वर्ग 9 वा, आदर्श विद्यालय आमगांव. (1969)
वर्ग 9 वा, आदर्श विद्यालय आमगांव. (1969)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझे साडे पाचवी (?) पर्यंतचे शिक्षण आमच्या बोरकन्हार या गावातील इंग्रजकालीन पक्के बांधकाम असलेल्या जि.प.च्या प्राथमिक शाळेच्या इमारतीतच झाले. दिवाळी नंतर जि.प.ने आमच्या गावातील सहाव्या वर्गाच्या मान्यतेला मंजूरी नाकारल्याने आम्हाला सहाव्या वर्गात दिवाळी नंतर 03 किमी वरील अंजोरा येथील जि.प.च्या पूर्व माध्यमिक शाळेत प्रवेश घ्यावा लागला. अंजोरा येथे आठव्या वर्गापर्यंतच सोय असल्याने मला नवव्या वर्गासाठी सहा किमी वरील आमगांव या निमशहरी गावातील रास्वसं च्या विचारधारेने प्रणित/प्रेरित आदरणीय लक्ष्मणराव मानकर गुरूजींच्या आदर्श विद्यालय या शाळेत प्रवेश घ्यावा लागला.
आठव्या वर्गात मला सायकल मिळाली असली तरी सातव्या वर्गापर्यंत मी पायीच व चप्पल-बुटाविनाच शाळेत जायचो. तत्कालीन अकरावी हायर मॅट्रीक उत्तीर्ण होईपर्यंत मी चप्पल-बूट वापरत नसे, तशी "फॅशन" अजून आमच्यापर्यंत पोचली नव्हती. तर नवव्या वर्गात मला आमगांव च्या आदर्श विद्यालयात प्रवेश मिळाला.
या शाळेत खाकी हाफपॅण्ट व पांढरा हाफ शर्ट असा गणवेश सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य होता. पण आठव्या वर्गापर्यंतचा माझा ड्रेस म्हणजे फूटभर बाॅटम असलेला झोलझाल पांढरा किंवा पट्ट्यापट्ट्याचा पायजमा व तसाच झोलझाल पण गुडघ्यापर्यंत लोंबणारा हाफ शर्ट असाच होता. कधीकधी हाफपॅण्ट सुद्धा वापरात असायचा, पण शर्टाच्या लांबीत तो दडून जायचा. शर्ट इन करायची मला लाज वाटायची. असाच पायजमा व शर्ट घालून मी पहिल्याच दिवशी आदर्श विद्यालय आमगांव येथे नवव्या वर्गाचा विद्यार्थी म्हणून दाखल झालो. आणि आजच्या भाषेत सांगायचे तर मी तेथील शहरी विद्यार्थ्यांद्वारे भयंकर रित्या ट्रोल झालो.
गणवेश शिवण्यासाठी आमगांव येथील कच्छी कापड दुकानदाराच्या दुकानात बसणा-या धनालकोटवार या आमच्या क्राॅफ्ट टिचर कडे दिले असले तरी त्यांनी तो अजून शिवून दिला नव्हता. पहिल्याच दिवशी माझ्या ड्रेसमुळे मी ट्रोल झाल्याने मी दोनेक दिवस शाळेत गेलोच नाही. पुढच्याच रविवारी आमचा गडी लोंढू मेंढे याच्यासोबत मी सायकलने डबलसीट आमगांवला गणवेश आणण्यासाठी टेलरकडे गेलो. वडीलांनी शिलाईचे नेमके पैसे दिले होते. ते पैसे देऊन तो एकुलता एक गणवेश टेलरकडून दोनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर घेतला व गावी येण्यासाठी निघालो. तर सायकलचे मागचे चाक पंक्चर झालेले.
त्यावेळी (1969 मध्ये) पंक्चर दुरूस्तीसाठी चार आणे/पंचेवीस पैसे लागायचे आणि आमच्याजवळ तर दमडीही नव्हती. आता सायकल ढकलत पायीच गावी परतण्याशिवाय पर्याय नव्हता. लोंढू सायकल ढकलू/ओढू लागला व मी मागेमागे चालू लागलो. ऊन तापले होते, जीवाची लाही लाही होत होती. सहा किमी पायी जायचे होते.
अशा संकटकालीन समयी मी माझ्या आईच्या शिकवणीनुसार मनातल्या मनात हनुमान चालीसाचा पाठ करीत असे. त्याप्रमाणे मी पाठ करू लागलो व या संकटातून मार्ग मिळावा/दिसावा, अशी हनुमंताला प्रार्थना करू लागलो.
आता गांधी प्रतिमा असलेल्या आमगांवच्या चौकात आल्यावर माझी नजर अचानक खाली पडलेल्या एका रुपयाच्या नोटवर गेली. मी संकोचाने ती नोट उचलू शकलो नाही, पण लोंढूने पटकन ती नोट उचलली. आणि आम्ही रिखीराम महाराजांच्या सायकल दुकानात जाऊन पंक्चर दुरूस्तीसाठी सायकल दिली. त्याच दुकानाला लागून एक फॅण्टावाल्याचे दुकान होते. एक फॅण्टा चार आण्याला मिळायचा. आम्ही एक-एक फॅण्टा प्यायलो. जूनचा शेवटचा आठवडा असावा, फॅण्टाच्या थंडाव्याने थोडी तरतरी आली. पंक्चर दुरूस्तीचे चार आणे दिल्यावरही आमच्याकडे अजून चार आणे उरले होते.
पंक्चर दुरूस्तीच्या दुकानात एक रिक्शावाला आला आणि सांगू लागला की, चौकात कोणाचे तरी काही रुपये सांडले असावेत, तेथे त्याला सहा रुपये सापडले. मला मात्र फक्त एकच रुपया दिसला होता व आम्ही तो उचलल्याने आमची समस्या दूर झाली होती. मला आजही प्रश्न पडतात की, त्या चौकात पैसे सांडवणारा तो कोण असावा? आम्हाला आमच्या गरजेपुरता फक्त एकच रुपया कसा दिसला असावा? मला आणि लोंढूला बाकीचे नोट का दिसले नसावेत? या योगायोगाला काय बरे म्हणावे? (455)
(माझ्या आगामी आत्मकथनात्मक लेखसंग्रहासाठी)
□
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
जि.गोंदिया (04.10.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment