एक आठवण (1987)

एक आठवण (1987)
~~~~~~~~~~~~~~
परीविक्षा कालावधी संपल्यानंतर मला बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे TARCS म्हणून पोस्टींग मिळाली. तेव्हा माझ्या फक्त सहा महिन्याचा असलेल्या मुलाचे हेमेनजोयमा चे (कान व गळा यामध्ये) मोठे ऑपरेशन (26 टाके लागले होते) नुकतेच नागपूरच्या शासकीय मेडीकल हाॅस्पिटल मध्ये झाले होते व दर पंधरा दिवसांनी फाॅलोअप साठी जाणे अनिवार्य होते. पण पादोद्यासारख्या 700-750 किमी अंतरावरून हे शक्य नसल्याने मी नागपूरच्या जवळपास कुठेही स्थानांतर व्हावे म्हणून विनंती केली होती. सुमारे सात महिन्यानंतर माझी विनंती मान्य(?) होऊन मला गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज(वडसा) येथील CBF येथे प्रतिनियुक्तीवर पोस्टींग देण्यात आली. पशूसंवर्धन विभागांतर्गत असलेले हे Cattle Breeding Farm सुमारे हजार एकरात पसरलेले(!) असून वडसावरून सहा -सात कि.मी.वर आहे. तेथे तत्कालीन मुख्यमंत्री श्री.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्वप्नातील ''दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम...." हा द्विवर्षीय डिप्लोमा कोर्स  चालविला(?) जात होता. (एकूण तीन ठिकाणी असे शासकीय कोर्स सुरू करण्यात आले होते, जत (जि.सांगली) येथे दुसरा व ठाणे जिल्ह्यात दापचेरी येथे तिसरा.)
   माझ्याकडे स्वयंचलित वाहन नसल्याने मी सायकलने रोज वडसा ते CBF असे 6-7 कि.मी. जायचो व यायचो. तेथे मला फक्त मंगळवारी (अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे) तासिका असायच्या. मी सहकार, सहकार कायदा, अंकेक्षण, Accountancy,(वाणिज्य) हे विषय शिकवायचो. मला मंगळवार सोडून इतर दिवस ऑफ(!) असले तरी मी रोजच 2-3 तरी तासिका घ्यायचो, तेव्हा विषयाचे बंधन नसायचे, GK, CARRIER GUIDANCE अशा कोणत्याही विषयावर मी बोलत असे. 
       सोबत पशु संवर्धन विभागाचे डाॅ.डोणगावकर (उप संचालक), डाॅ.राणे (सहाय्यक संचालक), दुग्ध विभागाचे श्री.खोडस्कर (उप संचालक) हे माझे अन्य सहकारी होते. डाॅ.डोणगावकर म्हणजे एक ज्ञानसागरच! निःस्पृह, भ्रष्टाचारापासून कोसो दूर असलेला व भ्रष्टाचाराची आत्यंतिक चीड करणारा एक सहृदय माणूस! डाॅ.काझी हे प्राचार्य होते. साधा सरळ वाटणारा पण कडक आहे असा भासवणारा एक गूढ व्यक्तिमत्वाचा माणूस. खोडस्कर म्हणजे सर्वांना हसवून हसवून सदैव प्रफुल्लित ठेवणारा (पण... ) माणूस. डाॅ.राणे वयाने सर्वात लहान, त्याला सगळ्यांचेच ऐकावे(?) लागे! श्री.गोखे हे कार्यालय अधीक्षक, सुनील खोबरागडे (LSS) आम्हा सगळ्यांचा लाडका बाॅयफ्रेंड(!). मजेत गेले ते एक वर्ष. नंतर त्या कोर्सला पुढील अनुमती(?) न मिळाल्याने मला 31 डिसेंबर 1987 ला तेथून कार्यमुक्त करण्यात आले व सिरोंचा (जि.गडचिरोली) येथे पोस्टींग देण्यात आली. मुलाच्या ऑपरेशन नंतरचे फाॅलोअप सुरूच होते. सिरोंचा गडचिरोली जिल्ह्यातच असले तरी ते नेमके कुठे(?) आहे, हे आमच्या पुण्यातील कार्यालयाला कसे कळणार??? (गडचिरोली ते सिरोंचा हे अंतर सुमारे 250 किमी. आणि गडचिरोली ते नागपूर हे अंतर 180 किमी. आहे, हे पुण्याच्या सेन्ट्रल बिल्डिंग मध्ये बसून कसे कळणार?☺☺☺)
          नाईलाजाने मी पुण्याला गेलो, वस्तुस्थिती सांगितली, सुदैवाने श्री.ओऊळकर सर हे सहकार आयुक्तांचे P.S/P.A होते व त्यांची माझी ओळख नसली तरी त्यांनी रदबदली करून मला सालेकसा या दुस-या आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त भागातील ठिकाणी TARCS म्हणून पोस्टींग मिळवून दिली. पाटोदा > देसाईगंज(वडसा)> सालेकसा> साकोली, ही अंत्याक्षरी सुरू झाली. 
    मला वडसा CBF येथे प्रतिनियुक्तीवर पोस्टींग देतानाच्या मंत्रालयीन,शासकीय आदेशात "प्रतिनियुक्ती" चा स्पष्ट उल्लेख असला तरी वारंवार विनंती करूनही मला प्रतिनियुक्तीचे "वेतन, भत्ते" कधीच मिळाले नाही. माझ्या वारंवारच्या पत्रव्यवहाराला कंटाळून(???) शासनाने ती "फाईल नस्तीबद्ध करण्यात आली असून यापुढे यासंबंधाने पत्रव्यवहार करू नये" अशी तंबीच दिली व मी ती "स्वीकारली."(???)
        देसाईगंज(वडसा) च्या CBF मधील दोन फोटोग्राफ खाली टाकत आहे, संबंधितांनी पाहिल्यास मला अवश्य कळविण्याची तसदी घ्यावी.
    (मी 01.01.1987 ते 31.12.1987 पर्यंत देसाईगंज(वडसा) येथे कार्यरत होतो.)
@लखनसिंह कटरे.

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन