एक हलके फुलके... पण गंभीर सुद्धा!

*एक हलके फुलके...पण गंभीर सुद्धा !*
------------------------------------------------
       गेल्या नोव्हेंबर (2018) मध्ये मी राजन खान प्रणित अक्षर मानव द्वारा आयोजित "चित्रपट कार्यशाळा" करिता मुर्टी (ता.बारामती, जि.सातारा) येथे गेलो होतो. पण तब्येतीच्या कारणांमुळे मला ती कार्यशाळा अर्ध्यावर सोडावी लागली. पण पुण्याला परत येऊन दोन आठवडे पुण्यातच थांबलो. दरम्यान मी "साधना" साप्ताहिकाचे संपादक श्री.विनोद शिरसाठ यांची भेट घेतली असता त्यांनी मला प्रभाकर पाध्ये यांचे 'असेही विद्वान' व शिरसाठ यांचे 'सम्यक सकारात्मक' ही पुस्तके भेट दिली. पैकी 'असेही विद्वान' हे मजेदार व गंभीर असे पुस्तक मी पुण्यात असतानाच वाचून काढले. 
      त्याच पुुुुस्त्तकातील काही उतारे "साधना" साप्ताहिकाच्या दि.15 डिसेंबर 2018 च्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहेत. (हे पुस्तक प्रत्येक विचारी मराठी वाचकाने अवश्य अवश्य वाचावेच असे माझे मत आहे.) त्या उता-यांतील अनंत काणेकर यांच्या संबंधीची आठवण वाचतांना मला माझ्या जीवनातील एक समांतर घटना आठवते. 
     त्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक राहील. 1971-72 दरम्यान माझ्या शालेय जीवनात मी मुंशी प्रेमचंद यांची एक हिंदी कथा वाचली होती, तिथून माझी ही आठवण प्रारंभ(?) होते. त्या कथेचे शीर्षक आठवत नसले तरी त्या कथेतील "त्या" गरीब परिवारातील विद्यार्थ्याचे त्याच्या एका श्रीमंत परिवारातील विद्यार्थी-मित्राकडे रहायला गेल्यावर "त्या"च्या वर्तणूकीतील बदलाचे वर्णन तेवढेच आठवते. ही कथा वाचल्यानंतर आणि तत्कालीन रशियन "सोव्हियत लॅण्ड", जर्मनीतून प्रसिद्ध होणारे "KONTAKT", "GDR REVIEW" सारखी नियतकालिके वाचून माझ्याही मनात मार्क्सवादाबद्दल प्रेम(???) व आपुलकी(!) निर्माण होऊ लागली होती. परंतु 1987 मध्ये CBF वडसा(देसाईगंज), जि.गडचिरोली येथे पशुसंवर्धन विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असताना तेथील माझे सहकारी मित्र सुनील खोबरागडे (सध्याचे ''जनतेचा महानायक'' (मुंबई) या दैनिकाचे संपादक) यांनी मला वाचायला दिलेले "दास कॅपिटल" (नाव चूकीचे तर नाही लिहिले ना?) वाचल्यावर माझा भयंकर भ्रमनिरास होऊन मी हळूहळू मार्क्सवादातील "हिमनगपृष्ठवाद" (काही आंधळे व हत्ती-ओळख) ओळखू(?) लागलो होतो. व माझी ही "ओळख" चूकीची नव्हती/नाही त्याची प्रचिती मला अजूनही वारंवार येते आहे. 
      त्या अनुषंगाने गोविंदराव तळवलकर यांच्या साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या "वाचता वाचता" या पुस्तकातील एक आठवण आणि आताची ही प्रभाकर पाध्ये व अनंत काणेकर यांची आठवण मला, माझ्या विचारांना व माझ्या निष्कर्षांना दुजोराच देताहेत असे मला वाटते. 
     ■प्रभाकर पाध्ये-सह-अनंत काणेकर यांची ती आठवण खालीलप्रमाणे आहे....
    प्रभाकर पाध्ये लिहितात, की...
    "अनंत काणेकर हे माझे मराठी वाड़्मयातले अत्यंत जुन्यातले जुने मित्र! आमच्या मैत्रीचा वाड़्मयाशी काही संबंध नव्हता. मार्क्सवादाच्या ओढीने आम्हाला एकत्र आणले होते.
     माझ्या डोळ्यांवरचा मार्क्सवादाचा अंमल त्या मानाने फार लवकरच उतरला. मी स्वतःला 1936-37 पर्यंत मार्क्सवादीच म्हणवत असे. काणेकरांच्या मार्क्सवादाची इतिश्री मला वाटते, 'छोडो हिंद'च्या काळात, कम्युनिस्टांनी ब्रिटिशांच्या युद्धाला लोकयुद्ध म्हटले तेव्हा झाली. पण त्या दिशेने त्यांची पावले अगोदरच पडू लागली होती.
    स्टालिनने फिनलँडवर 1939-40 मध्ये आक्रमण केले, तेव्हाची गोष्ट. मी धनुर्धारीतून स्टालिनवर कडाडून हल्ला चढवण्यास सुरुवात केली. (त्याची खबर स्टालिनला नव्हती, असण्याचे कारण नव्हते -- तो प्रश्न अलाहिदा!)
     याला उत्तर म्हणून व्ही.बी.कर्णिक, अनंत काणेकर, त्र्यं.वि.पर्वते वगैरेंनी (खासगी -- जाहीर) असा युक्तिवाद केला की, काही म्हटले तरी फिनलँड हे भांडवलशाही राष्ट्र आहे आणि रशिया हे समाजवादी राष्ट्र आहे. म्हणून रशियाचा फिनलँडवरील हल्ला हा कितीही दुर्दैवी असला, तरी प्रत्येक प्रगतिवाद्याने त्याला अखेरीस पाठिंबाच द्यायला हवा!
     हा युक्तिवाद खोडून काढण्यासाठी मी 'रशिया हे खरेखुरे समाजवादी राष्ट्र आहे काय?' असाच प्रश्न उपस्थित केला आणि आकड्या--पुराव्यानिशी असे सिद्ध केले की, रशियात भांडवलशाही राष्ट्रांपेक्षाही अधिक प्रखर अशी विषमता आहे आणि लाजिरवाणी अशी पिळवणूक आहे.
      हा माझा लेख धनुर्धारीत प्रसिद्ध झाल्यावर काणेकर मला भेटले, तेव्हा ते उद्गारले, "पाध्ये, यू आर डिस्ट्राॅइंग अवर लास्ट इल्युजन्स!" (पाध्ये, तुम्ही आमचे उरलेसुरले भ्रम आणि स्वप्ने नष्ट करीत आहात!)"■
     याद्वारे मी माझी तुलना या महान व्यक्तींशी करीत नसून फक्त सध्याची भारतीय वस्तुस्थिती, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय ग्रामव्यवस्था व शेतीअवस्था तथा तद्जन्य शेतकरी आत्महत्या या संबंधात स्वातंत्र्यदिनापासूनच उद्भवलेल्या अनर्थकारक अशा मार्क्सवाद-प्रणित अर्थनिती व राजनिती बद्दल माझे अल्पबुद्धीचे निदान मांडत आहे. 
     चूक-भूल बद्दल क्षमस्व.
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~~~~~(14.12 2018)~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन