भगवद्गीता आणि मी...

बोरकन्हार-441902, जि.गोंदिया, दि.27.09.2019
@लखनसिंह कटरे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
□*भगवद्गीता आणि मी ...!*
~~~~~~~~~~~~~~~
          माझा जन्म फेब्रुवारी-1955 चा. तीन-चार वर्षांचा होईपर्यंत मला माझ्या आईने देवनागरी बाराखडी व शंभरपर्यंतचे पाढे लिहायला वाचायला शिकवले होते. 1959 च्या जून मध्ये मला पहिल्या वर्गात दाखला मिळावा म्हणून माझ्या वडिलांनी आपल्या राजकीय व पोलीस पाटीलकीचा प्रभाव(?) टाकूनही, मला सहा वर्षे पूर्ण न झाल्याने पहिल्या वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. तरी मी आमच्या शेजारच्या शांता भांडारकर या चौथीतील मुलीसोबत शाळेत जायचो. आणि तत्कालीन पहिली-पूर्व "तुकडी"च्या वर्गात बसायचो. माझ्यासोबत आणखी काही विद्यार्थी होते. किती होते, कोण कोण होते, हे मात्र आठवत नाही. असा दोन वर्षे मी "तुकडी" च्या वर्गात अधून-मधून जायचो.

      अखेर मला सहा वर्ष चार महिने पूर्ण झाल्यावर जून-1961 मध्ये मला पहिल्या वर्गात दाखला/प्रवेश मिळाला. तोवर मला थोडे थोडे लिहिता-वाचता यायला लागले होते. एप्रिल-1963 च्या दुस-या वर्गाच्या वार्षिक परीक्षेनंतरच्या उन्हाळी सुटीत मी हिंदीतून सुखसागर, प्रेमसागर, स्त्रीप्रबोधिनी आणि मराठीतून पांडवप्रताप कथासार व रामविजय/रामायण कथासार (नावे नीट आठवत नाही, क्षमस्व.) यांचे वाचन केले. माझ्या आईनेच माझ्याकडून हे वाचन करवून घेतले.

       एप्रिल-1964 च्या तिसरीच्या वार्षिक परीक्षेनंतरच्या उन्हाळी सुटीत (मे-जून 1964 मध्ये) मी हिंदीतून महाभारताचे वाचन केले. महाभारत हा ग्रंथ आमच्या घरी उपलब्ध नसल्याने माझ्या ताऊंकडून मागून तो ग्रंथ मी पहिल्यांदा वाचला. तेव्हा सर्वप्रथम माझी गीतेशी तोंडओळख झाली. या पहिल्या वाचनात मला गीता समजली, असे बालिश विधान मी करूच शकत नाही. पण गीतेबद्दल "काहीतरी विशेष" मला अबोध मनात जाणवले असावे असे मला आज वाटते. कारण 1964 मध्ये विनोबा भावे यांची पदयात्रा आमगांव येथे आली होती त्यावेळी मी माझ्या वडिलांसोबत विनोबाजींना पहायला गेलो होतो. त्यावेळी विनोबाजींची पुस्तके पंचायत समितीच्या आवारात विक्रीसाठी ठेवली होती आणि गीता-प्रवचने खरेदी केल्यास विनोबाजी तिच्यावर स्वाक्षरी करतील, असे कळल्याने मी अन्य काही पुस्तकांसोबत गीता-प्रवचने सुद्धा खरेदी केली. तात्काळ वडिलांसोबत विनोबाजींना भेटून नमस्कार केला आणि पुस्तक स्वाक्षरी साठी त्यांच्या पुढे धरली. त्यांनी मला "तुला हे पुस्तक कळेल काय", असे काहीतरी कौतुकाने विचारल्याचे स्मरते. त्यांनी पुस्तकावर स्वाक्षरी(?) केली व पुस्तक मला परत करून पुस्तक अवश्य वाचण्याबद्दल सुचविल्याचेही पुसटसे आठवते.

      मी ते पुस्तक वाचले. पण त्यावेळी, त्या वयात, त्यातले काय समजले, हे सांगता येणार नाही. पण कुठेतरी खोल काहीतरी रूतले असावे असे आज वाटते. त्यानंतर कदाचित 1968-69 मध्ये तरुण भारत मध्ये आचार्य रजनीश यांच्या संबंधात उलट-सुलट बातम्या, लेख आल्याचे अंधुकसे स्मरते. मी जबलपूर हून प्रकाशित होणा-या व आचार्य रजनीश द्वारे संपादित होत असलेल्या एका हिंदी नियतकालिकाचा वर्गणीदार वाचक झालो व त्यातून रजनीशांचे गीतेवरील प्रवचने वाचू लागलो. तेव्हा गीतेचा काही वेगळाच अर्थ कळू लागला.

     अशातच मुंबईच्या अवधूत शास्त्री यांच्या द्वारे संपादित मराठी मासिक "धर्मभास्कर" चा वर्गणीदार वाचक झालो. त्यातील माहितीनुसार मसुराश्रम कडून पहिल्या वर्षी ज्ञानेश्वरी व दुस-या वर्षी दासबोध मागवून त्यांची पारायणे केली. हे दोन्ही ग्रंथ मला विनामूल्य पण दोन अटींवर मिळाले होते. त्या दोन अटी म्हणजे, (1) वर्षभर दररोज 120 सूर्यनमस्कार घालायचे आणि (2) वर्षातून किमान तीन वेळा त्या ग्रंथांची पारायणे करावीत. मी या दोन्ही अटी मान्य करून हे ग्रंथ मिळविले होते. ही घटना 1970-72 दरम्यानची असून त्याकाळी त्या पारायणातूनही मला ज्ञानेश्वरी कळली नव्हती. पुढे मी "ज्ञानेश्वर" या नियतकालिकाचाही वर्गणीदार वाचक झालो.

      याच कालावधी दरम्यान 1969 ते 1980 पर्यंत मी पुणे येथील गीता धर्म मंडळाच्या "गीतादर्शन" मासिकाचाही वर्गणीदार वाचक झालो होतो. त्यामध्ये एक निवृत्त न्यायाधीश श्री.रानडे यांचे गीतेवरील प्रवचन-लेख प्रकाशित व्हायचे, ते सुद्धा मी वाचत असे.

     रामकृष्ण मिशन, रायपूरच्या तत्कालीन "विवेक ज्योति" या हिंदी नियतकालिकाचा व अरविंद आश्रम, पांडेचेरी येथून प्रकाशित होणारे "पुरोधा" हे हिंदी मासिक यांचाही मी वर्गणीदार वाचक झालो होतो.

      अशातच मी शिक्षक असताना 1983 मध्ये दहाव्या वर्गाच्या/SSC च्या भौतिक शास्त्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाह्य-परीक्षक म्हणून दिघोरी (ता.लाखांदूर, जि.भंडारा) येथे गेलो असता हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या एका शिक्षकाने मला लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य भेट दिले. यथामति त्याचेही वाचन करता आले. 

     गोरखपूर च्या "कल्याण" मासिकाचा वर्गणीदार वाचक असल्याने त्यांच्याकडील गीताभाष्य सुद्धा मागवून वाचले. दुर्गा भागवतांच्या वाल्डनकाठी या अनुवादित पुस्तकातून हेन्री डेव्हिड थोरो आणि त्याचे गीताविषयक विचार सुद्धा कळू शकले. 

      अशातच माझ्या मेव्हणीने आनन्दमूर्ति गुरुमाँ यांच्या प्रवचनाने निर्मित श्रीमद्भगवदगीतेचे हिंदीतील तीन विशाल खंड मला दिले. त्यांच्या वाचनाने गीतेचा आणखी एक वेगळाच अर्थ गवसला, असे म्हणता येईल. 

     1969 ते 1972 या माझ्या तत्कालीन HSC च्या अभ्यासक्रमात पं.विश्वनाथ पंडित ह्या त्यावेळी वयाची ऐंशी पार केलेल्या व वयोमानामुळे तोंडात एकही दात शिल्लक नसलेल्या संस्कृत विद्वानांनी मला संस्कृत शिकविले असल्याने मला थोडेसे संस्कृत येते/समजते. या माझ्या अल्पबुद्धीचा वापर (गैरवापर?), मी गीतेतील संस्कृत शब्दांना 'माझा अर्थ' देण्यासाठी करण्याची धृष्टता करीत असतो. माझ्या या धृष्टतेचा धूडगूस माझ्या लिखाणात (विशेषतः कवितेत) सुद्धा चालू असतो.

     शिवाय डाॅ.राधाकृष्णन्, राजगोपालचारी यांच्या लिखाणाच्या हिंदी अनुवादातूनही मला गीतेची ठेच लागतच राहिली आहे. 

     अशाप्रकारे गीता मला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रूपात भेटतच गेली व आजही तिची ठेच अधूनमधून लागतच असते.

      वि.रा.जोगळेकर यांनी मराठीत प्रथमच अनुवादित केलेला लुई फिशर यांचा "महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ" हा ग्रंथ मागवला असून त्याच्या वाचनातून पुन्हा महात्मा गांधी आणि गीता यांची ठेच लागणे सुरू झाले.  

    म्हणूनच आठवली तशी ही गीता-कथा, गीतेतील कोणत्याही प्रतिपादनाचा उल्लेखही न करता, सांगाविशी वाटली. कृपया ही साठा-उत्तराची कथा अर्ध्याच किंवा त्यापेक्षाही कमी उत्तरात समजून घ्यावी ही विनंती. 

(शब्द संख्या सुमारे 615)

@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन