नाद हरवलेल्या वाद्यांसोबत एक दिवस व एक रात्र ... (लघुकथा)

*नाद हरवलेल्या वाद्यांसोबत एक दिवस व एक रात्र ...* (लघुकथा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> आज सकाळी झोप उघडली ती डोकेदुखी घेऊनच. तशी माझी आणि डोकेदुखी ची खूप खूप जूनी अभंग अशी मैत्री आहे. पण आज अचानक तिचे सकाळी-सकाळीच उद्भवणे जरा आश्चर्याचेच म्हणावे लागेल. कारण सध्याच्या कोरोना-भारित कालावधीत खाणे-पिणे, उठणे-जागणे, व्यायाम-औषधी आदि सर्व बाबी नियमित, सुरळीत व यथायोग्यपणे सुरू असूनही डोकेदुखीचे कारण अनाकलनीयच ठरते.
>> विज्ञान असो की सनातन धर्माच्या आदि शंकराचार्यांचे सत्कार्यवाद हे तत्त्वज्ञान असो, 'कारणा'शिवाय 'कार्य' घडत नसते असे मानले जाते. (अतिअद्यावत भौतिकशास्त्रात आजकाल कार्यकारण संबंधावर साधार शंका उपस्थित करण्यात येत असल्या तरी अजूनही त्यासंदर्भात काही ठोस व ठाम विधाने विज्ञान करू शकला नसल्याने आपण सध्या तो विचार बाजूला ठेवू या.) पर्यायाने 'कारण' जेव्हा आपले अस्तित्व-अंतरण करून 'कार्या'त रुपांतरित होते, तेव्हा 'कारण' मावळून 'कार्य' दृग्गोचर होते असे म्हणतात. पण असे असले तरी कारण मात्र अस्तित्व-शून्य झाले असेही म्हणता येत नाही, असेही सांगितले जाते. 'कारणा'वर काहीतरी बाह्य-प्रभाव पडला किंवा सहकारी-कर्म घडले, तरच 'कारणा'चे 'कार्या'त परिवर्तन/रूपांतर होऊ शकते. म्हणजेच 'कारण' हे 'कार्या'मध्ये रुपांतरीत होत असताना या रूपांतराच्या आंतरप्रक्रियेत काहीतरी कॅटॅलिस्ट/त्वरक, छुपा घटक(?) उपस्थित राहून आपले गूढ-अनाकलनीय कर्तव्य(!) उरकून जातो, असेच म्हणावे लागेल. आता प्रश्न उपस्थित होतो की, हा कॅटॅलिस्ट/त्वरक, छुपा घटक(?) काय/कोण असावा? परंतु याच्या खोलात न जाता मला समजून घ्यायचे आहे की, माझ्या या सकाळ-सकाळीच्या 'अकारण' डोकेदुखीचे 'कारण' काय असावे?
>> याच विचारात मग्न असताना मी कधी ध्यानमग्न(!) झालो हे मला कळलेच नाही. त्या ध्यानमग्न/विचारमग्न अवस्थेत मला जाणवू लागले की मी एका घनदाट अरण्यात एकटाच असून वाट चुकलोय. या अरण्यातील सारी झाडे विशालकाय असून त्यांच्या फांद्या-फांद्यांवर पानांऐवजी अक्षरे, शब्द आणि काही अनाकलनीय वाक्ये आपापल्या लिपीत लगडून लटकत आहेत. भयाण वारा, वादळ सुटलाय. विजांचा रौद्र असा थयथयाट सुरू आहे. अदृश्य ढगांचा भयंकर गडगडाट सुरू आहे आणि मी वाट चुकून एकटाच इतस्ततः भटकत आहे, त्या अद्भूत वृक्षांच्या भयाण अरण्यात. तितक्यातच मला भटकता भटकता एक झोपडी दिसली. झोपडीचे दार उघडेच होते व त्या वादळात भयंकर हेलकावे खात असूनही तुटून पडत मात्र नव्हते. मी त्या दारासमोर पोचतो, तिथे उभा राहून हाका मारतोय. पण काहीच प्रतिसाद मिळत नाही. मी त्या हेलकांडणा-या दारातून कसातरी झोपडीत प्रवेश करतो. झोपडीच्या कूडाच्या भिंती आतून शेणा-मातीने सारवलेल्या असतात. उजव्या बाजूला एका कोप-यात मृगचर्माच्या आसनावर एक ओंकाराकृती डोळे मिटून ध्यानमग्न बसून असते. त्या ओंकाराकृतीला मानवी-शरीराचा आकार असला तरी ती मानवाकृती नसल्याचे स्पष्ट जाणवते. असे असले तरी मला तोपर्यंत भीतीने स्पर्श केलेला नसतो. मी त्या ओंकाराकृती समोरील एका मोकळ्या मृगचर्मासनावर पद्मासनात बसतो. तितक्यातच अकस्मात झोपडीच्या त्या कूडाच्या भिंतीतून सारे भारतीय वाद्य त्या झोपडीत जमा होऊ लागतात. हळूहळू सारी भारतीय वाद्ये जमा झाल्यावर त्यांच्या नादमय संगीताला प्रारंभ होतो. मी त्या स्वर्गीय नादलयीत डोलू लागतो.
>> काही काळ हा वाद्यमेळ सुरूच असतो. अचानकपणे त्या ओंकाराकृतीचे डोळे उघडतात आणि सारीची सारी वाद्ये नादशून्य होऊन जातात. तो दिवस आणि पुढची रात्र मी न झोपता त्या झोपडीतच, त्या ओंकाराकृतीच्या उघड्या डोळ्यांसमोर मृगचर्मासनावर मौन बसूनच असतो. सारी वाद्ये नादशून्य होऊन तेथेच निपचित पडून असतात. ...  मला आठवू लागते की, मला माझ्या सकाळी-सकाळीच्या अकारण डोकेदुखीचे कारण शोधायचे आहे. आणि अखेर मी स्वतःवर बळजबरी करून माझ्या ध्यानमग्नतेतून बाहेर पडतो, कोणत्याही उत्तराशिवाय व माझ्या डोकेदुखीच्या कोणत्याही कारणमीमांसेशिवाय!
>> तर अशी ही माझी, डोकेदुखीची आणि नाद हरवलेल्या वाद्यांसोबत घालवलेल्या एका दिवसाची बिन उत्तराची; बिन-डोक्याची, एक आलतू-फालतू कथा-कहाणी. 
(शब्दसंख्या सुमारे 480)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे. 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(07.05.2020//बुद्ध पौर्णिमा)
~~~~~~~~~~~~~||¤||~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन