प्रमेय : कविता संग्रह-1996 : एक आस्वाद

*प्रमेय* - कविता संग्रह  (जानेवारी- 1996)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> माझा पहिला-वहिला कविता संग्रह, "प्रमेय" हा खूप सा-या अडचणी, अडथळे पार करीत जानेवारी-1996 मध्ये (माझ्या वयाच्या 41 व्या वर्षी) ब्रह्मपूरी (जि.चंद्रपूर) येथील एका लग्नपत्रिका छापणा-या छापखान्यात छापून कसाबसा प्रकाशित करावा लागला होता. (मुखपृष्ठ माझेच आहे.)
>> माझ्या या कविता संग्रहाला सुप्रसिद्ध कवी, समीक्षक व विचारक प्रा.श्री.कृष्णा चौधरी यांनी सविस्तर प्रस्तावना दिली होती. 
>> ती दीर्घ प्रस्तावना जराशी संपादित करून खाली देत आहे. (प्रा.कृष्णा चौधरी आज हयात नाहीत, हे माझे दुर्दैवच!)
¤¤¤
👇👇👇
*प्रमेय : एक आस्वाद*
~~~~~~~~~~~~
प्रा.श्री.कृष्णा चौधरी 
~~~~~~~~~~~~
>> प्रमेय हा लखनसिंह कटरे यांचा पहिलाच काव्यसंग्रह. माझी उमेदीची पंचवीस वर्षे गोंदिया, भंडारा, साकोली, लाखनी या (तत्कालीन) भंडारा जिल्ह्यातील परिसरात साहित्यसंस्थांची निर्मिती व विस्तार करण्यात खर्च झाली. कटरे याच परिसरातील आमगांवजवळील बोरकन्हार या गावचे. (भवभूति चे गाव पदमपूर येथून तीन किमी वर.) सध्या(1995) ते सहायक निबंधक, सहकारी संस्था या पदावर महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात कार्यरत आहेत. लखनसिंह कटरे हे उदयोन्मुख कवि, कथाकार व हस्तकला/काष्ठकला क्षेत्रातील कुशल कलावंत असून साहित्य चळवळीतील ते नव्या दमाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या काही कथा, कविता व लेख उगवाई, विचार भारती, लोकप्रभा, कविताश्री, शब्दरंजन, समुचित, ककाक, अक्षरवैदर्भी, बहुजन संघर्ष, तरुण भारत, लोकमत, लोकसत्ता, मराठवाडा, जनवाद, नागपूर पत्रिका, अंकुर, उद्गान, प्रतिबिंब, उद्घोष, झुळझुळ, जीवन विकास, लोकानुकम्पा, भालचन्द्र, इरिंग मिरिंग, दारव्हा टाईम्स,.... सारख्या विविध वाङ्मयीन नियतकालिकांतून व वृत्तपत्रांच्या साहित्य-विषयक पुरवण्यांतून प्रकाशित झालेल्या आहेत. प्रमेय ला शुभेच्छा देताना व या उदयोन्मुख कवीचे स्वागत करतांना 'प्रमेय' या मला झोंबलेल्या संज्ञेचेही कौतुक करावेसे वाटते. 

>> 'प्रमेय' म्हणजे सिद्ध करण्याची गोष्ट, प्रतिपादलेला विषय, सिद्धांत, सारांश, अर्थज्ञान, दृष्टान्तग्रंथ(महानुभाव तत्त्वज्ञान), विषयत्व सिद्ध करण्यास योग्य किंवा शक्य होय. (व्युत्पत्तिकोष - कृ.पां.कुलकर्णी व अभिनव मराठी-मराठी शब्दकोश खंड 3 पृष्ठ 515 द.ह.अग्निहोत्री) आमचे आद्यकवी तत्त्वज्ञ संतकवी ज्ञानदेवही आपल्या ज्ञानेश्वरीतून 'प्रमेय' हा शब्द नेहमी उपयोजितात. त्यांचा अद्वयानंद वैभवाचा अलौकिक प्रत्यय देणारा अद्वैतसिद्धांत म्हणजेच प्रमेय. ज्ञानदेवांनी प्रमेय हा शब्द प्रतिपादलेले तत्त्व किंवा विषय-सिद्धांत म्हणून अनेकदा उपयोजिला आहे. 

>> 'प्रमाणेन स्वपरस्वरुप परिच्छेद प्रमेय' प्रमाणांच्याद्वारे जाणला जाणारा तो प्रमेय. जी वस्तु शोधली ती प्रमेय होय. (न्या.सू.) जैन ज्ञानकोशात खंड तीनमध्ये प्रमेयत्वगुण म्हणजे प्रमेयाचा भाव प्रमेयत्व, प्रमाणाच्याद्वारे जाणण्यायोग्य स्वपरस्वरुप ते प्रमेय होय; असे विवेचन आले आहे. प्रमेय ही संज्ञा न्यायशास्त्रातील असून यावर दार्शनिकांनी अनेक विवेचनात्मक ग्रंथ लिहिलेले आहेत. 

>> वैदिक, जैन, बौद्ध व चार्वाक इ. दर्शनांनी 'प्रमेय' हा शब्द तत्त्वप्रतिपादनार्थ उपयोजिला असला तरी ज्ञानेशांनी मात्र तो काव्यसौंदर्यप्रतीती या अर्थानेही उपयोजिलेला आहे. 

>> मुख्य प्रमेय सिद्ध करण्यास ज्याचे साह्य होते; त्याला पूर्वप्रमेय व मुख्यप्रमेयावरून जे सहजगत्या प्रस्थापित होते त्याला अनुप्रमेय म्हणतात. जोपर्यंत एखादे प्रमेय एखाद्या शुद्ध आकारित प्रणालीचा (उदा. युक्लीडीय भूमिती) भाग असते तोपर्यंत त्या प्रमेयाच्या सत्यतेसंबंधी बोलणे निरर्थक असून त्याच्या बरोबरपणाबद्दल बोलणेच योग्य ठरेल. प्रमेय अथवा त्याचा निष्कर्ष प्रत्यक्ष निरीक्षण करता येणा-या वस्तुस्थितीशी जुळणारा असेल तरच ते प्रमेय सत्य असते. (तर्कशास्त्र आधारित विश्वकोश खंड 10, म.रा.राईलकर)

>> स्त्रियांच्या देहात जसे लावण्य असते तसा महाकविंच्या वाणीत प्रतीयमान अर्थ-असंलउक्षक्रमध्वनी व्यक्त होत असतो. "व्यंजित सामान्यगुण योगेन रस" या ध्वनिसिद्धांतातील आकृतीतत्त्वाचे दर्शन ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी घडते. पाश्चात्य देशातही लेसिंग, राॅजर फ्राॅम, पाॅल कुली व क्लाईव्ह बेल इ. कलामीमांसकांनीही हा विचार मांडलेला आहे. ज्ञानेशांच्या वाङ्मयात असंख्य अमूर्त सौन्दर्यानुकृती मूर्तरुप होताना दिसतात. 

>> आधुनिक मराठी कवितेत आपल्या काव्यनिर्मीतीची प्रक्रिया केशवसुतांनी तर नवकाव्याच्या काळात मर्ढेकरांनी आपल्या काव्यनिर्मीतीच्या स्वरुपाने मांडली. काव्यनिर्मीती प्रक्रिया विशद करताना त्यांनी आपले काव्यप्रयोजनही सांगितले. 

>> 'प्रमेय' मध्ये कवी आपली काव्यनिर्मीतीची प्रक्रिया सांगताना लिहितो --- 

एखाद्या बेसावध क्षणी 
मी अनाम होतो 
ती अस्तित्वरिती-- 
माझ्या अस्तित्वात,
हलका मात्र, मी होतो.

काव्यनिर्मीतीचा आनंद हा एका अर्थाने काव्यातील अनुभवापासून दूर होऊन तो मुक्तीचा दिव्य आनंद असतो. एखाद्या बेसावध क्षणी कुठून तरी चिन्गार उडते व कवि काव्यानुभव रेखाटून इथे मोकळा होताना दिसतो. उमेदीच्या वयात निसर्ग व प्रेम या जीवनातील उदात्त व आकर्षक गोष्टी. प्रमेय मधील आस, याद, पाऊस आणि तू, या नवथर प्रेमातील भावनांचा सहजस्फूर्त आवेग व्यक्त करतात. 'आस'मध्ये कवीला तिचे स्मरण अश्रू वाहवून जायला भाग पाडते. आशा व आकांक्षांची राख होऊन कोमल भावनांचे स्मरण कवीला होते. कटरे आपली भावानुभूती उत्कट पण साध्या शब्दात सांगून जातात ---

जलद मेघाची पृथ्वीभेट 
काही मनातील सांगून गेली 
आस हृदयाला लावून गेली 

'याद' या कवितेत कवीने तिने दिलेल्या दुःखाचे स्मरण केले आहे. सामाजिक बंधनांनी कवीला तिला स्वीकारता आले नाही तरी तिची अखंड स्मृति मात्र कविच्या मनात आहे. 

आतुर नियती स्वप्नप्रसवा 
याचक होऊन माझ्या दारी आली 
जमान्याने शत्रुत्व निभावले 
तुझी याद मात्र माझी दोस्त झाली |

तसेच 'बिंदू' या कवितेत एक शारीरमानसिक इंद्रियानुभव संवेदनप्रतिमांच्या संघातातून इंद्रिय गोचर झाला आहे. असंलक्षक्रमध्वनीच्या उपयोजनाने इथे एक इंद्रिय गोचर संवेदनानुभव दृग्गोचर होतो.

>> कवी समाजजीवनात ज्या काळात जगतो व वावरतो त्या काळातील सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंबही त्याच्या काव्यात नकळत पडत असते. त्याच्या ठिकाणी अनुस्यूत असणा-या सामाजिक बांधिलकीने त्याची प्रतिभा व काव्यदृष्टि अधिकाधिक प्रज्वलित होत असते. केवळ शब्दांचे नवे नवे आकार शोधणा-या व रचनेचे नवे नवे घाट शोधणा-या कवीची कविता रेशमाचा किडा जसा आपल्या सभोवती विणलेल्या कोषातच गुदमरून मरतो; तशी आपल्या शब्द व रचनालाघवाच्या कोशातच-सौश्यातच मरून पडते. शेवटी कवितेत जिवंतपणा येतो तो तिच्या उत्कट भावानुभूतीमुळे व त्या भावानुभूतीने स्वयंभूपणे निवडलेल्या आपल्या नैसर्गिक आदिबंधामुळे ! या आदिबंधात मानसिक, नैतिक, सामाजिक व सांस्कृतिक इ. छटाच नेणीवयुक्त संज्ञाप्रवाहातून कवी व्यक्त करीत असतो. कवीने इतिहास, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र व समाजशास्त्र तसेच आधुनिक विज्ञान शास्त्रे वाचली, आभ्यासली पाहिजे तरच त्याच्या काव्यात शब्दाला सामर्थ्य प्राप्त होईल. एरवी त्याची कविता ही उथळ व सपक होईल. कटरे यांच्या जीवन : तीन संदर्भ, आज, फितुर नियती, व्यवस्थेसाठी, बिंदू, वर्तमान, लक्ष्यांतर, वारुणी, तेव्हा...., वास्तव, मौन, वाळवी, घर : काही संदर्भ, गणित, स्वप्न पालखी, इ. कविता या दृष्टीने पाहिल्या असता कवीच्या सामर्थ्याची जाणीव होते.

रात्री नभात चंद्र येता 
काजव्यांनी स्तुतिगीत गायिले 
चांदण्यांनी 'प्रकाशा'ची बरसात केली 
सप्तर्षी मात्र मौनच राहिले !

नदी कोरडी रेताळली-----
काठावर घेरावाची तयारी 
पावसाने झोडपले जंगलाला तेव्हा 
वाळवंटी राघू मारे भरारी 
                   (जीवन : तीन संदर्भ)

नाकारलेला तो इतिहास 
काजव्यांसमोर ठेवला जातो 
पवित्रा जरी खरा नसला 
यजमान बदल केल्या जातो
                      (आज)

जलद ढगच बेईमान झाल्यावर 
आजीवन दुःखाशी दोस्ती होते 
धरेशी नाते आणखी घट्ट होते.
                            (वास्तव)

दोन वाघांची लढाई 
साक्षी जंगल एकले 
सावजाच्या दावणीला 
हात दुरून जोडले. 
               (साक्षी जंगल एकले)

परितृप्त ओल्या भूमीवरील 
पाण्याचे चंचल बागडणे पाहून --
किनारा अस्तित्वच हरवून गेला.
             (पाणी, किनारा, वगैरे.....)

>> आज संवेदना बधिर झाल्याहेत. गोकुळात कृष्णाचा जन्म होऊनही स्वातंत्र्य तिथे फिरकत नाही. सर्वत्र अंधार कोठडी. देवकी मृत्यूपंथावर व वसुदेव लंगडा झाला आहे.  नाटकी जीवनाचा फुगा फुटल्यावर, भारवाहकांना ओझे पेलत नसते. विस्तवाशी जोडलेले आव्हानित नाते केवळ शोभेसाठी वापरायचे नसते. पण इथे 'शास्त्रात् रूढी बलियसि' या न्यायाने सीतेसाठी रामही जनरीतच 'वापरतो'. तेव्हा पुरूषप्रधान चातुर्वण्यावर आधारलेल्या भ्रमित संस्कृतीवर कोरडे ओढताना कवी म्हणतात  ----- 

प्रेम विश्वसंचारी फूलत डोलताही 
सीतेसाठी जनरीतच वापरली जाते 
हीनतेचा धूमकेतू पुच्छहीन होता 
यमाची सावलीही आकुंचत भ्रमित होते.
                           (जनरीत)

>> उत्कृष्ट काव्यनिर्मितीसाठी आपल्या परंपरेच्या जाणिवेसह नव्या समकालीन वास्तवाची जाणीवही आवश्यक असते. परंपरेच्या व नवतेच्या रासायनिक अर्कातूनच एक नवे आत्मभान कवीला येत असते. टी.एस.इलियट म्हणतो ---

"The progress of an Artist is a Continual Self-Sacrifice, a Continual Extinction of Personality. There remains to define this process of depersonalization and its relation to the sense of Tradition. It is in this Depersonalization that Art may be said to approach the condition of science. I shall therefore, invite you to consider as a suggestive analogy, the action which takes place when a bit as finely filiated platinum is introduced into a chamber containing oxygen and sulfur dioxide emotion and feeling ... Poetry is not a turning loose of emotion; but an escape from emotion; it is not the expression of personality but an escape from personality.  
           (POETRY AND INDIVIDUAL TALENT)

>> नेल्सन मंडेला व बोधीसत्त्व बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष कवीला म्हणूनच महत्त्वाचा वाटतो. चातुर्वर्ण्यावर आधारलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीने इथले जीवनच वर्गीकरण करून 'हवाबंद' केले होते. नेल्सन मंडेलाने मानवी स्वातंत्र्याचा पुरस्कार केल्यामुळे कवी म्हणतात  ----

सूर्यकुळातील सूर्यफूला 
जबरी 'दीर्घसूर्यास्त' भोगलास तू 
अखेर, सूर्योदय झालाच 
प्रभा फाकणारेय आता !
सूर्याला झाकता येत नाही 
हे पुन्हा एकदा 
सिद्ध केलेस तू !

नेल्सन मंडेलाने आपल्या लोकांसाठी आपले सत्तावीस वसंत बलिदान केले, तेही आपल्या लोकांना मानवी स्वातंत्र्याचे वसंत मोजता यावे म्हणून. नेल्सन मंडेला नंतर कवीला स्मरण होते ते पशूपेक्षाही हीन जीवन वाट्याला आलेल्या तथाकथित अस्पृश्यांची; वर्णव्यवस्थेच्या कृत्रिम पिंज-यातून सुटका करणा-या बोधीसत्त्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे. कवी म्हणतात  ------

तुझ्यासाठी कोणते शब्द वापरावे ?
जे प्रतिशब्द 
तुझ्यासाठी वापरले जातात / जातील 
ते क्रांतिसूर्यादिसारखे 
अपारंपरिकच असतात / असतील.

>> मानवी मूल्यांच्या संघर्षाची सर्वांगीण जाणीवच कवीला कैतव व नवे नवे परिमाण प्राप्त करून देते.

>> असा हा 'प्रमेय' मधील सौंदर्यानुभूतीचा माझा प्रवास. कवी लखनसिंह कटरे यांच्या काव्यातील समकालीन वास्तवाकडे पाहण्याची त्यांची काव्यदृष्टि अधिकाधिक सूक्ष्म व अंतर्भेदी होत जावो. आपल्या उत्कट भावानुभूतीच्या घटितांनी तिचा फुलोर अधिकच बहरत जावो. 

>> "मोगरा फुलला - मोगरा फुलला ; फुले वेचिता बहर कळिमासि आला."

>> 'प्रमेय'चा मोगरा अखंड फुलत राहो हीच सदिच्छा !
¤
@प्रा.श्री.कृष्णा चौधरी 
(एम.फील.)
मराठी विभाग प्रमुख,
नरेंद्र तिडके काॅलेज, रामटेक, जि.नागपूर. 
दि. 15 फेब्रुवारी 1995.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन