कावळा हागता.... (एक टिपण)

■कावळा हागता.....!■
~~~~~~~~~~~~~
       पुण्याहून त्यावेळी प्रकाशित होत असलेल्या व डाॅ.आनंद यादव संपादक असलेल्या "विचार भारती" या नियतकालिकाच्या मार्च-एप्रिल-1988 च्या अंकात प्रकाशित माझ्या एका लघु-टिपणात मी व्यक्त केलेले विचार आज अचानक तीव्रतेने स्मरण-जागृत झाले. याला निमित्त ठरला प्रफुल्ल शिलेदार द्वारे संपादित "युगवाणी" च्या ऑनोडि-2018 अंकात प्रकाशित श्री.सुधीर रसाळ यांचा "गो.वि.करंदीकरांची समीक्षा" हा अतिशय महत्वपूर्ण लेख!
      या संदर्भ-श्रीमंत लेखात रसाळ यांनी करंदीकरांचे साहित्य-समीक्षा विषयक मत/विचार (भाष्य) उद्घृत केलेले आहेत. एकंदरीत हा लेख माझ्या दृष्टीने एकूणच मराठी साहित्य व त्याची समीक्षा या संदर्भात अतिशय महत्वाचा तथा मैलाचा दगड ठरावा असा झाला आहे. या लेखाबद्दल मी शिलेदारजी व रसाळजी यांचा कृतज्ञ आहे/राहीन. 
       सदरील लेखात उद्घृत एक विधान मला माझ्या "त्या" प्रतिपादनाला पूरक वाटत असल्याने मी स्वाभाविकरित्या "प्रफुल्लि"त झालो. ते विधान असे -- "...ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी माणसाच्या वर्तनसंबंधात आणि अभिप्रेरणांत बदल करीत असतात. सर्जनशील साहित्यातील कल्पनाजन्य जीवनदर्शनात ह्या सर्वांचा आणि आणखी खूप काहींचा समावेश होतो." (साहित्यमूल्यांची समीक्षा : पृष्ठ 15-16)
या विधानाच्या प्रकाशात मी जेव्हा विचार करतो, तेव्हा मला असे दिसून(!) येते की, कोणतीही "कलात्मक-अभिव्यक्ती" ही त्या "कलाकारा"(!)च्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीच्या सापेक्ष असणे अगदी स्वाभाविक/नैसर्गिक आहे/असते. अर्थातच ती "कलात्मक-अभिव्यक्ती" वस्तूतःच ORIGINAL असते/असावी(!). आणि कोणतीही ORIGINAL वस्तू(!) ही पर्यायाने दुर्बोध(?) असणे क्रमप्राप्तच ठरते/ठरावी. (किमान आश्चर्यकारक वा ऋणात्मक तरी वाटू नये!) याचे उदाहरणच द्यायचे झाले तर मी म्हणेन की, ग्रेस यांचे कोणतेही लिखाण (पद्य असो वा गद्य) मला कधीही दुर्बोध(?) वाटले नाही. माझी आकलन शक्ती आणि स्वतंत्र/स्वायत्त विचारशक्ती "कशाची"ही गुलाम नसेल तर मला ग्रेस आणि त्यांच्या समविचारी "कलावंतां"ची "कलाकृती" दुर्बोध वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ORIGINAL "वस्तू" मूळ रूपात "समजून" घेण्यासाठी "ही" पूर्वअट नाकारता येत नाही.
      तर मुख्य मुद्दा असा की, कोणत्याही "कलावंता"ची कलात्मक-अभिव्यक्ती ही वर नमूद केल्याप्रमाणे काही विशिष्ट घटकांच्या सापेक्ष असतेच असते. आणि पर्यायाने "प्रथमदर्शनी दुर्बोध" (किंवा कदाचित असंबद्ध) सुद्धा वाटू शकते. परंतु मराठी "प्रकाशन-व्यवसाया"तील काही स्वनामधन्य प्रकाशक व संपादक मात्र या "विचारां"शी पूर्णतः असहमत आहेत, असे आम्हा "झाडीपट्टी"वासीयांना नेहमीच अनुभवायला मिळते(?). उदाहरणच द्यायचे झाले तर "मौज" प्रकाशन चे व्यवस्थापक/संपादक, "ग्रंथाली/शब्द रूची" चे दिनकर गांगलोत्तर उत्तराधिकारी, "ललित"चे केशवराव कोठावळेत्तर (काही!) उत्तराधिकारी यांची नावे यासंदर्भात प्रामुख्याने घ्यावी लागतील. 
      माझ्या एका कवितेची पहिलीच ओळ अशी आहे---
"कावळा हागता चिमणीला विटाळ..." 
या ओळीतील "हागता" हा शब्द वगळून तेथे "शिटता" असा शब्द घ्यावा, असे मला सुचविण्यात आले होते. मी त्याला "सकारण/सस्पष्टीकरण" नम्र नकार कळविला असता मला त्या प्रकाशन गृहाच्या "प्रकाशन-नकार" यादीतून अजूनही (सुमारे पंचेवीस-तीस वर्षानंतरही) वगळण्यात आलेले नाही. अजूनही मी त्यांचा नकार झेलतोच आहे.
      अशा या "मराठी-प्रकाशन/संपादन हिटलरशाही"चा पर्दाफाश करणे आजवर कोणाही मराठी "माणसाला" पूर्णतः शक्य होऊ शकलेले नाही. विंदांनी जरी अशा बाबींवर अतिशय परखडपणे भाष्य केलेले असले आणि विंदांची ती पुस्तके "त्यां"नीच "प्रकाशित" केली असली तरी "ते" प्रकाशक/संपादक विंदांच्या "त्या" परखड भाष्याचे सोयीस्कर "विखंडण" करण्यातच अग्रेसर(?) आहेत. ही #कटूवस्तूस्थिती आहे.
        तर अशी ही, "कावळा हागता..." च्या साठा उत्तराची संक्षिप्त कथा आहे!
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902
      ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~~~(04.02.2019)~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन