फेब्रुवारी 1978 आणि त्यानंतर : एक स्वानुभवाकलन

*फेब्रुवारी 1978 आणि त्यानंतर : एक स्वानुभवाकलन!*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> मे-जून 1977 मध्ये अखेर मी B.Sc.(PCM) चा पदवीधर झालो. M.Sc.(Phy.) साठी PGTD आणि HISLOP College या नागपूरच्या विद्यापीठ/संस्थानात अर्ज केला. दोन्ही ठिकाणी मला M.Sc.(Phy.)च्या सिलेक्ट लिस्ट च्या अंतिम क्रमांकावरील विद्यार्थ्यापेक्षा दोनेक गुण कमी पडल्याने (याचीही एक वेगळीच स्टोरी आहे!) Physics ऐवजी Maths मध्ये प्रवेश घेण्यासंबंधाने विचारणा करण्यात आली/तसे कळविण्यात आले. पण मला Maths मध्ये बिलकुल M.Sc. करायचे नसल्याने हिरमुसला व किंकर्तव्यमूढ होऊन मी गावी परतलो. वडिलांना ही हकिगत सांगून आता यापुढे आणखी न शिकता, शेती व मी उभारलेला धान-खरेदी-सह-किराणा दुकान-सह-आटाचक्की चा छोटासा व्यवसाय वाढविण्याची माझी इच्छाही बोलून दाखवली.

>> माझ्या वडिलांना वकिलीच्या व्यवसायाबद्दल व वकीलांबद्दल खूप आकर्षण-वजा-ओढ असल्याने त्यांनी मला वकील होण्याचा जोरकसपणे सल्ला दिला. अखेर मी LL.B.ला प्रवेश घेतला. LL.B.चे वर्ग संध्याकाळी लागत असल्याने दिवसभर मी मोकळाच असे.

>> त्या कालावधीत B.Sc. गणित शिक्षकांची अतिशय चणचण(!) होती. आज आश्चर्य वाटेल परंतु ही वस्तुस्थिती आहे की, दर आठवड्याला मला काही खाजगी शाळांकडून गणित शिक्षकाची वारंवार ऑफर यायची. पण मला बिलकुल शिक्षक व्हायचे नव्हते. म्हणून मी सर्वांना नकारच दिला. 

>> अशातच जानेवारी-1978 दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सर्व कर्मचा-यांनी (54 दिवस चाललेला) संप पुकारल्याने शासकीय कामकाजच थांबले होते. तशातच फेब्रुवारी-1978 मध्ये विधान सभेची निवडणूक घोषित झाली. कर्मचा-यांच्या संपकाळात निवडणूक घेण्यासाठी म्हणून शासनाने तात्पुरता कर्मचारी वर्ग, संपकालीन कर्मचारी/SPP-STRIKE PERIOD PERSONNEL या शीर्षाखाली, रोजंदारीवर घेण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने आमच्या काॅलेज मध्ये नोटीस बोर्डवर उप विभागीय अधिकारी गोंदिया यांचे सूचनापत्र लावण्यात आले की, पदवीधर विद्यार्थ्यांनी वरीलप्रमाणे रोजंदारीवर निवडणूकीचे काम करण्यासाठी अर्ज करावेत. त्यानुसार कुतुहलापोटी मी आणि माझ्या काही मित्रांनी तसा अर्ज केला आणि आमची निवड झाल्याने दि.01 फेब्रुवारी 1978 पासून तहसील कार्यालय गोंदिया येथे आम्ही रुजू झालो. 

>> 10:00 ते 05:00 असा आमचा निवडणूक कामासंबंधीचा प्रशिक्षण वर्ग चालायचा आणि सायंकाळी आमचा लाॅ काॅलेज, असा आमचा दिनक्रम सुरू झाला. आम्हाला प्रशिक्षण देणारे एक चिमुरकर नावाचे अगदी तरुण एसडीओ अतिशय दिलखुलासपणे हसतखेळत पण गंभीरपूर्वक आम्हाला निवडणूक कामाचे प्रशिक्षण देत असत. आठ-पंधरा दिवसातच आम्ही निवडणूक-कामात अगदी तरबेज होऊन गेलो होतो. 

>> इतक्यातच कर्मचा-यांनी संप मागे घेतला. (हा अंशतः माघार होता किंवा कसे ते आज निश्चित आठवत नाही.) तरी आम्हा संपकालीन कर्मचा-यांना शासनाने निवडणूक संपेपर्यंत कायम ठेवले. आणि निवडणूक शांतपणे पार पडल्यावर दि.28 फेब्रुवारी 1978 ला मध्योन्होत्तर आम्हाला कमी करण्यात आले. 

>> मार्च-1978 च्या पहिल्याच आठवड्यात आम्हाला रु.25/- प्रतिदिन प्रमाणे फेब्रुवारी 1978 च्या 28 दिवसांचे एकूण रु.700/- 😃 अदा करण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्याकाळी शिक्षकाचे मासिक वेतन सुद्धा रु.700/- पेक्षा कितीतरी कमी म्हणजे सुमारे रु.350/- च्या आसपासच होते. 

>> या एका महिन्याच्या मेहनतान्याने मला कोठेतरी विचलित केले होते की काय न कळे, पण सप्टेंबर 1978 मधील शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगांव (तत्कालीन भंडारा जिल्हा) चे प्राचार्य श्री.जी.डी.ठाकुर आणि माझा मित्र सी.आय.पटले यांच्या आग्रहाला बळी(?) पडून मी जिल्हा परिषद भंडारा कडे गणित शिक्षकाच्या पदासाठी अर्ज केला. तत्कालीन सीईओ श्री.अनिलकुमार लखीना यांनी माझा इंटरव्हयू घेतला आणि दुस-याच दिवशी मला गोरेगांव येथेच गणित शिक्षक म्हणून रूजू होण्याचा आदेश सुद्धा मिळाला आणि मी अखेर शिक्षक झालोच. यावेळी माझे मासिक वेतन होते, एकूण रु.465/- (!)😃

>> यादरम्यान माझा लाॅ काॅलेज सुरूच होता. सायंकाळी/रात्रीचा काॅलेज असल्याने अडचण नव्हती. त्यावेळच्या शिक्षकी नोकरीच्या 3B-1 या नियमाप्रमाणे मला मार्च 1979 अखेर शिक्षक पदावरून कमी करण्यात आले. एप्रिल-मे 1979 मध्ये माझी LL.B. Second Year ची परीक्षा झाली. 15 जून 1979 च्या दरम्यान निकाल लागून मी 62.5% गुण घेऊन उत्तीर्ण सुद्धा झालो. LL.B. च्या FINAL YEAR च्या प्रवेशाची प्रक्रिया सुद्धा झाली. आणि जून-1979 च्या अखेरीस माझी गणित शिक्षकाची नियुक्ती देवरी (तत्कालीन जिल्हा भंडारा) या आदिवासी बहुल भागातील जि.प.ज्युनिअर काॅलेज येथे झाल्याचे माझा मित्र व सहशिक्षक के.बी.दोनोडे याने कळवले. मी तात्काळ देवरी येथे रुजू झालो. 

>> त्यावेळी देवरीत रहायला सुव्यवस्थित घर भाड्याने मिळणे अतिशय अतिशय दुरापास्त होते. अखेर माझ्याच गावातील प्राथमिक शिक्षक श्री.दादूजी बोपचे (जे देवरी येथेच कार्यरत होते) यांच्या सहकार्याने त्यांच्याच मोहल्ल्यात एक घर भाड्याने घेऊन तिथे रहायला सुरुवात केली. तेव्हा त्या घरी वीज, संडास/शौचालय व पाण्याची कोणतीच सोय नव्हती. कंदिलाच्या उजेडात माझा LL.B. चा आणि MPSC/UPSC चा अभ्यास मी करीत असे. शौचासाठी जवळपासच्या जंगलात लोटा घेऊन जावे लागे. माझ्यासोबत माझ्या वडिलांनी एक नोकर दिल्याने तो सुमारे तीन-चार फर्लांगावरील विहिरीवरून पाणी आणायचा आणि स्वैंपाकही करायचा. देवरीतील माझे वेतन आता वाढून रु.505/- 😃 झाले होते. 

>> 1979-1984 दरम्यानच्या माझ्या देवरी येथील 3B-1 नियमाधारित शिक्षकी-नोकरीसोबतच मी एसटी मध्ये ATS, रेल्वे मध्ये ASM, महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात STI, अशा काही छिटपुट नोक-या अत्यल्प कालावधीसाठी केल्या-सोडल्या. अखेर 1982 च्या दरम्यान केव्हातरी आमची शिक्षकी-नोकरी कायम झाल्याने माझा अन्य नोकरी धर-सोडीच्या क्रमाला आळाच बसला. अखेर एप्रिल 1984 ला मी शिक्षकी-नोकरीला अखेरचा रामराम करून महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन कृषी व सहकार तथा सद्यकालीन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून मे 1984 ला रूजू झालो. (MPSC द्वारे निवड झाल्याप्रमाणे) 

>> त्यावेळी माझ्या शिक्षकी-नोकरीचे मासिक वेतन रु.780/- 😃 होते. आणि राजपत्रित पदावरील तेव्हाचेच मासिक वेतन रु.1395/- 😃 होते.

>> मी 1981 मध्येच LL.B. उत्तीर्ण झालो असलो तरी वकीलीची सनद मात्र डिसेंबर-2019 मध्ये घेतली. तेव्हा माझे वडील हयात नव्हते. दि.25 जानेवारी 2018 ला ते निसर्गशरण झाले.

>> बस! आणखी काय? 😃😃😃
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(02.06.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन