कवितेचा महोत्सव की महोत्सवाची कविता!
*कवितेचा महोत्सव की महोत्सवाची कविता!*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कविता म्हणजे काय? हा प्रश्न अजूनही निर्विवादपणे सोडविता आलेला नाही. आणि कदाचित त्यामुळेच आज जागतिक स्तरावरही सर्वत्रच "कवीं"चा भयंकर(!) सुळसुळाट आढळून येतो. स्पाॅन्टेनियस ओव्हरफ्लो..... हे आंशिक सत्य असले तरी व्हाॅट इज ओव्हरफ्लो आणि ओव्हरफ्लो ऑफ व्हाॅट, हे प्रश्न अजूनही एकवाक्यतेच्या प्रतिक्षेत तडफडतच आहेत.
मी जेव्हा "कावळा हागता चिमणीला विटाळ..." अशा "प्रारंभा"ची कविता प्रकाशनार्थ पाठवतो तेव्हा मूळ ग्रामीण असलेली पण व्यवसायामुळे शहरी झालेली संपादकीय मानसिकता मला "आदेशात्मक सूरात" कळवते की, "हागता" हा शब्द वगळून त्याऐवजी "शिटता" हा शब्द वापरावा.
मी एक अप्रसिद्ध व उजळ ग्रामीण मानसिकता जपून असलेला, झाडीपट्टीतील झाडप्या, व्यक्ती असल्याने जरा खडसावूनच लिहिले की,
## माझ्या बालपणी माझी आई महिन्यातील तीन-चार दिवस बाहेर बसायची व माझी आजी स्वैंपाक करायची. मी आईला याचे कारण विचारल्यावर ती मला सांगायची की, 'चिंचेच्या झाडाखालून परसाकडे जाताना माझ्या डोईवर कावळा "हागला". त्याच्या विटाळामुळे मला तीन-चार दिवस शिवायचे नाही.' मला ते आई-वाक्य शंभर टक्के खरे वाटून मी दररोज चिंचेवरील कावळे उडवत असे. हीच अवस्था आम्हा सगळ्याच ग्राममित्रांची होती. आजही या मोबाईल-टीव्ही-युगात सुद्धा अजून ही अवस्था ग्रामीण भागातून पूर्णपणे लयास गेलेली नाही. त्यामुळे मी "हागता" ऐवजी "शिटता" हा शब्द "वापरला" तर माझ्या कवितेचा "संदर्भ"च अर्थशून्य होऊन कविता सुद्धा एक बडबडगीतच ठरते/ठरू शकते.##
माझे हे खडसावणे, माझ्या सुदैवाने व त्या संपादकांच्या सुज्ञतेने, त्या संपादकांना पटले. आणि त्यांनी माझी ती कविता दिवाळी विशेषांकात प्रसिद्ध सुद्धा केली. पुढे सलग दहा वर्षे त्यांनी त्यांच्या दिवाळी विशेषांकातून माझ्या निरनिराळ्या कविता मागवून/आवर्जून प्रकाशित केल्यात.
या एका एपिसोड वरून मला एक प्रश्न पडला असून तो आजवरही अनुत्तरितच आहे. तो प्रश्न असा की, "माझ्या वरील प्रसंग-निवेदनातून कोणता स्पाॅन्टेनियस ओव्हरफ्लो.... परिभाषित /होत असावा?" म्हणजेच मी पुन्हा पहिल्या प्रश्नावरच फेकला जातो की, कविता म्हणजे नेमके काय?
यासंदर्भात मला माझ्या एका अभिन्न हिंदी भाषक मित्राचे, खिणेशकुमार यांचे, एक विधान, जे 1975 च्या सुमारास दिल्लीहून प्रकाशित होणा-या "प्रकाशित मन " ह्या श्री.दयानंद वर्मा द्वारा संपादित हिंदी साहित्यिक मासिक पत्रिकेत एका पत्र-लेखाच्या स्वरूपात प्रकाशित झाले होते, त्याचे स्मरण होते. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, "कवी के अनुभव और विचारों की सूत्रबद्ध अभिव्यक्ति को कविता कहना समुचित होगा।"
आणि माझ्या अल्पबुद्धीनुसार मला असे वाटते की, सर्वंकष वाचन-सवयीच्या इतिहासातून खडतर तरी सक्षम प्रवास केल्याशिवाय अशी "अनुभव और विचारों की सूत्रबद्ध अभिव्यक्ती" अगदी असंभवनीय आहे. आणि अशा सूत्रबद्ध अभिव्यक्ती साठी तो "स्पाॅन्टेनियस ओव्हरफ्लो..." मग अनिवार्य ठरतो/ठरेल. परंतु आजच्या कवींच्या भयंकर(!) सुळसुळाटात याच न्यूनतेची अधिकता दिसून येऊ लागली आहे.
अशा या माहोलात आता माझ्यासारख्यांची बोलतीच बंद झाली आहे. म्हणून मी मौन धारण करावे काय?
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(24.09.2019/2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment