अतिरेकी विचारपद्धती आणि त्यांचे अपरिहार्य डबके...

□अतिरेकी विचारपद्धती आणि त्यांचे अपरिहार्य डबके...□
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      'आधुनिक' या काल-सापेेक्ष भासणा-या पण प्रत्यक्षात काल-सुसंगत असलेल्या संकल्पनेची सर्वंकष आणि निर्विवाद व्याख्या अजूनही प्रलंबितच आहे. आणि त्यामुळे आधुनिक, उत्तराधुनिक, उत्तरोत्तराधुनिक, + + + × × × ..... असे फसवे व भ्रामक शब्दप्रयोग करून/वापरून 'आधुनिक' या निसर्गतःच स्वतंत्र व स्वायत्त संकल्पनेची ऐशीतैशी करण्यात आजची विचारशैली मश्गुल असल्याचे पदोपदी व सदैव आढळून येते. 

      अशा या संकल्पनिक उपपत्तींच्या सम्यक आकलनाअभावी अति-सौम्य/शिथिलरित्या वापरल्या जाणा-या प्रतिगामी व पुरोगामी या विचारपद्धती सुद्धा आपापल्या रंगीबेरंगी वर्तुळात अतिरेकी रूप धारण करतात. विचारपद्धती प्रतिगामी असो वा पुरोगामी ती अतिरेकी झाली की तिचे पर्यावसान शक्तिशाली नकारात्मक परिणामाला कारणीभूत ठरण्यातच होते. आणि पर्यायाने समाज-जीवनातील एकजिनसीपणा नष्ट होऊन 'मेरे मुर्गेकी एकही टांग' ही मुजोर आणि भेदजनक वृत्ती फोफावत जाते. दुर्गंधीयुक्त विचार-डबक्यांची संख्या वाढत जाते.  

        वस्तूतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणत्याही विचारपद्धतीचे परिशीलन केल्यास प्रत्येकच विचारसरणीतील loop-holes दिसून येतात. पण एखादी विचारपद्धती जेव्हा श्रद्धेत रुपांतरीत होते तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन झाकोळत जाऊन ती श्रद्धा लवकरच भयंकर अंधश्रद्धेचे विचारदुष्ट रूप धारण करू लागते. अशावेळी निसर्ग व विज्ञान संमत असा 'प्रणाली सिद्धांत' नाकारला जाऊन 'संवाद-प्रक्रिया'च खंडित होते. मग 'एकतर तू नाहीतर मी' ही आदिमानवाची मनःस्थिती पुन्हा उपस्थित होऊन संभाव्य "प्रलया"ला कारणीभूत ठरू लागते/शकते.

      प्रतिगामी आणि पुरोगामी विचारपद्धतींच्या नैसर्गिक व स्वाभाविक मर्यादा न आकळल्याने त्यांच्या अतिरेकी आग्रहापोटी मध्यम विचारपद्धती सुद्धा आहे/असते आणि त्याद्वारे 'उत्तरे' शोधता येतात/सापडतात, याचा सोयीस्कर विसर पडतो. पर्यायाने प्रश्नांची व समस्यांची उकल व/वा सोडवणूक न होता ते आणखी आणखी चिघळू लागतात. या अशा परिस्थिती आणि वस्तुस्थिती चा गैरफायदा मग सत्तापिपासू व्यवस्था अचूकपणे, अलगद उचलते/घेते व आपला 'ताबा' फैलावते. तरी अंधश्रद्वेने अंधभक्त झालेले प्रतिगामी-पुरोगामी विचारपद्धतींचे अनुयायी जागेच होत नाहीत, त्यांचा 'डोळसपणा'ही जागृत होत नाही, ही त्या-त्या अतिरेकी विचारपद्धतीची नियतीच होऊन बसते. आणि दुर्दैवाने ही #कटू-वस्तुस्थिती (#BitterReality) वेळीच ओळखण्याची क्षमता नसलेल्यांचीच चलती वाढू लागते.

