छू लेने दो......

*छू लेने दो......*
-----------------------
       १९६९-७० मधील एक घटना आठवते तशी सांगण्याचा प्रयत्न करतोय. 
       तर झाले काय की, आमच्या गावातील जि.प.पूर्व माध्यमिक शाळेत एक शिक्षक बदलून आले. त्यावेळी शिक्षक मंडळी शाळेच्या गावातच सपरिवार निवास करीत व त्यांच्या पुष्कळशा गरजा तो-तो गाव निशुल्क पूर्ण करीत असे. त्या शिक्षकांनी आमच्या वाड्यात राहण्याची इच्छा व्यक्त केली. आमच्या वाड्यात तोवर कधीही कोणाही व्यक्ती किंवा परिवाराला राहण्याची परवानगी माझ्या वडीलांनी दिली नव्हती. पण या शिक्षकांचा स्वभाव, त्यांची शिकविण्याची शैली यांनी प्रभावित होऊन वडिलांनी त्यांना आमच्या वाड्यातील एक खोली (कोणत्याही भाड्याशिवाय) रहायला दिली. त्या शिक्षकांच्या धर्मपत्नीलाही लवकरच आमच्या गावच्या शाळेतच शिक्षिकेची नोकरी मिळाली. त्या शिक्षकांनी त्यांच्या एका लहान बंधूला सुद्धा शिक्षणासाठी सोबत ठेवले होते. हा लहान बंधू आठव्या वर्गात होता. आमच्या गावात आठवी नसल्याने तो लहान बंधू जवळच्याच अंजोरा या तीन किमी वरील गावातील शाळेत जाऊ लागला. मी त्यावेळी नवव्या वर्गात होतो व आदर्श विद्यालय आमगांव या सहा किमी वरील निमशहरी गावातील खाजगी शाळेत शिकत होतो. हा लहान बंधू शरीरयष्टीने अगदीच हाडकुळा असल्याने तो प्रत्यक्षात चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यासारखाच दिसायचा. त्याची व माझी चांगलीच गट्टी जमली, जी आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.
     या लहान बंधूला निसर्गानेच सुमधूर आवाजाची देणगी दिली होती. तो हिंदी सिनेगीत खूप सुंदर गायचा. एका सायंकाळी माझ्या वडीलांना त्याचे गायन ऐकण्याची इच्छा झाली. मी त्या लहान बंधूला वडीलांच्या कचेरी(?)त बोलावून आणले व तो बाबूजींच्या आदेशानुसार गायला लागला. दोनेक गीतानंतर त्याने "छू लेने दो नाजूक ओठोंको...." हे तत्कालीन मशहूर सिनेगीत गायला सुरवात केली. बाजूच्याच खोलीत वास्तव्याने असलेले त्याचे वडील-बंधू (शिक्षक), ते गीत ऐकून तडक तेथे आले व त्या लहान बंधूला ते गीत थांबविण्यास फर्मावले. मग बाबूजींनी सुद्धा त्या शिक्षकांच्या निर्णया(!)ला संमती दर्शवली. गुरुजी एवढेच म्हणाले की, "या वयात अशी गीते गायची नसतात."
     मला व त्या गायक लहान बंधूला यामागील कारणमीमांसा त्याकाळी, त्या वयात समजण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून आम्ही दोघे गुरुजींच्या या निर्णया(!)वर बेहद्द नाराज होतो.
      काही वर्षांनंतर आम्हाला "कारणमीमांसा" कळू लागली व माझ्या मनातील त्या गुरुजीविषयीचा राग गायब झाला. 
     आज २०१८ मध्ये या सर्व बाबी कालबाह्य झाल्यात/ठरल्यात. मागासलेपणाच्या, गावंढळपणाच्या द्योतक ठरू लागल्यात. शिक्षण-तज्ज्ञ श्री.हेरंब कुलकर्णी यांचे मत जरी आमच्या या जुन्या बुरसटलेल्या मताशी जुळत असले किंवा सहाव्या-सातव्या वर्गातील मुले-मुली (विद्यार्थी-विद्यार्थिनी?) यांची प्रेमप्रकरणे मोठ्या प्रमाणात सापडत असल्याचे सर्वेक्षण असले किंवा अगदी बारा-तेरा वर्षांच्या मुली गर्भवती राहत(?) असल्याच्या घटना घडत असल्या किंवा त्याच वयाची मुले बलात्कारादि प्रकरणात सामील असल्याचे आढळून येत असले तरी आमचे विचार बुरसटलेले(?)च आहेत, हे आम्हाला नाईलाजाने मान्य करावेच लागेल. 
     विषय मोठा आहे, गहन की काय म्हणतात तसा आहे, तरी आमच्यासारख्यांच्या अरण्यरुदनाला काहीही अर्थ नसल्याने इथेच थांबतो. जय हो, जय जय हो!
□□
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902.
~~~~~~(१०.१२.२०१८)~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन