आदिम प्रकाशचित्रे : एका अगम्य इतिहासाची फलश्रुती?



◇आदिम प्रकाशचित्रे◇
    ---------------------------    
(एका अगम्य इतिहासाची फलश्रुती?)
 ---------------------------------------------      
     आज दि.29 मार्च 2021, होळीचा दुसरा म्हणजे धुुळवडीचा दिवस. मार्च 2018 च्या अशाच होळीच्या दिवशीची एक आठवण ताजी झाली. त्यादिवशी पहाटे पाच वाजताच मला दचकून जाग आली होती. 1996-97 मध्ये माझ्यासोबत घडलेल्या अनैतिहासिक घटना व प्रसंगांचा थयथयाट अचानक माझ्या झोपलेल्या स्मृतीतून प्रकट झाला होता. विस्मरणाची कला अभ्यासली(?) असली तरी त्याकाळातील एकेक प्रसंग चलचित्राप्रमाणे माझ्या मानसपटलावरून सरकू(!) लागले. तर्काच्या कवेतही न सामावणा-या व इतिहाससिद्ध नसलेल्या प्रसंगांचेच बाहुल्य अनुभवणे, "आपल्या"तीलच 80-85% माणसां(?)च्या अनाकलनीय दुस्वासाची कारणमीमांसा शून्यवत होणे, सभ्यता व सत्यता यातील तथ्याचे हरवणे,  स्वतःच्याच नव्हे तर संपूर्ण कुटूंबाच्या हत्त्येच्या प्रयत्नांची वारंवारिता उद्भवणे, भ्रष्टाचार रोखू पाहणा-या(?)लाच भ्रष्टाचाराच्या काल्पनिक व खोट्या आरोपांचे वारंवार "स्पष्टीकरण" द्यावे लागणे, प्रशासन; राजनिती; पोलीस यासारख्या "यंत्रणां"चा अनाकलनीय व नितीबाह्य तथा कायदेबाह्य जाचाचा सामना करावा लागणे, अशा अनैतिहासिक प्रसंगी कसे "वागावे" याचे पूर्व-उदाहरण नसल्याने नव्याने संरक्षण यंत्रणा उभारणे, इत्यादी...! 

       अशा अनाकलनीय, मारखुंड्या(?) प्रसंगांच्या मारझोडीत पत्नीचे सुदृढपणे व भक्कमपणे पाठीशी उभे राहणे, बालवयीन कन्येची व पुत्राची समजूतदारपणाची "अवस्था" अनुभवणे, अशातच सहकार व पणन विभागाच्या इतिहासात प्रथमच साकोली येथील राजस्व विभागाच्या SDO नी एका बाजार समितीच्या निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी (निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून) माझ्यावर सोपविणे, कायदा व नियमाला अनुसरून अतिशय कमी खर्चात निवडणूक घेताना राजनैतिक; प्रशासनिक; गुंडजनित दबावांना बळी न पडता निवडणूकीचे संपूर्ण कामकाज यशस्वीपणे पार पाडणे, अशासमयी झोपेचे खोबरे होऊन रात्र-रात्र जागतांना माझ्याही "नकळत" काही "आदिम प्रकाशचित्रे" यांचे कागदावर उतरणे, या प्रकाशचित्रांना "त्यातून काहीच बोध होत नाही" असा शेरा देऊन एका अतिशय सन्मान्य(!) मराठी द्वैमासिकाच्या संपादक व अधिदेशकाने नाकारणे; पण त्याच प्रकाशचित्रांना "कविता-रती" च्या प्रा.पुरूषोत्तम पाटील, "लोकानुकम्पा" च्या डाॅ.योगेन्द्र मेश्राम, "तरुण भारत" नागपूरच्या रविवासरीय व दिवाळी अंकांच्या संपादकांनी आवर्जून प्रसिद्धी देणे, दरम्यान श्री.प्रकाशचंद्र पद्मावार या सहकार जिल्हा निबंधकांनी माझ्यावरील सा-या आरोपांच्या फोलपणाची व खोटेपणाची सर्वांगीण खात्री करून त्यांच्या प्रशासनिक व लेखन कौशल्याने माझ्या निर्दोषित्वाचा कणखर अहवाल वरीष्ठांकडे पाठवून मला सांभाळण्यास निस्वार्थ मदत करणे, या आणि यासारख्याच प्रसंगांच्या या 1996-97 च्या भोव-यात मला हिंमत व सामर्थ्य देणा-या 16 "आदिम प्रकाशचित्रे" यांचे संकलन (कवितासंग्रह) प्रकाशित करण्यासाठी चंद्रपूरचे माझे ज्येष्ठ साहित्यिक मित्र श्री.मदनराव धनकर यांनी मोलाची भूमिका बजावणे, विचारधारेचे नव्यप्रवर्तक विचारवंत श्री.सुरेश द्वादशीवार यांनी या संकलनाला (संग्रहाला) विश्लेषणात्मक प्रस्तावना देणे, महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मान्यवर साहित्यिकांनी सुरेख लेखी अभिप्राय/प्रतिक्रिया कळविणे व माझे ज्येष्ठ मित्र मुंबईचे सुप्रसिद्ध गझलकार श्री.सदानंद डबीर यांनी मला तूर्तास "थांबायचा" सल्ला दिल्याने व मला तो सल्ला पटल्याने 2006 नंतर 2018 पर्यंत एकही कवितासंग्रह प्रकाशित न करणे, या सर्व प्रसंगांची मालिका माझ्या समोर नाचू लागल्याने त्यातून तात्पूरता का होईना थोडासा मोकळा होण्यासाठी ही, माझ्या फेसबुक वाॅलवर प्रगटीकरणाची, पळवाट(!) शोधली आहे. कंटाळवाणे व/वा स्तुतिपर(?) वाटल्यास क्षमस्व.

    ◇सोबत "आदिम प्रकाशचित्रे" मधील एक कडी◇
                 -------------------
                      ◇८◇
                     ~~~~~
चोर-पोलीसचा खेळ खेळतानाचे मुलांचे निरागस मन
अस्वल नतमस्तक...भिंतीला टांगलेले सर्व आपण...

अधिक कार्यक्षमता व एकाग्रतेकरिता निमंत्रण पत्रिका
अभिव्यक्ती स्वातंत्र्य...चिंचेच्या झाडावरील उलटी जन्मपत्रिका...

जाहिरातीतल्या स्त्री-देहावरील तोटक्या वस्त्रांची शपथ
आरडाओरडीचे संगीत...चौकातील गाय करते रवंथ...

संमिश्र युतीचे शासन केंद्रात स्थापन झाल्याझाल्या
गावोगावच्या युत्या...दुश्मनीत सहज तबदिल झाल्या...

'उल्लासमयी बेला मे आपको मेरी हार्दिक बधाईयाँ'
दीर्घायुष्यी व्हाच...ओठापोटातील अंतराच्या रुबाया...

विविध वस्तूंच्या भांडारात फसलेला उंदीर मेला
उंदीरमार पावडर...जवळच्या मंदिरात विकणारा गेला...

स्वप्नसखीचा इशारा समजूनही डोक्यावरून पसार
घर तिथेच बांधावे...भूखंडविक्रीला देऊन साफ नकार...

'आदिम प्रकाशचित्रे' भोव-यात सापडलेल्या शेळीसारखी
खाणा-याला वातड...अपेक्षित प्रश्नांच्या गाईडसारखी...
○○○
@ॲड.लखनसिंह कटरे, 

बोरकन्हार-441902
     जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~(01.03.2018/29.03.2021)~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन