मी एक "हिंदू".........!(?)

मी एक "हिंदू".......!(?)
~~~~~~~~~~~~
1)1979 मध्ये मी देवरी (तत्कालीन जि.भंडारा) येथे गणित शिक्षक म्हणून बदलून गेलो. देव गुरूजींच्या ब्राह्मण परिवाराशी असा काही जुळलो की, त्यांची कन्या माझी मानसकन्या झाली.(आम्ही आजही हे नाते निभावून आहोत.) देव वहिनी माझ्या मानसआई व देवगुरूजी माझे मानसभाऊ झालेत. त्यांच्या दोघांच्या शेवटपर्यंत हे नाते त्यांनी निभावले. त्यांच्या घरी कोणतेही सोवळे-ओवळे, जात-पात असा प्रकार कधीच पाळल्याचे मी किंवा कोणीही पाहिले नाही, अनुभवले नाही. देववहिनी म्हणजे मानवी-देवीच होत्या. त्यांच्या मित्रमंडळींपैकी कोणीही, केव्हाही त्यांच्या स्वैंपाक घरात "घूसून" जेवण करू शकत होता. 
2)माझ्या पत्नीची गर्भाशय काढून घेण्याची शस्त्रक्रिया झाली, तेव्हा माझी दुसरी मानसकन्या, जी पूर्वाश्रमी(?)ची महार समाजातील व सध्या बौद्ध धम्मीय, नोकरीतून महिनाभराची सुट्टी घेऊन माझ्या कडे राहिली व तिने संपूर्ण घर (माझ्या मुला-मुलींसह) सांभाळले. माझ्या पत्नीच्या वतीने ती "देवपूजा"ही करायची. तिच्या बौद्धधम्मीय विवाहात मी तिचे "कन्यादान"ही केले. आजही आमचे हे नाते कायम आहे. (माझ्या बौद्ध धम्मीय मानसपूत्राबद्दलही पुन्हा कैव्हातरी लिहीनच.)
3) शिकत असताना व नंतरही मी सुमारे दहा-बारा वर्षे एका मुस्लिम कुटूंबाच्या घरी भाड्याने राहिलोय. त्या घरची अम्माजी मला "बडेभाऊ" म्हणायची, (आता त्या हयात नाहीत.) व त्यांच्या घरी काही "विशेष" पकवन्यात आले तर मला आवर्जून निमंत्रण असायचे. (मी मांसाहारी होतो, पण अभक्ष्य भक्ष्य करत नव्हतो, आजही नाही; तेही अभक्ष्य भक्ष्य करीत नव्हते.) माझ्या घरच्या कित्येक कार्यक्रमांना अम्माजी व त्यांची दोन्ही मुले (जे मला मामू म्हणतात, मानतात; आजही!) हजर राहिलेले आहेत. (नंतर "पवित्र कुराण" चे वाचन केल्यावर मला असे वाटते की, ते "खरे मुस्लिम" नसावेत.) 
4)चंद्रपूरला एका जैन परिवाराशी घरोब्याचे संबंध जुळले.  त्या घरच्या "आई"ला ओशो रजनीश आपली पूर्वजन्मीची आई मानायचे व स्वहस्ताक्षरात त्यांना पत्रही लिहायचे. (ते पत्र त्यांनी आजही सांभाळून ठेवलेत. परंतु सुमारे 100 वर्षाच्या त्या "आई" शंभरी पार करून गेल्यावर्षीच निवर्तल्या.) तेथे जेव्हा जेव्हा मी गेलो, मला VIP ट्रीटमेंटच मिळाली.
5)मी रास्वसं चा स्वयंसेवक आहे की नाही, याला काहीच अर्थ नाही, कारण माझ्या माहितीप्रमाणे रास्वसं नोंदणीकृत नसल्याने त्याचे सदस्यत्व असणे/नसणे हे अर्थशून्यच. पण शिकत असताना व नंतर नोकरीतही काही ब्राह्मण समाजातील स्वयंसेवकांशी व पदाधिका-यांशी सुद्धा संबंध आला. पण मला "खोले बाईचे" ब्राह्मणत्व(?) अनुभवण्याचा प्रसंग क्वचितच आला असावा, नेमके स्मरत नाही. 
6)आंबेडकरांचे "बुद्ध आणि त्यांचा धम्म" व "शूद्र पूर्वी कोण होते" हे दोन ग्रंथ वाचल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग का केला व बौद्ध धम्मच का अनुसरला या विषयीची व एकूणच धर्मचिकित्सेची त्यांची अनवरत विचारप्रवाहाची अनंत प्रासंगिकता समजायला सुरूवात झाली.
     असे असले तरी मराठी साहित्य जगतात मात्र माझ्या दूर्दैवाने मला "ब्राम्हणत्व-धारणे"चा जबरदस्त फटका बसला आहे. "असे" थोडेसेच असले तरी "आहेत" ही वस्तुस्थिती आहे आणि त्याला कम्युनिस्ट विचारकही अपवाद नाहीत, असा माझा अनुभव आहे. असो. 
    फेसबुक चा "आवाका" लक्षात घेता इथेच थांबणे आवश्यक आहे. हे माझ्या विचारप्रवाहातील काही (संक्षिप्त) टप्पे आहेत, क्रमवार नसून काही मागे-पुढे झालेहेत. माझा प्रवास सुरू आहे, मी अजूनतरी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही. पण माझ्या हिंदू असण्याच्या शोधप्रक्रियेत मला भेटत जाणा-या प्रश्नांच्या उत्तरासाठी मी अजूनही कार्यप्रवणच आहे. म्हणूनच म्हणावयाचे की, मी एक हिंदू.........!!! 
    (आजकाल कोणाच्याही, कशानेही भावना वगैरे दुखावतात असे ऐकिवात आहे, त्यामुळे या माझ्या पोस्टने असे काही घडल्यास क्षमस्व, त्रिवार क्षमस्व.)
🙏🙏🙏
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
(दि.16.09.2017//पुनर्लेखन दि.16.09.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)