"महाराष्ट्र दर्शन" (समकालीन प्रकाशन) या ग्रंथाबद्दल..... (लेखक-प्रकाशकासोबतचा एक पत्रव्यवहार)
सप्रेम नमस्कार,
आपले इमेल पत्र मिळाले तेंव्हा मी बाहेरगावी होतो. तसे मी आपल्याला कळवलेही होते.
'महाराष्ट्र दर्शन' या आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकाबद्दलचा आपला प्रतिसाद वाचला. सविस्तर प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. आपल्याला याआधी कळवल्या प्रमाणे मी प्रतिकूल प्रतिसादाकडे दुर्लक्ष करणारा माणूस नाही. आपण एखादे काम केले तर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येणारच, त्याला नाकारायचे कशाला, हा माझा दृष्टीकोन आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की त्यामुळे प्रत्येक अभिप्रायावर प्रतिक्रिया दिली जाईलच. यापूर्वी आपण आम्ही प्रकाशित केलेल्या हेरंब कुलकर्णी यांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया पाठवली होती. ती मी वाचलीही होती, पण त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज मला वाटली नाही, कारण आपले आक्षेप लेखकाच्या दृष्टिकोना बद्दल होते आणि त्याची चर्चा आपण लेखकासोबत करणेच श्रेयस्कर होते. अर्थात, तशी ती करायची की नाही हा आपला प्रश्न होता. असो.
'महाराष्ट्र दर्शन' पुस्तकावरील आपली प्रतिक्रिया मात्र मला प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने महत्वाची वाटते, म्हणून हे पत्र लिहित आहे. पूर्व विदर्भातील चार जिल्हे एकाच लेखात समाविष्ट केल्याने भंडारा- गोंदिया या जिल्ह्यांवर अन्याय झाला आहे, असे आपले म्हणणे आहे. आपण त्याच भागातील असल्यामुळे आपल्याला असे वाटू शकते, आणि त्या बद्दल आमचे काही म्हणणे असण्याची गरज नाही. झाडीपट्टीतील चारही जिल्ह्यांवर स्वतंत्र लेख असायला हवे होते,हे खरेच आहे. किमान चंद्रपूर-गडचिरोलीवर एक आणि भंडारा-गोंदिया वर एक असे तरी व्हायला हवे होते. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नशीलही होतो, पण अपुऱ्या संपर्कामुळे तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे या चारही जिल्ह्यांवर एकत्र लेख प्रसिध्द करण्याची तडजोड करावी लागली. या चार जिल्ह्यांना सामावून घेणारा लेख लिहिता येऊ शकतो असं संबंधित लेखकाने आश्वस्त केल्यामुळेही आम्ही या निर्णयापर्यंत आलो होतो. पण या लेखामुळे आपले समाधान झाले नाही, हे मी समजू शकतो. त्या त्या जिल्ह्यातील वाचकांना आपापल्या जिल्ह्यावरील लेख अपुरे आहेत असे वाटू शकते आणि ते स्वाभाविकही आहे. एखाद्या तीन-चारशे पानांच्या पुस्तकात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या सर्व वाचकांचे समाधान होईल, असे मानणे काही खरे नाही. शिवाय, आमचाही हे पुस्तक परिपूर्ण असल्याचा दावा नाही. स्थानीय इतिहास आणि संस्कृती नोंदवण्याचा हा प्राथमिक प्रयत्न आहे अशीच आमची भूमिका आहे. आपण काळजीपूर्वक माझे मनोगत वाचले तर या गोष्टीचा उल्लेख आपल्याला दिसेल. या मनोगतात त्या-त्या भागातील लोकांनी आपापल्या पातळीवर असे लेखन करण्याची गरजही मी नोंदवलेली आहे. त्यामुळे या पुस्तकातील लेखावर नाराजी नोंदवून थांबण्यापेक्षा आपण या दोन जिल्ह्यांवर किंवा एकेका जिल्ह्यावर लेख लिहावात आणि आमच्याकडे पाठवावा, असे माझे आपल्याला आवाहन असेल. आपले लेखन आम्हास पसंत पडल्यास आमच्या 'अनुभव' या मासिकात ते अवश्य प्रकाशित करू. आपण यास तयार असल्यास मला कळवा, लेखकांसाठी तयार केलेला आराखडा मी आपल्याला पाठवेन. 'महाराष्ट्र दर्शन' या पुस्तकानंतर जिल्ह्याजिल्ह्याबद्दलचा माहितीचा प्रवाह वाचकांसमोर येत रहावा असा प्रयत्न करण्याचे आमचे नियोजन आहे. त्यात आपणही सहभाग नोंदवू शकता.
दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या पत्रातील खटकलेली एक गोष्ट मला आपल्याला मोकळेपणाने कळवावीशी वाटते. चार जिल्ह्यावरील लेखाबद्दल कडक भाषेत प्रतिकूल प्रतिसाद देताना आपल्याला या पुस्तकाबद्दल एका ओळीचाही सकारात्मक प्रतिसाद द्यावासा वाटला नाही, याचे मला आश्चर्य वाटले. याचा अर्थ मी आपल्याकडून कौतुकाची अपेक्षा करत आहे, असे मानण्याचे कारण नाही. समाजातील शहाणी व जबाबदार माणसे या पुस्तकाबद्दल आणि आम्ही (व आमच्या लेखकांनी) केलेल्या मेहनतीबद्दल आमचे अभिनंदन करत आहेत. ते आम्हाला पुरेसे आहे. तरीही हे पुस्तक वाचून आपल्या मनात कोणतीही सकारात्मक भावना का निर्माण झाली नाही, हा प्रश्न अनुत्तरीत राहतोच. आणखी एक गोष्ट म्हणजे, नागपूर वरील लेख उत्तम झाल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन करायचे आणि झाडीपट्टीवरील लेख आपली अपेक्षा पूर्ण करत नसल्याबद्दल संपादकाना दोष द्यायचा हा कुठला न्याय? ही दृष्टी निश्चितच संपादकांवर अन्याय करणारी आहे. आपल्या दृष्टिकोनातील ही विसंगती स्पष्टपणाने कळवल्याबद्दल आपण मला माफ करा. झाडीपट्टीवर लिहिणारे लेखक हे सक्षम व अधिकारी आहेत असे म्हणायचे आणि असा लेख लिहायला लावून लेखकाच्या प्रतिभेचा अपमर्द संपादकाने केला असे म्हणायचे; असे कसे चालेल? आठ-दहा वर्षे खपून एखादा प्रकल्प तडीस नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संपादकांबद्दल आपला दृष्टीकोन इतका अन्यायकारक का?
आम्ही प्रकाशित केलेले हे पुस्तक आमच्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचे पहिले पुस्तक आहे. अनेक वाचक व वृत्तपत्रीय लेखक त्याबद्दल आमचे अभिनंदन करत आहेत. तरीही आमची भूमिका 'हा पुस्तक प्रयत्न आहे', अशीच आहे. पण आपण त्याची वासलात 'एक भ्रामक आणि फसलेला प्रयत्न आहे', अशी लावली आहे. आमच्या मेहनतीचे वर्णन करण्यास आपल्याला हे शब्द सापडले याबद्दल आपले आभार व अभिनंदन!
-सुहास कुलकर्णी
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया, दि.12.10.2019~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~प्रति,मा.श्री.सुहास कुलकर्णी,संपादक, महाराष्ट्र दर्शन.समकालीन प्रकाशन, पुणे-30सप्रेम सादर नमस्कार.मी, लखनसिंह कटरे, (निवृत्त जिल्हा सहकार निबंधक)!मी मे-1984 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन कृषी व सहकार (विद्यमान सहकार, पणन व वस्त्रोद्योग) विभागात, MPSC द्वारे निवड होऊन, राजपत्रित अधिकारी म्हणून रूजू होऊन फेब्रुवारी-2013 मध्ये निवृत्त झालो. या दरम्यान मी पश्चिम महाराष्ट्र (मुंबई, पुणे सह), मराठवाडा (औरंगाबाद, बीड सह), विदर्भ (गडचिरोली ते यवतमाळ सह) या भागात नोकरीनिमित्त सपरिवार सह-निवास केला आहे. कोंकण व खान्देश भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी मी सपरिवार सह-निवास केला असल्याने व सहकार, पणन हा विभाग मुख्यतः ग्रामीण महाराष्ट्राशी सर्वाधिक संबंधित असल्याने मला या भागातील संस्कृती, इतिहास, समाजजीवन, लोकसाहित्य, पर्यावरण, शेती, इ. संदर्भात जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली आहे/होती.निवृत्तीनंतर मी कोणत्याही शहरी/नागरी भागात निवास न करता माझ्या जन्मगावी/छोट्याशा खेडेगावी निवास करून सपरिवार राहत आहे. मला वाचनाचा जणू "भस्म्यारोग" झाल्याप्रमाणे पूर्णवेळ वाचक म्हणून सध्या जीवन जगतो आहे. त्यासाठी 60 (मराठी/हिंदी/इंग्रजी) नियत/अनियतकालिकांचा वैयक्तिक वर्गणीदार वाचक झालो आहे. शिवाय झाडीबोली, पोवारी बोली या दोन ऐतिहासिक बोलींच्या चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवत आहे. तसेच महाराष्ट्रातील अन्य बोलींच्या संदर्भात बोली साहित्य चळवळीत सुद्धा सक्रीय भाग घेत आहे.आजवर माझी आठ पुस्तके (चार कविता संग्रह, एक अभंग संग्रह, एक कथासंग्रह, एक संकीर्ण व एक दीर्घ कविता पुस्तक) प्रकाशित झाली आहेत.कदाचित यामुळेच, मी कोणताही अर्ज/आवेदन न करता, महाराष्ट्र शासनाने डिसेंबर-2018 मध्ये माझी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर तीन वर्षाकरिता सदस्य म्हणून नियुक्ती केली असून सध्या मी तेथे सदस्य म्हणून कार्यरत आहे.रामदास स्वामी यांच्या "दासबोध" मध्ये नमूद मूर्खांच्या लक्षणांपैकी एक लक्षण वरीलप्रमाणे पूर्ण करून "मी एक मुर्ख" असल्याचे मी याद्वारे सिद्ध केल्यावरच समोरचे लिखाण करीत आहे. कृपया माझा "मूर्खपणा" ध्यानात घ्यावा ही सविनय विनंती आहे.दि.22.09.2019 ला छत्तीसगढ़ येथील छत्तीसगढ़ मराठी साहित्य परिषद, बिलासपूर द्वारे आयोजित "भाषा व्यवहार : मराठीचे अनुबंध" या एक दिवसीय चर्चासत्राला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली होती. (चर्चासत्राचे आयोजक श्री.कपूर वासनिक हे माझे महाविद्यालयीन जीवनातील वर्गमित्र असल्याने.) त्या चर्चासत्रात बोलताना मुंबईचे श्री.गिरीश पतकी आणि पुण्याचे डाॅ.दामोदर खडसे यांनी त्यांच्या विद्वत्तापूर्ण व्याख्यानात आपल्या द्वारे संपादित व प्रकाशित "महाराष्ट्र दर्शन" या ग्रंथाचा आदरपूर्वक उल्लेख केला होता. मला या ग्रंथाबद्दल थोडीफार पूर्वकल्पना असली तरी त्याच्या एकंदर स्वरूपाबद्दल मी अनभिज्ञच होतो. परंतु वरील दोन्ही मान्यवरांचा अभिप्राय ऐकून मी हा ग्रंथ विकत घेऊन वाचण्या/अभ्यासण्याचे ठरविले. त्यानुसार मी हा ग्रंथ आपल्याकडून मागवला. परवा दि.10.10 ला हा ग्रंथ मला मिळाला. काल 11.10 ला त्यातील आपले "नमन" तथा नागपूर जिल्हा आणि संयुक्त चंद्रपूर-गडचिरोली-भंडारा-गोंदिया जिल्हे यासंबंधीचे दोन्ही लेख वाचले. नागपूर जिल्ह्याचा लेख अप्रतिम झाला आहे, यात वादच नाही. मनोज भाऊ जोशी यांना सलाम!परंतु चंद्रपूर-गडचिरोली-भंडारा-गोंदिया जिल्ह्यांवरील लेखाने माझे मित्र श्री.देवेंद्र गावंडे आणि हे चारही जिल्हे या पाचही-वर "भयंकर" अन्याय व अत्याचार केला आहे, हे सुद्धा मला सांगितले पाहिजे. वस्तूतः देवेंद्र गावंडे हे आजतरी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यावर लिहिण्यासाठी एकमेव सक्षम व अधिकारी व्यक्ती आहेत. पण आपण त्यांच्यावर अतिरिक्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यांचा सुद्धा भार टाकल्याने देवेंद्र गावंडे आणि ते चार जिल्हे अशा पाचही जणां(?)वर आपण अन्यायच केला आहे. आपण आपल्या "नमन" मध्ये नमूद केलेले पहिलेच वाक्य त्यामुळे बिघडले असून ते वाक्य---"महाराष्ट्र दर्शन' हा एक भ्रामक पुस्तकप्रकल्प असून, तो एक फसलेला पुस्तक-प्रयत्नही आहे. महाराष्ट्राचं बहुरंगी दर्शन 'बि'घडविण्याचा प्रयत्न." असे विदारक होऊन माझ्यासारख्या गोंदिया-भंडारा जिल्हा-निवासींकरिता हे अतिशय दुखदायी ठरत/ठरले आहे.देवेंद्र गावंडे सारख्या एका सक्षम व त्याविषयाचा अधिकारी असलेल्या व्यक्तीवर सुद्धा हे अन्याय करणारे आहे.वस्तूतः भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा संदर्भ देण्या/लिहिण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे लिखाण आवश्यक ठरले असते. म्हणजे या जिल्ह्यांतील कचारगड गुहा/गुफा (आशिया खंडातील सर्वात मोठी निसर्गनिर्मित गुफा), मांडोबाई-सूर्यादेव देवस्थान, ससेकरण देवस्थान व या त्रयींतील ऐतिहासिक/मिथकीय संदर्भ, चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले डाकराम/सुकळी, चांदपूर, गायमुख, हाझरा फाॅल, पोंगेझरा, गढमाता(सालेकसा), हलबीटोला(सालेकसा)-सारखी सुप्रसिद्ध देव/निसर्गस्थाने, पुजारीटोला, कालीसराड, सिरपूर, गोठणगाव, बोदलकसा सारखी महत्वाची धरणे, बोंडगांव/देवी, वगैरे ऐतिहासिक स्थळे, यांच्या संक्षिप्त टिपणाने या जिल्ह्यांची खरीखुरी ओळख पटविणे शक्य झाले असते.शिवाय चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांना स्वतंत्र प्रकरणे दिली असती तर देवेंद्र गावंडे हे त्यावर आणखी संदर्भासहीत लिहायला पूर्ण सक्षम व अधिकारी व्यक्ती आहेत. तसे न केल्याने त्यांना या दोन्ही जिल्ह्यांना योग्य न्याय देता आलेला नसल्याने एकप्रकारे गावंडेजींच्या प्रतिभेचाच उपमर्द करण्यात आलेला आहे, असे ध्वनित होते.महोदय,ही टीका किंवा नाराजी नव्हे! याकडे तशा दृष्टीने पाहू नये अशी सविनय प्रार्थना आहे.तथापि आपणास तसे वाटल्यास माझ्या या अव्यापारेषु व्यापार ठरणा-या किंवा लहान तोंडी मोठा घास घेणा-या लिखाणाच्या धृष्टतेबद्दल मला क्षमा करावी ही विनंती."महाराष्ट्र दर्शन" सारख्या संदर्भ-सदृश्य ग्रंथात "अशा" त्रुटी असू नयेत या शुद्ध हेतूने हे कळवीत आहे. तरीसुद्धा आपल्याच भाषेत सांगायचे झाल्यास, ---"...स्वतःला सर्वज्ञ समजणारे पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील लोक महाराष्ट्राबद्दल विशेष अज्ञानी आहेत, असं लक्षात येतं. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक सत्तेची सूत्रं हळूहळू पुण्या-मुंबईपासून दूर सरकू लागलेली असली, तरी 'आपल्याला सर्व काही माहित आहे' असा गंड इथल्या धुरीणांमध्ये अजूनही कायम आहे. ही परिस्थिती फारशी चांगली नव्हे, कारण अपुरी माहिती असण्यापेक्षा जेवढी माहिती आहे ती संपूर्ण आहे असं मानणं घातक!" ---असे/एवढे उद्घृत करून थांबतो.तसदीबद्दल क्षमस्व.□आपला एक (ग्राहक)/वाचक,@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,ता.आमगांव, जि.गोंदिया (अतिपूर्वेकडील विदर्भ)(चलभाष: 7066968350/8766549828(R))~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ता.क.मागे दि.21.03.2019 ला एका ईमेल द्वारे श्री.हेरंब कुलकर्णी यांच्या "दारिद्र्याची शोधयात्रा" या आपणच प्रकाशित केलेल्या भ्रामक, डाटा-विश्लेषणाचा उलटा पिरॅमिड वापरून लिहिलेल्या ग्रंथाबद्दल माझे अल्पबुद्धीचे आकलन कळविले होते. पण अजूनही त्यावर आपणाकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे माझ्या सदरील आकलनावर सुद्धा आपण काहीच प्रतिसाद देणार नाही, याची खात्री असली तरी न राहवल्याने थोडासा बेशरम होऊन लिहून बसलो. कृपया क्षमा असावी.@लखनसिंह कटरे.~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment