माझे एक गुरुजी : श्री.रघुनाथ मनाजी दोनोडे

माझे एक गुरुजी : श्री.रघुनाथ मनाजी दोनोडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> 1966-67 या शैक्षणिक वर्षात मी आमच्या बोरकन्हार गावच्या शाळेतील सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होतो. परंतु आमच्या गावातील शाळेच्या या सहाव्या आणि पाचव्या सुद्धा वर्गाला तत्कालीन जिल्हा परिषदेने मध्येच मान्यता नाकारल्याने दिवाळीच्या सुटीनंतर आमच्या गावातील पाचवी आणि सहावी चे वर्ग बंद झाले.

>>  त्यामुळे मला जवळच्याच (3 किमी वरील) अंजोराच्या शाळेत, दिवाळीनंतर, सहावीत प्रवेश घ्यावा लागला व मी अंजोरा येथील उच्च माध्यमिक शाळेचा सहावीचा विद्यार्थी झालो. त्यावेळी आमच्या वर्गात चंद्रप्रकाश हरिणखेडे, हरिदयाल डोंगरे, गेंदलाल वालदे, रामेश्वर बहेकार, महादेव चौधरी अशी हुशार विद्यार्थ्यांची एक फळीच होती. मला या फळीसोबत मैत्री आणि स्पर्धाही करायची होती. 

>> सहाव्या वर्गाचे आमचे वर्गशिक्षक श्री.उरकुडे गुरुजी असल्याचे आठवते.उरकुडे गुरुजी आम्हाला मराठी, इतिहास, भूगोल,नागरिक शास्त्र, चित्रकला हे विषय शिकवत तर इंग्रजी आणि हिंदी साठी श्री.बाजपेयी गुरुजी व गणितासाठी श्री.रघुनाथ मनाजी दोनोडे गुरुजी होते. दोनोडे गुरुजींची गणित शिकविण्याची पद्धत अतिशय सरलसोपी होती. गणित शिकवता-शिकवताच दोनोडे गुरुजी केव्हा रामायण, महाभारतात शिरत हे कळतच नसे. त्यांच्या या शिकवण-पद्धतीमुळे माझ्या आईने मला लावलेल्या, गणित व धार्मिक ग्रंथ समजून घेण्याच्या, वृत्तीत खूप सकारात्मक भरच पडली. आणि मी गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळविण्यात सदैव यशस्वी ठरू लागलो. (या दोनोडे गुरुजींची गणित-शिकवण-पद्धत मला मी सहा वर्षे शिक्षक असताना खूप खूप उपयोगी ठरली.) परंतु त्यावर्षी, सहावीत, मात्र माझ्या वर्गात नेहमी पहिला येण्याच्या श्रृंखलेत खंड पडून मी दुसरा आलो होतो व पहिला होता चंद्रप्रकाश हरिणखेडे! असो.

>> त्यावेळी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, अतिशय कडक शिस्तीचे व भाषा आणि गणित विषयाचे तज्ज्ञ असलेले श्री.गोमा दाजिबाजी फूंडे हे होते. धोतर-कुर्ता नेसलेली त्यांची ठेंगणी मूर्ती पाहूनच विद्यार्थीच नव्हे तर सर्व शिक्षक सुद्धा वचकूनच असत. हे मुख्याध्यापक असले तरी दर दिवशी कोणत्यातरी एका वर्गाचा मराठी किंवा गणिताचा पीरियड घेत असत. त्यांची हे दोन्ही विषय शिकविण्याची शैली अद्भूतच म्हणावी अशी होती. माझ्या या दोन्ही विषयांवर माझ्या आईसोबतच त्यांच्यासुद्धा शैलीची छाप अजूनही आहे. 

>> पुढच्या सातव्या वर्गाचे आमचे वर्गशिक्षक श्री.दोनोडे गुरुजीच होते. ते आम्हाला मराठी आणि गणित शिकवायचे. त्यांच्या शिकवण-पद्धतीबद्दल मी यापूर्वीच लिहिले आहे. त्याशिवाय त्यांच्याकडून आम्ही कपडे वापरण्यातील टापटीप व सुयोग्यता सुद्धा शिकलो. एके दिवशी हे गुरुजी आपला नेहमीचा पायजामा-शर्ट हा वेष सोडून पँट व इन केलेला शर्ट अशा वेषात शाळेत आले. मला त्यांचा हा वेष खूप खूप प्रभावित करून गेला. पण काही उनाड विद्यार्थ्यांनी "अहा, सर्टींग सर्टींग" असे त्यांना आडून-आडून चिडवले असता दोनोडे गुरुजींची व मुख्याध्यापकांची त्यावरील प्रतिक्रिया मला खूप समृद्ध करून गेली. व माझ्या वेषातही मग हळूहळू सकारात्मक फरक पडू लागला. (आजच्या माझ्या ड्रेस-सेन्स(?) वर त्याचा काही ना काही प्रभाव असावाच, असे मला वाटते. असो.) यावर्षी पासून मी वर्गातील पहिला क्रमांक मात्र तत्कालीन अकरावी हायर मॅट्रीक पर्यंत (नववी चा अपवाद वगळता) टिकवून ठेवला. 

>> या सातव्या वर्गाच्या वार्षिक परीक्षेची एक समृद्ध आठवण मात्र सांगितलीच पाहिजे. त्यावर्षी आमची सातवीची परिक्षा पंचायत समिती स्तरावरुन झाली होती. आणि त्यावेळी गणिताची प्रश्न पत्रिका त्यावेळी बोरकन्हार येथील शाळेत कार्यरत असलेले व आमच्या वाड्यातच बिनभाड्याने (कारण तेव्हा गावात भाड्याचे घर ही पद्धत आमच्या गावात तरी नव्हती.) राहत असलेले श्री.श्रावण चांगोजी ब्राह्मणकर या एका मराठी व गणित विषयाच्या तज्ज्ञ शिक्षकाने काढली होती. या वार्षिक परीक्षेत पहिल्यांदाच मला गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळविण्यात यश मिळाले नव्हते. (थोडी कसर होती.) 

>> झाले असे की, मी गणितात शंभर पैकी शंभर गुण सहज मिळवतो ही गोष्ट दोनोडे गुरुजींनी कधीतरी ब्राह्मणकर गुरुजींकडे काढली होती. व त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठीच ब्राह्मणकर गुरुजींनी प्रथमच सातवीच्या गणिताच्या अभ्यासक्रमातीलच पण सातवीच्या गणिताच्या पुस्तकात नसलेली उदाहरणे त्यावर्षीच्या प्रश्नपत्रिकेत दिली होती. मला माझ्या वर्गातील गणिताच्या पुस्तकातील एकूण एक उदाहरणे उत्तरासहित पाठ असायची (आईची, चुटे* गुरुजी आणि दोनोडे गुरुजींची कृपा! 🙏🙏🙏) ! त्यामुळे ब्राह्मणकर गुरुजींनी पुस्तकातील उदाहरणे टाळून त्याच धर्तीवर पण थोड्या वेगळ्या शैलीत, आकडे बदलून, उदाहरणांची रचना केली होती. त्यांच्या या अफलातून प्रयोगामुळे मला शंभर पैकी शंभर गुण मिळाले नसले तरी माझ्या गणित विषयाच्या गतीत व विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक वाढ/प्रगती अवश्य झाली. पण खूप विद्यार्थी त्यामुळे विनाकारण दुष्प्रभावित(?) सुद्धा झाले. (माझी सातवीची गुणपत्रिका पहायला मागून, माझे गणितातील गुण पाहून, ही सारी घटना ब्राह्मणकर गुरुजींनी स्वतःच माझ्या वडिलांना, माझ्या समोरच सांगितली होती.)

>> तर अशा माझ्या स्मृतीत ठाण मांडून बसलेल्या तथा माझ्या मराठी व गणित विषयात अमुल्य भर टाकण्यात साह्यभूत ठरलेल्या श्री.रघुनाथ मनाजी दोनोडे गुरुजींचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्यच म्हणायचे!  
¤
(*श्री.सीताराम भुराजी चुटे, माझे वर्ग 1, 2, 3 चे खरेखुरे गुरुजी!)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(पूर्व विदर्भ/झाडीपट्टी)
(30.03.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन