औरस-चौरस असेही......!
□औरस-चौरस : असेही□
~~~~~~~~~~~~~~
आम्हाला स्वतंत्रता आणि स्वायत्तता यातील फरक अजूनही समजलेलाच नसावा, असे माझे अल्पबुद्धीचे आकलन आहे. या पृथ्वीवर "मी" एकमेव/एकटा नसून माझ्यासारखेच दुसरा, तिसरा, चौथा,... , हजारावा, ....., लाखावा,......कोटीवा....., असेही आहेत. निसर्गसंमत घटकत्वाच्या सिद्धांता(System Theory)नुसार या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव, निर्जीव प्राणी, वस्तू, इत्यादी कुठल्यातरी समूहाचा/ची घटक आहे. या समूहाशिवाय कोणत्याही घटकाचे अस्तित्व स्वतंत्र नाही. आणि घटकत्वाच्या सिद्धांतानुसार सुक्ष्मतम ते महत्तम हे घटकानुक्रम डावलताच येत नाहीत. मी -> कुटुंब -> समाज -> ...राज्य -> राष्ट्र -> जग हा घटकानुक्रम डावलून "मी" स्वतःलाच कुटुंब, समाज, ...राज्य, राष्ट्र, जग समजू लागतो तेव्हा मी माझ्या निसर्गसंमत मनुष्यत्वाचा त्याग करून तथाकथित (अनैसर्गिक) व्यक्तीस्वातंत्र्याच्या भ्रामक भोव-यात सापडलेला असतो.
मानवी मेंदूचा अभ्यास करणारे वैज्ञानिक सुद्धा मेंदूतील प्री-फ्रण्टल कोर्टेक्स चा अभ्यास मांडताना मनुष्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याऐवजी विवेकाधारित, भावनाभारित, स्वयंशिस्तपोषक स्वायत्ततेच्या प्रशिक्षणाची अनिवार्यता प्रतिपादित करताना आढळतात. निसर्गाच्या घटकत्वाचा सिद्धांत सुद्धा अशीच मांडणी करतो. ही वैज्ञानिक दृष्टिकोनाने संपुष्ट तथा घटकत्वाच्या सिद्धांताने समर्थित संकल्पना भारतीय संस्कृतीच्या मांडणीला पूरकच आहे.
परंतु भारतातील असह्य उन्हाळ्यातही थ्रीपिस स्यूट अनिवार्य असलेल्या पाश्चात्य-संस्कृती-पोषक मनोवृत्तीला ही भारतीय संकल्पना पेलवतच नाही. (येथे मी पाश्चात्य वेशभूषेवर टीका करीत नसून वृत्तीबद्दल बोलतोय, हे कृपया ध्यानी घ्यावे!)
व्यक्तीस्वातंत्र्य ही स्वयंपूर्ण, स्वयंसिद्ध, निरपेक्ष/निरंकुश अशी संकल्पना नसून ती परमतसहिष्णू व परजीव-सापेक्ष/सांकुश अशी व्यामिश्र संकल्पना मात्र आहे, ही #कटू-वस्तुस्थिती स्वीकारणे आजच्या या सत्यपश्चात/सत्योत्तर/POSTTRUTH च्या युगात कठीण असली तरी अनिवार्य ठरत आहे, असे माझे अल्पमतीचे आकलन आहे.
त्याऐवजी स्वायत्तता या संकल्पनेत विवेक, भावनाशीलता, स्वयंशिस्त यांचा अनिवार्य अंतर्भाव असल्याने स्वायत्ततेचा अंगीकार करणे मला अत्यावश्यक वाटते. बाकी, यथेच्छसि तथा कुरु.
भूल-चूक, देणे-घेणे.
@लखनसिंह कटरे, (झाडीपट्टी)
(21 ऑक्टोबर 2018)/2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment