◇नसणे : वडीलांचे ! ◇ एक स्मरण

◇नसणे : वडीलांचे ! ◇ एक स्मरण
****************************
       दि.25 जानेवारी 2018, गुरूवारला दुपारी 01:32 वाजता माझे वडील श्री.मोहनभाऊ कटरे हे वयाच्या 88व्या वर्षी वृद्धावस्थेमुळे हे जग सोडून गेले. माझे आजोबा श्री.उकनभाऊ पाटील ऑगस्ट 1948 मध्ये वारले, तेव्हा माझ्या वडीलांचे वय फक्त 18 वर्षाचे होते. त्या वयातही त्यांनी कुटूंबाचा सारा कारभार सांभाळला. सोबतीला त्यावेळचे आमचे आवारी श्री.शिवलाल कुंभरे हे आदिवासी समाजातील स्वामीनिष्ठ व्यक्ती होते. 
         शिवाय मोडकूकाका चव्हाण, मंगरूबडो चव्हाण, भैय्यालालभाऊ कुंभरे, उरकुडाबाबा शरणागत, छगनमामा शरणागत, कुकसीबडो भोयर, इंदलबाबा भोयर, वळगूबाबा येल्ले, बाबूलालमामा शरणागत, चुन्नीलालभाऊ सर्राटी, रावजीबाबा आंबेडारे, कारूभाऊ मेंढे, लोंढू(रूपचंद)भाऊ मेंढे, डोकूभाऊ नेवारे, गोंडूभाऊ नेवारे, दयारामभाऊ भूमके, तुकारामभाऊ भूमके, चिंधूभाऊ भूमके, फंदूभाऊ भूमके, मयारामबडो गौतम, डोमाबडो सहारे, बेनीमामा गौतम, चिंधू(भसकी)बडो सर्राटी, यासारखे जीवाभावाचे स्वामीनिष्ठ व कौटुंबिक/परिवारसम सेवक(!) सोबत होते. या सर्वांचा जणू एकच मोठा/संयुक्त कुटूंब होता. 
       अशा परिस्थितीत माझ्या वडीलांनी सारा कारभार सांभाळला व या सर्वांच्या मदतीने चांगली सामाजिक, राजनैतिक, प्रशासनिक(पोलीस पाटील म्हणून 1952 ते 1990), कौटुंबिक प्रगती साधली. आम्हा चौघाही भाऊ-बहिणींना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. एवढ्या लहान वयापासून सुरूवात करताना त्यांनी त्यांच्या वडीलांची उणीव कशी काय भरून काढली असेल, याचे आज, ते नसताना, मला एक अबूझ कोडेच वाटते. 
        त्या काळची नोकरचाकरांची कौटुंबिक स्वामीनिष्ठा व निस्वार्थ प्रेम/आपुलकी तथा मालकावरील अधिकार/विश्वास, मालकाचा त्यांच्यावरील निरभ्र लोभ या बाबी साह्यभूत ठरल्यात, हे सत्य असले तरी अगदी तरूणपणी वडील गेल्यावरची मानसिक पोकळी त्यांनी कशी भरून काढली असावी, हे मला आजही अकल्पनीयच वाटते. 
       फक्त तिस-या वर्गापर्यंत शिक्षण घेतलेल्या व अगदी तरूणपणी पोरके झालेल्या माझ्या वडीलांनी, श्री.मोहनभाऊ कटरे यांनी, सर्वश्री अशोक मेहता, मनोहरभाई पटेल, नरेंद्र तिडके, नासिकराव तिरपूडे सारख्या दिग्गजांशी दोस्ती केली व टिकवली सुद्धा. पण त्यांच्याकडून कवडीचीही आर्थिक, राजकीय वा कसलीही मदत वा सवलत कधी मागितली वा स्वीकारली नाही. काॅन्ग्रेस पक्षाला त्यांनी फक्त "दिले"- "घेतले" काहीच नाही वा तशी अपेक्षाही बाळगली नाही. 
         पण वयाच्या 80-81 व्या वर्षी गोंदियाच्या एका स्वनामधन्य नेत्या(?)च्या चमच्याला त्याच्या वाढदिवशी आशीर्वाद द्यायला गेले तेव्हा जैन समाजातील त्या चमच्याने, जैन समाजालाही मान्य नसलेल्या पद्धतीने, त्यांना रांगेत उभे केले होते, याचा त्यांना खूप विषाद होता.
                त्यांच्या गेल्यावरचे तीन दिवस मी जी मानसिक अवस्था व मानसिक/भावनिक पोकळी अनुभवली आहे, ती मला आजही शब्दांत व्यक्त करता येत नाही. मृत्यूपूर्वी दीड-दोन वर्षे ते माझ्या लहान भावाकडेच रहायचे, तरी रोज सकाळी त्यांचे पाया पडताना मी त्यांना गुदगुल्या करून हसवायचो आणि त्यांच्या आई-वडीलांच्या भूमिकेत त्यांना "दादी" म्हणायचो, तेव्हाचे त्यांचे भोबडे(दात पडल्याने) हास्य मला दिवसभराचे चैतन्य प्रदान करायचे. त्यांचे-माझे काहीसे तीव्र स्वरूपाचे वैचारिक मतभेद कुटूंबात, गावात सगळ्यांना ठाऊक होते,आहेत; पण त्यांची उंची मात्र माझ्या मनात सदैव कायम होती, आहे व पुढेही राहील. "वडीलांचे जाणे" म्हणजे काय असते, हे माझ्या तेव्हाच्या वयाच्या 63व्या वर्षी सुद्धा मी परिभाषित करण्यास पूर्णतः असमर्थच होतो. आता 67 पूर्ण करतानाही जाणवणारी अनामिक पोकळी मात्र माझ्या आसपास अजूनही कायम आहे
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार-441902
(जि.गोंदिया)/28 जानेवारी 2018/2022
********************************************

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन