कवीवर्य कुसुमाग्रज आणि त्यांची कविता : एक स्वानुभव
*कवीवर्य कुसुमाग्रज आणि त्यांची कविता : एक स्वानुभव*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> दोनेक वर्षांपूर्वीची घटना असावी. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भवभूती महाविद्यालय आमगांव येथे मला बोलावे लागले. बोललो सुद्धा काही बाही. प्राचार्य श्री भुस्कुटे यांनी कुसूमाग्रजांच्या कवितांचं सुंदर असं "प्रदर्शन" सुद्धा भिंती भिंतीवर "लावलं" होतं. एका कवितेसमोर मी थोडासा थबकलो. मला 2009 मधील एक अप्रिय प्रसंग आठवला. ती कविता म्हणजे "- ...पाठीवर हात ठेवा....."! (कणा)
>> झालं असं की, जानेवारी-2009 मधील माझ्या अपघातानंतर डावा हात पूर्णतः आणि डावाच पाय अंशतः दिव्यांग होऊन मी सहा महिने उपचार घेऊन नुकताच रूजू झालो होतो. या दरम्यान जुने जिल्हाधिकारी बदलून नवीन जिल्हाधिकारी सुद्धा रुजू झाले होते. त्यामुळे प्रोटोकॉलच्या दृष्टीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मी काठीच्या साहाय्याने लंगडत लंगडत (डावा हात बॅन्डेज मध्येच लटकवलेला) त्यांना भेटायला गेलो. साहेबांना आल्याचा निरोप धाडला. 1/1.5 तासा(?)नंतर साहेबांनी चेम्बरमध्ये बोलावलं. गेलो. माझ्या प्रोटोकॉल पाळण्याच्या सवयीप्रमाणे वरीष्ठां(?)नी बस म्हटल्याशिवाय मी बसत नसल्याने काठीच्या साह्याने जिल्हाधिकारी साहेबासमोर उभा राहिलो. अभिवादन केले. साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्या अधिकार क्षेत्रात नसलेले एक "काम" सांगितले. चंद्रपूर येथील जूना पूर्वानुभव लक्षात घेता "हो" म्हणण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. तरी (उभ्याउभ्याच) म्हणालो. "सर पाठीवर आपला हात असला तर "हे" काम सुद्धा करता येईल." मला वाटलं होतं की, कुसुमाग्रज मदतीला येतीलच. पण कसचे काय. साहेब म्हणाले ---आम्ही पाठीवर "हात" नाही "लात" ठेवतो.---
>> त्यावेळी त्यांच्या चेम्बरमध्ये आणखी 4-5 जिल्हास्तरीय अधिकारी बसून होते, ते अवाक होऊन पाहातच राहिले. माझ्या सोबत आलेला माझा कनिष्ठ सहकारी सुद्धा अवाक होऊन पाहातच राहिला. नंतरच्या एका सभेत भेट झाल्यावर त्यादिवशी चेंबरमध्ये उपस्थित असलेले व प्रत्यक्ष साक्षीदार असलेले ते जिल्हास्तरीय अधिकारी मला म्हणाले की, तुमचा पेशन्स(?) खूपच जबरदस्त म्हणावा लागेल. मी मात्र त्यावर काहीच बोलू शकलो नाही.
>> अशी ही कुसुमाग्रजांची व त्यांच्या त्या सुप्रसिद्ध कवितेची आठवण तेथे त्यादिवशी पुन्हा जिवंत झाली. यात 1% ही असत्य वा अतिशयोक्ती नाही. असो. असो. असोच.
□
@ॲड.लखनसिंह कटरे
(निवृत्त डीडीआर)
बोरकन्हार, जि.गोंदिया.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment