शब्दाशब्दांमधून जगण्याची बीजे पेरणारी कविता : माझ्यातल्या कवी मरत चाललाय (इरफान शेख)

*शब्दाशब्दांमधून जगण्याची बीजे पेरणारी कविता*
(माझ्यातला कवी मरत चाललाय : इरफान शेख)
-------------------------------------------------------------
(@ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  
>> युवा मराठी कवी इरफान शेख यांचा "माझ्यातला कवी मरत चाललाय..." ह्या कवितासंग्रहातील कविता वाचल्यावर मला जे जाणवले ते हे की, या कवितासंग्रहाच्या कवीतील कवी "मरत" चालला नसून "पेरत" चाललाय. या संग्रहातील बहुतेक कवितांमधून कवीने एकेक बीज पेरले आहे.

>> त्या कविता वाचल्या/अनुभवल्यावर वाचकाच्या मनोविश्वात ते "बीज" प्रस्फुटित होते, अंकुरित होते, वाढू लागते, विस्तारते, पारंब्यांनी समृद्ध होत जाते आणि त्या बीजातून प्रकट/प्रगट झालेल्या महाकाय वृक्षाचे स्वरूप आणि त्याचा आशयादि पाहून/अनुभवून वाचक अचंबित होतो, स्तंभित होतो, विचारप्रवृत्त होतो. त्या महाकाय महावृक्षाच्या "आवरणा''त वाचक स्वतःचा शोध घेऊ लागतो/आत्मावलोकन करू लागतो. आणि तेथे "कवी-वाचक" हे द्वंद्व लोप पावून "कवी-वाचक" एकाकार होतात, दोघांची "वृत्ती" सामाईक होऊ लागते. हेच मला या कवितासंग्रहाचे, माझ्या दृष्टीने, एक वैशिष्ट्य जाणवले.

>> मी ज्याप्रकारची/पद्धतीची कविता करतो(?)/लिहितो(?), त्यापेक्षा ह्या संग्रहातील कविता अगदी वेगळ्या/भिन्न प्रवृत्तीच्या आहेत. आणि कदाचित म्हणूनच मला या कविता अत्यधिक भावल्या, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. माझ्या कवितांच्या प्रवृत्तीहून अगदी वेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या कविता मला नेहमीच भावत आल्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या कविता वाचून/अनुभवून माझ्या मनात त्या-त्या कवींविषयी एक प्रकारची सकारात्मक जेलसी(!) निर्माण होत असावी असे मला वाटते. मला तशी कविता जमत/लिहिता येत नाही, हे मग माझे वैषम्य ठरत नाही, तर तशी कविता लिहिणारा कवी माझा मित्र(!) आहे, याचे मला समाधानच नव्हे, तर त्याचा मला अभिमानही वाटू लागतो.

>> म्हणूनच मला इरफान शेख च्या कवितेचा हेवा(!) वाटू लागतो. त्याची ही "बीज-पेरती" कविता मला खूप खूप आवडली. इरफान शेख च्याच शब्दात सांगायचे तर त्याची ही कविता म्हणजे "शब्दाशब्दांमधून जगण्याची बीजे पेरणारी कविता" आहे.

>> काही थोडक्या कवितांचा अपवाद सोडल्यास त्याच्या कवितेत "अनुकरण-शरणता" दिसत नसून अस्सल अभिव्यक्तीचेच दर्शन होते.

"एका अनाम मित्रासाठी" या कवितेतील,
//'आगे बढो' म्हणत पिछे ढकलणारे...मित्र//,

"मोहल्ल्यातले आठवपक्षी" या कवितेतील,
//काँक्रीटच्या नव्या तयार रस्त्यांनी / केलीय सोय पावलांची दिशा हरविण्याची//,

"कवितेनं बोलत राहिले पाहिजे" या कवितेतील,
//कुणाच्या तरी शब्दाला मी गोंजारलं पाहिजे ही अपेक्षा...//,

"तू, मी आणि कविता" या कवितेतील,
//बांध फुटायला असतो तत्पर साचलेपणाचा किती काळाचा...//

ह्या ओळी त्याने/कवीने "अनुकरण-शरणता" नाकारली आहे असे स्पष्टपणे घोषितच करतात जणू! अर्थात काही अपवाद आहेत. पण "अपवादानेच नियम सिद्ध होतो" हे वैज्ञानिक सत्यही आहेच!

>> या संग्रहातील तिन्ही अभंग रचना मला अतिशय भावल्या. कारण आजच्या या आधुनिक/आधुनिकोत्तर/जिगतिकीकरणोत्तर/सत्योत्तर युगातील अभंग-रचना ही पारंपारिक अभंग रचनेचा घाट/रूप घेऊन अवतरत असली तरी आशयात मात्र सार्वकालिक विद्रोह (विद्वेष नव्हे!) घेऊन अवतरत असते/असावी. हा गुण या अभंगात मला आढळून आला. माझ्या "शाश्वत मौनाचे स्वगत"(2002) या अभंगसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी काळशरण डाॅ.अनिल नितनवरे यांनी केलेले एक विधान = "हा अभंग संग्रह म्हणजे फक्त अभंगच असलेला कदाचित पहिलाच आधुनिक अभंगसंग्रह असावा"= ची आत्मस्तुती-जनक आठवण ताजी झाली आणि "तू कोणता देव/मज नाही ठावे/लावू कसा दिवे//तुजलागी//" या माझ्या अभंगाची सुद्धा आठवण प्रभावली. (लोणच्यासारखी तोंडी लावण्यापुरती ही आत्मस्तुती येथे चालेल ना? 😃😃)

>> शेतकरी व त्याची अवनत-थोप अवस्था तथा शेतकरी आत्महत्या या विषयावर खूप लोकांनी काही अक्राळविक्राळ कविता(?) केल्याहेत. पण या संग्रहातील इरफान यांच्या "माझ्यातला कवी मरत चाललाय..." या शीर्षक कवितेतील चार ओळी मला अक्षरशः हलवून गेल्या. त्या ओळी अशा...

"कित्येक हिरव्या झाडांनी खदखदत अनुभवलं
मातीतून सोनं उगवणा-या शेतक-यांच्या आत्महत्या,
स्वप्नांच्या किती नद्या आटल्या सीमेवरती
तरुण रक्तांच्या कितीतरी, आभाळाला पडले छिद्र"

ह्या चार ओळी म्हणजे "जय जवान, जय किसान" या निसर्गसंमत व वैज्ञानिक दृष्ट्याही सत्य असलेल्या/ठरलेल्या "घोषणे"लाही सत्तांतरीत इंडियाच्या सर्वच सत्तातुरांनी कशी "उफराटी" घोषणा(?) करून टाकली आहे, याचे एक अत्युत्तम सटायरच ठरतात! या चार ओळी "जय जवान, जय किसान" या घोषणेतील #कटूवास्तव (#BitterReality) दर्शवितात! या ओळी लिहिताना कवीच्या पुढे(!) "काय" होते, हे अर्थातच मला ज्ञात नाही, पण त्यातून ध्वनित होणारा "अर्थ" मात्र मला वरीलप्रमाणे भासला/भावला आणि मी या चार ओळींना नमन करून बसलो.

>> असो. मी काही काव्याभ्यासक, समीक्षक वगैरे नसून एक व्होरासियस वाचक-मात्र असल्याने त्याच अल्पज्ञ भूमिकेतून मी हे लिहून बसलो. सबब क्षमस्व.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(24.05.2020)
-----------------------------||○||-----------------------------

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)