         अशाच, सध्या धुमाकूळ घालत असलेल्या एका अतिरेकी विचारपद्धतीचा निष्पक्ष व तटस्थ वृत्तीने आढावा घेऊन अवलोकन केले असता असे प्रथमदर्शनी दिसून येते की, अतिरेकी पुरुषवादाने जन्माला घातलेला अतिरेकी स्त्रीवाद सुद्धा याला अपवाद असल्याचे दिसून येत नाही. या दोन्ही वादांच्या व विचारपद्धतींच्या अतिरेकी आचरणाने सत्यवान-सावित्री या जोडीतील सावित्री आणि ज्योतीबा-सावित्री या जोडीतील सावित्री, अशा दोन्ही सावित्रींमध्ये युद्धाची घोषणा होताना दिसत आहे. वस्तूतः शारीरशास्त्र, मानसशास्त्र, यौन-विज्ञान, प्राणिशास्त्रीय अद्यावत संशोधन, मानवी मेंदूूविषयक अद्यावत संशोधन, पुरुष व स्त्री शरीरातील सेक्स पाॅईंट्सची (ऑर्गन्स नव्हे!) भिन्न भिन्न संख्या, त्या सेक्स पाॅईंट्सची व त्याद्वारे उत्तानावस्थेची वैज्ञानिक अवस्था व व्यवस्था, निसर्ग-संमत घटकत्वाचा सिद्धांत, अशा आणखी संबंधित विभिन्न अद्यावत वैज्ञानिक शोध-संकल्पना व सिद्धांत यांचा कोणताही साधा वा साकल्याने अभ्यास व/वा विचार न करता "मला वाटते, मी म्हणतो/ते, माझाच अभ्यास" अशा अवैज्ञानिक, अंधश्रद्धासंपृक्त व मुजोर आयुधांनी लढले/लढविले जाते. पर्यायाने या अनंत विश्वात एकमेव असलेल्या मानव जातीमधील स्त्री-पुरुष यातील संवाद संपत असून त्याची जागा विसंवाद, वितंडवाद, कृत्रिम भेदवृत्ती, आदि अनैसर्गिक व अ-मानवी गोष्टी/बाबी घेत असल्याचे संकेत पदोपदी जाणवत आहेत. 

       वास्तविक पाहता या विश्वातील पहिला जीव ही 'स्त्री'च असून पुरुष हा त्यानंतर आलेला/आणलेला/विकसित झालेला उपरा जीव आहे, हे वैज्ञानिक व वैश्विक सत्य आज प्रयोगाने सिद्ध होण्याच्या मार्गावर असताना या दोन्हींमध्ये कृत्रिम व अनैसर्गिक वैर जन्माला घालण्याचेच कार्य ह्या दोन्ही अतिरेकी विचारपद्धती करीत आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.  

     त्यामुळेच म्हणावेसे वाटते की, एखादी विचारपद्धती जसजशी अतिरेकी होत जाते तसतसे तिचे रूपांतर कोणत्यातरी "वादा"त होऊ लागते. आणि काही कालावधीने अशा "वादा"चे रुपांतरण "विचार-डबक्या''त होऊन त्यातून फक्त दुर्गंधीच बाहेर पडू लागते. म्हणूनच कोणत्याही अतिरेकी विचारपद्धती ला शरण न जाता आपल्या अगाध अज्ञानाची जाणीव सतत जागृत ठेवून नदीच्या सदैव नवनवोन्मेषशाली प्रवाहासारख्या मध्यम स्वरूपाच्या विचारधारांचे निसर्ग-स्नेही अनुकरण व अनुसरण केल्यास त्यात सदैव नव-विचार सामावण्याची क्षमता असल्याने आपणही सदैव ताजे-तवाने राहू शकतो. व पर्यायाने अतिरेकी विचारपद्धतींना शरण न जाता, हे विश्व नष्ट न होता नव-निर्माण-वृत्तीने परिपोषित होण्यास आपण साह्यभूत ठरू शकतो... 
इति शम।
@लखनपाल सिंह कटरे "अपराधी"
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, 
ता.आमगांव, जि.गोंदिया 
(विदर्भ-महाराष्ट्र) //22.06.2019//13.12.2020//
~~~~~~~~~~~~\\~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन