ग्रामगीता आणि शाश्वत विकास : एक टिपण
बोरकन्हार-441902 दि.05.01.2019
------------------------------------------------------------------
*ग्रामगीता, सहकारी अर्थरचना आणि शाश्वत विकासाच्या धोरणाचे सर्वंकष प्रारूप*
-------------------------------------------------------------------
◇राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (30.04.1909-11.10.1968)
◇माणिकदेव मंजूळादेवी बंडोजी(नामदेव) गणेशपंत इंगळे
◇तीर्थयात्रा :- काशी, प्रयाग, ओंकारेश्वर, हरिद्वार, पुष्करराज, पशुपतिनाथ(नेपाळ), आदि दूरस्थ तथा रामटेक, चिमूर, तपोभूमी गोदंडा, महारण्य ताडोबा, रामदिघी, आदि निकटस्थ तीर्थक्षेत्रे,
◇आडकोजी महाराज, लष्करीबाबा, वसिष्ठ महाराज, दादाजी धूनीवाले आदि अनेक संतांच्या भेटी व कृपा
◇ग्रामगीता : प्रत्येकी पाच पाच अध्यायांचे आठ पंचक = 40 अध्याय + ग्रंथमहिमा हा 41 वा अध्याय = 41 अध्याय (४६७३ ओव्या)
◇तिस-या ग्रामनिर्माण पंचकातील अध्याय 11, ग्रामरक्षण आणि अध्याय 13, ग्रामनिर्माण कला : भारतीय संस्कृती व सर्वांगीण, शाश्वत, सम्यक विकासाचे प्रारूप.
◇सहकार ही अति प्राचीन अशी मूळ भारतीय संकल्पना, एकूणच शाश्वत, सम्यक अशा सर्वांगीण स्वरूपाच्या, देश व समाज विकासाचा एकमेव सकस व सक्षम पर्याय/प्रारूप असल्याचे या ग्रंथातील या दोन (11 व 13) अध्यायातून राष्ट्रसंतांनी पुनश्च अधोरेखित केले आहे.
◇विकासाचे जे प्रकार सांगितले जातात, ते असे :- सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, व मानवी सभ्यता हे पाच प्रकार "विकास" ही आधुनिक संकल्पना स्पष्ट करते. पण हे पाचही विकास साधले तरी शाश्वत, सम्यक, सर्वांगीण विकास मात्र होतोच नाही असे नाही, हे जगाला आता कळून चुकले आहे. विकासाचे वरील पाचही प्रकार "मूळापासून पलायन" व "निसर्गाला ओरबाडणे" या मुख्य गृहीतकांवर अवलंबून/आधारित असतात/आहेत. त्यामुळे आज आपण भकास, भणंग, बेदरकार शहरी झोपडपट्ट्या, पर्यावरणाचे भयानक असंतुलन, महाभयंकर प्रदूषण, पेयजल-संकट, यासारख्या मानवनिर्मित समस्यांना तोंड देता देता मानवी अस्तित्वाच्याच अंतिम टोकावर पोचलो आहोत.
◇अशा आजच्या या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण) च्या माहोलात आमच्यातील मूळ मानवी-वृत्तीच हळूहळू नष्ट होत चालल्याचे आम्ही पाहत आहोत. आजच्या या अमानुष, अंधाधूंद, अमानुषीकरणातून सुटका होण्यासाठी पुनश्च मूळ मानवी-संस्कृतीचे बीजारोपण अनिवार्य ठरू लागले आहे.
◇यावरील एकमेव सक्षम व शंभर टक्के सफल निष्कर्ष देणारा मार्ग हा महात्मा गांधी यांच्या विचारधारेतूनच व तदनुषंगाने राष्ट्रसंतांनी त्यांच्या ग्रामगीतेतून मांडलेल्या विचारांतूनच जातो हे जगाला कळू लागले आहे. अशा या जागतिक दर्जाच्या अर्थशास्त्रज्ञाला मी प्रणाम करतो.
◇वर नमूद केल्याप्रमाणे पाचही विकास-संकल्पना या शाश्वत, सम्यक, सर्वांगीण विकासासाठी पुरेशा नाहीत. मग त्यासाठी काही अन्य मार्ग, काही अन्य संकल्पना आहे काय? हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आणि या प्रश्नाचे शंभर टक्के योग्य उत्तर "होय, आहे!" असेच द्यावे लागेल. तो मार्ग, ती संकल्पना म्हणजे गांधीजी आणि राष्ट्रसंतांनी सूत्ररूपाने मांडल्याप्रमाणे, "परिसर वैशिष्ट्यांचा विकास" (Development of the LIKE of the AREA) हा/ही होय. (सहकाराचा मूलभूत उद्देश सुद्धा हाच आहे.)
◇"भारताच्या स्वातंत्र्या"चा "इंडियाचे स्वातंत्र्य" असा अनर्थकारी अर्थ लावला गेल्यामुळे तत्कालीन व नंतरच्याही राज्यकर्त्यांनी (लालबहाद्दूर शास्त्री, चरणसिंह हे अपवाद वगळता) "शहरीकरण/औद्योगिकीकरण म्हणजेच विकास" असा अशाश्वत, भोंगळ आणि अ-भारतीय प्रारूप स्वीकारून संपूर्ण ग्रामव्यवस्था भकास व नष्ट करण्याचेच काम केले आहे. त्यामुळे विकासासाठी गाव --->> ते तालुक्याचे निमशहर -->> ते जिल्ह्याचे पाऊणशहर -->> ते नागपूर/अमरावती/औरंगाबाद/पुणे/मुंबई/दिल्ली --> ते विदेश अशी विकासदर्शी(?) पलायन व्यवस्था स्थापित झाली. पर्यायाने शहराच्या झोपडपट्ट्या, कचरानिर्मुलन, पेयजल-संकट, पर्यावरण-विनाश, वीज(ऊर्जा)अपव्यय, प्रदूषण, मानवाचे अमानवीकरण,... सारख्या अतिभयंकर समस्या निर्माण झाल्या आणि त्यावरील उपाय अशक्य ठरू लागले.
◇या उलट गांधीजी आणि राष्टसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातील "ग्रामविकास" ही संकल्पना राबविण्यात आली असती तर "पलायन" हे सर्व मानवी समस्यांचे मूळच उखडून फेकले गेले असते. व परिसर वैशिष्ट्यांच्या विकासाद्वारे शेतीविकास --> ग्रामविकास --> नैतिक विकास --> मानवविकास --> औद्योगिक विकास --> संरक्षण-क्षमता विकास --> शहर विकास --> अवकाश-पादाक्रांत विकास --> देश विकास हा शाश्वत, सम्यक, सर्वांगीण विकासाचा यशस्वी-पथ साधून आजच्या अंधाधूंदी, अराजक, अमानवीकरण, पर्यावरण, प्रदूषण, जलसंकट, ऊर्जासंकट, कचरा-संकट,..... आदि समस्याच उद्भवल्या नसत्या. याचे ज्वलंत उदाहरण म्हणून हिरोशिमा, नागासाकीच्या महाभयंकर संकटातून पार पडताना 1947 पासूनचेच (भारताचेही 1947 पासूनचेच प्रयत्न???) जपानच्या स्व-धर्मी यशस्वी प्रयत्नांचे अध्ययन करता येईल आणि "परिसर वैशिष्ट्यांचा विकास" हा नैतिक विकास सुद्धा कसा साध्य करून देतो, ते ख-याखु-या अभ्यासकांच्याही लक्षात येईल.
◇अशा या शाश्वत, सम्यक, सर्वांगीण विकासाच्या प्रमुख सहाव्या घटकाचा (परिसर वैशिष्ट्यांचा विकास / Development of the LIKE of the AREA) विचार करताना राष्ट्रसंताच्या संपूर्ण ग्रामगीतेचे महत्व प्रामुख्याने अधोरेखित होते. त्यातही विशेषतः अकराव्या (11 व्या) "ग्रामरक्षण" अध्यायातील खालील ओव्या मला अतिशय महत्वाच्या वाटतात...
"एकाने कोणी गुन्हा केला | शहाणपण सांगावे सकळांनी त्याला || गुन्हेगार ऐकेनासा झाला | शिक्षा द्यावी गावाने ||२५||
जेथे समजदार प्रलोभनी पडला | सोंग करोनि घोरू लागला || चिमटे घेवोनीच त्याला | उठविले पाहिजे ||२६||
कोळसा साबूने धुवा, उगाळा | परि तो शेवटवरि काळा ||
अग्निसंस्कारी जळता उजाळा | येई त्यालागी ||२७||
म्हणोनि बहिष्कार, असहकार | करोनि त्याचे तोडावे आधार || नाक दाबता तोंड सत्त्वर | उघडो लागे ||२८||
ऐसी सर्वांनी पाठ पुरवावी | जो कोणी गावास बिघडवी ||
ऐकेनासा होता सत्ता प्रभावी || मुक्त करावा गावातुनि ||२९||
उत्तमाचाचि संग्रह बरवा | वाईटाचा निषेध करावा || जराही पनपू न द्यावा | वृक्ष वाईटाचा ||३०||
सर्वांनी झटावे यासाठी | करावी लागेल ती आटाआटी || प्राण गेला तरी संकटी | सहन करावे सेवेस्तव ||३१||
ऐसी असावी गावाची तयारी | तरीच गाव बनेल स्वर्गपूरी || नलगे सत्ताधीशांची तुतारी | पाठीमागे ||३२||
यावर वेगळ्या कोणत्याही भाष्याची आवश्यकता नाही, इतक्या सुस्पष्ट तरी साध्या भाषेत राष्ट्रसंत सांगतात.
◇तसेच तेराव्या (13व्या), "ग्रामनिर्माण कला" या अध्यायात राष्ट्रसंत सांगतात...
"जीवनात यावा सरळपणा | साधा सात्विकतेचा बाणा ||
हृदय-निर्मळतेचा निशाणा | कलावंताचा धर्म हा ||३१||
एरव्ही कला सर्वांनाच येते | कलेवाचूनि नाही रिते ||
तरी तारतम्य पाहिजे तेथे | लोकांपुढे न्यावया ||३२||
कष्ट करोनि आपुल्या हाते | आदर्श करावे घराते ||
असेल जरी झोपडी ते | भासवावी नंदनवन ||३३||
माती मिळवोनि घरे बांधली | परि चुन्यापेक्षाहि सुंदरता आली ||
थोडके पैसे लावोनि केली | रचना सगळी घराची ||३४||
आपुल्यागावीच विटा केल्या | मडकी-सुरया, ओतल्या, भाजल्या ||
कवेलू-कुंड्यासहित निर्मिल्या | आपुल्या गावी ||३५||
लाकडे तासोनि सरळ केली | त्यात सात्त्विकतेची प्रतिभा भरली ||
गावाच्या सुताराला आली | कला आमुच्या ||३६||
गावीच केले हातोडे-खिळे | ऐरणी-कु-हाडी, सापळे, विळे ||
पावडे-कुदळ्या, शिंके आणि सगळे | सामान जीवनाचे ||३७||
दगड फोडोनि फाडी केली | सरळ चिरेदार टापोनि छाटली ||
इमारतीस बसविता दिसली | सुंदर सगळी ||३८||
फडे, झाडणी, चटई, नवार | पलंग, पायपूस, मोटमंदोर ||
सुंदर केले डवरे, वखर | नव्या धर्तीचे ||३९||
.....
असे सर्व ग्रामव्यवस्थेचे घटक, व प्रसंग राष्ट्रसंतांनी देशाच्या तत्कालीन धुरीणांसमोर या "ग्रामगीते"च्या माध्यमातून ठेवले होते. परंतु भारतीयांचे दुर्दैवच की तत्कालीन देश-धुरीण तथाकथित पाश्चात्य आणि हिमनगपृष्ठवाद सिद्ध झालेल्या व सपशेल अयशस्वी ठरलेल्या साम्य/समाजवादाची कास धरणारे होते. आज आपण त्या कु-धोरणांचे महाभयंकर दुष्परिणाम भोगत आहोत. देशाचा पाया असलेल्या अन्नदात्याला सातत्याने लुटण्याचे धोरण राबविल्याने व त्याविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दाद मागण्यासही त्याला 18 जून 1951 च्या पहिल्याच संविधान संशोधनाद्वारे "न्यायबंदी" केल्याने या अन्नदात्याला आत्महत्या हा अ-मानवी पर्याय स्वीकारणे भाग पडत आहे आणि तरी याचे सोयरसूतक देश-धूरीणांना असल्याचे दुर्दैवाने जाणवतही नाही.
अशा या भविष्यद्रष्ट्या अर्थशास्त्री तथा देशाच्या शाश्वत, सम्यक, सर्वांगीण विकासाच्या धोरणाचे जनक, ऋषीसदृश्य प्रेरक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना माझा, एका शेतकरी पुत्राचा प्रणाम!
(शब्द संख्या सुमारे 830)
□
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)/7066968350.
---------------------(05.01.2019)--------------------------------------------
Comments
Post a Comment