सोनेरी घोडा : एक सत्यकथा
*सोनेरी घोडा : एक सत्यकथा*
~~~~~~~~~~~~~~~~~
>> सन 1963 मधली घटना असावी ती. मी नुकताच तिसरीत (1963-1964) गेलो होतो. आमचे वर्गशिक्षक स्व.सीताराम भूराजी चुटे हे आमच्या वाड्याला लागूनच असलेल्या स्व.हरीभाऊ भांडारकर (तत्कालीन सरपंच, ग्राम पंचायत, बोरकन्हार) यांच्या घरी त्यांच्या काही अन्य शिक्षक मित्रांबरोबर रहायचे. (त्याकाळी आमच्या गावात तरी घर भाड्याने देण्याची प्रथा नव्हती.) त्यामुळे ते आमच्या कडील त्या सोनेरी घोड्याला रोजच पाहत असत आणि एखाद्या निमित्ताने वर्गात सुद्धा आमच्या त्या सोनेरी घोड्याचा कुतुहलपूर्वक उल्लेख करीत. म्हणून मला त्या घोड्याचा आमच्या कडील आगमन कालावधी लक्षात राहिलाय.
>> तर झाले असे की, माझ्या आजोबांच्या कालावधीपासूनच आमच्याकडे प्रवासासाठी घोडागाडी व पर्यायाने घोडेपालन ही प्रथा होती. माझे वडील घोड्यांच्या लक्षण-परीक्षण विद्येत तज्ज्ञ होते व त्यांची घोड्याची निवड कधीच चुकली नाही. त्यांनी सुद्धा घोडागाडी व घोडेपालन ही प्रथा पाळली. आमच्या गावापासून सहा किमी वरील आमगांव या तत्कालीन जमीनदारीच्या गावात (सद्यकालीन तहसील-स्थळ असलेल्या निमशहरात) डिसेंबर महिन्यात चंपाषष्ठीची मोठ्ठी यात्रा भरायची. आजकाल ही यात्रा फक्त नावापुरतीच असली तरी आमच्या बालपणी ही भव्य यात्रा पंधरा-वीस दिवस सुद्धा 'चालायची.' या यात्रेत घोड्यांचा बाजार सुद्धा भरत असे. दूरदूरचे घोडे व त्यांचे मालक आठ-दहा दिवसांच्या मुक्कामाने आमगांव येथे तंबू ठोकून थांबायचे व घोडा-व्यापार करीत असत.
>> अशाच 1963च्या चंपाषष्ठीच्या यात्रेत माझ्या वडिलांनी हा सोनेरी घोडा पाहिला आणि त्याचे 'सर्वांगीण' परीक्षण करून तो सर्व शुभ लक्षणांनी संपृक्त घोडा कोणत्याही परिस्थितीत व किंमतीत खरीदण्याच्या मागे लागले. अखेर आपली सर्व युक्ति-शक्ती वापरून माझ्या वडिलांन तो सोनेरी घोडा खरेदी करून घरी आणला.
>> त्या घोड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा चकाकता सुंदर सोनेरी रंग आणि त्याचे खुंटावर नित्य झुलणे. शिवाय आणखी काही अभूतपूर्व वैशिष्ट्यपूर्ण खुणा/चिन्ह/लक्षणे त्या घोड्यावर असल्याचे वडील सांगत, जे मला कधीच समजले व उमजलेही नाही. असा भाग्यवान घोडा भाग्यवंतांच्याच भाग्यात असतो, असेही वडील सांगायचे. योगायोग म्हणावा की काय ते माहीत नाही पण यापूर्वी ज्या दोन घोडामालकांनी हा घोडा विकला त्यांना खूप नुकसानीला सामोरे जावे लागले होते व वडीलांना तो अगदी 'घोडाविकण्या'चाच परिणाम असल्याची पूर्ण खात्री होती. पर्यायाने आता हा घोडा मरेपर्यंत विकायचा नाही हे वडीलांनी ठरवून टाकले. एक वर्ष दुस-या एका तशाच शुभलक्षणी घोड्यासोबत त्याला घोडागाडीला जूंपून वडील 35-40 किमी वरील माझ्या आत्यांच्या गावी सुद्धा जात-येत असत. पण पुढच्याच चंपाषष्ठीच्या यात्रेत वडीलांनी या सोनेरी घोड्याला यापुढे घोडागाडीला न जुंपण्याचा निर्धार करून आणखी एक तिसरा घोडा खरेदी केला. व या सोनेरी घोड्याचे खावो-पिवो-झुलो-आराम करो चे जीवन सुरू झाले.
>> माझ्या वडिलांना सायकल आदि कोणतेही वाहन चालविता येत नव्हते. सायकल चालवायला शिकण्याच्या प्रयत्नात टोंगरे उकसल्याने त्यांनी तो नादच सोडला. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन म्हणजे घोडागाडीच. या घोडागाडीने ते एका दिवसात 60-70 किमी चा जाऊन-येऊन प्रवास करून रात्रीपर्यंत घरी परतत असत. आपल्या पूर्ण जीवनात त्यांनी खूप झाले तर आठेक रात्रीच घराबाहेर काढल्या असतील. रात्री घरी परत यायचेच हे स्वतःवरील बंधन त्यांनी आपल्या जीवनभर पाळले. त्या सोनेरी घोड्यानंतर कितीतरी घोडे आमच्याकडे आले आणि गेले. पण तो सोनेरी घोडा न जुंपता खुंटावर झुलत उभा रहायचा. त्याला नंतर कधीच घोडागाडीला जुंपण्यात आले नाही. (घोड्यांचे एक वैशिष्ट्य असते की घोडे दिवसा सहसा कधीच बसत नाहीत. रात्री अंधार झाल्यावरच ते बसतात आणि पहाटेच पुन्हा उठून उभेच राहतात.) तर असा तो आमच्याकडील सोनेरी रंगाचा चकाकणारा झुलणारा घोडा आमच्या परिवाराचा एक अभिन्न घटकच होऊन गेला होता.
>> मला निश्चित वर्ष आठवत नसले तरी मी त्यावेळी रामटेक येथे कार्यरत होतो असे आठवत असल्यामुळे मला वाटते तो 1993 चा पावसाळा असावा. मी एके रात्री एसटीडी बुथ वरून घरी फोन केला असता कळले की तो सोनेरी घोडा गेला. झाले असे की पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात रोवणीचे काम सुरू होते. (आमच्या झाडीपट्टीत धानाचे पीक घेण्यात येत असून जुलै-ऑगस्ट महिन्यात रोवणीची कामे जोरात सुरू असतात.) वडील नेहमीप्रमाणे शेतातच होते. घरी वाड्यात माझी आई आणि सोबत घरधंद्या व भसकी-गायकी असे दोनच सालदार होते. आई समोरच्या छपरीत बसून होती. आमच्या त्या सोनेरी घोड्याने मानेला झटका देत आपला दावा/दोर तोडला व कसातरी डुलत डुलत आईसमोर छपरीजवळ आला आणि वाड्याकडे तोंड करून कोसळला. गेला होता तो.
>> वडीलांना शेतात बोलावणे गेले. वडील चार-पाच मजूरांना शेतातून सोबतच घेऊन आले. बैलबंडी जुंपण्यात आली. बैलबंडीवर तो सोनेरी घोडा, त्याचे शव, चढवण्यात आले व त्या 'सोनेरी घोड्या'ला आमच्या शेतातच रीतसर दफन करण्यात आले.
>> असा हा/तो आमचा सोनेरी घोडा व अशी ही त्याची सत्यकथा!
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया (झाडीपट्टी)
(01 मे 2020)
~~~~~~~~~~~~~¤~~~~~~~~~~~~~~

Comments
Post a Comment