अल्पांश स्वगत
◇अल्पांश...स्वगत◇
~~~~~~~~~~~~~~
मी कोणत्याही विचारसरणीचा वा विचारवादाचा (ism चा) ठाम समर्थक/शरणार्थी नाही किंवा ठाम विरोधक सुद्धा नाही. मग मी "दोगला" (बिन पेंदीचा लोटा) असावा काय? मला अजून "माझे अंतिम सत्य" गवसलेले नाही, मी त्या दिशेने प्रवासरत मात्र आहे. नरहर कुरुंदकर, मर्ढेकर, सुरेश द्वादशीवार, सदानंद मोरे, विलास सारंग, हरिश्चंद्र थोरात, रंगनाथ पाठारे, यांच्यासारखे मागच्या/आताच्या पिढीतील भारतीय(मराठी) विचारवंत/विचारक (लेखक/कवी) मला आदर्शवत वाटतात, पण मी त्यांचा भक्त/शिष्य मात्र होऊ शकत/शकलो नाही. मला त्यांचे स्वतंत्र, मूलगामी व विचारगर्भ लेखन/कथन/विचार माझ्या "या" प्रवासात जागोजागी व पदोपदी मदत करतात. त्यांच्या विचारांनी मी दिपून जात नसलो (कारण दिपल्याने डोळ्यापुढे अंधार साचतो) तरी माझ्या प्रवास-मार्गातील अंधार दूर करणा-या विजेरीची व पणतीचीही भूमिका "ते" ठामपणे निभावतात.
माझी भूमिका निश्चित करण्यात मला याची खूप खूप मदत होते. पण माझीच भूमिका "परम सत्य" असे मी मानत नाही, मानू शकत नाही. कारण मी तसे मानले/मानू लागलो तर मी निसर्गाच्या सतत परिवर्तनशील अनादि-अनंत प्रक्रियेलाच नाकारतोय, असे ठरेल. (असे मला वाटते.) "शांततापूर्ण सहअस्तित्व" या संकल्पनेची परिभाषा समजण्या/करण्यापूर्वी आपल्याला आपल्या आतच प्रथम खोदावे लागते, हे मी विसरू शकत नाही. माझा कोणीतरी "उद्धारक" होता/आहे किंवा होणार/येणार आहे, या विचारसरणीला जर मी मूलाधार ठरविले(?) तर मग माझ्या जीवनाचे प्रयोजनच काय?, असा मला प्रश्न पडतो. श्रीकृष्ण, महावीर, बुद्ध, पैगंबर, येशू, विवेकानंद, ॲरोबिंदो, आंबेडकर, ओशो, कोणीही मला घरबसल्या "अंतिम सत्य" मिळवून देऊ शकत नाहीत, ते मला योग्य मार्ग दाखवू शकतील, त्या मार्गावर चुकत/माकत कां असेना, चालावे तर मलाच लागेल. मार्गात उद्भवणा-या अडचणी, पसरलेले काटेकुटे, आणि फुलेसुद्धा माझी मलाच सावरावी/आवरावी लागणार आहेत. तेव्हाच मला माझा तो प्रवास सुरू/चालू ठेवता येईल. अन्यथा मला कुठेतरी (नाईलाजाने) थांबावेच लागेल व थांबणे ही बाब तर निसर्गविरोधी आहे. त्यामुळे मला आपल्या आंत उतरून मार्गक्रमणाची दिशा ठरविणे उचित तथा क्रमप्राप्त ठरेल, असे मला वाटते.
"घटना" म्हणजे वर्तमान, ही संकल्पना तशी भ्रामकच आहे. सर्वत्र सदैव प्रक्रियारत असणारा निसर्ग परिवर्तनाचाच पाईक असल्याने मला तत्त्व आणि व्यवहार यातील विसंगती ही -विसंगत- वाटत नाही. सुसंगती हा निसर्गाचा स्वाभाविक नियमच नाही, हे माझे आजवरचे अल्पबुद्धीचे आकलन आहे. निसर्ग मानवाला अंदाज व्यक्त करण्याचे, अंदाज लावण्याचे स्वातंत्र्य अवश्य देतो, पण तो "अंदाज" खराच ठरेल याची शाश्वती मात्र निसर्ग कधीच देत नाही. कावळा बसला आणि फांदी तुटली, म्हणजे कावळा खूप "वजनदार" आहे, असा सरळधोपट निष्कर्ष काढून आम्ही स्वतःच स्वतःला फसवत असतो व आमच्या या फसगतीवर निसर्ग सदैव "हसत" असतो, असे मला वाटते.
त्यामुळे मी "दोगला" (बिन पेंदीचा लोटा) नसावा, असे माझे निवेदन (स्पष्टीकरण नव्हे!) आहे.
चूक-भूल देणे-घेणे व यथाविहीत क्षमस्व.
¤||¤<><><>||¤||
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार, गोंदिया, विदर्भ.
(फेब्रुवारी 05, वर्ष कोणताही!)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment