माझी आत्म-आलोचना ...(?)
माझी आत्म-आलोचना...(?)
~~~~~~~~~~~~~~~~
माझी मातृभाषा हिंदी असल्याने माझ्या प्रकाशित लेखनाची सुरूवात हिंदीतूनच झाली. 1980पर्यंत मी हिंदीत चांगला(!) स्थापित(!) होऊ लागलो होतो. परंतु माझे शालेय शिक्षण मराठीतून झाल्याने, B.Sc.(PCM) ला 1st year ला मराठी घेतल्याने, ग्रेस आणि वसंत आबाजी डहाके यांनी केलेल्या गारूडाने मी हिंदीला 1978 पासून हळूहळू व सुमारे 1982 पासून पूर्णतः त्यागून मी मराठी लेखनाकडेच वळलो. मराठी साहित्याचे वाचन तसे 1965 पासूनच सुरू होते, त्याची गती मात्र आता वाढवली. माधव मनोहर या "गुप्तहेरा"चे लेखन वाचण्यात आले. त्यांनी मोठमोठ्या, नावाजलेल्या मराठी साहित्यिकांच्या पाश्चात्य परपुष्टतेची लक्तरे सार्वजनिक **घाटावर धुवून मराठीच्या वेशीवर टांगली. माझे ज्येष्ठ मित्रवर्य दत्तप्रसाद दाभोळकरांचे "ज्ञानपीठ-पुरस्कार"चे पुराण वाचण्यात आले. आणि काहीसा निराश होऊ लागलो होतो. दरम्यान आनंद यादवांशी "गोतावळा" संबंधाने पत्रसंवादही झालेला होता. तरी मराठीतील मोठमोठ्या साहित्यिकांचे "मातीचे पाय" पदोपदी आढळून येऊ लागले. मराठीतील एकेकाळी काही नावाजलेल्या(!) तर काही सध्या नावाजत(!) असलेल्या काही सन्माननीय(!) मराठी नियतकालिकांची परपुष्ट, हिमनगपृष्ठवादी, अहंगडपोषक, पाश्चात्यविचारप्राधान्य दर्शक, उपदेशवादी, भारतभूप्रेरित विचारांप्रति पूर्वग्रह जनित,--- दृष्टी, दृष्टीकोन, वृत्ती, इ. (माझ्या अल्पबुद्धीला) आढळून आली. काहींसोबत विचार-भांडणही झाले, काहींना पटले, काहींनी मला शिव्याही दिल्या, बहिष्कृतही केले.
ज्ञात-ज्ञेय-प्रमेय सारखे सर्वच काही पूर्वनिश्चित नसते. अशावेळेस साहित्यिकाला विश्वामित्रासारखी प्रतिसृष्टी निर्माण करावीच लागते, हा हिंदी (भारतीय/?) साहित्य क्षेत्रात प्रचलित व मान्य असलेला विचार, दृष्टीकोन पाश्चात्य विचारपद्धतीने परपुष्ट झालेल्या बहुतेक मराठी साहित्यिकांना अहंगंडापायी मान्यच नसतो, असेही आढळून येते. ज्ञानपीठ पुरस्कारापुरताच विचार केला तरी, मराठी मध्ये हिंदी, कन्नड, बंगाली भाषेइतकी समृद्ध पुस्तके/ग्रंथ (साहित्य) कां नसावे/त, हा प्रश्न सदैव अनुत्तरीतच कां राहतो? रविन्द्रनाथांच्या नोबेल साठी पाश्चात्य विचारांची नव्हे तर शुद्ध भारतीय विचारांची महती कशी काय उत्कृष्ट(!) ठरली आणि आता आमची जागतिक(!) मराठी मात्र पाश्चात्य पार्श्वभूमीच अंगीकारते आहे, हे कशाचे द्योतक समजावे?
"...दरअसल, समय के आवर्तों के साथ न चल पाने और एक ही तरह के सोच-विचार के चलते धीरे-धीरे विचारों और आग्रहों में भी एक खास तरह का "रीतिवाद" (stereotype) रूढ़ हो जाता है| इसके चलते एक अतिवादी आग्रह कई बार असंगत और अतार्किक होते-होते मूल मुद्दे से इतर 'प्रेतछाया' को ही सबकुछ मान लेता है| 'भक्तमंडली' इस प्रेतछाया को पूजने लगती है और विरोधी उसे दुराने लगते हैं|..." विनोद तिवारीजी के शब्दों में मुक्तिबोध के इन विचारों को मै इसीलिए यहां उद्घृत करना चाहता हूँ|
एकदम हिंदीत आलो, त्याबद्दल क्षमस्व, पण मराठी साहित्यिकांनी यावर गांभीर्याने विचार करायची वेळ येऊन ठेपलेली आहे, हे विसरता येणार नाही.
सध्या नव्या पिढीत किरण येले, प्रणव सखदेव, ऐश्वर्य पाटेकर, हृषिकेश गुप्ते, ... सारखी साहित्यिक मंडळी ही कोंडी फोडायचा प्रयत्न करीत आहेत, हे आश्वासक वाटते. श्री.मंगेश नारायणराव काळे त्यांच्या "खेळ" द्वारे यासाठी जोमदारपणे कार्यरत आहेत, त्यांना सलाम. घनश्याम पाटील सुद्धा त्यांच्या "...चपराक" द्वारे चांगलीच चपराक हाणत आहेत. "काव्याग्रह'' मात्र निराश करतंय की काय, असे वाटते. असो. मराठीला ज्ञानपीठ च नव्हे तर नोबेल सुद्धा मिळावे व ज्ञानेश्वर, तुकारामांची मराठी पुन्हा शीर्षस्थानी विराजमान व्हावी, यासाठी ही आत्म-आलोचना केली आहे. चूक-भूल बद्दल क्षमस्व.
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
------(04.12.2017)----------------------------------------
Comments
Post a Comment