता पोसता द्वेष
रोडावते प्रतिभा,
प्रसवू लागते मग
सारी बाळबोध कथा. 
¤
'आला लांडगा धावा' 
सुरू होते धावाधाव,
फसवा असा प्रचार 
आणि खोटाच आव. 
¤
बहरता आत्मस्तुती 
लाजू लागती शब्द, 
करू जाता बळजबरी
अर्थन्यून होती शब्द. 
¤
पिऊन टाकता लाज 
होई पोरके अस्तित्व, 
वाजवून ढोल मग 
दवंडी पिटती भक्त. 
¤
साद सुप्त विवेकाची 
जबरीने नाकारता,
रुतू लागे चिखलात 
फसवी सारी महत्ता. 
¤
विस्कटून क्रमानुक्रम 
ढालीनेच लढू लागती,
पेलेना तलवार त्यांना  
गाती छद्माची आरती. 
¤
@खगेन्द्र मोहन ऊकाराव 
(24.01.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(13)
■CONFESSION■
~~~~~~~~~~~~
मी
मीच आहे,
हे मला मान्यय.
तू कोण?
तू तूच आहेस किंवा कसे,
मला शंकाच शंका!

मी
म्हणेन तीच पूर्व!
पश्चिम, उत्तर, दक्षिण...
नैऋत्य, ईशान्य, आग्नेय, वायव्य...
मी ठरवीन त्याच!
त्यानुसारच तुला
तुझ्या दिशा ठरविता येतील,
कारण
मी साशंक आहे
तुझ्या अस्तित्वाबद्दलच!

मी
अजेय आहे,
मी सदैव जिंकतच आलोय,
युद्धाचे नियम मीच ठरवत असतो.
तू
माझ्यासोबत कोणतेही युद्ध करू शकतोस,
पण
युद्ध-नियम मीच ठरवणार
नेहमीप्रमाणे!

मी
युक्तिवाद-स्वामी आहे,
षड्दर्शनेही मला वचकूनच असतात.
तू
शंकित-अस्तित्वाचा आभास...
माझ्यापुढे
तुझा टिकाव शक्यच नाही,
तरी तू लढू शकतोस माझ्याशी!
अखेर पराजय स्वीकारण्याची
तुझी आकांक्षा
मी करेन पूर्ण,
आश्वस्त रहा!!
□□
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902
(07.10.2018)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(14)
 *थांबला पाऊस*
------------------------
पाऊस थांबला,    
परतले उन 
घामाघूम रान || अवघेचि ||१||

थांबला पाऊस 
घरंगळे पाणी 
सोडून निशाणी || वाहण्याची ||२||

थांबला पाऊस 
पाने ओलेचिंब 
जरठले कोंब || धरेपोटी ||३|| 

थांबला पाऊस 
भिजली वाकळ 
वासे जे पोकळ || वाकले गा ||४||

थांबला पाऊस 
याद ताजी झाली 
अरण्य सावली || अनाघ्रात ||५||

पाऊस थांबला 
झाला तसा भास 
सुप्त वनवास || आजीवन ||६||
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(08.10.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(15)
*तर्क, कुतर्क आणि वितर्क...वगैरे*
----------------------------------------------
काही 
मला अंतरलेले,
काही 
मी अव्हेरलेले, 
मध्येच सोडलेले, 
सर्व रस्ते 
एकवटले एकत्र 
एका 
घनदाट अरण्यातील 
महाकाय वटवृक्षाखाली 
आणि 
भरवली त्यांनी 
एक परिषद 
तेथे 
त्याच वटवृक्षाखाली
एकांत स्थळी.

परिषदेत 
सर्व रस्त्यांनी 
मांडली जोरकसपणे 
भूमिका आपापली
तर्क,
कुतर्क,
वितर्काचा आधार घेत 
आणि 
अखेर
माझ्यावरच थोपला आरोप 
सर्वांनी एकमुखाने
मीच पथभ्रष्ट असल्याचा/झाल्याचा.

परिषदेचा 
सविस्तर वृत्तांत 
कळविण्यासाठी मला 
आणि
आणण्यासाठी 
माझा खुलासा,
नेमले त्या रस्त्यांनी 
एका 
नवजात पायवाटेला. 

घसरून पडली 
अरण्यातच 
ती पायवाट, 
निरोप घेऊन येताना 
माझ्याकडे
आणि 
सांडला निरोप 
तिच्याकडून 
कुठेतरी अरण्यातच,... 
सुटले वादळ 
अचानकच अरण्यात,... 
वादळाने आणला 
उडवून तो निरोप 
माझ्यापर्यंत.

तेव्हापासून 
मी आहे विचारमग्न 
काय खुलासा करावा 
मी 
आणि
कशी मांडावी 
माझी बाजू 
मी 
त्या रस्त्यांच्या त्या परिषदेपुढे! 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(02.11.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(16)
*...विस्कटले सारे भविष्यकथन*
-----------------------------------------------
दचकून उठले सारेच मित्रग्रह 
सूर्याला घाम फुटल्याचे समजल्यावर 
आणि 
विसरून सख्यभाव कुंडलीतील 
वक्रगतीने चालू लागले 
दृष्टी ठेवून एकमेकांवर. 

साडेसातीचे सारे सोपस्कार 
शनीने आटोपले एकदाचे 
आणि 
गुरुने मांडले बस्तान 
शुक्राच्या स्वस्थानी अकस्मात 
तेव्हापासूनच विस्कटले सारे भविष्यकथन. 

चंद्र आपला निर्णय बदलून 
बुधाच्या घरात घुसला जबरीने 
आणि 
राहू राहून राहून उडू लागला 
बुद्धीबळातील घोड्यासारखा अडीच घर 
तेवढ्यातच केतूने साधले आपले इप्सित. 

अखेरीस कंटाळून मंगळाने 
लग्नस्थानी उभारले ध्वजदंड 
आणि 
चतुर्थ, अष्टम, द्वादशस्थानी 
सकाम पोकळी निर्माण होऊन 
सारे सापेक्ष भाव निरपेक्ष झाले. 
¤
@खगेन्द्र मोहन ऊकाराव 
(26/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(17)
*भेटीची एक आस अधुरी*
-----------------------------------------
मी त्याला भेटू इच्छित होतो 
खूप दिवसांपासून होती माझी इच्छा 
त्याला कडकडून भेटण्याची. 

तो राहतो त्या गावात एसटी जाते 
मी एसटीत बसून पोचलो त्याच्या गावी 
आणि चालू लागलो पायी गल्लीबोळातून 
शोध घेत त्याच्या अरण्यगर्भ घराचा. 

पोचलो अखेर मी 
त्याच्या त्या अरण्यगर्भ घरासमोर 
घरासमोरील अंगणात
हतारचे पापड वाळत टाकले होते 
एक जख्ख म्हातारी कावळे हाकलत बसली होती. 

मी त्या म्हातारीलाच विचारले 
"तो" घरी आहे की काय म्हणून 
म्हातारी बहिरी असावी 
तिला काही ऐकायलाच गेले नाही 
ती डोळे विस्फारून माझ्याकडे पाहत राहिली 
मी फाटक उघडून आत गेलो.

आता म्हातारीने तोंड उघडले 
मला काय पाहिजे म्हणून विचारू लागली 
मी "त्या"ला भेटायचे असल्याचे सांगितले 
म्हातारीला बहिरेपणामुळे काही कळलेच नाही 
तिने आत आवाज दिला 
एक नुकतीच मिशी फुटलेला तरुण बाहेर आला 
मी त्याला माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले. 

तो तरुण काही न बोलताच आत गेला 
खूप वेळ झाला तरी तो बाहेर आलाच नाही 
मी कंटाळून म्हातारीलाच पुन्हा विचारले 
म्हातारीला काहीच कळले नाही 
ती डोळे विस्फारून माझ्याकडे देखतच राहिली 
इतक्यातच तो बाहेर आला 
त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले 
व मी कोण म्हणून विचारू लागला. 

त्याने मला ओळखलेच नाही 
मी मात्र त्याला बरोब्बर ओळखले 
मी आश्चर्यचकित होऊन
माझी ओळख देऊ लागलो 
तरी त्याच्या चेहर्‍यावर ओळखीचे चिन्ह दिसेनात 
मी त्याला पुन्हा सर्व सांगितले 
आमचा पूर्वेतिहास उलगडून सांगू लागलो 
पण त्याच्या चेहर्‍यावर ओळखीचा भावच उमटेना 
भेटीची इच्छा अतृप्तच राहिली माझी.

अखेर निराश होऊन मी परतू लागलो 
गल्लीबोळ पार करत बस स्थानकावर पोचलो 
एसटीची वाट बघता बघता मला झोप लागली 
झोपेत एक स्वप्न उगवले 
त्याने मला ओळखल्याचे दिसू लागले 
स्वप्नात त्याने माझे जोरदार स्वागत केले 
कडकडून भेटला तो मला स्वप्नातच 
म्हातारी खळखळून हसत होती 
तो तरुण तोरण उभारू लागला 
आणि एसटी आल्याने माझी झोप उघडली.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(27/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(18)
*सर्व अवयव शाबूत*
--------------------------------
बातमी तशी मला जरा उशीराच कळली 
तिनेच विझवला वणवा 
पाणी ओतून ओतून हिंमतीने एकटीनेच 
ही बातमी तशी मला जरा उशीराच कळली. 

वणवा पेटला, भडकला आणि पसरला 
साऱ्या अरण्यात हाहाकार माजला 
अनाघ्रात वेली जळून खाक झाल्या 
नाल्यातील पाणी उकळू लागले 
तरी न घाबरता, न विसावता 
तिनेच विझवला तो वणवा एकटीनेच 
ही बातमी तशी मला जरा उशीराच कळली. 

वणव्यात होरपळून बेजार झालेले 
अवाढव्य वाढलेले महाकाय सारे वृक्ष 
झुडपांना वाचवता वाचवता होरपळल्याचे 
वृत्तांत कथन झाले न्यूज चॅनेल वर 
सारे एंकर हिरमुसले/चुकचुकले 
वृत्तांत कथन करता करता 
त्या सर्वांचे सांत्वन तिनेच केले एकटीनेच 
ही बातमी तशी मला जरा उशीराच कळली. 

वणव्याने होरपळून निघाले अरण्य आतल्याआत 
बाहेरच्यांना मात्र 
कोणतीच झळ पोचली नाही 
तरी अरण्याचे सारेच अवयव मात्र शाबूत राहिले 
याकामी तिनेच पुढाकार घेतला एकटीनेच 
ही बातमी तशी मला जरा उशीराच कळली. 

बातमी तशी मला जरा उशीराच कळली 
तिनेच विझवला वणवा 
पाणी ओतून ओतून हिंमतीने एकटीनेच 
ही बातमी तशी मला जरा उशीराच कळली.
¤
@खगेन्द्र मोहन ऊकाराव 
(27/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(19)
*झाली अखेर ती अजरामर*
--------------------------------------
तिनेच पुढाकार घेऊन 
पुढचा प्रवास सुकर केला 
मी घुटमळत होतो तिथल्यातिथेच 
उषोदयाचा उद्घोष तिनेच घडवून आणला. 

मैदानात अस्ताव्यस्त सांडलेली 
पानगळीची सारी पिवळसर, करडी पाने 
घेऊन त्यातील काही हाती मी बुचकळलो जरा 
वसंतागमनाची दावून लालूच केले तिने मज ताजेतवाने. 

मौनाच्या अगाध कोलाहलात 
सप्तसुरांचे बोल झाले अनाकलनीय 
वधस्तंभावरील राकट दोर सारे लपवून ठेवत 
निष्कंटक मार्ग उपलब्ध करून देत ठरली ती वंदनीय. 

होऊन मग्न उषोदयात मी 
प्रकाश शोधत हिंडू लागलो क्षितिजावर 
हळूच होऊन अंतर्धान ती अंधारात गडप झाली 
हाती माझ्या देऊन मोरपंख झाली अखेर ती अजरामर.
¤
@खगेन्द्र मोहन ऊकाराव 
(28/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(20)
*सहा दिशा : एक भान*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फाटलेले दिवस सारे
शिवता शिवत नाही,
अंधाराला चटावलेले
उजेडाला शिवत नाही.
¤
अनाघ्रात नदीकाठी 
घरट्यांची पंगत नाही 
डोहातील काळे पाणी 
उंबरा*चे पाय धुत नाही.
¤
एकांती रमलेले अरण्य 
ध्वजदंड उभारत नाही 
ओढा जरी पाझरू लागला   
पूर मात्र सहसा येत नाही. 
¤
दडवलेले गूढतम ते पुष्प 
पाकळ्यांना आवरत नाही 
स्वयंस्फूर्त अदम्य पुष्पेच्छा 
दडपणाला जुमानत नाही.  
¤
चकवा प्रवेशता गावात 
रस्ते ओळखीचे ठरत नाही 
जातायेता होणारी दृष्टीभेट 
आकारता आकारत नाही.
¤
अंधारलेले सारे कालभान 
उजेडालाही जुमानत नाही 
शिवलेले दिवस उजेडाचे 
अंधार-कवेत मावत नाही.
¤
@खगेन्द्र मोहन ऊकाराव 
(02/02/2022)
(*झाडीबोलीतील शब्द, उंबर = औदुंबर)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(21)
*छद्म पुराणांतील वांगी*
~~~~~~~~~~~~~~~~~~
अनभ्यासापोटी जन्मतो दंभ 
पीळ उरतो जरी जळला सुंभ 
जल असो कितीही पारदर्शी 
फुटतो अंती न भाजलेला कुंभ. 
¤
नसताही साप धोपटती भूमी 
द्वेषजनित प्रमादी खुमखुमी 
खाजवती आपलाच पार्श्वभाग 
समजून जणू तीच रणभूमी.
¤
पांघरून स्वयंघोषित उपाधि 
पाखडती कुज्ञान अल्पावधी 
घेऊन प्रच्छन्न शब्द साथीला 
म्हणती, 'साधली शब्द-समाधी'.
¤
पेरून छद्म-पुराणे जागोजागी 
काल्पनिक कथानके साकारती 
अपप्रचाराचा आखून आखाडा 
कुश्ती आभासीची खेळू लागती. 
¤
धूर्त अज्ञानाचा घेऊन आधार 
उगारती विखारी भणंग तलवार 
ताणून रबर 'खेळणी'तील जुने
उरकती परजीवी ते सोपस्कार.
¤ 
उकरून काढती नसलेला वाद 
करती सार्थ शब्दांनाही बरबाद 
हवेतल्या हवेत करून हातवारे 
उभारती फसवी, फुकटची ब्याद.
¤
@खगेन्द्र मोहन ऊकाराव 
(31/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

(22) 













Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन