गझल आणि न-गझल : माझे नम्र आकलन (16/02/22)
*गझल आणि न-गझल : माझे नम्र आकलन*
---------------------------------------------------------
>> गझल हा असा काव्यप्रकार आहे की तो प्रत्येक रसिक, वाचकाला आवडतोच आवडतो. गझल आवडत नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. अर्थातच मीही त्याला अपवाद नाहीच.
>> परंतु प्रयत्न करूनही मला गझल वश होऊ शकलेली नाही. कदाचित माझा स्वभावच त्याला नडला असावा. आणि वश न झालेल्या गझलेला जोरजबरीने/वशीकरणाद्वारे आपल्या वशमध्ये आणावे इतका मी मुजोर, मुर्ख, बढाईखोर नाही.
>> त्यामुळेच मी गझल लिहिण्याची हिंमत केली नाही/करीत नाही. तथापि गझलेसारखी 'दिसणारी' पण गझल 'नसणारी' अशी रचना मी सुरूवातीपासूनच करीत आलो आहे. अशा 'गझल नसणाऱ्या/नसलेल्या' माझ्या तत्सम(?) रचनेला काय नाव द्यावे हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता.
>> अशातच मी न-नाटक, न-कथा, यांच्या धर्तीवर न-गझल असे नाव स्वीकारून तशा तत्सम(?) रचना करू लागलो. पण माझे मित्रश्रेष्ठ गझलकार श्री.सदानंद डबीर (मुंबई) यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले की, यापूर्वीच 'न-गझल' ही संज्ञा कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी वापरली असून त्याअंतर्गत त्यांच्या रचनाही प्रकाशित आहेत. शिवाय त्यांनी त्यांच्या न-गझलेतही काफियादि गझलेचे नियम पाळले असल्याचेही श्री.डबीर यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. परंतु मला मात्र गझलेचे काफियादि नियम पूर्णांशाने पाळता न आल्याने (किंवा माझी तशी हिंमत न झाल्याने किंवा ते मला वश होऊ न शकल्याने म्हणा) माझी 'न-गझल' ही कवीवर्य पाडगावकर यांच्या 'न-गझले'हून वेगळीच असल्याचे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो.
>> माझ्या अशा काही न-गझल मी खाली देत आहे. त्यावर वाचकांच्या/रसिकांच्या सडेतोड (DISSENT is the VOICE of PROGRESS.) प्रतिक्रियेची प्रतीक्षा राहील.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
👇
(1)
*...उघडी पडली वाळू* (न-गझल)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पेरलेले सारे शब्द उगवले हळूहळू
मौनात दडलेले ते गूढ लागले कळू.
अनादि-अनंत ती अतृप्त अभीप्सा
नियतीच्या परीघात लागली तळमळू.
बंध सारे सजग चहूकडे अंथरलेले
परी गंध 'परीसा'चा लागला दरवळू.
नश्वर ती शब्दांची गूढ काल-मालिका
अवतरण्या पुढ्यात लागली कळवळू.
कोरडला अकस्मात 'तो' प्रवाह नदीचा
उघडी पडली मग पात्रातील 'ती' वाळू.
कोलाजात विसावले ते चित्र प्रभावी
फ्रेम ती चित्राची रडे बिचारी कनवाळू.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे.
(16/02/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(2)
*कोरडाच राहिलो मी...!*
------------------------------------
स्थल-काल सारा अनुकूल असता मीच 'अबला' झालो
आवाक्यात तुझ्या येता येता अकस्मात मी परका झालो.
उत्तीर्ण झालो साऱ्या परीक्षा साकारल्या ज्या तू पदोपदी
परी घेताना प्रमाणपत्र डगमगलो आणि परागंदा झालो.
*कौन कहता है, आसमान में सुराख नहीं होता
एक पत्थर तो जरा तबियत से उछालो यारों*
दगड सारेच माझे आकाशाला गेले छेदून सहजच
सावडताच न आले मला ते दगड मी दचकून गेलो.
मौनावलेले ते बोल तुझ्या डोळ्यांतून जरी झाले प्रगट
उमजूनही सारे मी विषयाला फाटेच फोडत राहिलो.
न्याहाळताना पाय आपले तो मोर मनात झुरतो जसा
बंदीवासात माझ्या तसा मी एकटाच घुमसत राहिलो.
प्रवाह नदीचा जोडतो किनारे दोन्ही पुरासोबत वाहता
पुरात वाहून जाण्याच्या भयाने मात्र मी कोरडाच राहिलो.
(*दुष्यंत कुमार यांच्या ओळी)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(05/11/2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(3)
*रोखती अडसर मृगजळाचे...!*
--------------------------------------------
पायाखाली ठेवून निखारे उभारले मी मनोरे खास
परी पुढ्यात माझ्या वाढून ठेवलेला अगम्य वनवास.
पुरातत्ववेत्ते लागले खोदू वनातील त्या सुप्त पहाड
सापडेना सापडता तरी तो भेदरलेला लुप्त इतिहास.
हस्तिदंती हवामहालात लपलेले सारे मनमौजी वारे
झाले सैरभैर देखून संभाव्य वादळाचे येणे आसपास.
प्राक्तन पानगळीनंतरचे वृक्षावृक्षांवर मुद्रित होताना
विस्कटून सारे वास्तव अस्ताव्यस्त उरले फक्त भास.
पदरात लपता सारे अभिनंदनाचे अप्रकट इशारे
मनोमनी उमलती उष्ण आणि उष्टे बेबंद वीजोल्लास.
लक्ष्मणरेषा पुसटशी सहज ओलांडून जाता पलीकडे
अडसर परी ते मृगजळाचे रोखती पदोपदी हमखास.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(10.11.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(4)
*गायब होणे संकेतस्थळाचे...!*
~~~~~~~~~~~~~~~~
नसतो विश्वासार्ह अविश्वासाच्या हृदयातील विश्वास
मौनात दडवून होकार सारे फसवले जाते हमखास.
हिमनगाचे शिष्यत्व स्वीकारून सहज लपता येते
अदृश्य होता दृश्य आसपासचे नसते काही खास.
सहज फिरवता येते नजर नजरानजर होता रस्त्यात
ढग कोरडेच ढळून जातात झाला जरी वीजोल्लास.
भास ते सारे भोवतालीचे कळपात चर्चिले जाताना
नदी, नाले, डोंगरादि सारेच देती अरण्याचा आभास.
सांडलेले सारे ते हावभाव विसंगतीचे जणू विसंवाद
स्थानकावर न थांबता सुरूच असतो लंबित प्रवास.
शुभ-अशुभाचे संकेत गायब होता संकेतस्थळावरून
पायव्यात दडती सारे छद्मी पालनहार खासमखास.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(17.11.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(5)
*ध्रुव एकटा ध्रुवपदी...*
~~~~~~~~~~~~
प्रेमाच्या पुराने वेढलेला मी एक प्रेमवीर
सावलीतील चंद्राला भोवलेला एक फकीर.
उजेडता चंद्र राती काजव्यांना सुटते हाव
ढगामागे लपलेला तो एक शुक्रही गारेगार.
सप्तर्षींनी अंथरता चिचपाल्याची जंगी खाट
होकार तो मौनातील येता ओठी होई नकार.
रागावलेला मंगळ नजर रोखून असतो
होऊ लागतो मग हळूहळू क्रोधाचा असर.
कृपावंत असलेला गुरु बेसावध असता
कुंडलीतून सारेच मित्रग्रह होती पसार.
ध्रुव एकटाच ध्रुवपदी जन्मठेप भोगतो
ठरलेली एक दिशा, नाकारून सारे व्यापार.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(21.11.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(6)
*मीच तो अपराधी...*
~~~~~~~~~~~
अपराध मी केला नाही तरी मीच तो अपराधी
मीच सोडल्या अवतीभोवती विखुरलेल्या संधी.
दृष्टिभेट हमरस्त्यावरील झाली कशी सांगतो मी
भिंतीवरील जाहिराती साऱ्या पुसून टाका आधी.
असतो त्रैलोक्यात एखादाच वचन-बद्ध गुरु
शिष्यवाद मात्र भोवतो गुरुलाच, हेरून संधी.
घागर रिक्तच माझी जलसंपृक्त विहीरीकाठी
उचंबळून येते पाणी तरी मधूनच कधी-कधी.
गाडले विकृत दगड सारे पायव्यात स्वप्नांच्या
स्वप्नमहाल स्वप्नवत विखुरला बांधण्याआधी.
कित्येक सावल्या पेरून उन्हात पस्तावलो मी
अपराध मी केला नाही तरी मीच तो अपराधी.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(05.10.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(7)
*अस्तित्वभयाचा अरिष्टकाळ...*
-------------------------------------------
अस्तित्वभयाचा तो अजामीनपात्र अरिष्टकाळ
अजाणता होये आतल्या आत निवृत्त पळापळ.
नव्हते पलायन, होते अनिवार्य सुदृढ स्थलांतर
कसे मग गेले वाहून डोळ्यातील सुप्त काजळ.
ओबडधोबड ते पाय क्षणार्धात खुपता दृष्टीला
वस्त्रावगुंठन पायीचे होऊ लागले मग पायघोळ.
मैल तनाचा येईलही धुता जरा साबण-पाण्याने
जाता जाता उरकावी हृदयाची सचैल आंघोळ.
"दुरून डोंगर साजरे" होती एक म्हण पुरातन
वारे जाता वाहून डोंगराला येते आता भोवळ.
निकष सारे बारगळताना त्या अस्तित्वभयाचे
पळापळीचे नियम पचवून जाती, अरिष्टकाळ.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(16.10.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment