काही कटूतम, काही गोड ...

काही  कटूतम, काही गोड...

~~~~~~~~~~~~~~~~

1)प्रमेय (कवितासंग्रह--जानेवारी:1996)

2)जाणिवेतले कर्कदंश (कवितासंग्रह--ऑक्टोबर:2000)

3)एकोणिसावा अध्याय (कथासंग्रह--मे:2001)

4)शाश्वत मौनाचे स्वगत (अभंगसंग्रह--जून:2002)

5)आदिम प्रकाशचित्रे (कविता-रेखाटने-संग्रह--ऑक्टोबर: 2004) 

6)शब्दार्थांचे आधार निष्फळ (कवितासंग्रह--एप्रिल:2005)

7)लेक नि विवेक (संकीर्ण--ऑक्टोबर:2007)

8)इतिहास आढळत नाही (दीर्घ कविता--ऑक्टोबर:2018)

    अशी एकूण आठ पुस्तके माझ्या नावावर आहेत. ही सर्व पुस्तके मी स्वखर्चाने प्रकाशित केली आहेत.(🤔🤔🤔😀😀😀) या आठ पैकी कमाल शंभरेक पुस्तके विक्री झाली असावीत, पण त्यांची "किंमत" मात्र माझ्यापर्यंत अजूनतरी पोचलेली नाही. ही काही नवलाईची वा अचंब्याची गोष्ट(?) नाही. ही सर्वविदित सत्य-वस्तुस्थिती  आहे!

     अनुभवाने मनुष्य शहाणा होतो, असे म्हणतात. त्याप्रमाणे माझे शहाणपण उगवले तेव्हा मी पुस्तक विक्रीचा "छंद"(?) सोडून पुस्तक भेटीवर व वाटपावर लक्ष केंद्रित केले. कलकत्ता/कोलकाता येथून, तेथील एका प्रसिद्ध महाराष्ट्र मंडळाने एक पुस्तिका प्रकाशित करून संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर विदेशातीलही महाराष्ट्र/मराठी मंडळांचे पत्ते इच्छुकांना पुरविण्याचे महत्कार्य केले आहे. सुमारे पंचेवीस-तीस वर्षांपूर्वी ही पुस्तिका प्रकाशित झाली असून तेव्हाच मी ती पुस्तिका मागविली होती. त्या पुस्तिकेतून देश-विदेशातील महाराष्ट्र/मराठी मंडळांचे व साहित्यिकांचे तथा प्रकाशन विश्व मधून महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांचे व वाचनालयांचे पत्ते घेऊन मी त्यांना माझी पुस्तके अवलोकन, अभिप्राय व यथाशक्य समीक्षणार्थ भेटस्वरूप पाठविल्यात/पाठवीत असतो. 

     त्यानुसार काहींच्या/चे सकारात्मक, प्रोत्साहक आणि ईगो सुखावणा-या प्रतिक्रिया/अभिप्राय आलेत/येतात. काही मोजके नकारात्मक प्रतिसादही आलेत/येतात. पैकी सकारात्मक प्रतिसाद देणा-या बहुतेकांना मी त्यांच्याप्रती आभार प्रकट करणारे पत्रोत्तर सादर केले/करतो. पण नकारात्मक प्रतिसादाची मी दखल घेतली असली/घेत असलो तरी त्यांना पत्रोत्तर मात्र दिले नाही/देत नाही.

    हे सर्व मी का लिहीतो आहे असा प्रश्न एखाद्याच्या मनात उद्भवू शकतो. त्यामुळे माझ्या या आलतू-फालतू लिखाणामागची कारणमीमांसा अशी सादर करतो की,--- 

मी जर माझ्या कमाईचे, माझ्या खिशातील पैसे खर्च करून एखादे पुस्तक, नियतकालिक, अनियतकालिक खरेदी करून वाचत असेल व त्या वाचनातून माझे समाधान व/वा मला आकलन-सुखप्राप्ती होत नसेल तर मी तसे त्या पुस्तक, नियतकालिक, अनियतकालिकाच्या निर्मात्याला प्रश्न विचारून आपले विहित समाधान करून घेण्याचा मला नैतिक व कायदेशीर अधिकार असून "त्या" निर्मात्याने माझे समाधान करून देणे हे "त्या" निर्मात्याचे कर्तव्य असून त्याच्यावर ते नैतिक व कायदेशीर रित्या बंधनकारक सुद्धा असते. असे न घडल्यास तो नैतिक व कायदाधारित अपराधच ठरतो. 

      परंतु मला ते पुस्तक, नियतकालिक, अनियतकालिक कोणतेही पैसे खर्च न करता भेटस्वरूप मिळाले असेल तर मला त्यावर "प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार" असला तरी लेखक, प्रकाशक, संपादक यांनी त्यावर उत्तर/खुलासा/स्पष्टीकरण/निवेदन दिलेच पाहिजे, हे त्या लेखक, प्रकाशक, संपादकावर नैतिक व/वा कायदेशीर रित्याही बंधनकारक नाही/नसावे/नसते. 

      मी एखाद्या नियतकालिक/अनियतकालिकाचा आपल्या खिशातील, आपल्या कमाईचे पैसे खराचून वर्गणीदार वाचक असेल आणि त्यात प्रकाशित कोणत्याही साहित्याबद्दल माझ्या मनात काही शंका व/वा प्रश्न असतील तर त्याचे समाधानकारक निराकरण व/वा स्पष्टीकरण होणे/मिळणे, हे त्या वर्गणीदार वाचकाच्या स्वाभाविक अधिकारात मोडते आणि त्याची यथाविहित पूर्तता करणे हे त्या मालक, संपादक, प्रकाशकाचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य असून ते त्याच्यावर परमावश्यकरित्या बंधनकारक असते. 

      त्याचप्रमाणे मी त्या नियत/अनियतकालिकातून प्रकाशनार्थ काही लिखाण/मजकूर पाठवला, तर तो स्वीकारणे व/वा नाकारणे हा त्या नियत/अनियतकालिकाच्या मालक, प्रकाशक, संपादकांचा परमाधिकार असतो आणि त्यांच्या या स्वाभाविक अधिकाराच्या संदर्भात मी किंवा अन्य कोणीही प्रतिवाद करणे हे माझे/त्याचे अज्ञान व नासमजपणाचे द्योतकच असते. परंतु असे आमंत्रित वा अनाहूत लिखाण नाकारताना काही कारणे देण्यात येत असतील तर ती कारणे तकलादू, भ्रामक, आभासी, खोटे, मानभावीपणाचे, ताकाला जाऊन भांडे लपवण्याच्या पद्धतीचे नसावे, यात दुमत असूच शकत नाही. कोणत्याही कारणाशिवाय सुद्धा नकार कळविता येतो, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "मौज"चे माजी संपादक आदरणीय श्री.श्रीनिवास विनायक कुलकर्णी सर. त्यांच्या बारीक, सुंदर हस्ताक्षरातील नकार/साभार परत म्हणजे एक अत्यंत सुंदर व सभ्य संस्कृतीचे साकार उदाहरणच असायचे. 

     परंतु असे अपवाद खूप म्हणजे खूपच दुर्मिळ असल्याचा इतिहास व वर्तमान म्हणजे मराठी साहित्याच्या सुदृढ व सक्षम प्रकटीकरणावर साचलेला "जंग"च आहे जणू! 

     मला अशाप्रकारे नकार/साभार परत कळवण्यात आल्यावर त्यात काही कारणमीमांसा नमूद असली तर मी त्या नकार/साभार परतीच्या "मालका"चे सारे साहित्य मागवून वाचतो, त्यातून त्यांच्या विचाराची/विचार प्रकटीकरणाची दिशा शोधतो. आणि त्यांची ही दिशा आणि नकार/साभार परतीसोबतच्या कारणमीमांसेची दिशा कशी विपरीत, विसंगत आहे, हे साधार, पुराव्यानिशी दाखवून देतो. तेव्हा मोठ मोठे नाव असलेले साहित्यिक, प्रकाशक, मालक, संपादक, समीक्षक उघडे पडतात व माझा कायम दुस्वास करू लागतात. याचे लेखी पुरावे माझ्याकडे अजूनही उपलब्ध आहेत.

     नियत/अनियतकालिकाच्या मालक, प्रकाशक, संपादक व वर्तुळात मावणारा समीक्षक यांच्या टोळीचा गँगस्टर-सदस्य होणे/असणे हे अतिशय महत्त्वाचे क्वालिफिकेशन माझ्यासारख्यांजवळ नसल्याने सुद्धा आलतू-फालतू, तकलादू, भ्रामक, आभासी, खोटी कारणे दर्शवून लिखाण नाकारणे/साभार परत करणे ही मराठी प्रकाशन जगताची व एकांगी विचारडबके सांभाळून बसलेल्या अ-विचारवंतांची मक्तेदारी मराठी साहित्याच्या प्रांतात भयानक रूप धारण करून स्थानापन्न झाली असल्याचे दिसून येते. आणि असे असल्यानेच कृत्रिम व परपुष्ट/परतंत्र साहित्यलेखनाला सध्या सुगीचे दिवस आले असून नाविण्यपूर्ण व गंभीर अशा स्वायत्त व स्वतंत्र साहित्याला बेकारी/भिकारीचे दिवस आल्याचेही दिसून येते. 

     याच संदर्भात मला असेही वाटते की, एकतर माझे नाव लखनसिंह आणि आडनाव कटरे, हे दोन्ही नाव-शब्द मराठी माणसाला खूप खूप विचित्रच वाटत असावेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील चंबळच्या खो-यात एकेकाळी भयानक उच्छाद व धुमाकूळ मांडलेल्या/घातलेल्या, कुऽकुऽऽकुप्रसिद्ध असलेल्या, डाकू लाखनसिंगाचे नाव धारण करणारा हा कुठला दुसरा चंबळचा डाकू, शिवाय आडनाव कटरे, म्हणजे कापणारा की काय? अशा समजूतीने सुद्धा गफलत होत असावी. नाहीतर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील मराठीचे प्राध्यापक राहिलेल्या व अत्युत्कृष्ट कथा लिहिणा-या चाहल आडनावाच्या एका सिंहाला (अजितसिंह चाहल यांना) मराठी साहित्याच्या प्रांतात प्रवेश नाकारला गेला नसता. 

     तर अशी ही साठा उत्तराची कथा संक्षिप्त रूपात संपवतो आहे. यथावश्यक बोध घेता आल्यास घ्यावा अन्यथा 'जा उडत', म्हणून चुपचाप बसावे, ही विनंती. 

@लखनसिंह कटरे, 

बोरकन्हार-441902, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)

(7066968350)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)