श्री.गो.तु.पाटील सर यांच्या अमृत-महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने...

श्री.गो.तु.पाटील सर यांच्या अमृत-महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
     First impression is the last impression, या सूत्रावर माझा बिलकुल विश्वास नाही. माझ्या संपूर्ण शासनसेवा काळात प्रशासन राबविताना मी नेहमी या सूत्रातील फोलपणा अनुभवला आहे. पण कोणताही नियम अपवादाशिवाय पूर्णता पावत नाही, हे सत्यसुद्धा मी अनुभवले आहे.
     1997-98 दरम्यान मी तत्कालीन भंडारा (सध्याच्या गोंदिया) जिल्ह्यातील अर्जूनी/मोरगाव येथे तालुका निबंधक (सहकार व पणन) म्हणून कार्यरत होतो. या तालुक्यात नवेगावबांध हे अभयारण्य असून तेथे दूरदूरून पर्यटक येत असतात. सुटीचा दिवस असल्याने एके दिवशी मी घरीच होतो, तेव्हा आमच्या घरमालकाच्या दुकानातील पो-या सांगत आला की, कोणीतरी तुम्हाला विचारत आहेत, ते गाडीतच बसले आहेत. मी जाऊन पाहिले असता माझ्या हस-या प्रतिसादाला मोहक हास्याचा प्रतिसाद देणारे एक अनोळखी व्यक्तीमत्व गाडीजवळ उभे राहून मला "न्याहाळत" होते. आम्ही दोघांनी एकदुस-याला कधीच पाहिले नसल्याने त्यांनीच ओळख करून दिली की, ते गो.तु.पाटील आहेत व नवेगावबांधला भेट देऊन "अनुष्टुभ"चा एक वाचक अर्जूनी/मोरगाव ला राहतो म्हणून भेटायला आलेत. ((हा साधेपणा व नियतकालिकाच्या सामान्य वाचकाप्रति आपुलकी जपणारा प्रसंग माझ्या हृदयात नेहमीसाठी कोरला गेलाय.)) माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी गो.तु.सर आणि वहिनींना घरी आग्रहाने घेऊन गेलो. "अनुष्टुभ" बाबत संक्षिप्त चर्चा झाल्या. आग्रह करूनही न थांबता फक्त चहा घेऊन ते पुढच्या पर्यटनासाठी रवाना झाले. ही पहिली भेट व त्यातून मला भेटलेले गो.तु. दाम्पत्य नंतरच्या प्रत्येक भेटीतही अगदी तसेच निरागस व लोभस हास्य/भाष्य सहीतच भेटले. म्हणूनच गो.तु.पाटील सर आणि त्यांचा परिवार माझ्या "first impression is always NOT last impression" या सूत्राला  अपवाद ठरलेत.
      मी 1994 पासून "अनुष्टुभ"चा ग्राहक/वाचक होतो, नंतर मी आजीव ग्राहक सुद्धा झालो. या दरम्यान (1998-2000 या कालावधीत) "अनुष्टुभ" मध्ये प्रकाशित/अप्रकाशित(?) साहित्याबद्दल माझे "अनुष्टुभ"च्या संपादक मंडळ व अधिदेशक मंडळासोबत गंभीर मतभेदही झालेत, पत्रयुद्ध(?) सुद्धा झालेत. श्री.अशोक केळकर व श्री.दत्तप्रसाद दाभोळकर या दोघांचा अपवाद वगळता माझ्या प्रश्नांना व शंकेला समाधानकारक प्रतिसाद मिळू शकला नाही. या सा-या कालावधीत श्री.गो.तु.पाटील सरांना जो मनस्ताप (माझ्यामुळे) झाला, त्याबद्दल मी स्वतःला आजही दोषीच मानतो. 
        कोणी मानो अथवा न मानो, परंतु "अनुष्टुभ" च्या यशस्वी व सक्षम वाटचालीत श्री.गो.तु. सरांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचा व सौजन्यशील कामकाजाचा वाटा सर्वाधिक आहे. याचा अर्थ अन्य मान्यवरांच्या सहभागाला कमी लेखणे, असा नसून कोणत्याही नियतकालिकाच्या यशस्वीतेत व्यवस्थापकीय कौशल्याचे स्थान अधोरेखित करणे असा घ्यावा, ही विनंती आहे.
       "अनुष्टुभ" परिवाराने मला श्री.म.सु.पाटील सर, श्री.जयप्रकाश लब्धे व स्व.ताई यांच्यासारखे संरक्षक व "नातलग" दिलेत, सर्वश्री.विलास सारंग(स्व.), हरिश्चंद्र थोरात, रंगनाथ पाठारे, प्रभाकर बागले, यांच्यासारख्या विचारवंतांचे साहित्यविषयक सम्यक दृष्टीचे विचार समजून पचवून घेण्याची क्षमता दिली. आणि या सर्वाला सर्वाधिक कारणीभूत ठरले माझे आवडते ज्येष्ठबंधूसम गो.तु.पाटील सर! गो.तु.सरांच्या या अमृतवर्षपूर्ती कृतज्ञता सोहळ्याला माझ्या अस्वास्थ्यामुळे, होकार देऊनही, मी प्रत्यक्ष हजर राहू शकत नसलो तरी अप्रत्यक्ष रूपाने मी तेथे हजर असल्याचा अनुभव मी घेणार आहे. पुनश्च श्री.गो.तु.सरांना, आदरणीय वहिनींना सादर प्रणाम करून तूर्त थांबतो.
@लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902 (जि.गोंदिया)
~~~~~~~(05.01.2018)~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन