आदिम प्रकाशचित्रे (2004) आणि श्री.सुरेश द्वादशीवार

□"आदिम प्रकाशचित्रे" (ऑक्टोबर 2004), या माझ्या कवितासंग्रहाला आदरणीय मित्रश्रेष्ठ सुप्रसिद्ध विचारवंत, संशोधक, पत्रकार श्री.सुरेश द्वादशीवार यांनी दिलेली प्रस्तावना : पुन्हा एकदा □
         ◇आयुष्याचे अभिवचन◇
         •••••••••••••••••••••••••••••
      माझे मित्र श्री.लखनसिंह कटरे हे सहकार खात्यात जिल्हा उपनिबंधक पदावर असतानाही कविता करतात ही गोष्ट त्या खात्याविषयीचे गैरसमज दूर करायला जशी उपयोगी ठरावी, तशीच ती लखनभाईंच्या प्रतिभासामर्थ्याची आणि सहनशक्तीचीही निदर्शक व्हावी. गेली अनेक वर्षे ते कवितेची उपासना करीत आहेत. नियतकालिकांतून नियमितपणे प्रकाशित होणा-या त्यांच्या कविता मी पाहत आणि वाचत आहे. एका समारंभात त्यांनी त्यांच्या कवितांचे एक पुस्तक माझ्या हाती दिले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी असल्यामुळे इतर वक्त्यांची भाषणे होत असतानाच मी ते अख्खे वाचून काढले. आणि त्या कविता वाचत असताना मी समोरचा समारंभ विसरलो.
        आपले मन उघड करीत असताना ते वाचकालाही त्याचेच वाटायला लावणे, ही प्रतिभावंतांना लाभलेली किमया आणि तसे ते वाटत असताना आणखी बरेचसे हाती लागायचे राहून गेले, अशी हुरहूर त्यांच्या मनात कायम राखणे हाही प्रतिभेचाच गुणविशेष असावा. समजला तेवढा हवाहवासा आणि न समजला तेवढा  अस्वस्थ करणारा, असा हा प्रकार आहे. लखनसिंह कटरे यांची कविता या दोन्ही पातळ्यांवर विकसित झालेली आणि अस्फुट राहिलेली आहे. ती हाती लागते आणि त्याच वेळी दूरही राहते.
               "शब्दांनी होआवे
                अर्थाचे वाहक
                सत्याची पारख
                          शब्दाअंगी"
           असे त्यांनी म्हटले असले, तरी सत्याची खरी पारख शब्दाहून मौनातच अधिक होत असते. शब्दावाचून संवाद करण्याची एक आदिम प्रतिज्ञा मराठीत प्रगटली आहे, ती याच सनातनाची वाणी आहे. लखनसिंह कटरे या कवीची कविता शब्दातून प्रकटते आणि त्यांच्या मनातले गुह्य बरेचसे त्यांच्या मनाच्या गुहेत राहून जाते, असा ते पुस्तक वाचताना माझा समज झाला. एक खूप काही सांगू-देऊ शकणारा अनुभव गाठीशी असलेला, ब-यापैकी गूढ लिहिणारा आणि काहीसा तसा दिसणारा हा कवी नंतर माझ्या स्मरणात कायमचा स्थिरावून आहे.
          एखादा कवी गूढ का असतो आणि तो तसेच का लिहितो या प्रश्नाचे उत्तर त्याच्या प्रकृतिधर्मावर आणि शैलीच्या उपासनेवर सोपवायचे, असेच मला आजवर वाटत आले. खूप गूढ लिहिणारे पण प्रत्यक्षात सहज गवसणारे काही कवी माझ्या परिचयातही आहेत. शैलीची वेष्टणे त्यांना कशासाठी हवी असतात? अभिव्यक्तीच्या चमत्कारातच त्यांची कविता संपते काय? की ते जे सांगू पाहतात ते खरोखरीच सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आणि आकलनाहून वरचे असते? (रसिकांनी आपली पातळी उंचावून घ्यावी असे बजावणारे काही कवीही मराठीने पाहिले आहेत) की मुळात काही नसताना नुसतेच वेष्टनात वाचकांना गुंगविण्याचा हा प्रकार असतो! अध्यात्मात कांद्याच्या प्रतिमेचा अतिशय चांगला वापर केला आहे. नेती, नेती म्हणत त्या ब्रह्माचा शोध घेणा-यांचा उद्योग कांदी सोलल्यासारखा होतो म्हणे! तो सोलत जायचा आणि डोळ्यांतून पाणी गाळत राहायचे. कांदा सोलून झाला की हाती काही लागत नाही, डोळे तेवढे रिकामे होतात.
         शहाण्या माणसांचे म्हणणे असे की, त्या प्रक्रियेत हाती काही लागो वा न लागो, सोलणा-याचे डोळे मात्र स्वच्छ होतात आणि ती उपलब्धी काही कमी मोलाची नाही.
         माणसाच्या वाट्याला येणारे आयुष्य त्याला निवडता येत नाही. जे वाट्याला येते ते त्याचे जगणे. या जगण्याचीही एक गंमत ही की त्यातले काही अनुभव कोणत्याही पूर्वकारणावाचून त्यात येतात. कितीही विचार केला आणि तर्कांनी कशीही गणिते मांडली तरी त्यांची समोर योग्य संगती लागत नाही. त्या अकारण येणा-या प्रसंगानी हातातल्या आयुष्याची मोडतोड मात्र पुरती करून टाकली असते. मात्र माणसाच्या मनात वर्तमानाचा भरवसा उरत नाही. भविष्याचे भय आणि भूतकाळा विषयीची एक चमत्कारिक शंका मनात येऊ लागते. तर्क संपला आणि विश्वास हरला की बोलणे, लिहिणे, संवाद, विसंवाद असे सारेच मग निरर्थ आणि विसंगत होऊन जाते. शब्दाचा भरवसा संपला की मग सांगायचे काय आणि कसे? विपरीत अनुभवांचीच परिणती अशी असते असे नाही. भावणा-या, हव्याहव्याशा वाटणा-या अनुभवांचा परिणामही बरेचदा असा असतो. मग त्यासोबत नुसतेच राहायचे आणि त्याचेशी स्वतःला जुळवून घ्यायचे. त्यांना सरल करून आयुष्यात नेमके बसवून घेणे अशक्य नसले तरी ते सा-यांनाच जमणारे नाही. अनुभवांचे हे तुकडे त्यांच्या स्वतःच्याच गतीने आणि त्यांच्याच दिशेने भिरभिरत असताना माणसाने मात्र स्थिरचित्त राहायचे आणि त्यांची भ्रमणे शांतपणे पाहायची असे शास्त्रांचे सांगणे असते. ही शास्त्रवचने देखील सा-यांनाच पेलता येणारी नसतात. मग आयुष्य भरकटणारे आणि माणूस मात्र एकसंघ आणि घट्ट. हाती लागते ते धरून ठेवणारा आणि निसटून उडू पाहते ते तसेच निमूटपणे पाहणारा.
            या ओढाताणीत माणसे पुढे जात नाहीत, मागेही सरकत नाहीत. ती उंच मात्र होतात. ती ओढाताण संपली वा मागे पडली तरी तिने दिलेल्या त्या उंचीची जाणीव मात्र मागे राहते. आयुष्याने दिलेले ज्ञान तेच असावे. याच ज्ञानाचे एक रूप प्रतिभा हे आहे आणि ते निर्मितिक्षम आहे. अनुभवांचा धांडोळा खाली आला की दिसणा-या निरभ्र आकाशात मग या निर्मितीचा पट लागतो. लखनसिंह कटरे यांच्या सोळा कवितांचा हा छोटेखानी संग्रह तशाच पटाचा भाग आहे.
               त्यांच्याच शब्दात सांगायचे तर १९९६-९७ या दोन वर्षांचा कालखंड त्यांच्या आयुष्यात सत्त्वपरीक्षेसारखा आला. काही होरा जमवून बांधलेले आयुष्याचे घरटे पार उद्ध्वस्त करणारा तो  होता. सभोवती सारे विपरीत घडत असताना आपण शक्तीपात झाल्यासारखे नुसतेच बसून राहायचे, आपल्यावर होणा-या आघातांचा प्रतिकार करायचे मनात येऊनही काही एक करता न यायचे. आपले वाहून जाणे मुकेपणी पाहायचे असा हा अनुभव आहे. आपली आयुधेच नव्हे, तर आपले अंगभूत सामर्थ्यही आपल्या उपयोगाचे नाही, अशी जीवघेणी जाणीव करून देणारा हा अनुभव. भूत, वर्तमान आणि भविष्याचा विश्वास जावा, शब्दच नव्हे तर नातीही निरर्थक असल्याची जाणीव व्हावी तसा. पण त्या अगोदर सुरू झालेल्या आदिम जाणीवांचा एक धागा त्याही काळात तसाच राहिलेला. मजबूत आणि घट्ट. आपण हरवतो असे वाटू लागते तेव्हा एखादाच, तोवर अज्ञात वाटलेला आधार आपल्याला सामर्थ्य देत असतो. त्याचा आरंभ थेट आपल्या आणि आपल्याला ज्ञात असलेल्या ज्ञानानुभवाच्या सुरुवातीला जुळलेला, तर त्याचा भरवसा दृष्टी आणि मन जाईल तेथवरचा असतो. मग माणसे उभी राहतात. कोसळलेल्या क्षणांचे मग प्रकाश-कण होतात. त्यांची चमक मग प्रतिभावंतांना सुखावू लागते.
          एखाद्या आठवणीच्या सुरेल क्षणी मग तो आपल्या आदिम जाणीवेच्या अखंड धाग्यात ते उडणारे प्रकाश-कण गुंफू लागतो. त्यातून 'आदिम प्रकाशचित्रांची' कविता जन्मास येते.
              ही कविता वाचताना हाती काही येत नाही हे प्रथमच सांगितले पाहिजे. मी स्वतः कवी वा कवितेचा समीक्षक नाही. कविता समजत असल्याचाही माझा दावा नाही. पण प्रथम वाचताना ही कविता मला अनुभवता आली नाही, हे खरे आहे. मी ती दुस-यांदा वाचली तेव्हा त्या प्रकाशकणांचे दिशाहीन उडणे काहीसे जाणवले. पुढे त्यांची आदिम सामर्थ्याच्या घट्ट जाणीवेतली प्रातिभ वीण समजल्याचा भास झाला. तिचे सारेच कोडे उलगडल्याचा दावा मात्र मला करता यायचा नाही.
       हाती एक भला मोठा आरसा घेऊन त्यात आपलेच प्रतिबिंब न्याहाळत आणि त्यावर प्रसन्न होऊन चालत जगण्याची एक सवय असते. हा काळ फार सुखाचा असतो. त्यावेळचे सारेच भावणारे, आनंद देणारे, रोमांचित करणारे असते. येणारा प्रत्येक क्षण नवे यश सोबत आणतो. त्या यशासोबत प्रतिष्ठा येते, सुरक्षाही येते. त्यातही ज्यांचे पूर्वायुष्य नुसत्या अभावांनीच भरले असते, त्यांची या काळातली प्रसन्नता आकाशात न मावणारी होते. समोरच्या आरशात दिसणा-या आपल्या प्रतिमेला जगाचे कोंदण लाभल्याचा अनुभव येतो. सभोवतीचे जग आपलेच नव्हे, तर आपल्यासाठीच असल्याचा अनुभव. मित्र आपले आप्त तर असतातच, मग वृक्ष-वल्ली, पशु-पक्षी, पृथ्वी-आकाश, तारे आणि अंतराळ, असलाच तर डोंगर आणि समुद्र या सा-यांनी मिळून आपली प्रतिमा अधोरेखित करण्याचा, सुशोभित बनविण्याचा नुसता चंग बांधला आहे, अशी ही जाणीव. मग आपण मोठे होतो आणि जग लहान. दुबळ्या आणि असमंजस माणसांना असा अनुभव उर्मट आणि गर्विष्ठ बनवतो, तर समर्थ आणि प्रतिभाशाली माणसांना तो नम्र आणि डोळस करतो.
        एका दुष्ट क्षणी तो आरसा तुटतो. त्याच्या काचेचा भूगा सर्वत्र पसरतो. तोवर एकत्र आणि एकसंघ दिसणा-या प्रतिमा त्याच्या एकेका तुकड्यात असंबद्ध स्वरूपात विखूरलेल्या दिसतात. एका तुकड्यात नुसतीच एक लंगडी गाय, कुठे शरमिंदा झालेला सूर्य. दफ्तराचे ओझे पाठीवरून वाहून नेणारी गोजीरवाणी पोरे, बकरीचे तुटके शेपूट, शेतक-यांचे उपोषण, ऑफिसातल्या खुर्च्या, शेजारणीच्या घरात रमणारा नवरा, दुर्गापूजेची वर्गणी खंडणीसारखी वसूल करणारे गुंड हे सारे त्यात तुटकपणे दिसू लागते. खूप लहानपणच्या आठवणी त्यात येतात, खचलेली स्वप्ने येतात, आनंदाचे भुगा होऊन येणे असते. समाजातल्या ढोंगाचे मुखवटे येतात, त्या मुखवट्यांच्या आडचे राक्षसी चेहरेही येतात. मंदिरातले पाप आणि वेश्यालयातले पुण्य. आयुष्याची सुरेख आणि विद्रूपही चित्रे. रक्त आणि अश्रू, घाम आणि परिश्रम, विचकट हसणे आणि कुजकट बोलणे, बगळ्यांची माळ आणि तुटलेले शिंके, घाणेरडे हावभाव, राजकारणातले स्वार्थ, त्यासाठी आघाड्या, फसलेली युती, पुढा-यांचे समंध आणि प्रजेची दीनवाणी वाटचाल म्हटले तर ही सारी तुटक चित्रे आहेत, म्हटले तर एकाच एकसंघ जीवनाच्या त्या भिन्न कडा आहेत. वेचलेल्या क्षणांच्या पुसट आठवणी. काही निसटणा-या - काही हाती लागणा-या. मग पुनः आयुष्याचा तो अनादी अनंत बळकट धागा, त्या धाग्यातली या स्मरणांची प्रातिभ गुंफण. तशी ही प्रकाश चित्रे...
      एक गोष्ट आश्वस्त करणारी. ही प्रकाशचित्रे आहेत, अंधारवलये नाहीत. अनुभवांच्या खाचखळग्यावर, द-याखो-यांवर उठण्याचे आणि उंच उड्डाण करण्याचे ते आश्वासन आहे. तुटलेल्या काचा पुन्हा एकत्र जुळवून आयुष्य संघटित करण्याचे अभिवचन...हे आश्वासन कवितांचे आहे, आयुष्याचेही आहे.
        जीवनाविषयीचा विश्वास बळकट करणारा हा आविष्कार आहे.
      या संग्रहात सोळा कविता आहेत. म्हटल्या तर पुरेशा, म्हटल्या तर अपु-या. पण कवीने पुढे येणा-या संग्रहाचे आश्वासनही याच सोबत दिले आहे. या संग्रहाला शुभेच्छा आणि नव्या संग्रहाची प्रतीक्षा.
                  --- सुरेश द्वादशीवार.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन