एमपीएससी : एक अविस्मरणीय अनुभव

*एमपीएससी : एक अविस्मरणीय स्वानुभव*
-----------------------------------------------------
>> ग्रॅज्युएशन नंतर प्रथम प्रयत्नाच्या, 1977-78 च्या, एमपीएससी च्या नागरी सेवेसाठीच्या परीक्षांत मी (लेखी - 61% व मुलाखत - 40%) उत्तीर्ण झालो असलो तरी बीडीओ ची पोस्ट मला पसंत न पडल्याने मी रुजू झालोच नाही. (बीडीओ या पदासंबंधाने माझ्या नापसंतीची कारणे मी येथे लिहू शकत नाही, क्षमस्व.) 

>> 1978-79 च्या परीक्षांत सुद्धा मला लेखी परीक्षेत 62.5% मार्क्स पडले असले तरी तत्कालीन Rural Weightage संबंधीच्या मा.उच्चन्यायालयाच्या अंतरिम निर्णयाचा "सोयीचा" अर्थ लावून त्याचा गैरफायदा घेत एमपीएससीच्या तत्कालीन "चालकां"नी Rural Weightage चा लाभ वगळून एकत्रित Merit चा विचार न करता, Weightage चा लाभ-पात्र अशा सर्वांना सरसकट वगळून, उर्वरितांची Merit List करून, जाहिरातीत नमूद एकूण पदांच्या सुमारे 80-85% पदे निवडण्या/भरण्याची विहित कार्यवाही उरकली. मा.न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर Weightage शिवाय सुद्धा Merit मध्ये असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा फार्स करून उर्वरित सुमारे 15-20% पदे भरण्याची कार्यवाही उरकली. मी Weightage चा लाभ-पात्र असलो तरी Weightage शिवाय च्या Merit List (62.5%) मध्ये असल्याने मला सुद्धा नंतरच्या/उर्वरितांच्या मुलाखतीसाठी बोलावणे आले होते व माझी मुलाखत घेण्यातही आली होती. पण यावेळी मुलाखतीत मला जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यांची उत्तरे फक्त आणि फक्त मीच देऊ शकत होतो. (माझ्या आई, वडील, भाऊ, बहीण, शेती, शिक्षण आदि फक्त माझ्याशी संबंधितच प्रश्न होते ते! व ही मुलाखत फक्त पाचेक मिनिटातच संपली होती.) हा मुलाखतीचा फार्स असल्याची मला शंका होतीच. ती अखेर खरी ठरली. मला मुलाखतीत 15% च मार्क्स "पडले" होते. अर्थातच माझी निवड झाली नाही. या घटनेमुळे मी निराश न होता माझ्या मनात एमपीएससीच्या निवड प्रक्रियेबद्दल एक तीव्र चीड मात्र निर्माण झाली. 

>> या "चीड" च्या प्रभावातच मी 1982-83 ची परीक्षा दिली व लेखी परिक्षेत पुन्हा 60.5% मार्क्स मिळवू शकलो. अर्थातच मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मला मागील चीड होतीच व ती चीड व्यक्त करण्यासाठीच मी मुलाखतीसाठी गेलो होतो. मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी माझ्या या इराद्याबद्दल देवरी येथील माझे प्राचार्य श्री.जगदीश मिश्रा, शिक्षक मित्र शिवाजी पाठक, धनंजय भिमटे, तुलसीराम देशमुख, माझ्या गावचे एक प्राथमिक शिक्षक श्री.दादूजी बोपचे (जे तेव्हा देवरी येथेच रहायचे) व माझे मोठे चुलतभाऊ श्री.भैय्यालाल कटरे (हे सुद्धा तेव्हा देवरी येथेच रहायचे) यांना स्पष्ट कल्पना सुद्धा दिली होती.

>> मुलाखतीसाठी नागपूर च्या रविभवन येथे व्यवस्था होती व तिथेच माझी मुलाखत घेण्यातही आली. त्या दिवशी एमपीएससी चे चेअरमन डाॅ.श्री.के.जी.देशमुख काही कारणामुळे हजर नसल्याने मुलाखत घेणा-या टीम चे प्रमुख म्हणून ज्येष्ठ सदस्य बॅरिस्टर श्री.पी.जी.पाटील होते. मुलाखतीदरम्यान मागील मुलाखतीचा संदर्भ येताच मी मुलाखतीच्या फार्सपणाबद्दल बोलताच बॅरिस्टर पाटील एकदम रागावले. मी माझ्या सोबत मागील दोन्ही मुलाखतींचा व लेखी परीक्षांचा परिणाम दाखविणारी गुणपत्रिकादि सर्व कागदपत्रे घेऊन गेलो होतोच, तीच त्यांच्या समोर ठेवली. ते पाहून बॅरिस्टर पाटील सर अक्षरशः चक्रावून गेले, अवाक झाले व उलट मलाच शांत करत त्यांनी माझी सविस्तर मुलाखत घेतली. दुसरे एक सदस्य श्री.एस.एच.ठक्कर सरांनी सुद्धा माझी मुलाखत घेतली. सुमारे अर्ध्या-पाऊण तासाच्या सफल मुलाखतीनंतर मी हसतमुखानेच बाहेर पडलो. आता माझी चीड शमली होती. 

>> या मुलाखतीत मला 50% मार्क्स पडले व मी निवडीसाठी पात्र ठरलो. पण माझ्या प्रथम पसंतीच्या D.T.O. या पदासंबंधाने मा.उच्चन्यायालयात प्रकरण असल्याने मला द्वितीय पसंतीचे असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटीव्ह सोसायटीज हे पद ॲलाट झाले. त्यानंतरच्या सर्व औपचारिकता पूर्ण होऊन मी 05 मे 1984 ला शिक्षक पदाचा राजीनामा देऊन निवड झालेल्या पदावर रुजू झालो. 
(ह्या रुजू होण्याची सुद्धा एक अफलातून(?) "स्टोरी" आहेच. ती संक्षेपात अशी -- मार्च 1984 च्या शेवटच्या आठवड्यात मंत्रालयातून माझ्या नावे "र.पो.ने" पाठविलेला //माझ्या नियुक्तीच्या आदेशाच्या जी.आर.ची प्रत असलेला// लिफाफा मला अजूनही //36 वर्षानंतरही// मिळालेला नाही. माझे मित्र जोगेन्द्रनाथ/सिंह गवई यांनी अंतर्देशीय पत्र पाठवून मला माहिती दिल्यामुळे मी त्यांच्या प्रतीच्या आधारे रुजू होऊ शकलो होतो. 🤔😀)

>> रुजू झाल्यावर प्रशिक्षण कालावधीत पुण्याकडील सहकर्मींकडून कळले की, बॅरिस्टर श्री.पी.जी.पाटील ही काय हस्ती आहे! आणि मी धन्य झालो हे जाणून की, आजही पी.जी.पाटील सरांसारखे निष्पक्ष व निस्पृह वृत्तीचे महान लोक एमपीएससी मध्ये आहेत. बॅरिस्टर श्री.पी.जी.पाटील यांची महती पश्चिम महाराष्ट्रातील कितीतरी अधिकारी, इतर क्षेत्रातील महत्त्वाचे पद भूषविणारे त्यांच्या संपर्काचे सुवर्णक्षण अनुभवलेले व्यक्ती आजही सांगतात व त्यांची महती सांगताना ते थकत नाहीत. अशा एका महान व्यक्तीचा माझ्या निवडीत सहभाग होता, हे जणू माझे सौभाग्यच. 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
¤
खालील फोटोग्राॅफ तत्कालीन NAGPUR TIMES या इंग्रजी वर्तमान पत्राच्या 18 जून-1983 च्या अंकाच्या कात्रणासह मी जपून ठेवला होता. 'कोरोना उत्खनना'त हे कात्रण सापडले व जुन्या स्मृती जागृत झाल्यात. (ह्या स्मृतीत काही + , -- असल्यास तो माझा स्मृती-प्रमाद(?) समजावा.)

👇👇
एमपीएससी चे तत्कालीन चेअरमन डाॅ.श्री.के.जी.देशमुख व सदस्यद्वय बॅरिस्टर श्री.पी.जी.पाटील व श्री.एस.एच.ठक्कर 
(नागपूर, दि.17 जून 1983)

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन