एक स्मरणयात्रा : फ्रेडरिक नित्शे आणि विचार-स्वातंत्र्य
◇Friedrich Nietzsche आणि विचार-स्वातंत्र्य◇
++++++++++++++++++++++++++++++++++
◇विज्ञान युग, जिज्ञासा आणि गजानन क्षीरसागर◇
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
1971-72 मधील घटना असावी. मी सीताबर्डी नागपूर येेेथील हनुमान गल्लीतील मोठ्या न्यूज पेपर व्हेेंडरला विनंती करून रविवारचा "मटा" त्यांच्याकडून पोस्टाने मागवत असे. "मटा"तील एका छोट्याशा जाहिरातीनुसार मी पुण्याच्या (अनिरुद्ध प्रकाशन, 1493 क, सदाशिव पेठ) श्री.गजानन क्षीरसागर यांच्या "विज्ञान युग" मासिकाचा वर्गणीदार झालो. लवकरच त्यांनी "जिज्ञासा" हे दुसरे सामान्य ज्ञान विषयक नियतकालिक सुरू केले व मी त्याचाही वर्गणीदार झालो. या अल्पजीवी "जिज्ञासा"चे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. UPSC/MPSC बद्दलची साद्यंत माहिती मला सर्वप्रथम याच नियतकालिकाने पुरविली/दिली होती.
या "जिज्ञासा" मध्ये प्रकाशित एका लेखाने माझ्या विचार-विश्वात आमूलाग्र बदल घडवून आणला. तो लेख म्हणजे जर्मन तत्त्वज्ञ फ्रेडरिक नित्शे (Friedrich Nietzsche/1844-1900) यांच्यावरील परीचय-लेख. (या लेखाच्या लेखकाचे नाव मात्र आता आठवत नाही, क्षमस्व.) या लेखाच्या वाचनाने माझ्या विचारपद्धतीमध्ये खूप बदल घडून आला. मी सर्व प्रकारच्या "विचार-गुलामी"तून मुक्त होऊ लागलो. "विचार-स्वातंत्र्य" म्हणजे काय असते, याची हळूहळू ओळख पटू लागली. 1967 पासून BBC HINDI SERVICE व VOICE OF AMERICA HINDI SERVICE चा नियमित श्रोता राहिल्याने मला फ्रेडरिक नित्शे आपल्या क्षमतेनुसार समजून घ्यायला मदतच झाली. यानंतर काॅलेज च्या लायब्ररीतील PSYCHOLOGY आणि PHILOSOPHY वरील ग्रंथ वाचण्याचा सपाटाच लावला. (त्यामुळे B.Sc.(PCM)च्या प्रथम वर्ष परिक्षेत नापासही झालो.) त्यावेळी माझी इंग्रजी अगदी प्राथमिक स्वरूपाचीच असल्याने "मला किती समजले असेल" हा प्रश्न(च) असला तरी काही-ना-काही "विचार-फरक" पडत गेलाच असावा. कोणीही, कितीही मोठ्ठा "विचारक" असला तरी त्याचे विचार वाचताना/समजून घेताना माझी चिकित्सक वृत्ती "दबून" जात नव्हती/नाही. त्यामुळे माझ्यावर पुष्कळदा उद्धटपणाचे वगैरे काहीबाही आरोप/आक्षेपही झाले/होतात. पण वस्तूतः माझ्यातील चिकित्सक वृत्तीने मला मुजोर होण्यापासून व कोणाचाही "अंधभक्त" होण्यापासून मात्र वाचवले आहे.
"जिज्ञासा" हे नियतकालिक वर्गणीदारांच्या पुरेशा संख्येअभावी लवकरच बंद करावे लागले. मी गजानन क्षीरसागर यांना हे नियतकालिक पुन्हा सुरू करण्यासाठी वारंवार विनंती करीत असे, पण या "मराठी मुलुखात" त्यावेळी पुरेसे वर्गणीदार न मिळाल्याने अखेर "जिज्ञासा"चा पुनर्जन्म होऊ शकला नाही. मला वाटते की, "जिज्ञासा" ला त्यावेळी पुरेसे वाचक मिळाले असते व ते बंद करावे लागले नसते तर आज IAS/IPS/IFS... मधील "मराठी टक्का" कितीतरी अधिक राहिला असता. असो.
मला विचार-स्वातंत्र्याची दिक्षा देऊन कोणत्याही व कसल्याही/कुणाच्याही विचार-गुलामी पासून दूर ठेवण्यात "जिज्ञासा", निसर्ग-शरण गजानन क्षीरसागर आणि फ्रेडरिक नित्शे या "त्रयींच्या" योगदानाला मी कधी विसरू शकणार नाही. मी त्यांचा सदैव ऋणी, कृतज्ञ असेन. जय हो!
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
(जि.गोंदिया/05.02.2019)
●●●●●●●●●●●●●●●●●●●●
Comments
Post a Comment