आळंदी आणि योगिराज ज्ञानेश्वर : एक स्वानुभव

आळंदी आणि योगिराज ज्ञानेश्वर : एक स्वानुभव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      माझी कन्या आणि जावई वाकड येथे वास्तव्याला असल्याने मी वर्ष-सहा महिन्यातून एकदा तरी वाकड(पुणे) येथे येत असतो. आळंदी हे वाकड वरून सुमारे 35-40 किमी वरच असूनही व वेळ उपलब्ध असूनही मी आजवर आळंदी ला जाऊ/भेट देऊ शकलो नव्हतो.

     म्हणूनच आज दि.14 जानेवारी 2020 ला अगदी ठरवून व पूर्वनियोजन करून आळंदी ला जाऊन/भेट देऊन आलो. पण तेथे जाऊन/भेट देऊन मी चूक केली असे मला आता वाटत आहे. कारण ज्ञानेश्वर हे लोकोत्तर मानव आणि मानवी प्रज्ञा तथा कर्तुत्वाचा एक उदात्त आविष्कार असल्याची जाण आम्ही(बहुसंख्य) गमावून बसलो की काय, अशी शंका त्यामुळे माझ्या मनात उद्भवून मला अकारणच मनस्ताप घडला.

    आम्हा(बहुसंख्य) भारतीयांना देव या संकल्पनेचा इतका सोस आहे की आम्ही कोणत्याही दगडाला सुद्धा देव करून टाकतो. येथे तर योगिराज, भगवद्गीतेचे यशस्वी भाष्यकार, अद्भूत प्रज्ञावान अशा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधीचे स्थळ ! अशा पवित्र स्थळाला आम्ही "देवस्थान" करून टाकल्याचे म्हणूनच आश्चर्य वाटत नसले तरी मनस्ताप मात्र होतोच. योगी अरविंद यांचे एक विधान असे आहे की, We, the INDIANS are SERIOUS PATIENT of THINKOPHOBIA! याचा भावार्थ असा की आम्ही भारतीय लोक "विचार करायला घाबरण्याच्या" भयंकर/गंभीर रोगाने ग्रस्त आहोत. आणि म्हणूनच आम्ही शतकोंशतके पारतंत्र्यात खिचपत पडलो होतो, असेही योगी अरविंद यांचे पुरक विधान आहे.

      आळंदी आणि तेथील योगिराज ज्ञानेश्वर यांची संजीवन समाधी यांना भेट दिल्यावर आम्हाला त्यातून सकारात्मक प्रेरणा घेता आली पाहिजे. पण त्याऐवजी आम्ही (बहुसंख्यांकांनी) संत ज्ञानेश्वर यांना "देव" करून टाकल्याचे मला तेथे जाणवले. आणि देव म्हणजे मानवी-शक्ती/क्षमतेच्या पलीकडील अति-मानवी/दैवी संकल्पना असे आम्ही मानत असल्याने आम्ही स्वतः "ज्ञानेश्वर होण्याची" प्रेरणा घेण्याऐवजी आम्ही तेथे ज्ञानेश्वरांकडे ऐहिक भोग व साधने मागत त्यासाठी तसे नवस बोलतो. पर्यायाने आम्ही(बहुसंख्य) प्रत्यक्ष आळंदी ला जाऊन आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधीला भेट देऊन तेथेच त्या प्रज्ञावंत, गीता-भाष्यकार, लोकोत्तर ज्ञानेश्वर यांचाच अपमान करीत असतो, असे मला वाटून गेले.

     आणि म्हणूनच मी तेथे गेलो नसतो तर ते बरेच झाले असते, प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांच्या समक्ष/सान्निध्यात ज्ञानेश्वरांचा अपमान पाहण्याचा मनस्ताप टळला असता, असे मला वाटते.

     असो. या टिपणामुळे एखाद्याची भावना दुखावली गेल्यास अगदी अग्रिम क्षमाप्रार्थी असल्याचे प्रकर्षाने नमूद करतो. क्षमस्व.

@लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया
(विदर्भ-महाराष्ट्र) //14.01.2020//
~~~~~~~~~~~~~~\~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन