शब्दार्थांचे आधार निष्फळ : कवितासंग्रह (जून 2005), @लखनसिंह कटरे//प्रस्तावना--डाॅ.श्री.हरिश्चंद्र बोरकर.

*शब्दार्थांचे आधार निष्फळ*: कवितासंग्रह/जून-2005 :
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902.
प्रस्तावना--डाॅ.श्री.हरिश्चंद्र बोरकर (26 मार्च 2005)
------------------------------------------------------------------
*आधारशोध*
----------------
>> लखनसिंह कटरे यांचे हे सहावे पुस्तक. या सहा प्रकाशित ग्रंथांमध्ये केवळ एक कथासंग्रह असून उर्वरित पाचही काव्यसंग्रह आहेत. यावरून या कवीचा काव्यप्रांतातील प्रपंच लक्षात येऊ शकेल. 1996 साली त्यांचा 'प्रमेय' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. झाडीपट्टीतील रिवाजानुसार तो तसा उशिरानेच लोकांसमोर आला. तथापि त्या संग्रहाने आपल्या शीर्षकापासून तर विषयापर्यंत आणि प्रतिमांपासून तर रचनापद्धतीपर्यंत आपले वेगळेपण सुस्पष्ट केल्याचे जाणवते. वास्तविक 'प्रमेय' हा काव्याशी विळ्याभोपळ्याचे नाते असलेल्या गणितातील शब्द. पायथागोरसपासून तर अपोलोनियसपर्यंत अनेकांची प्रमेये हे शीर्षक कानावर पडताक्षणीच आपल्याला आठवतील. असे शीर्षक आपल्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाला देऊन वेगळेपणाचा 'धागा' लखनसिंह कटरे यांनी 'शिवला' आहे असे म्हणता येईल. 

>> शीर्षकातील हा वेगळेपणाचा क्रूस आपल्या खांद्यावर पेलत या कवीचा प्रवास सातत्याने सुरू असल्याचे त्याच्या अन्य काव्यसंग्रहांची शीर्षके न्याहाळल्यास आपल्याला आढळून येते. 'जाणिवेतील कर्कदंश' हे त्यांचे दुसरे अपत्य नावाच्या बाबतीत त्याच सदरात मोडणारे. 'शाश्वत मौनाचे स्वगत' हे तिसरे अपत्य सर्वसामान्यांना लक्षात ठेवायला किती कठीण आहे ? 'आदिम प्रकाशचित्रे' हे विचित्र शीर्षक असलेला त्यांचा काव्यसंग्रह काही महिन्यांपूर्वी (ऑक्टोबर 2004) प्रकाशात आला. खरे म्हणजे आपल्या जीवनातील अंधारयुगात कवीची जी मनःस्थिती होती तिचे काव्यरूपांतर या संग्रहात आहे. पण त्यातही कवीला प्रकाशाचा आढळ लागल्याचे निदान या शीर्षकावरून आपल्याला कळते.

>> आता आपल्या पुढ्यात येऊ घातलेल्या 'शब्दार्थांचे आधार निष्फळ' या नवीन लेकराच्या संदर्भातही तोच धागा पकडून असे म्हणता येईल की आपल्या काव्यसंग्रहाच्या शीर्षकाच्या बाबतीत कवीने ठरविलेले हे वेगळेपण अगदी आखीव-रेखीव असे आहे. आणि त्याचा त्याग करावयास हा कवी अजिबात तयार नाही. 

>> या सर्व गोष्टींना लखनसिंह कटरे यांचे अफलातून व्यक्तिमत्व जबाबदार आहे, असे माझे मत आहे. कवी म्हटला की एक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. माझ्या दृष्टीने ती मंगेश पाडगावकर यांच्यासारखी असते. नव्हे कवीच्या प्रतिमेचा आदर्श म्हणून त्यांना पुढे ठेवता येईल. ते गोबरे गाल आणि त्यावर साजणारी विशिष्ट कट असलेली त्यांची दाढी. ही व्यक्ती कवी आहे हे वेगळे सांगावेच लागत नाही. लखनसिंह कटरे यांचे व्यक्तिमत्वदेखील कवीला साजेसे आहे, असे त्यांना पाहताक्षणीच कोणीही आपले मत व्यक्त करेल. या संदर्भात एक प्रसंग मला आजही आठवतो. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगांव तालुक्यातील महागांवजवळील सिरोली या गावी झालेल्या सहाव्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या वेळी पुण्याच्या आनंद माडगूळकरांची चमू 'माय मराठी' करिता चित्रीकरण करण्यास तेथे आली होती. त्यांनी अनेक उपस्थित कवींना आपल्या कविता गाताना चित्रित केले. त्यांचे म्हणणे असे होते की या सर्वांत एकच चेहरा 'फोटोजेनिक' आहे. आणि त्यांनी दूर उभ्या असलेल्या लखनसिंह कटरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. 

>> शासकीय नोकरीत आपले काम भले आणि आपण भले अशाप्रकारे सदैव कार्यरत असणारा हा माणूस क्वचितच इतर भानगडीत पडत असावा. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ही चार-पाच जिल्ह्यांची झाडीपट्टी हेच त्यांचे सध्याचे कार्यक्षेत्र आहे. गोंदिया ही जन्मभूमी आणि भंडारा ही अनेक वर्षांपासूनची कार्यभूमी.  सांप्रत चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन अवाढव्य जिल्ह्यांचा कार्यभार सांभाळून आपल्या शासकीय कार्यात हा कवी गर्क आहे. कधीकधी कार्यालयीन कामाकरिता किंवा बैठकीच्या निमित्ताने बाहेर जाणे झाले तर तेवढाच विरंगुळा. पण त्यांच्या कवितेने मात्र ही सीमा केव्हाच ओलांडलेली आहे. अगदी 'अभिरुची' पासून तर साहित्यिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असलेल्या अनुष्टुभ, कविता-रती, उगवाई, सारख्या सर्वच नियतकालिकांमध्ये त्यांच्या कवितेला स्थान प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते. याच संग्रहाचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास यातील पन्नास कवितांपैकी अठ्ठावीस कविता पूर्वप्रकाशित असून त्या वेगवेगळ्या शहरांतील सतरा नामवंत नियतकालिकांत आलेल्या आहेत. या सतरामध्ये मुंबई या महानगरातून निघणारी तब्बल पाच म्हणजे सर्वाधिक नियतकालिके आहेत; हे पाहिले म्हणजे त्यांच्या कवितेला लाभलेले आदरस्थान कळून येते. शिवाय यात सुदूर मध्यप्रदेशातील इंदूर येथून प्रकाशित होणारे एक नियतकालिक (शब्द दर्वळ) देखील अंतर्भूत आहे. इतकेच नाही तर या प्रकाशित अनेक कवितांना दिवाळी निमित्त निघणा-या विशेषांकांत स्थान मिळालेले आहे हेही येथे अधोरेखित केले पाहिजे. 

>> कवितेच्या बाबतीत लखनसिंह कटरे यांचा दूरदूरच्या संपादकांशी आणि कवींशी नित्य पत्रव्यवहार चाललेला असतो. त्यामुळे त्यांना या क्षेत्रातील अनेक व्यक्तिमत्वांशी मैत्री साधता आलेली आहे. अर्थात कधीकधी ही मैत्री शत्रुत्वात(?)ही परावर्तित झाल्याची काही किरकोळ उदाहरणे आहेत. आपण लिहिलेल्या शब्दावर अटळपणे स्थिर राहण्याचा स्वभाव लखनसिंह कटरे यांचा आहे. त्यांचे मनोगत यथोचितरित्या न जाणता त्यांनी वापरलेल्या शब्दांवर आक्षेप घेणा-या काही मान्यवर नियतकालिकांशी आणि पर्यायाने त्यांच्या संपादकांशी लखनसिंह कटरे यांचे पत्रयुद्ध चाललेले आपल्याला त्यांचा पत्रव्यवहार वरवर न्याहाळला तरी लक्षात येईल. 

>> अर्थात हे शीतयुद्ध/पत्रयुद्ध त्यांनी जे वाण स्वीकारले आहे त्याच्या पूर्ततेकरिता असते. आपण केलेला शब्दप्रयोग कवितेची पार्श्वभूमी न जाणून घेता बदलण्याचा अट्टाहास धरणा-या संपादकांचा हट्ट त्यांनी का म्हणून मान्य करावा? मी त्यांचा हा सारा (सौजन्यशील) पत्रव्यवहार एकदा आपल्या नजरेखालून घातला आहे. त्यावरून लखनसिंह कटरे यांचा आग्रह का आहे हे जसे कळते तसाच त्या (काही) संपादकांचा कोतेपणादेखील स्पष्टपणे दिसून येतो. शहरातील सातव्या मजल्यावरील वातानुकूलित कक्षात बसणारा बिचारा तथाकथित विद्वान संपादक खेड्यापाड्यातील प्रतिके आणि प्रतिमा काय व कशी जाणणार? आयुष्यात कधीही खेड्यातील लाल-काळ्या मातीत पाय न रंगविलेल्या आणि चिखलात हात न माखविलेल्या त्या संपादकालाही त्या बाबतीत काय नि कसा दोष देता येईल? 'परमेश्वरा, त्यांना क्षमा कर', एवढेच महान येशूचे शब्द चोरून त्यासंदर्भात आपल्याला म्हणावे लागेल. 

>> प्रत्येक कवी आपल्या भावना व्यक्त करण्याकरिता आपल्या परिसरातील प्रतिके व प्रतिमांची निवड करीत असतो. त्याला सहज सुचणा-या, त्या विषयाला योग्य न्याय देऊ शकणा-या आणि आपल्या या वर्ण्यविषयाला उत्तम प्रकारे प्रकट करू शकणा-या प्रतिमा निवडण्याचा प्रयत्न तो करीत असतो. लखनसिंह कटरे हा कवी ज्या झाडीपट्टीत लहानाचा मोठा झाला आणि आताही वावरतो आहे त्या भूभागात बोलली जाणारी जी झाडीबोली तिच्यातील प्रतिमा व प्रतिके आपल्या कवितेत आणण्यासाठी सदैव सजग असल्याचे दिसून येते. त्यांनी आपल्या एका कवितेत 'पाणी' या प्रमाण/ग्रांथिक मराठीतील शब्दाऐवजी 'पानी' हा झाडीबोलीत प्रचलित असलेला शब्द वापरला. वस्तुतः आपल्या सर्व भाषांची जननी म्हणून ओळखल्या जाणा-या संस्कृतातही 'पाणी' हा शब्द 'पानीय' असा लिहिला जातो, हे सर्वांनाच माहिती आहे. हा शब्द या कवीने चुकीचा लिहिला असावा असा समज एका संपादकाचा प्रारंभी झाला. पण कवीने तो हेतूपुरस्सर वापरला असल्याचे कळविले तेव्हा त्या संपादकाचा 'अहम्' दुखावला. 'हा गावकुसाबाहेरचा शब्द येथे आलाच कसा?' असा सवाल त्या संपादकाने केला. त्या कवितेत हाच शब्द वापरणे कसे सयुक्तिक आहे हे कवीने सोदाहरण पटवून दिले, पण संपादकांना ते पटले नाही; संपादकांनी ते पटवून घेतले नाही. त्या दोघांमधील हा पत्रव्यवहार कवीने कधीतरी मुद्दाम प्रकाशित करावा असे याप्रसंगी सुचवावेसे वाटते. तो इतरांनी वाचला तर पुण्यामुंबईचे ते दुढ्ढाचार्य किती कोत्या मनाचे असतात हे सर्वांनाच कळून येईल आणि त्या संपादकांचे पितळ उघडे पडेल.

>> कवितेच्या बाबतीत अनेक परस्परविरोधी विधाने करण्यात येतात. कोणी म्हणतात, "आता खरोखरच कविता करण्याची पृष्ठभूमीच राहिली नाही. म्हणजे कविता रचणे ताबडतोब बंद करायला हवे." अगदी श्री.म.माटे यांना तर हे कितीतरी वर्षांपासून कळून चुकले होते. त्यांनी कवितालेखन तात्काळ बंद करून गद्यमय 'उपेक्षितांचे अंतरंग' चितारण्यास प्रारंभ केला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. याचीच दुसरी बाजू अगदी विरुद्ध आहे. या विश्वाच्या अंतापर्यंत कवितालेखन चालूच राहणार असे आग्रहाचे प्रतिपादन करणारा दुसरा पंथ तितक्याच हिरीरीने हा आपला विचार मांडताना दिसतो. खरे म्हणजे मानव प्रारंभी जे बोलायला लागला ते आजच्या कवितेसारखेच काही प्रमाणात असणार. म्हणजेच आपल्या भाषिक संस्कृतीचा प्रारंभच कवितेपासून झाला असे म्हणता येईल. रामायणाच्या निर्मितीची कथा सांगताना क्रौंचयुगुलाचा प्रसंग आणि त्यावरून वाल्मीकी नावाच्या कवीचा झालेला जन्म, हे तर आपणा सर्वांनाच माहिती आहे. किंबहुना वर्डस्वर्थने कवितेची केलेली व्याख्या वाल्मीकीच्या जीवनातील या प्रसंगावरूनच तर बेतली नाही ना, असा संशय यावा इतकी ती या घटनेला अनुकूल अशी आहे. असो, शेवटी जगातील सारे श्रेष्ठ पुरुष एकाच भाषेत बोलतात, हेच पुन्हा या ठिकाणी सिद्ध होत आहे. 

>> तथापि काव्यनिर्मितीला अंत नाही हे मान्य केलेच पाहिजे. प्रत्येकाल येणारा अनुभव जसा भिन्न असतो तसा तो अनुभव व्यक्त करण्याचा प्रत्येकाचा मार्गदेखील भिन्न असणे क्रमप्राप्तच आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती हा न्याय या बाबतीत तर चपखलपणे लागू पडतो. कोणी सरळ शब्दात आपले भाव मांडून मोकळा होतो, तर कोणी आपल्या भावना योग्य व सार्थ शब्दात आणि समर्थपणे कशा मांडाव्या याच विचारात गुंग होतो. आणि योग्य मार्ग सापडल्यानंतरच आपली अभिव्यक्ती कागदावर उतरवितो. पण हे सारे प्रकट केल्याशिवाय मात्र त्याला चैन नसते, उसंत तर अजिबात नसते. या संदर्भात प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, हरेकाची पद्धती भिन्न असते; हे मान्य करावयास हवे.

>> कवितेच्या काठिण्याच्या बाबतीतही अनेक संभ्रम आहेत. त्यांच्यापैकी काही अभिनिवेशातून निर्माण झाले आहेत, तर काही गैरसमजातून आलेले आहेत. एखाद्याला कविता कळली नाही तर त्याचा किती बाऊ केला जातो? पण हे आकलन न होणे केवळ काव्याच्याच संदर्भात घडून येते का? सर्वच गद्य सर्वांनाच समजले आहे असा आपण समज करायचा काय? आपले शास्त्रीय ग्रंथ आपल्याला सर्वार्थाने कळतात काय? असे प्रश्न पुढे आले की कवितेच्या बाबतीत हा जो समज आहे त्याचे उत्तर सहज मिळते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे एखादी गोष्ट कळणे अथवा न कळणे हे त्या त्या व्यक्तीच्या मगदुरावर, शैक्षणिक स्तरावर आणि जीवनपद्धतीवर अवलंबून असते. वास्तविक संस्कृतात लपविलेले ज्ञान अडाणी लोकांना कळावे म्हणून ज्ञानेश्वरांनी 'भावार्थदीपिका' लिहीली. पण आज ती किती लोकांना कळते? केवळ भाषा कालबाह्य झाली म्हणून आपल्याला प्राचीन साहित्य समजणे दुरापास्त होते. मग आजच्या काळात तर प्रतिमांचे आणि प्रतिकांचे क्षेत्र इतके विस्तृत झाले आहे की त्या सर्वच क्षेत्रांची आपणांस माहिती असणे सर्वस्वी अशक्य आहे; तशी अपेक्षा करणे हेदेखील अयोग्य, अनुचित ठरावे.

>> लखनसिंह कटरे यांच्या कवितेवरही दुर्बोधतेचा आरोप करण्यात येतो. तो कितपत योग्य आहे याचे विवरण त्यांनी या कवितासंग्रहाच्या प्राक्कथनात विस्तृतपणे आणि सोदाहरण सादर केले आहे. योगायोगाने वकिलीची परीक्षा उत्तीर्ण असलेले लखनसिंह कटरे जर खरोखरच वकिलीच्या व्यवसायात उतरले असते तर त्यातही ते यशस्वी झाले असते याचा प्रत्यय त्यांनी केलेले हे विश्लेषण वाचून येतो. श्री.म.सु. पाटील आणि डाॅ.विश्वास कानडे यांच्या मतांचा त्यांनी घेतलेला धांडोळा पाहून हा कवी केवळ कल्पनाजगतात रमणारा व्यवहारशून्य नाही, तर चिकित्सक व विचक्षण अभ्यासक व चिंतकही आहे याची प्रचिती आपणास त्यांच्या या प्रतिपादनावरून आल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः त्यांनी केलेली ऑडेन व वर्डस्वर्थ यांची तुलना आमच्या नवोदित कवींना अभ्यासाची दिशा दाखवायला पुरेशी आहे. 'आता खूप झाले लिहिणे; थोडे कवितेविषयी वाचायला तरी लागा', असे सुप्त आवाहन नवोदितांना जणू लखनसिंह कटरे यांनी या निवेदनात केलेले आहे, असे मी समजतो.

>> 'कवी तयार करता येत नाही, तो जन्मावा लागतो', हे विधान आता गुळगुळीत झाले आहे. पण कवीला आपले स्थान कायम ठेवण्यास अभ्यासाचीही तेवढीच गरज आहे. या अभ्यासात आजचा कवी कमी पडतो अशी सर्वच बुजुर्गांच्या मनात खंत आहे. कवितेविषयक साहित्यच काय, पण दुस-याची कवितादेखील वाचायला आजच्या कवीला सवड नसते. त्याने आपला अभ्यास वाढवावा हे या निमित्ताने लखनसिंह कटरे यांना सुचवायचे आहे. केवळ कवीलाच नाही तर रसिकालाही आपला अभ्यास वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण कवितेत कवीने ज्या पद्धतीने प्रतिपादन केले असते ते कळायला आपली पातळी तेवढी वाढायला नको का? निदान त्या कवितेत एकरूप होण्यासाठी आवश्यक असलेली किमान पात्रता तरी आपण आत्मसात करायला नको का? कवितेत रस असेल, तर तो स्वीकारायला आपण 'पात्र' म्हणून भूमिका पार पाडण्यासाठी किती 'पात्र' आहोत? याचे आत्मनिरीक्षण करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. हे सातत्याने होत राहिले तर कोणत्याच कवीवर दुर्बोधतेचा आरोप होणार नाही. आणि पर्यायाने त्याच्यावर अकारण होणारा अन्याय टळू शकेल असे वाटते.

>> कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या एका काव्यविषयक लेखात त्यांनी स्वतःबद्द्ल लिहिले आहे की त्यांना कविता एकाच दमात सुचते आणि त्याच काळात ती लिहून पूर्ण करावी लागते. तेव्हा अपूर्ण राहिलेली कविता नेहमीकरिता अपूर्णच राहून जाते. त्यांनी अशा अपूर्ण राहिलेल्या काही कवितांची उदाहरणेही दिलेली आहेत. पण लखनसिंह कटरे मात्र असे एकाच बैठकीत नेहमी कविता पूर्ण करणारे कवी नाहीत हे त्यांच्या काही कवितांवरून आपल्याला दिसून येते. 'एक फसवी आत्मकथा' ही त्यांची पहिलीच कविता यासंदर्भात पुढे करता येईल. या कवितेतील चार कडव्यांपैकी पहिली दोन कडवी लिहिल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी त्यांनी नंतरची दोन कडवी रचली आहेत. तरीदेखील पुन्हा ती कविता अपूर्ण असल्याचे ते नमूद करतात. 'हसण्याचे कर्ज' ही सहा कडव्यांची कविता असली तरी आधी त्यांनी केवळ पहिलेच कडवे लिहून ठेवले आणि त्यानंतर तब्बल साडेपाच वर्षांनी त्यांनी अन्य कडवी पूर्ण केली आहेत. 'पूर : एक अभिलेख' याही कवितेच्या बाबतीत असेच घडून आले आहे. याचा अर्थ आपल्याला असा लावता येईल की कवीला तो विषय जोपर्यंत मनासारख्या योग्य प्रतिमांचा वापर करून व्यक्त करता येत नाही तोपर्यंत कवी थांबण्याची तयारी ठेवतो. त्याकरिता भलेही दीड वर्षच काय, पण साडेपाच वर्षे थांबावे लागले तरी तो त्याबद्दल फिकीर करीत नाही. 

>> लखनसिंह कटरे यांचा वृत्तविचार हा वेगळ्या विस्तृत लेखाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो. हा कवी नव्या मार्गाने आपले विचार मांडण्याचा अट्टाहास करीत असला तरी त्याकरिता पारंपरिक छंदांचा वापर करणे त्याला प्रिय आहे असे दिसून येते. ओवी आणि अभंग हे तर या कवीचे अतिशय लाडके असे काव्यबंध आहेत. 'शाश्वत मौनाचे स्वगत' हा तर त्यांचा केवळ अभंगांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. असे असले तरी अनेकदा हा कवी मुक्तछंदाचीदेखील कास धरताना दिसतो. पण त्यातही अक्षरांचे स्वतःवर बंधन घालून घेण्याचा पायंडा त्याने पाडलेला आहे. या संग्रहात अशा कमीतकमी दहा कविता आहेत. अगदी 'जंगल : एक अनुभव' ही दुसरीच कविता पाहिली तरी तिच्यात हेच बंधन आपणास आढळून येते. सहा कडवी असलेली ही कविता. प्रत्येक कडव्यात चार ओळी आहेत. या चार ओळींमधील अक्षरांची संख्या 8, 12, 10 व 12 अशी आहे. हे बंधन कोणत्याच ग्रंथाच्या आधारे कवींनी स्वीकारलेले नाही. त्यांनी ते स्वतःच निर्माण करून त्याचे तंतोतंत पालन करण्याची प्रतिज्ञा स्वयंप्रेरणेने घेतली आहे. यासंदर्भात 'एक फसवी आत्मकथा', 'पूर्वपक्ष', 'एकांतातील आरसा', 'गोपुराच्या अस्तित्वाचे स्वगत', 'स्पंदते मन आरपार', 'पुजारी बाबा', 'गाभा-यातील परके होणे', 'दुःखी माणसाचा सदरा', 'कंठशोष बेकार' इत्यादी कविता अभ्यासणे मनोरंजक ठरेल.

>> अनेक नवीन जाणिवांना कवटाळून असणारा हा कवी आपल्या पुरातन संदर्भांचाही तेवढ्याच सहजतेने आणि चपखलपणे उपयोग करताना दिसतो. 'पृथ्वीपती : एक संज्ञापन' या कवितेत कुंती व पंडू यांचा संदर्भ देत द्रौपदी-भिक्षेचाही उल्लेख कवी करतो. 'अपारंपरिक वादळे' या कवितेत तर अशा संदर्भांची रेलचेल आहे. रामायणातील ऊर्मिला व लक्ष्मण यांच्यासोबत ऐतिहासिक काळातील राहूल, यशोधरा व बुद्ध यांचाही संदर्भ येथे येऊन जातो. 'आखडता पंख' या कवितेत कृष्ण व अर्जुन हे दोन मित्र येतात. 'चक्रव्यूह' मध्ये अभिमन्यू आणि त्याच्यासोबत त्याचा मामा व पिता येणे क्रमप्राप्तच आहे. 'कृष्णा, तुझी गीता' आणि 'कुब्जा झाली राधा' या कवितांमध्ये शीर्षकांप्रमाणे कृष्ण, कुब्जा व राधा यांचे उल्लेख येताना दिसतात. 'स्पंदते मन आरपार' या कवितेत कवी कधी नव्हे तो सौंदर्यात रमला आहे. त्यामुळे येथे रंभा व इंद्र यांच्याशिवाय मोकळे केस, हसणे, बोलणे व सजणे हे सजणीचे विभ्रम पहिल्यांदाच आले आहेत. 

>> आपल्या कवितेत सहजरीत्या झाडीबोलीतील शब्दांचा वापर करणे ही लखनसिंह कटरे यांची खासियत आहे. त्यांनी केलेले हे शब्दप्रयोग आग्रह म्हणून नाहीत, तर त्या विषयाची अनिवार्य गरज म्हणून आहेत. हे शब्द वापरले नसते तर कवीच्या मनातील संदर्भ आपल्याला स्पष्टच झाला नसता. त्या त्या कवितेत लगेच या शब्दांचा प्रमाण मराठीतील अर्थ दिल्यामुळे झाडीबोली न जाणणा-यांची सोय झालेली आहे. यासंदर्भात 'जंगल : एक अनुभव', 'पुरालेख', 'पुजारी बाबा', 'प्रमेयांचे साकारणे', 'पूर : एक अभिलेख', 'वाट, पाय आणि गाय', 'दुःखी माणसाचा सदरा', 'हसण्याचे कर्ज' इत्यादी कविता अभ्यासण्यासारख्या आहेत.

>> केवळ झाडी शब्दच नव्हे तर झाडीपट्टीतील वातावरण व निसर्ग आपल्या कवितेत चितारण्यात कवी अतिशय कुशल आहे. विशेषतः या परिसरातील बाहव्याचे वर्णन 'हसण्याचे कर्ज' या कवितेत कवी पुढीलप्रमाणे करतो.....
        
        'वसंताची वाणी      मौनावते आत 
        निसर्गाचे ओठी     हसणे बंदिस्त 
        पिवळे उदास        बाहव्याचे झाड
        कु-हाडी शोधती    हसणारे 'खोड' ||

     आपल्या सोन्यासारख्या पिवळ्या फुलांमुळे नवरदेवासारखा दिसणारा हा बाहवा आपल्याला कोणी सुयोग्य नवरी मिळत नाही या चिंतेत तर उदास बसलेला नसेल?

>> झाडीपट्टीत पोपटाची चोच घेऊन पळस फुलायला लागतो. कमळाच्या फुलांची आठवण करीत सावरी फुलते. एक वेगळीच नशा धारण करून मोहाची सोनेरी फुले सारा आसमंत गंधित करतात. आंब्याचा मोहोर तर आपला राजेशाही थाट मिरवीत असतो. हे सारे इतक्या धुमधडाक्यात आणि एकाच वेळेस घडत असते की वसंताला तेव्हा तात्काळ या परिसरात येणेच भाग पडते. मग लखनसिंह कटरे यांच्यासारखा झाडीचा वसा घेतलेला कवी हे निसर्ग-सूक्त गायला कसा मागे राहणार?

>> 'कविता' या विषयावर स्वतः कवीने रचलेल्या कविता कवीच्या मनातील या विषयावरील भाष्ये म्हणून महत्त्वाच्या असतात. अशा निदान पाच तरी कविता या संग्रहात आपल्याला आढळतात. केवळ 'कविता' या नावाचा उल्लेख असलेल्या तीन कविता या संग्रहात आहेत. 'कलंदर कविता', 'शीर्षक नसलेली कविता' आणि 'फालतू कविता' ही ती तीन शीर्षके होत. त्यातील पहिली 'कलंदर' या विशेषणाने युक्त आहे, तर शेवटची 'फालतू' हे विशेषण घेऊन आहे. तर एकीला शीर्षक न देण्याचे ठरवून कवी तेच शीर्षक देऊन बसला आहे. पण प्रत्यक्ष 'कविता' या नावाचा उल्लेख नसणारी 'आवाहन' ही त्यांची कविता प्रतिभेचे देव्हारे माजविणा-या आजच्या तथाकथित समीक्षकांवर जळजळीत टीकास्त्र प्रक्षेपित करणारी आहे. तिच्यातील एक कडवे पहा....

            'प्रतिभेचे पोकळ बहाणे 
            वळचणीला टांगा आता 
            मस्तवाल बिनकामी बैल 
            शेतात जुंपा जरा आता !'

ही संपूर्ण कविताच जिवंत निखा-यासारखी आहे. 'चक्रव्यूह' या कवितेत हाच विषय मांडताना अभिमन्यूने केलेले धाडस 'प्रतिभे'च्या चक्रव्यूहात शिरलेल्या आजच्या कवीनेदेखील अभिमन्यूच्या ईर्ष्येने करायला हवे, असे आवाहन कवी करतात. 

>> 'आई' या विषयावर प्रत्येक कवी कधी तरी एक कविता लिहून जातो. पण लखनसिंह कटरे यांनी लिहिलेली 'आई : एक संदर्भ' ही कविता आपले वेगळे वैशिष्ट्य लेऊन आहे.

           'आंघोळीच्या गोट्यावर 
            राग राग रागावणारी 
            जेवू घालताना मात्र 
            मऊ मऊ मऊशार होते.'

अशी आई झाडीपट्टीतील प्रत्येकाला आठवत असेल.

>> जन्माने शेतकरी असलेला व आजही शेतीचा ध्यास असलेला हा कवी आजच्या शेतकरी शोकांतिका पाहून व्यथित झाल्याशिवाय कसा राहील? 'एक अप्रत्याशित भविष्यकथन' आणि 'आकाशवाणी' या दोन कविता त्याच्या या विचारांकरिता पुढे करता येतील. 'माणूस-खरेदी' या कवितेत कवीने आजच्या व्यवस्थेवर केलेला प्रहार अतिशय कठोर आणि बोचक आहे. 'पाऊस-सखी' ही कविता कवीच्या रसिक मनाची द्योतक असून 'अंगे भिजली जलधारांनी...' या नाट्यगीताची आठवण करून देणारी आहे. तर 'वाकलेल्या ताठ माणसांचा तांडा' व 'सूरशून्य बासरी' या कविता आजच्या लोकशाहीत शिरलेल्या अनिष्ट प्रथांवर कोरडे ओढणा-या आहेत.

>> अर्थात हा सारा शब्दार्थांचाच खेळ आहे. 'शब्दार्थांचे आधार निष्फळ' हे या संग्रहाचे शीर्षक असलेली कविता मात्र पहिल्या क्रमांकावर नाही; तशी ती शेवटीही नाही. म्हणून या शीर्षकाची कविताच या संग्रहात नसावी असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण या शीर्षकाची ही कविता या संग्रहात बत्तीसावी आहे. 'शहाण्याला शब्दांचा मार' असे म्हणतात पण जेथे शब्दांचा आधारच निष्फळ ठरतो तेथे पुढे सारेच बोलणे खुंटले. मग आपण कविता तरी कशाला रचायची? आपले शब्द आणि त्यांचा अर्थ जर कोणी कळून घ्यायचा प्रयत्न करीत नसेल तर हा व्यर्थ खटाटोप करायचा तरी कशाला? असे प्रश्न या कवीसह अनेकांना पडणे क्रमप्राप्त आहे. पण 'बुडत्याला काडीचा आधार' असे म्हणतात. आपण कवितेत 'बुडालो'च आहोत. हो, दोन्ही अर्थांनी बुडालोच आहोत. अशा परिस्थितीत काडीचा आधार देखील पुरेसा नाही काय?

>> हाच आधार शोधायचा प्रयत्न प्रत्येक तत्त्वज्ञ व कवी युगायुगापासून करीत आला आहे; युगांतापर्यंत करीत राहणार आहे. ॲरिस्टाॅटलपासून तर अभिनवगुप्तापर्यंत, मुकुंदराजांपासून तर मर्ढेकरांपर्यंत आणि तुकारामांपासून ते थेट तुकडोजींपर्यंत हीच प्रक्रीया सुरू आहे. लखनसिंह कटरे यांचादेखील प्रयत्न त्याच कोटीतील आहे. हा "आधारशोध" आपण आपला मानावा असे आवाहन करून थांबतो.
¤
@डाॅ.हरिश्चंद्र बोरकर 
'झाडीबोली'
रेंगेपार (कोहळी), जि.भंडारा. 
दि.26 मार्च 2005.
~~~~~~~~~~~~~¤~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन