लाखांदूर एपिसोड : एक भयस्वप्न

*लाखांदूर एपिसोड* : एक भयस्वप्न 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
          ऑगस्ट 17 च्या दरम्यान एका वर्तमानपत्रात एक बातमी प्रकाशित झाली होती की, दोन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे एका विरोधी पक्षनेत्याकडे प्राप्त झाले आहेत. मला त्या विरोधी पक्षनेत्यांना सांगायचे आहे की, 'त्या पुराव्यांचा काही उपयोग होईल असे माझ्या अल्पबुद्धीला वाटत नाही.'  ----->>>>>      माझा एक छोटासा अनुभव सांगतो... 1996-97 मधील सत्य घटना आहे ही. तत्कालीन भंडारा जिल्ह्यातील एक तालुका सहाय्यक निबंधक (सहकार,पणन,...) सेवानिवृत्त झाल्याने त्या तालुक्याचा प्रभार कोणाला द्यावा यासाठी जिऊनि कार्यालयात खूप मोठे(?) खलबत(!) झाल्यावर कोणीही तेथील प्रभार घ्यायला तयार(?) नसल्याने मला विश्वासातही न घेता तो अतिरिक्त प्रभार मला सोपविण्यात आला. तेथील एक कनिष्ठ कर्मचारी नागपूर, अमरावतीच नव्हे तर राज्यातील संपूर्ण सहकार, पणन, ... विभागात सु(?)विख्यात (कुप्रसिद्ध?) होता. स्वतःच्या भ्रष्टाचाराला आच लागू नये म्हणून सर्वच वरीष्ठांच्या खोट्यानाट्या पुराव्यां(?)सह खोट्यानाट्या तक्रारी करण्यात तो अगदी निष्णात व माहीर होता. निवृत्त झालेला स.नि. त्याच्यामुळे फक्त 'पागल' होणेच शिल्लक राहिला(?) होता, असे ऐकिवात होते. त्यामुळे "तो" अतिरिक्त प्रभार घ्यायला कोणीच तयार नव्हता. तर अखेर मी तो अतिरिक्त प्रभार (वरिष्ठांच्या आदेशानुसार) स्वीकारला, कारण भिती आणि द्वेष यांना मी कधीच माझ्या आसपासही फटकू दिलेले नव्हते व नाही.
   थोड्याच दिवसात मला "वस्तुस्थिती"ची कटू जाणीव व्हायला लागली. मी माझ्या पद्धतीने त्याला हळुवारपणे "हाताळत" होतो. तरी "कुत्र्याचे शेपूट कितीही प्रयत्न केले तरी सरळ होऊ शकत नाही," याचा मला पदोपदी अनुभव यायला लागला. एका सहकारी संस्थेच्या निवडणूकीत "त्या"ने काही लोकांशी "संगनमत" करून पात्र उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र चुकीचे व बेकायदा कारण नोंदवून रद्द केले. त्या उमेदवारांनी माझ्याकडे अपील केल्या. या अपीलावरील स.नि. यांचा निर्णय अंतिम असतो, त्याविरुद्ध फक्त उच्च न्यायालयातच दाद मागता येते. त्यामुळे "तो" कर्मचारी माझ्या निवासस्थानी रात्री 10 वाजेच्या सुमारास एकटाच आला व मला काही रक्कम ऑफर करून अपील फेटाळण्यास सांगितले. मी जरा रागावूनच त्याला "उपदेश(???)" करून मोठ्या मुश्किलीने परत पाठविले. झालं, त्यानंतर त्याने एकतर्फी महायुद्धा(?)ची घोषणाच केली. आता त्याच्या "तोफेच्या" निशाणावर त्याने मला घेतले व खोट्यानाट्या पुराव्यांसह माझ्याविरुद्ध खोट्यानाट्या तक्रारींचा सपाटा सुरू केला. जिऊनि कार्यालयापासून राष्ट्रपती कार्यालयापर्यंत (होय, राष्ट्रपती कार्यालयापर्यंत!) सर्वांकडून माझी चौकशी करण्यात आली. पोलीस ते एसीबी व तत्सम यंत्रणाकडूनही माझी चौकशी झाली. वर्तमानपत्रांतूनही माझ्याविरूद्ध बातम्या "प्रायोजित" करण्यात आल्या. मी वस्तूस्थिती सादर करून करून अक्षरशः बेजार झालो. "त्या"च्या भ्रष्टाचाराचे सक्षम व भक्कम पुरावे देऊन देऊन थकलो, पण "त्या"च्या विरूद्ध कुठलीही कार्यवाही झाली नाही, तशी कोणी हिंमतच केली नाही. दरम्यान जिऊनि कार्यालयातील स.नि. यांच्या मासिक सभेत सर्व स.नि. व इतर कर्मचा-यांच्या समक्ष भर सभेतच त्याने मला आई-बहिणीवरूनही शिव्या दिल्यात. मी त्याच्या विरूद्ध विभागीय चौकशीचा प्रस्तावही पाठवला, पण तो प्रस्ताव वारंवार अनावश्यक व बेजबाबदार त्रूट्या काढून परत येऊ लागला. तितक्यातच पुण्याचे एक विभागीय सह निबंधक नागपूरला बदलून आले व त्यांनी सर्व प्रकरण स्वतः तपासून विभागीय चौकशीचा आदेश निर्गमित केला. यासमयी गोंदियाचे स.नि. श्री.गुप्ता सोडले तर कोणीही अधिकारी/कर्मचारी मला वाजवी मदत करण्याची हिंमत दाखवू शकला नव्हता. हे सुद्धा विशेषच! (तशी ही स्टोरी खूप लांब आहे अजून, पण तूर्त एवढे पुरे असावे. माझा "आदिम प्रकाशचित्रे" हा कवितासंग्रह याच न्यायदुष्ट व तर्कविसंगत नियतीच्या अनुभवावर "प्रसवला" आहे.)
          माझ्या या "छोट्याशा(?)" स्वानुभवावरूनच सांगू इच्छितो की, विरोधी पक्षाच्या त्या नेत्यांनी "त्या" दोन मंत्र्यांचा तथाकथित भ्रष्टाचार "मांडून" वा पुराव्या(?)सह सादर(?) करूनही काही साध्य होईल असे माझ्या अल्पबुद्धीला तरी वाटत नाही. यात माझ्या नकारात्मक/सकारात्मक वृत्ती वा विचाराचा प्रश्न नसून विद्यमान वस्तुस्थितीचाच प्रश्न(?) आहे.
          असो...असो...असोच...!!! भूल-चूक, देणे-घेणे. आणि क्षमस्व.
       (यात एक राहिलंच.--- माझ्याविरूद्धच्या या खोट्यानाट्या तक्रारी कशा बिनबुडाच्या आणि false आहेत हे सर्वच वरीष्ठांना सडेतोड अहवालाद्वारे कळविण्याची हिंमत तत्कालीन जिऊनि पी.एम.पद्मावार यांनीच (त्यांची माझ्याशी कोणतीही पूर्वओळख नसतांना, संपूर्ण प्रकरणाचा स्वतः अभ्यास करून) केली. व 1999 च्या दरम्यान माझ्याविरूद्धच्या या false & baseless तक्रारींचा ससेमिरा थांबला.)
@ॲड.लखनसिंह कटरे, 
(Retd.DDR)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन