माझा अपघात : एक स्मरणगाथा

माझा अपघात : एक स्मरणगाथा...
~~~~~~~~~~~~~~~~~~
       दि.18 जानेवारी 2009, रविवार. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा दिवस. मी जिल्हा सहकार निबंधक या नात्याने जिल्हा निवडणूक अधिकारी. मी नेमलेला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे तालुका सहकार निबंधक प्रशांत धोटे. तसा धोटे हा डेअर-डॅशिंग आणि कायदा-नियमानेही प्रशासन-सुदृढ अधिकारी असला तरी चामोर्शी तालुक्यातील राजकारणाची जवळून ओळख असलेला माझ्या जिल्हा कार्यालयातील माझा कनिष्ठ सहकारी, सहाय्यक निबंधक मोरेश्वर गणवीर म्हणाला की, या निवडणुकीच्या मतदानप्रसंगी मी स्वतः मतदान केंद्रांवर उपस्थित राहून देखरेख करणे अनिवार्य राहील. कारण पूर्वेतिहास खूपच कठीण प्रसंगांनी डागाळलेला होता. माझ्या स्वच्छ पारदर्शी कारभाराने जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे व अपक्ष सुद्धा नेते/कार्यकर्ते मला "मानत" असल्याने निवडणूक/मतदान प्रसंगी एखादा अप्रत्याशित प्रसंग उद्भवल्यास मी तेथे हजर असलो तर तो प्रसंग सुद्धा सहज निस्तरता येईल, असे गणवीर चे आकलन होते. गणवीर यांचे हे "आकलन" मला "सुखावणारे"च असल्याने म्हणा किंवा कर्तव्याची जाण म्हणून म्हणा, मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची टाटा सुमो गाडी मागवून निवडणूक/मतदान निरीक्षणाला गणवीरसोबत गेलो.

     याच दरम्यान आष्टी (जि.गडचिरोली) येथे मी कार्यकारिणी सदस्य असलेल्या झाडीबोली साहित्य मंडळाचे झाडीबोली साहित्य संमेलन सुद्धा सुरू होते. श्री.विठ्ठल वाघ हे प्रमुख पाहुणे होते. मी माझ्या निरीक्षणादरम्यान मधून मधून संमेलनाचाही आस्वाद घेत होतो. 

     सायंकाळी चार-साडेचार वाजताच्या सुमारास निवडणूकीचे काम अगदी शांतपणे पार पडत असल्याची खात्री करून मी मुख्यालयी गडचिरोली ला परत येण्यास निघालो. सोबत गणवीर होताच. 

     चामोर्शी-गडचिरोली रस्त्यावर गडचिरोली जवळील सेमाना देऊळ ओलांडल्यानंतर डावीकडच्या एका अरुंद बायपास  रोडने गडचिरोली-ऑफिस कॅम्पस कडे सरळ जाता येते. आमची टाटा सुमो त्या बायपास ने जात असताना मुख्य रस्त्यापासून सुमारे दोन-तीन फर्लांगाच्या दरम्यान समोरून एक काॅलेज कन्यका स्कूटी ने येत होती. हा रस्ता अरुंद व जमिनीपासून जरा उंचीवरच आहे. रस्त्याच्या दोन्ही कडचा भाग (स्लोप?) उबडखाबड होता. ती कन्यका कशी काय गांगरली/घाबरली माहित नाही, तिने अचानक/एकाएकी रस्त्याच्या मधोमध स्कूटी आणली. हे सर्व एका निमिषार्धातच घडले. माझा ड्रायव्हर सुद्धा गांगरला व त्या कन्यकेला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने टाटा सुमो उजवीकडे रस्त्याच्या खाली घेतली. कन्यका बचावली, पण तेथील उबडखाबडपणामुळे टाटा सुमो फुटबॉल सारखी उधळू लागली. ड्रायव्हरने या धांदलीत पुन्हा डावीकडे जोरात स्टिअरिंग फिरवला आणि अंदाज चुकून टाटा सुमो डावीकडे रस्त्याच्या खाली, एरोप्लेन क्रॅश होतो त्याप्रमाणे, तोंडावरच एका गिट्टी/बोल्डरच्या ढिगावर आदळून बंद पडली. त्या जबरदस्त धक्क्याने टाटा सुमोचा समोरचा काच निखळून पुढे पडला. व टाटा सुमो समोरून पूर्णतः चेपली जाऊन तिची ऐशीतैशीच झाली.

        मी ड्रायव्हरच्या बाजूलाच समोरच बसलो होतो व नेमका त्याच दिवशी सीटबेल्ट लावायला विसरलो होतो. त्यामुळे मी डाव्या हाताकडील सीटच्या वर असलेल्या हॅण्डलला डाव्या हाताने मजबूत धरून ठेवले होते. पण त्या जबरदस्त धक्क्याने माझा डावा हातच निखळला, पण मांस न तुटल्याने निर्जीव होऊन खांद्यापासून लोंबकळू लागला. माझा हात गेला पण त्यामुळे मी बाहेरील बोल्डरच्या ढिगावर फेकला जाण्यापासून व कपाळमोक्ष(?) होण्यापासून वाचलो. एकंदरीत माझ्या डाव्या हाताने, स्वतः शहीद होऊन, मला वाचवले. भयंकर, असह्य वेदनेने मला हलता-डुलताही येईना. मान फिरवणे/हलवणे सुद्धा जमेना. माझ्या सोबत असलेल्या ड्रायव्हर व गणवीर ला किरकोळ खरचटण्यापलीकडे काही इजा झाली नव्हती. पण ते दोघेही माझी अवस्था पाहून अवाक होऊन गेले होते. त्यांना काहीच सुचेनासे झाले होते. ते सुन्न होऊन पाहतच राहिले. अखेर मीच सांगितल्यावर त्या दोघांनी मला कसेतरी टाटा सुमोतून काढून जमीनीवर झोपवले. मला असह्य वेदनेने थोडेसेही हलता सुद्धा येत नव्हते व ते दोघेही किंकर्तव्यमूढ झाल्यासारखे सुन्न झाले होते. मला जमीनीवर झोपलेला व टाटा सुमोची बद-हालत पाहून जाणारे-येणारे बघे, "किती गेले" असे विचारायचे. अशा परिस्थितीतही मला त्याचे हसू येई. मग मीच माझ्या उजव्या हाताने उजव्या खिशातील मोबाईल काढून सर्वप्रथम माझ्या मुलाला कळविले. तो नागपूर ला M.B.A.ला होता. त्याला मी अपघाताची पुसटशी कल्पना देऊन मी नागपूर ला दवाखान्यात येत असल्याचे सांगितले. पण अचानक मला जवळपासच्या चंद्रपूर येथील डाॅ.गाडेगोणे यांच्या खाजगी दवाखान्याची आठवण झाली व मी त्यांना मोबाईल वरून तशी सूचना देऊन मी येत असल्याचे सांगितले. चंद्रपूर येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील माझ्या जुन्या अधीनस्थांना सांगून दवाखान्यात पोचण्यासाठी सुचविले. ॲम्बुलन्स साठी बँकेला कळविले व त्यानुसार तात्काळ ॲम्बुलन्स आली सुद्धा. मला कसेतरी ॲम्बुलन्स मध्ये झोपवण्यात आले. (या सा-या वार्तालापात माझा नियमित दणदणीत आवाज मात्र मी कायम राहू दिल्याने प्रत्यक्ष मला पाहिल्यावरच अपघाताची गंभीरता बाकीच्यांना कळली.) असह्य वेदनेला झेलत गणवीर सोबत ॲम्बुलन्स ने मी चंद्रपूर येथे डाॅ.गाडेगोणे यांच्या खाजगी दवाखान्यात जाऊन पोचलो. तोवर मी गडचिरोली ला घरी माझ्या पत्नीला मात्र कळवले नव्हते. दवाखान्यात पोचल्यावर मग मी श्रीमतीला कळविण्यास सांगितले. दरम्यान संजय सुरजुसे, राजू कुमरे, माझी मानसकन्या मंजू सुरजुसे, राजू कुमरे कडील सूनबाई, आदिंनी माझा ताबा घेतला होता. ताबडतोब डाॅक्टरनी मला तपासले व तात्काळ एक शस्त्रक्रिया करून माझ्या असह्य वेदना तेवढ्या थांबवल्या. मला होश आला तेव्हा माझ्या वेदना शांत झाल्या होत्या. श्रीमती तोवर पोचली होती व तिने सारी परिस्थिती आपल्या सक्षम नियंत्रणाखाली घेतली होती. 

     दुस-या दिवशी डाॅ.गाडेगोणे यांनी मला सांगितले की, अपघातामुळे मला Brachial Plexus Injury झाली असून खांद्यातील जवळपास सारेच लिगामेन्ट्स तुटले किंवा क्षतिग्रस्त झाल्याने माझा डावा हात आता नेहमीकरिता पूर्णतः निकामी झाला आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार मी दुस-याच दिवशी नागपूर ला गेलो व नागपूर येथील संबंधित डाॅक्टरांची लूट व चूकीचा बदसल्ला अनुभवून आठवड्यातच पुन्हा चंद्रपूर ला डाॅ.गाडेगोणे यांच्या कडे पोचलो. त्यांनी पुन्हा एक छोटीशी शस्त्रक्रिया केली व मला पुण्याच्या डाॅ.अनिल भाटिया या भारतात प्रसिद्ध अशा Hand Specialist Surgeon यांना भेटायला सांगून त्यांच्या नावे एक पत्रही दिले.

     त्यानुसार मी पुण्याला पोचलो. पुण्यात मुलगी-जावई राहत असल्याने थांबण्याचा प्रश्न मिटला. डाॅ.अनिल भाटिया यांचा शोध घेतला असता ते जोशी हाॅस्पिटल मध्ये असल्याचे कळले. तेथे त्यांना भेटलो असता त्यांनी तपासणी करून Brachial Plexus Injury चे निदान पक्के केले व त्यावरील उपचार शक्य असल्याचेही सांगितले. पण माझे त्यावेळचे 54 वर्षाचे वय लक्षात घेता पूर्ण दुरूस्ती होण्याबद्दल मात्र शंका व्यक्त केली. मी मात्र त्यांच्या कडून उपचार घेण्या बदल कंफर्म होतो. त्यांच्याच सल्ल्याने डाॅ.आशिष बाभुळकर या दुस-या प्रसिद्ध सर्जनची भेट घेऊन त्यांचीही संमती घेतली. या दोघांनी मिळून संचेती हाॅस्पिटल पुणे येथे 22 फेब्रुवारी 2009 ला सुमारे अकरा तास चाललेल्या शस्त्रक्रिये द्वारे मला दिलासा दिला. त्यानंतर सुद्धा पंधरा दिवसांच्या आतच आणखी दोन शस्त्रक्रिया त्याच हातावर करण्यात येऊन मे-2009 अखेरपर्यंत मी संचेती हाॅस्पिटल चा "ग्राहकोपचार" घेतला. या संपूर्ण कालावधीत माझ्या पत्नीने सर्व पुढाकार घेऊन सारी परिस्थिती अगदी काटेकोरपणे हाताळली. दवाखान्यात मी तिच्याशिवाय क्षणभरही राहू शकत नसल्याने दवाखाना-घर-औषधपाणी, वगैरे सारी सर्कस तिनेच यशस्वीपणे सांभाळली. 

     याच कालावधीत दि.31मार्च 2009 ला माझी कन्या प्रसूत होऊन मला नातू (चि.अद्विक) झाला. प्रसूतीक्रिया सुद्धा दवाखान्यातच झाली. अशा या अक्राळविक्राळ परिस्थितीतही माझे जावई विवेक तुरकर आपले ऑफिस सांभाळून सुद्धा प्रत्येक ठिकाणी पाहिजे तेव्हा मदतीला व धावपळीला नेमके हजर असत. अर्थातच त्यांचे हे अष्टावधानी काम अनुभवून मी कृतकृत्य झालो. 

         त्यानंतरही माझ्या डाव्या हाताला नेहमी गळ्यात लटकवूनच ठेवावे लागे. त्यात अंशतः शक्ती येऊन हाताची हालचाल करण्याचा कालावधी चार वर्षे इतका दीर्घ होता. आज अजूनही माझा डावा हात, मला हलवता येत असला तरी तो पूर्णतः दिव्यांग असून त्याच्या द्वारे मला कोणतेही काम मात्र करता येत नाही. पण गळ्यातील पट्टा मात्र 2014 पासून सुटला. अशी ही माझी अपघाताची स्मरणगाथा!
(शब्द संख्या सुमारे 950)
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया. 
(18.09.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन