डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची "विचारधारा" आणि वर्तमान : एक आकलन.
*डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची "विचारधारा" आणि वर्तमान : एक आकलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~
>> डाॅ.बाबासाहेब (भीमराव रावजी) आंबेडकर यांचा जीवनप्रवास/जीवनपट पाहिला असता बाबासाहेब ख-या अर्थाने 1930 पासूनच भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि सांसदिय प्रभामंडलावर प्रभावीपणे उदित होऊ लागल्याचे/झाल्याचे दिसून येते. म्हणजेच सारांशाने जीवनाच्या उण्यापु-या फक्त 26-27 वर्षात (1956 मधील त्यांच्या निर्वाणापर्यंत) बाबासाहेबांनी भारतीय समाजाच्या जवळपास सर्वच क्षेत्रात जो दबदबा, जो मानसन्मान, जी विद्वतमान्यता, जी क्षितिजसमांतरता प्राप्त करून घेतला/ली, ती एक अद्भुत वाटावी अशीच वस्तुस्थिती आहे. वस्तूतः कोणत्याही सबळ व सक्षम परिस्थितीच्या साथीशिवायही, सर्वार्थाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून, स्वसामर्थ्याने बाबासाहेबांनी जी उत्तुंग अशी सर्वश्रेष्ठता प्राप्त करून भारतीय जनमानसावर आपली अकाट्य अपरिहार्यता ठसविली ती जगाच्या इतिहासात बिनतोड अशीच आहे. हे आइनस्टाइनने महात्मा गांधींबद्दल वापरलेल्या शब्दातच सांगायचे झाले तर, बाबासाहेबांसारखा पुरुष या पृथ्वीतलावर होऊन गेला, ही वस्तुस्थिती येणा-या पिढीला अतिशयोक्तीचीच वाटण्याची शक्यता अधिक आहे.
>> बाबासाहेबांना जाऊन आता 64 वर्षे होत आहेत. पण बाबासाहेबांनी आपल्या फक्त 26-27 वर्षात जे "स्थान" आणि "मान्यता" मिळविले/ली, जी प्रगती साधली व साधून दिली, ते/ती वाढविणे तर सोडाच उलट ते स्थान/ती मान्यता/ती प्रगती ऋणत्वाकडे झूकू लागलेले/ली पहावे लागण्याची, आजची अशी #कटू-वस्तुस्थिती का उद्भवू लागलीय, हे माझ्यासारख्या अल्पमती-जनांना कळू/उमगू शकलेले नाही. यावर आत्मचिंतन, आत्मपरीक्षण होऊन सर्वंकष अशी विवेकपूर्ण चर्चा-मंथने का होत नसावीत, त्यानुसार आचरण का होत नसावे, हा माझ्यासारख्या समोरचा मोठ्ठा प्रश्न आहे. "मी" ची वाटचाल "आम्ही" कडे का होत नसावी, हे सुद्धा एक आजवर न सुटलेले कोडेच आहे.
>> बाबासाहेबांच्या सतत प्रवाही व नवनवोन्मेषशाली विचारांना, साम्यवाद/समाजवाद सारख्या संकुचित व कूपमंडूक संज्ञापनासारखी, 'आंबेडकरवाद' अशी चुकीची हिमनगपृष्ठवादी संज्ञा देऊन "आंबेडकर-विचारधारे"ला अवरुद्ध करण्याचे कारस्थान राजरोसपणे होत असताना सुद्धा सुविज्ञ आणि समंजस अशा आंबेडकर-विचारानुयायींनी त्याला अटकाव न करता कधी तटस्थ तर कधी छद्म/प्रच्छन्न वृत्तीने जणू बढावाच दिलाय, असे माझे अल्पमतीचे आकलन आहे.
>> गेल्या कित्येक दशकांपासून वारंवार सांगण्यात/प्रदिपादित करण्यात येत असलेल्या हायपोथिसिस प्रमाणे तथाकथित उच्चवर्णीय ब्राह्मणांची संख्या भारतात फक्त 3.5% च आहे. त्यातील 100% ब्राह्मण काही वर्णवर्चस्ववादी नाहीत/नसावेत. त्यामुळे या 3.5% पैकी कमाल(?) 20% ब्राह्मण वर्णवर्चस्ववादी धरल्यास/मानल्यास त्याचे प्रमाण सुमारे 0.5% होते. आणि शिवाय ओबीसी या तथाकथित उच्चवर्णीयांच्या सुमारे 70% लोकसंख्येच्या सुमारे 12.5% (पूर्णांकाच्या दृष्टीने), म्हणजेच सुमारे 9% ओबीसी लोकसंख्या सुद्धा अजूनही तथाकथित वर्णवर्चस्ववादी(?) आहे, असे वादाकरिता मानले तर एकूण वर्णवर्चस्ववादी लोकसंख्येचे प्रमाण (9+0.5)=9.5% होते. म्हणजेच या अशा एका प्राथमिक संख्याशास्त्रीय अंदाजानुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या फक्त 9.5% लोकसंख्या वर्णवर्चस्ववादी वृत्ती जोपासणारी आहे/असावी, असे दिसून येते. असे असले तरी डाॅ.आंबडकरांच्या नावाने व नावाखाली उर्वरित (वर्णवर्चस्ववादी नसलेल्या) सुमारे [(3.5+70)-9.5]=64% (ब्राह्मण+ओबीसी) जनतेला/जनतेकडे अकारणच द्वेषबुद्धीने जोखण्या/पाहण्या/देखण्याचे अनैसर्गिक व असंवैधानिकच नव्हे तर आत्मघाती कृत्य व कृती सर्रास सुरू असल्याचे आपण पाहतोय. आणि दुर्दैव हे की हे सर्व त्या सर्वार्थाने विद्वान व बुद्धत्व प्राप्त महापुरुष असलेल्या महामानवाच्या नावावर/नावाने केले जाते. वस्तूतः विद्रोहातून त्वेष निर्माण झाला तर नवनिर्मितीची प्रक्रिया सुकर होऊ लागते, उलट विद्रोहातून द्वेष निर्माण झाला तर आत्मविनाशासोबतच सर्वविनाशाची प्रक्रिया सुरू होऊ लागते. म्हणूनच मला वाटते की बाबासाहेबांनी आरंभ करून दिलेली लढाई(!) लढताना द्वेष नव्हे तर त्वेष या शस्त्राचा विवेकपूर्ण वापर करता आला तर बाबासाहेबांना अपेक्षित असलेला "विजय" दूर असणार नाही. (याठिकाणी एक बाब आवर्जून नोंदवाविशी वाटते की, आदिमानवपूर्व काळापासून मानवी शाखांनी आत्मसात केलेले गुणधर्म म्हणजे जाणिवा आणि अहंभाव या गोष्टी आजही आपले अस्तित्व मानवात, विस्तारित स्वरूपात, 'टिकवून' असून त्याकडे आजच्या विचारक/समाजसंघटक असलेल्या मानवाने दुर्लक्ष करणे आत्मघातकी स्वरूपाचेच ठरण्याची शक्यता आहे.)
>> तसे पाहिले तर कोणताही विचारवाद किंवा कोणतीही विचारसरणी ही, हे जग आणि या जगातील माणूस समजून घ्यायला, अपुरा/अपुरीच असते. जगात किंवा या जगातील माणसांत पुढे काय घडेल हे कोणालाही माहित नसते किंवा कोणालाही निश्चितपणे सांगता येत नसते. त्यामुळे विचार करणा-यांनी व समाज संघटकांनी जग व जगातील माणूस समजून घेण्याच्या शक्यता नेहमी खुल्याच ठेवल्या पाहिजेत. या अशा शक्यता कोणत्याही विचारवादाने व/वा विचारसरणीने बंद करून वा साकळून टाकता कामा नये. त्यामुळेच नव्या कल्पनांकडे, नव्या विचारांकडे, नव्या शक्यतांकडे जास्त आणि सकस अशा मोकळेपणाने पाहणे शक्य होऊ शकते. माणसाने, विचारकाने, समाज संघटकांने एकाच दिशेने विचार करणे आणि स्वतःला त्यात बांधून/अडकवून घेणे हे नैसर्गिक नाही, वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा योग्य व/वा सुपरिणामकारक नाही. आणि म्हणूनच कोणत्याही माणसाने, विचारकाने, समाज संघटकांने अशा कोणत्याही विचारवाद व/वा विचारसरणी सारख्या हिमनगपृष्ठवादी श्रृंखलेत न अडकता/न फसता बाबासाहेबांना अनुसरत त्यांच्या सतत प्रवाही व नवनवोन्मेषशाली अशा बुद्ध-विचारधारेशी स्वतःला जोडून आपली विचारशक्ती त्या विचारप्रवाहात व विचारप्रवाहासोबत प्रवाहित ठेवून समोर ठाकलेल्या/ठाकू शकणा-या कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीतून सुयोग्य व सुपरिणामकारक मार्ग काढण्यासाठी प्रवृत्त व्हावे, असे माझ्या अल्पबुद्धीचे आकलन आहे. (शब्दसंख्या सुमारे 625)
¤
(शेवटच्या परिच्छेदातील काही विचार सुहास कुलकर्णी यांच्या महा अनुभव मासिकात प्रकाशित निळू दामले यांच्यावरील दीर्घ लेखात व्यक्त काही विचारांशी सहमती दर्शविणारे आहेत. त्याबद्दल सुहास कुलकर्णी यांचे आभार.)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(25.09.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment