मी एक नवोदित(!) साहित्यिक(?).

◇*मी एक नवोदित(!) साहित्यिक(?)*◇
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
            माझा जन्म फेब्रुवारी 1955 चा. माझी मातृभाषा पोवारी/हिंदी. शालेय शिक्षण मात्र (गणित वगळता) मराठी माध्यमातूनच झाले. नंतरचे पुढील सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. तरी माझे पहिले प्रकाशित साहित्य(लेख) हिंदीतून डिसेंबर 1972 मधले. मराठीतले पहिले प्रकाशित साहित्य(कविता) एप्रिल 1978 मधले. 
>> 1978 ते 1980-82 या माझ्या भाषा-संक्रमण  काळात अखेर मराठी वरचढ ठरली व मी 1980-1982 पासून पूर्णतः मराठी लेखनाकडेच वळलो. (बिचारी मराठी म्हणाली असेल, आला आणखी एक उपटसुंभ! पण मी काही मराठीचा पिच्छा सोडला नाही.) दरम्यान आनंद यादव, कृष्णा चौधरी, यशवंत मनोहर, दिनकर देशपांडे, योगेन्द्र मेश्राम, केशवराव कोठावळे, अवधूत शास्त्री, या दिग्गजांशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध जुळत गेला. हरिश्चंद्र बोरकर या झाडीबोलीच्या एका अभ्यासकाशी सुद्धा सख्य जुळत गेले.
>> 1990 ते 1993 दरम्यान साकोली येथे कार्यरत असताना चाकोरीबाह्य, नावीन्यपूर्ण विचार करणा-या अनिल नितनवरे या चिरतरूण साहित्यिकाशी मैत्री जुळली.(23 जानेवारी 2018 ला ते अकस्मात, अकाली आमच्यातून निघून गेले.) व मी मराठीचा नवोदित साहित्यिक(?!?) झालो.
>> रामटेक ला बदलून गेल्यावर तेथे कृष्णा चौधरी यांच्या तगाद्यानुसार प्रकाशित कवितांचा संग्रह काढावा असे ठरले व जानेवारी 1996 मध्ये माझ्या पहिल्या कवितासंग्रहाचा ('प्रमेय'चा) गर्भावधीपूर्व(!) जन्म झाला. या संग्रहाच्या प्रकाशनासाठी माझा पिच्छा पुरविणा-यांत डाॅ.अनिल नितनवरे, डाॅ.गिरीश सपाटे, डाॅ.जितेंद्र वासनिक यांचाही समावेश होता.
>>  त्यानंतर 'शाश्वत मौनाचे स्वगत'(अभंगसंग्रह), 'जाणिवेतले कर्कदंश' , 'आदिम प्रकाशचित्रे' , 'शब्दार्थांचे आधार निष्फळ' या चार कवितासंग्रहांचा आणि 'एकोणिसावा अध्याय' या एका कथासंग्रहाचा तथा 'लेक नि विवेक' या एका संकीर्ण संग्रहाचा 2006 पर्यंत जन्म होऊ(?) शकला.
>>  तेव्हापासून अजूनपर्यंत तरी नवीन(?) पुस्तक आलेले नव्हते. सुमारे बारा वर्षानंतर "इतिहास आढळत नाही" हे दीर्घ कवितेचे पुस्तक आलेय.
>> 19/21 फेब्रुवारी 2020 ला माझ्या नवव्या साहित्य कृतीचे, हिंदीतील कविता संग्रह "आखिर बचता तो अंधेरा ही है" चे प्रकाशन झाले (मराठी नटश्रेष्ठ सचिन खेडेकर यांच्या हस्ते चंद्रपूर येथे), व मी हिंदी साहित्य क्षेत्रातही नवोदित साहित्यिक(?) म्हणून अधिकृतपणे प्रवेश करू शकलो.
>>  असा मी एक नवोदित साहित्यिक(?!?) आहे. मी अजूनही ज्येष्ठ साहित्यिक(?) होऊ शकलेलो नाही याची मला आत्मसंतुष्टी(?)/समाधान आहे. कारण माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे संपलेला/प्रतिभाशक्ती आटलेला साहित्यिक असा माझा अर्थनिष्कर्ष आहे.(😃)
>> वस्तूतः साहित्यिक हा कधीच ज्येष्ठ होत नाही, तो सदैव नवोदितच असतो आणि म्हणूनच तो (अभि)नव साहित्य-निर्मिती करू शकतो, असे माझे आकलन मी नम्रपणे मांडू इच्छितो. (मी फक्त एकच उदाहरण देतोय, वसंत आबाजी डहाके या सदैव चिरतरूण विचारांच्या साहित्यिकाचे आजचेही पद्य/गद्य साहित्य अगदी नाविन्यपूर्णच नव्हे तर इतरांसाठीही नव-बीज पुरविणारे असते. या साहित्यिकाचे साहित्य कधीच 'जुने' होत नाही किंवा "कालबाह्य' वाटत नाही.) + (एक खुलासा:- वसंत आबाजी डहाके यांच्याशी मी माझी असंभाव्य तुलना करीत नाहीये किंवा ते माझ्या 'ओळखीचे', नात्यातले, पत्रव्यवहारातले, वा मित्र(?)परिवारातलेही नाहीत.)
>> मला मंगेश नारायणराव काळे, अनिल नितनवरे, घनश्याम पाटील, देवानंद सोनटक्के, ऐश्वर्य पाटेकर, किरण येले, प्रदीप खेतमर, आशुतोष पाटील, पी.विठ्ठल, विनायक येवले, प्रमोदकुमार अणेराव, मेघराज मेश्राम, मिलिंद रंगारी, पृथ्वीराज तौर,.....आदि,  यांच्यासारख्या "तरुण" साहित्यिकांचे माझ्या साहित्या(?)वरील विचार महत्वाचे वाटतात. यांच्यासारख्या "तरुणां"नी मराठी साहित्याविषयी जनाधार आणि वैश्विक तत्त्वाधार वाढविण्यासाठी केलेले व करीत असलेले प्रयत्न मलातरी आश्वासक वाटतात. (या "तरुणां"तील काही महत्वाची नावे सुटलीत,याची मला जाणीव आहे, पण माझे हे लिखाण स्फुट स्वरूपाचे असल्याने ते क्षम्यच असावे. क्षमस्व.) 
>> एकंदरीत, मी एक नवोदित साहित्यिक(?!?)च असल्याचे मला जे वाटते व पटते, ते येथे संक्षेपाने व्यक्त करण्याचे प्रयत्न केले आहे.
(चूक-भूल क्षमस्व आणि ...... 👏👏👏)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
(13.12.2018/18.04.2020)
------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन