एक कन्फेशन (न्यूनगंडाचे चक्रव्यूह)
*एक कन्फेशन (न्यूनगंडाचे चक्रव्यूह)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
1965 मध्ये मी दहा वर्षाचा असतानापासूूनच मला ग.त्र्यं.माडखोलकरांच्या संपादकत्वाखालील नागपूर "तरुण भारत" नियमित वाचण्याची सवय लागली होती. रविवारची पुरवणी व दिवाळी विशेषांक वाचून मला मराठी वाचनाचा नादच लागला. त्यापूर्वी आईच्या पुढाकाराने मी हिंदी धार्मिक ग्रंथ (रामायण, महाभारत, स्त्री-सुबोधिनी, ... आदि) वाचले होते. पण मराठी वाचनाची सवय मात्र "तरुण भारत" ने च लावली. रविवारच्या तरुण भारतात विविध नियतकालिकांच्या जाहिराती प्रकाशित व्हायच्या. अशाच एका जाहिरातीनुसार मी 1968 मध्ये "ललित" मासिकाचा वर्गणीदार वाचक झालो. 1969 मध्ये पुण्याच्या गीता धर्म मंडळाच्या "गीतादर्शन" मासिकाचा आणि 1970 मध्ये मुंबईच्या अवधूत शास्त्री यांच्या "धर्मभास्कर" मासिकाचा वर्गणीदार वाचक झालो. त्यानंतर 1980 पर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे द्वारे प्रकाशित "महाराष्ट्र साहित्य पत्रिका", मराठी संशोधन मंडळ, मुंबई द्वारे प्रकाशित "भाषा संशोधन पत्रिका", नागपूरच्या डाॅ.ब.स.येरकुंटवार यांचे "प्रज्ञालोक", विदर्भ साहित्य संघ, नागपूर द्वारा प्रकाशित "युगवाणी", मौज प्रकाशन गृह द्वारे प्रकाशित "सत्यकथा", वसंत दावतर यांचे "आलोचना", आंध्रप्रदेश मराठी साहित्य परिषद हैदराबाद च्या द.पं.जोशी सरांद्वारे संपादित "पंचधारा", नागपूरच्या वा.वि.मिराशी यांच्या द्वारे संपादित विदर्भ संशोधन मंडळाचे "संशोधन वार्षिक", पं.सातवळेकरांचे "पुरुषार्थ", ... आदि नियतकालिकांचा वैयक्तिक वर्गणीदार वाचक झालो.
यातून प्रकाशित होणा-या साहित्याद्वारे माझे मराठीकरण होऊ लागले असले तरी "ललित" मधून ओळख झालेल्या आनंद यादवांच्या "गोतावळा" इतके कोणतेही साहित्य माझ्या प्रत्यक्ष जीवनाशी व जगण्याशी मला Relate मात्र होत नव्हते.
1970-71 दरम्यान मी दहावीत असताना माझ्या आदर्श विद्यालय आमगांव च्या स्नेहसंमेलनाच्या हस्तलिखिताचे मला, माझ्या सुंदर(!) अक्षरांमुळे व वाचनवेडामुळे, संपादक नेमण्यात आले. त्यावेळी नुकताच आमगांव-गोंदिया रोडवर एका खाजगी बसचा अपघात झाला होता व त्याची हृदयद्रावक बातमी वर्तमान पत्रातून प्रकाशित झाली होती. त्या घटनेला आधाराला घेऊन मी "अपघातग्रस्त बसची आत्मकथा" अशी एक कथा त्या हस्तलिखितासाठी लिहिली. पण त्यातील बसचे स्त्रीलिंगी आत्मकथन व कथेची सुदृढ(?) मांडणी पाहून/वाचून आमच्या पालक शिक्षकाने मला विचारले की, मी ही कथा कुठून चोरली? पण आमच्या वर्गशिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांनी माझी बाजू घेऊन ही कथा चोरली नसून मीच लिहिलीय हे सांगितले. अखेर ती कथा आमच्या हस्तलिखितात माझ्याच हस्तक्षरात सामील झाली. पण डिसेंबर 1971 च्या भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या बांगला मुक्ति युद्धामुळे त्यावर्षीचे स्नेहसंमेलन रद्द करण्यात आले. अखेर 1972 च्या स्नेहसंमेलनाच्या वेळी गो.नी.दांडेकर यांच्या हस्ते त्या हस्तलिखिताचे प्रकाशन(!) करण्यात आले. मी त्यावेळी आदर्श विद्यालय आमगांव चा विद्यार्थी राहिलेला नव्हतो. तत्कालीन अकरावी हायर मॅट्रीक उत्तीर्ण होऊन मी धोटे बंधू सायंस काॅलेज गोंदिया येथे बी.एससी.(PCM) प्रथम वर्षाचा विद्यार्थी होतो.
1980 पर्यंत ललित, मराठी साहित्य पत्रिका, आलोचना, गीतादर्शन, धर्मभास्कर, सत्यकथा, युगवाणी, प्रज्ञालोक, भाषा संशोधन पत्रिका, पंचधारा, पुरुषार्थ, ... आदि 14-15 नियतकालिकांचा मी नियमित वर्गणीदार वाचक झालो असलो तरी माझे कोणतेही लिखाण, साधे पत्र सुद्धा कोणत्याही नियतकालिकात प्रकाशित केले जात नव्हते. मी सुद्धा भयंकर न्यूनगंडाने ग्रस्त असल्याने मला माझ्यातच काहीतरी "कमी" आहे, असे वाटायचे. माझ्या लिखाणात दमच नसल्याने माझे साधे पत्र सुद्धा प्रकाशित होत नाही, अशी भयंकर न्यूनगंडाची भावना मला व्यापून होती. गीतादर्शन या मासिकाने अखेर माझ्या पाठपुराव्याला मान देऊन त्या मासिकात वाचकांच्या पत्रव्यवहाराला जागा द्यायला सुरुवात केली आणि अगदी पहिले पत्र माझेच प्रकाशित केले. पण इतर कोणत्याही मराठी नियतकालिकात मात्र माझ्या पत्राची/लिखाणाची साधी दखल सुद्धा घेण्यात येत नव्हती. पर्यायाने मी आणखीनच न्यूनगंडाने ग्रस्त व्हायचो.
अशातच मी पुन्हा हिंदी भाषेकडे वळलो. दिल्ली हून प्रकाशित एक मासिक पत्रिका, "प्रकाशित मन" चे विद्वान संपादक दयानंद वर्मा आणि टाईम्स ऑफ इंडिया चे हिंदी साप्ताहिक "दिनमान" चे संपादक सर्वेश्वरदयाल सक्सेना यांनी मात्र 1975-76 पासून, मी फक्त 20 वर्षांचा असतानाही सन्मानाने वागवून माझे हिंदी लिखाण/पत्रें आवर्जून प्रकाशित केली व पत्रोत्तर देऊन माझा उत्साह वाढवला आणि हळूहळू माझ्यातील न्यूनगंड पूर्णतः धूवून काढायला मला मदत केली. वर नमूद दयानंद वर्मा यांचा "यौन व्यवहार अनुशीलन" हा ग्रंथ जागतिक स्तरावर नावाजला गेला होता व खुद्द आचार्य रजनीश यांनी या ग्रंथाची भलावण केली होती, हे विशेष मी विशेषत्वाने नमूद करू इच्छितो. आणि सर्वेश्वरदयाल सक्सेना यांच्या बद्दल हिंदी वाचकाला काही सांगण्याची आवश्यकताच नाही, एवढे हे "नाम" सुप्रसिद्ध व सुप्रतिष्ठित होते/आहे. हिंदीतील अशा गणमान्य व साहित्य-समृद्ध व्यक्तींचा माझ्या जीवनातील चंचूप्रवेश(!) मला माझ्या साहित्य विषयक न्यूनगंडातून बाहेर पडण्यासाठी साह्यभूत ठरला, हे आज मी अभिमानाने सांगू इच्छितो. लाडनूं, राजस्थान येथून विद्वान जैनमुनी आचार्य तुलसी यांच्या कृपाछत्राखाली, तेरापंथी जैन समुदायाद्वारे प्रकाशित होणारी ज्ञान व साहित्य समृद्ध हिंदी मासिक पत्रिका "युवादृष्टी" , नेमीचंद जैन यांच्या संपादकत्वाखाली इंदोर, मध्यप्रदेशातून प्रकाशित होणारी उत्कृष्ट हिंदी मासिक पत्रिका "तीर्थंकर", कलकत्ता येथून प्रकाशित होणारी इंग्रजी पुरातत्व-प्रमुख त्रैमासिक पत्रिका "Jain Journal", कलकत्ताहूनच प्रकाशित होणारे आनंद किंवा अमृत बाजार पत्रिकेचे हिंदी साप्ताहिक "रविवार" यांनी सुद्धा माझ्या ओबडधोबड लिखाणाची/पत्रांची दखल घेऊन व प्रसिद्धी देऊन माझ्यातील न्यूनगंड घालविण्याला मदत केली आहे. या सर्वांचा मी सदैव ऋणी राहीन.
(परंतु MPSC मार्फत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित सेवेत आल्याने/आल्यावर अकस्मात 1984 नंतर मी हिंदी शी जणू फारकतच घेतली व मराठी कडे पूर्णत्वाने वळलो. MPSC मध्ये माझा एक ऐच्छिक विषय मराठी साहित्य होता व मिळालेले गुण 78/100 होते(?!?) असो.)
आम्ही-तुम्ही गावखेड्यातून आलेले व्यक्ती जेव्हा काही लिखाण करू लागतो, व त्यात काही स्फूल्लिंग दिसू लागले तर अशा खेडूताला पूर्णतः डावलून नामोहरम करणे किंवा त्याला आपल्या कळपा(?)त ओढून त्याला आपला शिष्य करून टाकणे, ही मराठीच्या मुंबई, पुणे सारख्या पुढारलेल्या(?) भागातील प्रस्थापित/तथाकथित साहित्य-सम्राटांची व साहित्य-मार्तण्डांची रणनीती/व्यूहनीती समजून घेणे आमच्यापैकी भल्याभल्यांना जमत/जमलेले नाही. शिवाय असे शिष्यत्वाकडे झुकलेल्या किंवा झुकू लागलेल्या आमच्या खेडूतांना कितीही ओरडून सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या कानावर जूं रेंगत नाही, ही शोकांतिकाच आहे.
अशी ही आमची भू-सांस्कृतिक न्यूनगंडाची कर्मकथा असून आम्ही अजून तरी या चक्रव्यूहातून पूर्णपणे बाहेर पडू न शकल्याने आमचा अभिमन्यू करणे "त्यांना" सहज शक्य होत असते.
□
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया//03.09.2019//
□□□
(ता.क. :- रामदास स्वामी यांनी त्यांच्या "दासबोध" मध्ये सांगितलेल्या मूर्खांच्या लक्षणांपैकी "स्वतःची तारीफ स्वतःच करणे" या लक्षणाचे अनुपालन करीत माझ्या वाटचालीबद्दल येथे लिहिणे भाग पडले, त्यासाठी मी क्षमाप्रार्थी आहे. क्षमस्व. 🙏🙏🙏)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment