गतिमान संतुलन आणि मी : एक टिपण (प्रकाशित)

"गतिमान संतुलन" (संपादक : दिलीप कुलकर्णी) या मासिकाच्या जानेवारी 2022/सौर माघ, शके 1943 (वर्ष : 21, अंक : 2) या अंतिम अंकात प्रकाशित माझे एक मनोगत...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*गतिमान संतुलन आणि मी : एक टिपण*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> लोकसंख्या सुमारे 2345 असलेले झाडीपट्टीतील एक छोटेसे गाव बोरकन्हार हे माझे जन्मगाव. या गावात माझी वडिलोपार्जित 60 एकर धानाची शेती होती/आहे. असा मी एक गावकरी, महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात एक राजपत्रित/शासकीय अधिकारी म्हणून एमपीएससी मार्फत निवड होऊन महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली ते मुंबई आणि पुणे ते बीड, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली अशा विविध शहरी भागातून नोकरीनिमित्त मी 'भटकत'(?) राहिलो.

>> अविभाजित भंडारा जिल्ह्य़ातील एक मोठे शहर असलेल्या व मुंबई ते हावडा या प्रमुख रेल्वेरूटवर वसलेल्या गोंदिया या सद्यकालीन जिल्ह्याच्या शहरात भाड्याने खोली करून मी शिकलो आहे. शरद पवार गोंदियाला 'मिनी मुंबई' असे संबोधतात. त्यामुळेच कदाचित या शहरात आपलेही घर असावे म्हणून मी 1996-97 दरम्यान गोंदिया येथे एक प्लाॅट इएमआय वर खरेदी केला. व दर महिन्यात इएमआय भरू लागलो. 

>> अशातच सुमारे 2001-02 च्या दरम्यान माझे मित्रश्रेष्ठ श्री.भानू काळे यांच्या 'अंतर्नाद' मासिकाच्या एका संपादकीयात श्री.दिलीप कुलकर्णी, सुश्री.पौर्णिमाताई कुलकर्णी व त्यांचे लघु-मासिक 'गतिमान संतुलन' (वा.व.रु.30/- फक्त) बद्दल वाचून मी 'गतिमान संतुलन' चा वर्गणीदार-वाचक झालो (तो आजतागायत.) 'गतिमान संतुलन' च्या वाचनाभ्यासाने माझ्या विचारप्रवाहाला एक वेगळीच दिशा सापडली. आणि मी निसर्ग-स्नेही, पर्यावरणनिष्ठ, सम्यक विकास, शहरीकरण-विकृति, ... सारख्या जीवननिष्ठ संकल्पनांशी हळूहळू परिचित होऊ लागलो. एका वर्षाचे अंक, दिलीप कुलकर्णी यांची काही पुस्तके वाचून मी गोंदिया या शहरात घर बांधण्याचे माझे पूर्व नियोजन बासनात गुंडाळून माझ्या जन्मगावीच घर बांधण्याचे निश्चित केले. 

>> 2003 मध्ये मी महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन रजानियमांनुसार एक वर्षाची बिनपगारी रजा घेतली आणि गावातील जुन्या वाड्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर एक घर बांधायला सुरुवात केली. या घराचे बांधकाम 2007 मध्ये पूर्ण झाले. त्यावेळेस मी माझ्या गावापासून सुमारे 325 किमी वरील व-हाड/पश्चिम विदर्भातील यवतमाळ या 'आत्महत्याग्रस्त' म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात जिल्हा सहकार निबंधक म्हणून कार्यरत होतो. आणि या जिल्ह्य़ातील बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना (जो गेल्या आठ वर्षांपासून बंद अवस्थेत होता) सुरू करण्याच्या धडपडीत सफल झालो होतो. 

>> दरम्यान आता मी दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमाताई कुलकर्णी यांच्या विचारांचा, लिखाणाचा, जीवनशैलीचा फॅन झालो होतो. शहरात न वसता गावातच वसण्याच्या माझ्या निसर्ग-स्नेही, पर्यावरणनिष्ठ निर्णयाची सकारात्मक बाजू मला, माझ्या कुटुंबातील सर्वांना समजू व उमजूही लागली होती. अखेर फेब्रुवारी 2013 मध्ये निवृत्त झाल्यावर मी माझ्या जन्मगावीच परत येऊन मी बांधलेल्या घरातच राहून निसर्ग-स्नेही, पर्यावरणनिष्ठ असे जीवन जगण्याचा सहकुटुंब प्रयत्न करू लागलो. 

>> मला दोन अपत्य असून मोठी कन्या पुणे येथे असते. छोटा चिरंजीव, अनिकेतसिंह याचे बी.काॅम., एलएल.बी., एम.बी.ए.(FIN & HR)., S.A.P. पर्यंतचे शिक्षण होऊन तो नागपूर व पुणे येथे जाॅब करू लागला होता. परंतु डिसेंबर 2013 मध्ये त्याने स्वतःच निर्णय घेतला व अर्थातच आमच्या सल्ल्याने जाॅब सोडून निसर्ग-स्नेही, पर्यावरणनिष्ठ जीवनाचा अंगीकार करण्यासाठी गावी परतला. त्याची तद्विषयक दृढ इच्छाशक्ती पाहून मी त्याला आमच्या शेतीतील दोन प्लाॅट राबण्यासाठी उपलब्ध करून दिले. निवृत्तीनंतर मिळालेल्या लाभातून ते दोन्ही प्लाॅट विकसित करून त्यांना वन्यप्राणी व चोरांपासून अल्पबचावासाठी तारांचा व टिनांचा कम्पाऊण्ड सुद्धा करून दिला. 

>> त्या प्लाॅट वर त्याने दीर्घपल्ल्याच्या 50-60 आंब्याच्या वृक्षांसह कारले, काकडी, वांगी, बरबटी, भेंडी, ... सारख्या सब्जीभाजीचे पीक घेतले. या घटनेला कोरोनो-कालपूर्व सहा वर्षे लोटल्यानंतर कोरोना-संकटकाळात माझा/आमचा आणि मुलाचा निर्णय किती सटीक आणि सुयोग्य होता हे संपूर्ण जगालाच मान्य करावे लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही पूर्ण विषमुक्त आंबे आणि भाजीपाला/सब्जीभाजी वापरत आहोत व खरेदीदारांनाही तसेच विषमुक्त रसाळ आंबे आणि सब्जीभाजी विकण्याचे सत्कार्य(!) करून उत्पन्नाची साधने विस्तृत करीत आहोत. 

>> मी/आम्ही अजूनही दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमाताई कुलकर्णी यांना शंभर टक्के फाॅलो करू शकलो/शकत नसलो तरी थोड्या फार प्रमाणात आम्ही निसर्गस्नेही, पर्यावरणनिष्ठ जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमच्या या जीवनशैलीचे श्रेय दिलीप-पौर्णिमा कुलकर्णी यांनाच द्यावे लागेल.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया 
(विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन