लोकान्त ते एकान्त : एक प्रवास (वाङ्मयीन लोकशाहीच्या दिशेने...)//प्रकाशित//साहित्य चपराक//
□लोकान्त ते एकान्त : एक प्रवास.
(वाङ्मयीन लोकशाहीच्या दिशेने...)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वस्तूतः, ही सर्वमान्य वस्तुस्थिती आहे की, नैसर्गिक वाढ झालेले अरण्य आणि लागवड केलेले वन यांच्यात एक अनाकलनीय असा मूलभूत फरक असतो. त्यातील विचरण परिभाषित करता येणार नाही अशा पध्दतीने वेगवेगळे अनुभव प्रदान करीत असते. एखाद्या अभ्यासकाला यासंदर्भात सखोल संशोधन करून ह्या 'फरका'चे नियम, निकष व तर्क-संदर्भ अवश्य शोधता/मांडता येतील. तरी आईन्स्टाईनचा सापेक्षवादाचा वैज्ञानिक सिद्धांत येथेही लागू होत असल्याने त्यावरही मतभिन्नता असण्याचे नाकारता येणार नाही.
याच संदर्भात जेव्हा एखाद्या खेडूत/ग्रामीण तरुणाचे शिक्षणासाठी किंवा जीवनयापनासाठी महानगरात स्थलांतर/विस्थापन(?) होते तेव्हा त्याच्या विचारविश्वात होणारी उलाढाल व उलघाल सुद्धा परिभाषित करणे दुरापास्तच ठरते. ग्रामसंस्कृतीने त्या तरुणावर त्याच्याही नकळत (त्याच्यावर) केलेले/झालेले ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक संस्कार त्याला सहजी पुसता येत नाहीत. आणि त्याचवेळी त्या महानगरीचे इतिहास, भूगोल, संस्कृती आणि परंपरा नाकारू पाहणारे नागरी-संस्कार सुद्धा त्याला पेलावे/झेलावे लागतात. तो तरुण जेथून आलेला तेथील समाज, त्यांची बोली/भाषा, वातावरण, पर्यावरण, संस्कृती-संस्कार या संचिताचे एक गाठोडे त्याच्या भिनलेले असते. आणि ते अतिशय महत्त्वाचे सुद्धा असते. असे असले तरी या अनिवार्य अशा बाबीचा/गोष्टीचा/घटिताचा सुद्धा नव्या दृष्टीने, आपल्या पूर्व-संचितावर महानगरीय तडका मारून, अभ्यास होऊ शकतो, असे त्या तरुणाला कळू/उमजू शकले तर तो या सर्व अनुभव-स्थितीला आत्मविश्वासाने सामोरा जाऊ शकतो व जीवनात यशस्वी होण्याचा आपला मार्ग शोधून घेऊ शकतो. अन्यथा तो न्यूनगंडाने पछाडला जाऊन द्विधा मनस्थितीचा शिकार होऊन जातो व एक उमलते/उमलू पाहणारे जग/जीवन पुन्हा अंधारातच गडप होऊ लागते.
ग्रामसंस्कृतीतले असे नव-महानगरीय(?) प्रतिभाशाली तरुण शोधून त्यांना न्यूनगंडातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी ही मुख्यतः प्रस्थापित साहित्यिकांचीच असते/असावी. पण बहुतेक प्रस्थापित साहित्यिक मात्र हस्तिदंती मनो-यातूनच समाजदर्शनाला व तदनुषंगिक आपल्या लिखाणाला आपले ध्येय व इप्सित मानत असल्याचे दृष्टोपत्तीस येते. तशातही एखाद-दुसरा ग्रामीण तरुण इतिहास, परंपरा, संस्कृती आणि नवता यांच्या समन्वयाद्वारे स्वतःला सावरून महानगरवासी होतो, आणि त्याचवेळी महानगरीय चकाचौंधला भुलून स्वतः स्वनिर्मित चकव्यात फसून पुन्हा न्यूनगंडाने ग्रसित होऊ लागतो. त्याला, त्याचेच भाऊबंद असलेले, दुसरे खेडूत/ग्रामीण तरुण/व्यक्ती मागासलेले(?) वाटू लागतात. तो महानगरीय मेनकेला व भुलभुलैयाला अगतिकपणे शरण जाऊन हळूहळू वांझ-निर्मितीला पूरक ठरू लागतो. अशावेळी अशा पथभ्रमित तरुणांना सांभाळून, समजावून, वस्तुस्थितीची जाण करून देऊन त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी आजतरी कोणतीही सक्षम व सुयोग्य यंत्रणा वा व्यवस्था (काही सन्माननीय अपवाद वगळता) दिसून येत नाही. त्यामुळे उमलणारी व उमलू पाहणारी/शकणारी प्रतिभा बहुतेक वेळा कळी-पूर्व अवस्थेतच सुकू लागल्याचे हताशपणे पहावे लागते.
नरहर कुरुंदकर म्हणतात की, श्रद्धांच्या पराभवातून नवे विचार जन्माला येतात. याच संदर्भात माझे अल्पबुद्धीचे आकलन असे की, इतिहास, परंपरा, संस्कृती यांचा बोझा हा भार म्हणून डोक्यावर स्वार करून घ्यायचा की इतिहास, परंपरा, संस्कृती यांचा पाया म्हणून उपयोग करून घ्यायचा; याचे यथायोग्य तारतम्य, महानगरीय प्रस्थापित व तरुण साहित्यिकांपेक्षा खेडूत/ग्रामीण तरुण अशा साहित्यिक प्रतिभेला अधिक असते/समजते. ही वस्तुस्थिती कटू वाटत असली तरी सत्य आहे, हे तटस्थ व निरपेक्ष निरीक्षक/अभ्यासकाला नाकारता येणार नाही. याच अनुषंगाने आणखी एक निरीक्षण असे की, बहुतेक महानगरीय साहित्यिकांनी/बुद्धीमंतांनी भारतीय/मराठी/हिंदी भाषेतील शेवटचे वाचलेले पुस्तक, शेवटचे व्यक्त केलेले मत शोधता येईल काय? हे महानुभाव इंग्रजी वाचणार, इंग्रजी बोलणार ! अशांनी शुद्ध भारतीय समस्या आणि तदनुषंगिक साहित्य यावर भाष्य करणे व त्या साहित्यातील तर-तमपणा ठरविणे म्हणजे सुताने स्वर्ग गाठण्याचा प्रयासच नव्हे काय?
त्याचप्रमाणे नैसर्गिक तथ्याच्या अवकाशात तटस्थ व निरपेक्षपणे डोकावले असता हे स्वयंस्पष्ट होते की, सर्वसाधारणपणे महानगरीयांचे उत्पन्न व/वा राहणीमान कोणत्याही प्रकारे जमिनीशी, शेतीशी, पावसापाण्याशी, अकाली पडणा-या गारपिटीशी, पुराशी, अवर्षणाशी, वगैरे संबंधित वा अवलंबून नसते. परंतु दुसरीकडे खेडेगावात मात्र ज्यांना शेती संबंधात घडणा-या नैसर्गिक, (पूर, दुष्काळ, अकाली पाऊस आणि गारपिटी, इ.), आर्थिक, राजकीय घटनांची प्रचंड झळ बसते; तरी शासनाची आर्थिक, सामाजिक, राजकीय धोरणे त्यांना अनुकूल नसतात; अशांची अभिव्यक्ती पूर्णतः वेगळ्या स्वरूपाची, वेगळ्या धाटणीची, वेगळ्या श्रेणी(!)ची, वेगळ्या व्याकरणा(?)ची असणे क्रमप्राप्तच नव्हे तर निसर्गानुकूलही आहे/असते. अशी खेडूत प्रतिभा जेव्हा वर म्हटल्याप्रमाणे, विविध कारणांनी, महानगरीय होऊ लागते तेव्हा तो एकप्रकारे तिचा लोकान्तातून एकान्ताकडे घडून येणारा दुर्गम व दुर्लांघ्य असा प्रवासच असतो, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. अशा या प्रवासात "ती" प्रतिभा टिकवून ठेवणे, ही त्या प्रतिभाशाली खेडूतासाठी व महानगरीय साहित्यिकांसाठी सुद्धा एक महादुष्कर अशी प्रक्रिया/परीक्षाच ठरते. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणारी-- (1)खेडूत-प्रतिभा न्यूनगंडाने ग्रसित होऊन हळूहळू संपू लागते तर (2)महानगरीय प्रस्थापित साहित्यिक हस्तिदंती मनो-यात विराजमान होऊन आपला अहंगंड पोसत वांझ रचनाच प्रसवत बसतात.
असे असले तरी या परीक्षेत उत्तीर्ण होणारे अत्यल्प संख्या असलेले प्रतिभाशाली खेडूत आपला एक विशिष्ट ठसा साहित्य क्षेत्रात उमटवून जातात. त्यांच्या या प्रयत्नांना व कृतीशीलतेला महानगरीय साहित्यिकांपैकी सच्चे व प्रामाणिक साहित्यिक साह्यभूत ठरून आपले साहित्यिक म्हणून असलेले विहित कर्तव्य पार पाडण्यात धन्यता मानून धन्य होतात. पण हे/अशांचे प्रमाण मराठी साहित्य विश्वात अत्यल्पच असल्याने मराठी साहित्याला इतक्या वर्षात फक्त चारच ज्ञानपीठ मिळू शकलेत. (त्यातील काही ज्ञानपीठाची "हकीकत" समजून घेण्यासाठी श्री.दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या तद्विषयक आठवणी वाचणे सुद्धा मनोरंजक(!) ठरावे.)
तर अशी ही लोकान्त ते एकान्त अशा प्रवासाची, साठा उत्तराची, संक्षिप्त कथा-कहानी आहे.
माझे हे संक्षिप्त टिपण वाचून एखाद्याला मी काहीतरी विचित्र व असंबंद्ध लिहिलेय असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने स्पष्ट करू इच्छितो की, लोकशाही ही फक्त राजकीयच नसते/नसावी. राजकीय लोकशाही सोबतच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन(साहित्यिक) लोकशाही सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते. आणि मला येथे वाङ्मयीन/साहित्यिक लोकशाही बद्दल प्राथम्याने व प्राधान्याने विचार मांडावयाचे आहेत. कारण आजच्या या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)च्या उत्तराधुनिकोत्तर व सत्योत्तर (पोस्ट ट्रूथ/Post TRUTH) च्या ग्लोकल युगात/वातावरणात/प्रकाशात वाङ्मयीन लोकशाहीचे अनुपालन सुद्धा अत्यंत महत्त्वाचे व अनिवार्य ठरू लागले आहे. अशा या आजच्या व्यामिश्र काळातील साहित्य-लेखन सुद्धा काळसापेक्ष होत असल्याने काही जुने संदर्भ तथ्यशून्य व संदर्भशून्य सुद्धा ठरू लागतात, हे विसरता येणार नाही. आणि असा "बदल" महानगरीय अनुभवाच्या तुलनेत ग्रामीण/खेडूत अनुभवात अधिकच, अमुलाग्र झालाय, हे सत्य प्रकट करणे, हा सुद्धा माझ्या या टिपणाचा एक उद्देश आहेच. वस्तुतः महानगरीय अनुभव-बदल मुख्यतः वैयक्तिक स्वरूपाचे असतात तर खेडूत/ग्रामीण अनुभव-बदल हे वैयक्तिक +सामाजिक असे द्विदल स्वरूपाचे असतात/आहेत, हे सुद्धा लक्षणीय, विचारणीय आहे. असो.
(शब्द संख्या सुमारे 850)
[ता.क. :- या टिपणातील खेडूत, ग्रामीण हे शब्द उपहासात्मक नसून आदरसूचक अर्थाने वापरलेत, हे कृपया लक्षात घ्यावे.]
□
@लखनपाल सिंह कटरे,
बोरकन्हार-441 902, ता.आमगांव, जि.गोंदिया
(चलभाष:-7066968359)//31.07.2019//
<lskatre55@gmail.com >
(प्रकाशित : साहित्य चपराक, मासिक, पुणे, दिवाळी विशेषांक-2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment