झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि झाडीबोली व पोवारी बोली ... (2)

*झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि झाडीबोली व पोवारीबोली*
*(कला, साहित्य, संस्कृती व परंपरा)* : *एक आकलन*
-------------------------------------------------------------------
@ॲड.लखनसिंह कटरे 
-----------------------------------------------
(1) झाडीपट्टी/झाडीमंडळ : ही एक ऐतिहासिक, भौगोलिक तथा सांस्कृतिक वस्तुस्थिती आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हे संपूर्ण चार जिल्हे आणि नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक, भिवापूर, कुही, उमरेड हे तालुके (आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचाही काही भाग) असा हा झाडीपट्टीचा विस्तार आहे. या भागात सर्रास बोलली जाणारी ग्रामीण बोली ही झाडीबोली म्हणून संबोधिली/ओळखली जाते. झाडीबोली खालोखाल बोलली जाणारी या भागातील दुसरी प्रमुख बोली म्हणजे पोवारीबोली होय. या भागातील वनाचे प्रमाण एकूण भूभागाच्या सरासरीने 60 ते 80% असून येथील वनात मौल्यवान सागवानापासून जवळपास सर्वच प्रजातीचे वृक्ष आहेत. येथील वृक्षराजी अत्यंत समृद्ध आहे. 
सुप्रसिद्ध संस्कृत कवी/नाटककार भवभूति हे आमच्या झाडीपट्टीतील आमगांवजवळील पदमपूर येथील असल्याचे पुरातत्त्ववेत्ते महामहोपाध्याय डाॅ.वा.वि.मिराशी यांनी सप्रमाण मांडले आहे. पदमपूर येथे अजूनही काही भग्नावस्थेतील नाट्यमंडप, मूर्ती उपलब्ध आहेत.(यासंदर्भात एक परिच्छेद-समूह पुढे आहेच.) 
> लीळाचरित्रातही चक्रधर स्वामींनी झाडीमंडळ या शब्दाचा उल्लेख केलाय.
> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सुद्धा ही कर्मभूमी व तपोभूमी सुद्धा होती/आहे.
> झाडीपट्टी/झाडीमंडळ म्हणजे जणू विदर्भाचे काश्मीरच. 
👇
¤साम्य : 
(i) 
>> काश्मीर--सरोवर 
>> झाडीपट्टी--तलाव, बोड्या, नद्या, बांध(शिरपूर, पुजारीटोला, कालीसराड, गोठणगांव, नवेगावबांध, बोदलकसा, कटंगी, आदि)
(ii) 
>> काश्मीर--बर्फाच्छादित पर्वतशिखरे, दरी-खोरे 
>> झाडीपट्टी--पहाड्या, टेकड्या, घनदाट जंगल, गुफा(कचारगड), हाझरा फाल(झरणा), ताडोबा-नागझिरा-नवेगावबांध अभयारण्ये आदि.
(iii) 
>> काश्मीर--आतंकवाद 🤔
>> झाडीपट्टी--नक्षलवाद 🤔
(iv) 
>> सृष्टीसौंदर्य आणि निसर्गाची नयनरम्य लयलूट -- दोन्ही ठिकाणी 
(v) 
>> काश्मीर मध्ये बहुतांश वेळ थंडी व काहीसा उन्हाळा 
>> झाडीपट्टी मध्ये हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा या तिन्हींचा सौम्य ते तीव्रतम हवामानाचा अनुभव. 
👇
¤फरक :
(i) झाडीपट्टीत बर्फवृष्टी अजूनतरी(?) नाही. 
(ii) पर्यायाने स्केटिंग नाही, पण बोटींग ची सोय आहे. 
(iii) राहण्याची सोय 'सरोवरावर' नसली तरी विविध विश्रामगृहे, हाॅटेल्स/लाॅजेस उपलब्ध आहेत.
-----------
(2) झाडीपट्टीतील कला, साहित्य, संस्कृती व परंपरा : एक सिंहावलोकन/विहंगावलोकन....
¤ कचारगड येथील प्रचंड गुहेचे व गुहेतील आदिम भित्तीचित्रांचे अजूनही अध्ययन होणे बाकी आहे. आशिया खंडातील निसर्गनिर्मित सर्वात मोठी गुहा आहे ही. दूरदर्शन च्या सुरभि या तत्कालीन कार्यक्रमात या गुहेवर एक एपिसोड प्रसारित झालेला होता. ही गुहा आदिमानवाचे निवासस्थान मानली जाते. (आदिवासींचा उगम येथूनच झाला अशी आदिवासींची धारणा आहे.) दरवर्षी वसंत पंचमीच्या दरम्यान तेथे आदिवासी समाजाची मोठी यात्रा भरते. संपूर्ण भारतातून त्यासाठी लाखोने आदिवासी समाज तेथे भक्तिभावाने जमा होतो.
¤भवभूति : (झाडीपट्टीतील) एक दुर्लक्षित संस्कृत महाकवी/नाटककार >> महाराष्ट्राच्या अगदी पूर्वटोकावरील, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या (तीन तिगाडा) सीमाक्षेत्रात वसलेल्या झाडीपट्टीतील गोंदिया जिल्ह्याच्या इतिहास-प्रसिद्ध आमगांव तालुक्यातील पदमपूर (पद्मपूर) येथे होऊन गेलेला भवभूति हा महाकवी/नाटककार अजूनही दुर्लक्षितच आहे/राहिलाय. (म.म.वा.वि.मिराशी यांनी भवभूति यांचे (पदमपूर) हे स्थान संशोधनानंतर सिद्ध केले आहे.)
>> राजदरबारापुरती मर्यादित असलेली नाट्यकला खऱ्या स्वरूपात बहुजनांसाठी मोकळी करणारा, खुले रंगमंच या आधुनिक संकल्पनेचे कदाचित मूळ ठरावे अशा खुल्या दगडी खांबाच्या कायम नाट्य सभामंडपाचे (स्टेज चे) आविष्कार(!) करणारा भारतातील पहिलाच महाकवी/नाटककार म्हणून पुरातत्ववेत्त्यांद्वारे अनुमानित(?) असलेला भवभूति पदमपूर येथील तत्कालीन दगडी नाट्य-सभामंडपाच्या भग्नावशेषात अजूनही दडवूनच ठेवण्यात आला आहे, ही कटू वस्तुस्थितीच आहे. 
>> भवभूतिने त्याच्या मालतीमाधव या नाटकात एक श्लोक लिहिला आहे. तो असा ----

ये नाम केचिदिह न प्रथयन्त्यवज्ञां 
जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः |
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा 
कालो ह्ययं निरवधिः विपुला च पृथ्वी ||

        याचा संक्षिप्त भावार्थ असा की, समकालीन विद्वानांनी जरी भवभूतिच्या रचनांची कदर केली नसेल तरी काळ आणि पृथ्वी अनंत असून भविष्यात कधीतरी/कोणीतरी समानधर्मा गुणग्राहक भेटेल व भवभूतिला न्याय मिळवून देईल. 
>> असे असले तरी आमचा शेजारी भवभूति अजूनही महाराष्ट्रात पाहिजे त्या प्रमाणात चर्चिला, अभ्यासला, नावाजला जाताना दिसत नाही. उलट हिंदी पट्ट्यात विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात भवभूतिच्या काव्याचे/नाटकाचे अध्ययन केले जाते. महाराष्ट्रातील संस्कृती-अभ्यासकांनी, इतिहासकारांनी, संशोधकांनी, पुरातत्ववेत्त्यांनी आतातरी भवभूतिचे महत्त्व व स्थान अभ्यासून त्याची भविष्यवाणी(?) सत्य ठरवावी असे आम्हाला वाटते.
>> भवभूतिचे वास्तव्य असलेल्या झाडीपट्टीतील या पदमपूरच्या परिसरातच कै.श्री.लक्ष्मणराव मानकर गुरुजींनी 1950 मध्ये स्थापित केलेल्या भवभूति शिक्षण संस्थेचे भवभूति कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय असून या महाविद्यालयाच्या नुकत्याच दि.30 जून 2021 ला निवृत्त झालेल्या प्राचार्यांनी (डाॅ.श्रीराम भुस्कुटे यांनी) या महाविद्यालयाच्या प्रांगणात अतिशय दुर्मिळ अशा वनस्पतींची अतिशय देखणी अशी बाग फुलवून एक मिनी पर्यटन स्थळच तयार केले आहे. 
>> अशा या आमच्या शेजाऱ्याला समजून/उमजून घेण्यासाठी पदमपूर येथे त्याचे भव्य स्मारक उभारून गोंदिया या जिल्हास्थळी भवभूतिच्या नावाने एखादे सर्वसुविधासंपन्न नाट्यगृह सुद्धा उभारण्यात यावे अशी आमची मागणी/इच्छा आहे. तसेच किमान नागपूर विद्यापीठात तरी भवभूतिच्या सर्व साहित्याचा सर्वंकष अभ्यास करता येईल अशी अद्यतन व्यवस्था उभारण्यात यावी, अशीही आमची इच्छा आहे.

¤ जागतिक किर्तीचे चित्रकार सैयद हैदर (एस.एच.) रझा (22.02.1922--23.07.2016) यांची अल्पावधीची प्रारंभिक कर्मभूमी गोंदिया राहिली आहे.

¤सदानंद बोरकर या अवलिया चित्रकार, कवी, सुविद्य व सुप्रसिद्ध नाटककार यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव या ग्रामीण भागात चित्रकला महाविद्यालय असून येथून चित्रकलेचे शिक्षण घेऊन देशविदेशात नाव कमावलेले कलावंत या महाविद्यालयाची जणू शानच आहे.   

¤दिवंगत, ख्यातिप्राप्त चित्रकार गडचिरोली जिल्ह्यातील वडसा जवळील विसोरा या गावचे रहिवासी राहिलेले बांबू-चित्रकलेचे व पेंटींग चे जनक व प्रवर्तक धनंजय नाकाडे सुद्धा या झाडीपट्टीचेच सुपुत्र होते.

¤ सध्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले रेखाटनकार व चित्रकार, कवी बंसी कोठेवार, हे सुद्धा झाडीपट्टीचेच.

¤ भंडारा येथील सुप्रसिद्ध रेखाचित्र/चित्रकार, कवी, कथाकार प्रमोदकुमार अणेराव हे सुद्धा झाडीपट्टीतीलच.

¤ झाडीबोली या प्राचीनतम बोलीभाषेचे संशोधन करून तिला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणारे संशोधक डाॅ.हरिश्चंद्र बोरकर व त्यांचे सहकारी ॲड.लखनसिंह कटरे, ना.गो.थुटे, हिरामण लांजे, डाॅ.राजन जयस्वाल, घनश्याम डोंगरे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, समुपदेशक मिलिंद रंगारी, डाॅ.गुरुप्रसाद पाखमोडे, राम महाजन, गजानन बागडे गुरुजी, दिवाकर मोरस्कर, डोमा महाराज कापगते, अंजनाबाई खुणे, शिवशंकर बावनकुळे, डाॅ.हेमकृष्ण कापगते(माजी आमदार), विठ्ठल लांजेवार, ... इत्यादींनी वाढवलेली व सजवलेली झाडीबोली साहित्य चळवळ याच झाडीपट्टीतील. या चळवळीद्वारे दरवर्षी झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असून आजवर (2023अखेर) सत्तावीस (32) यशस्वी साहित्य संमेलने पार पडली आहेत.
---------
(3) मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान च्या त्रैसीमेवरील मालवा व धार येथून स्थलांतरित होऊन नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील नगरधन येथे राजधानी स्थापन केलेल्या पोवार राजवंशातील काही लढवय्या पोवार सरदारांनी नागपूरच्या भोसल्यांना कटक येथील युद्धात विजयप्रातीसाठी मोलाची सहभागी-मदत केली होती. त्याप्रित्यर्थ भोसल्यांनी त्या पोवार लढवय्या सरदारांना झाडीपट्टीतील काही जमीनदारी/मालगुजारी प्रदान केली होती. एकेकाळची अशी जमीनदारी/मालगुजारी भोगलेल्या पोवार समाजाची पोवारीबोली व पोवार समाज यांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारस्याचे लेखक/साहित्यिक, संशोधक, कवी डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे, जयपालसिंह पटले, ॲड.मनराज पटले, ॲड.लखनसिंह कटरे, देवेंद्र चौधरी, डाॅ.शेखराम येळेकर, रणदीप बिसने, पालिकचंद बिसने, ... इत्यादी या झाडीपट्टीतीलच रहिवासी आहेत.
------------
(4) त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाचे म्हणजे,
¤ आदिवासी कविता, साहित्य यावर अधिकारवाणीने लेखन/भाष्य करणारे साहित्यिक प्रभू राजगडकर,
¤ संपूर्ण भारतभर आदिवासी साहित्य व संस्कृती संबंधात गाजत/गाजवत असलेल्या उषाकिरण आत्राम व कुसुम आलाम, 
¤ कचारगड या आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असलेल्या निसर्ग-निर्मित गुफेबद्दल संशोधन करणारे सुमेरसिंह ताराम आणि त्यांची मित्रमंडळी,
¤ वडसा/देसाईगंज (जि.गडचिरोली) आणि नवरगाव (जि.चंद्रपूर) येथील जागतिक स्तरावर गाजलेली व गाजत असलेली झाडी-रंगभूमी/झाडी-नाटकमंडळी व तिचे प्रवर्तक, विशेषतः पद्मश्री डाॅ.परशुराम खुणे, सदानंद बोरकर, डाॅ.हरिश्चंद्र बोरकर, मिलिंद रंगारी, ....
¤ ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त असलेले संस्कृत कवी/नाटककार भवभूति यांच्या निवासस्थानाने पुनित झालेली गोंदिया जिल्ह्यातील पदमपूर या गावची भूमी व तेथील भग्नावस्थेतील नाट्यगृह, पाषाणशिल्पे इत्यादी,
¤ 1991 पासून अव्याहतपणे दरवर्षी उत्साहाने आयोजित होत असलेले झाडीबोली साहित्य संमेलनांची उज्ज्वल परंपरा 
¤ झाडीपट्टी मध्ये प्रामुख्याने बोलल्या जाणाऱ्या दोन प्राचीनतम बोली-- झाडीबोली आणि पोवारी या बोली या दोन्ही प्राचीनतम बोलींचे पुनरुज्जीवन व या दोन्ही बोलीत साहित्य निर्मितीचा जणू झंझावात, दोन्ही बोलीत अनुक्रमे सुमारे 350 व 150 पुस्तके प्रकाशित,
¤ प्राचीनतम पोवारी बोलीच्या पुनरुत्थानासाठी राष्ट्रीय पोवारी बोली साहित्य कला संस्कृती मंडळाची स्थापना करून पहिले अखिल भारतीय पोवारीबोली साहित्य संमेलनाचे फेब्रुवारी 2019 मध्ये यशस्वी आयोजन...2023 अखेरपावेतो चार यशस्वी साहित्य संमेलने......
¤ झाडीपट्टीतील काही प्रमुख साहित्यिक (नाट्यलेखकही)
मुकुंदराज, चक्रधर, भवभूति, ना.रा.शेंडे, डाॅ.हरिश्चंद्र बोरकर, आचार्य ना.गो.थुटे, ॲड.लखनसिंह कटरे, डाॅ.राजन जयस्वाल, डाॅ.अनिल नितनवरे, डाॅ.घनश्याम डोंगरे, प्रल्हाद सोनवणे, मदन धनकर, हिरामण लांजे, राजेंद्र घोटकर, अंजनाबाई खुणे, बंडोपंत बोढेकर, प्रमोदकुमार अणेराव, सुरेश खोब्रागडे, विद्याधर बनसोड, चिंतामण बागडे, युवराज गंगाराम, माणिक गेडाम, शशि तिवारी, उषाकिरण आत्राम, डाॅ.गिरीश सपाटे, भगवान सुखदेवे, इरफान शेख, पद्मरेखा धनकर, किशोर कवठे, प्रशांत आर्वे, मिलिंद रंगारी, डाॅ.जितेंद्र वासनिक, देवेंद्र चौधरी, पालिकचंद बिसने, डाॅ.शेखराम येळेकर, सदानंद बोरकर, विठ्ठल लांजेवार, तीर्थराज कापगते, प्रमोद मुनघाटे, डाॅ.अभय बंग, दिवाकर मोरस्कर, तुका मोहतुरे, डाॅ.चंद्रकांत लेनगुरे, नरेश देशमुख, शिवशंकर बावनकुळे, नरेंद्र नारनवरे, मुरलीधर खोटेले, ... इत्यादी.
¤ अशी ही झाडीपट्टी/झाडीमंडळाची कला, साहित्य व संस्कृती ची महानतम परंपरा आहे.  
--------------
(5) झाडीबोली ही मराठी वा अन्य कोणत्याही भाषा-बोलीची स्पर्धक नसून ही मराठी साठी संजीवनी बूटी चेच कार्य करीत आहे व यापुढेही करीत राहणार. झाडीबोली आणि पोवारी बोली या दोन्ही प्राचीनतम बोलींचा शब्दभंडार मराठीच नव्हे तर संस्कृतच्या शब्दभंडारापेक्षा कितीतरी मोठा/विस्तृत आहे, हे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कदाचित पटणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच या दोन्ही बोली मराठी भाषेला मुमुर्षू होण्यापासून वाचवण्यासाठी अमृतसिंचनाचे पवित्र काम अव्याहतपणे करीत आहेत व यापुढेही करीत राहतील.
(शब्दसंख्या सुमारे 1170)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(28 मे 2020/07 जुलै 2021)
~~~~~~~~~~~~~~~\\~~~~~~~~~~~~~








 


 

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन